अनर्थ !

Submitted by Dr. Satilal Patil on 22 May, 2022 - 05:16

आमावसेची काळीकुट्ट रात्र होती. राकीड्यांची किरकिर तिची भयानकता अजून वाढवत होती. सगळीकडे स्मशान शांतता होती. असणारच!, कारण ते स्मशानच होतं. साधूच्या सांगण्यावरून राजा विक्रमादित्य स्मशानातून झाडावर लटकणारं प्रेत काढायचा. त्याला पाठीवर घेऊन साधूच्या होमकुंडाच्या दिशेने निघायचा. रस्त्यात त्या प्रेतात बसलेल्या पिशाच्चाने त्याला गोष्ट सांगायची, विक्रमादित्याने उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील अशी भीती घालायची. आणि उत्तर दिलं की मात्र मौन भंगल म्हणून प्रेतासह परत झाडावर जाऊन लटकायचं. असा 'चीत भी मेरी, और पट भी' चा पिशाच्ची खेळ सुरु होता.

नुकत्याच निघून गेलेल्या वेताळामुळे हलका झालेला राजा माघारी फिरला आणि परत झाडावर चढून त्याने प्रेत, फांदीवरून खाली उतरवलं आणि त्याला पाठुंगळी मारून निघाला. 'हा! हा! हा! हा! असं विकट हास्य करत प्रेतातील वेताळ म्हणाला. 'राजा, तुझी चिकाटी म्हणजे कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यासारखी आहे, आपल्या हातात कसलंही नियंत्रण नसतांना प्रामाणिकपणे शेतात राबणारा शेतकरी, आणि वेळोवेळी हातातून प्रेत निसटल्यावरसुद्धा परतपरत तीच कसरत करणारा तु, तुम्हा दोघांची चिकाटी सारखीच'. 'राजा काहीच बोलला नाही' त्याला मौनात राहून प्रेत न्यायचं होत. मला माहित आहे राजन, तू बोलणार नाहीस. पण शांतपणे चालत जाण्यात काय मजा आहे. हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून, मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐक.

आटपाट नगरात ज्योतिबा नावाचा एक कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर बागायती शेती होती. बारमाही पाणी देणाऱ्या विहिरींच्या कृपेने हा सुपीक तुकडा वर्षभर पाणी प्यायचा. ज्योतिबाचं सगळं आयुष्य गावातच गेलं. कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासली नाही. शेतात घाम गाळायचा, पहाटे चार वाजता उठून गोठ्यातल्या कामापासून दिवसाला सुरवात करायची. दिवसभर शेतात राबायचं, संध्याकाळी घरी येऊन जेवायचं, रात्री भजनाला जाऊन बसायचं आणि घरी येऊन बिनघोरपणे झोपून जायचं. अश्या आखीव दिनचर्येमुळे तब्बेत उत्तम होती. कधी दवाखान्याची पायरी चढायची वेळ आली नाही.

ज्योतिबावर लहानपणापासूनच महात्मा फुलेंच्या विचाराचा प्रभाव होता. घरच्या परिस्थितीमुळे त्याला जास्त शिकता आलं नाही, पण गावातल्या शाळेत तो दहावीपर्यंत शिकला होता. आयुष्यभर त्याने फुलेंच्या विचारांचा अंगीकार केला.
विद्ये विना मती गेली l
मती विना नीती गेली l
नीती विना गती गेली l
गती विना वित्त गेले l
वित्त विना शूद्र खचलेl
एवढे अनर्थ एका अविद्येने केले....
असं महात्मा फुलेंनी माणसाचं विद्येविना होणारं अवमूल्यन सांगितलं आहे. अविद्येमुळे अवमूल्यन होऊ नये म्हणून ज्योतिबाने मुलाला शिकवलं. पोरगा बारावीपर्यंत शिकला. पुढे शेतकी डिप्लोमा करून, घरची शेती कसायाला आला. त्याला देखील शेतीची आवड होती. पण त्याचं पुस्तकी थेअरी आणि बापाचं प्रॅक्टिकल ज्ञानाचे खटके उडू लागले. 'तुमचा काळ जुना होता, आता शेती आधुनिक झालीये' असं म्हणत तो ज्योतिबाला टोचत राहायचा. ज्योतिबाचा स्वाभिमान त्याच्या या वक्तव्याने दुखावला जायचा. मग तोही 'तुमच्या पिढीला काय कळतंय शेतीतलं, चार बुकं शिकली म्हणजे शेती करता येते का? इथं आमचे काळ्याचे पांढरे झालेत हे काम करतांना, आणि आम्हाला शेती शिकवताय? असं म्हणत आपल्या दुखावलेल्या स्वाभिमानावर मलमपट्टी करायचा. पुढे पोराचे आणि ज्योतिबाचे जरा जास्तच खटके उडू लागले. समजदार बनत ज्योतिबा शेवटी शेतीतून रिटायर झाला. मुलाच्या हातात शेती सोपवली आणि स्वतः आषाढी-कार्तिकीची वारी, संध्याकाळी भजनी मंडळ, अधूनमधून अखंड हरिनाम सप्ताह असं देवधर्माला वाहून घेतलं.

मुलाच्या हातात शेतीचं सुकाणू आल्यावर, त्याने धडाधड बदल करायला सुरवात केली. बैलजोडी परवडत नाही. त्यांचं चारापाणी करा, गोठ्यात सफाई करा, यात फार वेळ वाया जातो. आजकाल ट्रॅक्टर आले आहेत. त्यापेक्षा आपण ट्रॅक्टर घेऊया असं त्याने ठरवलं. 'अरे आपल्या पाच एकर शेतीसाठी कशाला हवा ट्रॅक्टर? त्यापेक्षा भाड्याने आणूया की', असं म्हणत ज्योतिबाने विरोध केला, पण मुलाने तो मोडून काढत कर्ज काढून ट्रॅक्टर दारात आणला. आता बैल गेल्यावर, फक्त गाय आणि म्हशींसाठी कशाला शेण काढत बसायचं. पिशवीतून दूध मिळतंच की, असं म्हणत मुलाने गायम्हैस देखील बाजारात नेऊन विकली.

झंक्साले बरं बैल आणि गायम्हैस यांपासून मिळणाऱ्या शेणामुळे जमिनीला खत मिळायचं. जमिनीचा कस टिकून राहायचा. त्याच खतावर शेतकऱ्याचं आणि बैलाचं अन्न पिकायचं.

दारी ट्रॅक्टर आला खरा, पण घरची आर्थिक घडी विस्कटू लागली.
पण एक ट्रॅक्टर घेतल्याने गणित बदललं. बैल चारा खाऊन शेतात राबायचे. ट्रॅक्टर चारा खाऊन काम थोडंच कारणार होत. त्याला प्यायला डिझेल पाहीजे. वेळोवेळी मेंटेनन्स करायला हवा. त्याचा कर्जाचा हप्ता फेडायला हवा. त्यासाठी पैसे हवेत. गाईम्हशींमुळे घरचं रसायनविरहित दूधतूप मिळायचं. घरातील थोरामोठ्यांची प्रोटीन आणि खनिजांची कमतरता त्यामुळे भरून निघायची. तब्बेती चांगल्या राहायच्या. आता दूधतूप दुकानातून विकत आणावं लागतंय. त्याच्यासाठी कॅश हवी. घरातले गाय बैल शेतातील चारा खाऊन शेण द्यायचे. हे शेण, गोठ्यातील गोमूत्रात भिजलेला आणि अंगणात पडलेला पालापाचोळा वर्षभर उकिरड्यावर पडत राहायचा. वर्षाकाठी उकिरड्यावर बनलेल कंपोस्ट खत दरवर्षी शेतात पडायचं. आता खत दुकानातून आणावं लागतं. तेही रासायनिक. त्यासाठी परत पैसा हवा.

पूर्वी घरच्या शेतातच डाळीसाळी, कांदा, लसूण भाजीपाला उगवायचा. शिरपाच्या गुऱ्हाळावर पायलीभर बाजारी दिली की गुळाची भेली घरी यायची. आपल्या शेतातील तीळ, भुईमूग घाण्यावर नेऊन पिळून आणला की तेल आणि दुभत्या जनावरासाठी पेंड मिळायची. मुलांना खाउसाठीही या प्रोटीनयुक्त पेंडीचा उपयोग व्हायचा. बलुतेदारांना वर्षाकाठी धान्य दिलं की केरसुणी, मडकं, चप्पल यासारख्या वस्तू मिळायच्या. या सर्वासाठी ज्वारी, बाजरी, गहू किंवा तांदूळ हेच चलन होत. शेरपावशेर धान्य दिलं की वाण्याच्या दुकानातूनदेखील हवं ते मिळायचं. एव्हडेच काय पण, ताडी आणि हातभट्टी सारखं देशी पेय विकत घ्यायला देखील हे देशी चलन चालायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे चलन शेतात उगवायचं आणि त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण होती. पैसा गौण होता. पण आता सगळीकडेच पैसे मोजावे लागत असल्याने, पैसे मिळणारी पीकं घेणं भाग होतं. डाळीसाळी, घरासाठी भाजीपाला शेतात येईनासा झाला. मग तो बाजारातून आणणे क्रमप्राप्त होत. आता पैसा मोठा झाला होता. नवीन जमान्यात.

फुलेंची उक्ती नवीन जमान्यात बदलली होती.
ट्रॅक्टर मुळे बैल गेले l
बैला विना खत गेले l
खता विना कस गेला l
निकसा मुळे रसायन आले l
रसायनामुळे परावलंबित्व आले l
एवढे अनर्थ बैल नसल्यामुळे झाले l
'हे राजन, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे! ज्योतिबाच्या मुलाने शेतीत हे आधुनिक बदल घडवणे योग्य होतं का? या बदलांमुळेच त्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली का? मग नवीन तंत्रज्ञान वापरणं अयोग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील हे लक्षात ठेव'.

काही क्षण विचार करून राजा बोलू लागला, 'वेताळा, ज्योतिबाच्या मुलाने परिस्थितीचा अंदाज न घेता आतातायीपणे निर्णय घेतला. जी गोष्ट भाड्याने आणता येते तिच्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी होणं शहाणपणाचं नाही. ट्रॅक्टरघेण्या एवढी त्याची शेती मोठी नव्हती. एकदा का गाडी, ट्रॅक्टर किंवा कोणताही मशीन घरात आलं तर खर्च सुरु होतात. त्याच्या कर्जाचा हप्ता, सर्व्हिसिंग-मेंटेनन्स, पेट्रोल-डिझेलचा खर्च सुरु होतो. खोट्या प्रतिष्ठेपायी खर्च वाढवण्यापेक्षा भाड्याने मशीन घेऊन गरज भागवता येते. कर्जाच्या खर्चाच्या व्याजात ड्राइवरसह कार, ट्रॅक्टर भाड्याने घेता येतो. घरात गोधन असावं. त्यामुळे रसायनविरहित दुधतुप मिळते. जमिनीला खत मिळते. शेतात उगवलेल्या चाऱ्यावर ही जिवंत मशीन काम करतात. आधुनिक आणि पारंपरिक शेतीचा सुवर्णमध्य साधून, आपल्या पिंडाला, हवामानाला मानवेल अशी, मार्केटिंग आणि अर्थशास्त्र सांभाळून सम्यक शेती त्याने करायला हवी होती'.

'अगदी समर्पक उत्तर दिलंस राजन. तुझ्यासारखा राजा मिळाल्यास प्रजेचं नक्की भलं होणार यात शंका नाही. पण तू बोललास आणि फसलास. मौनव्रत तोडलंस. त्यामुळे मी निघालो'. असं म्हणत वेताळ विक्रमादित्याच्या पाठीवरून प्रेतासह उडाला आणि परत झाडावर जाऊन लटकला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा. एकाच वेळी रंजक आणि उद्बोधक ही.
कथेचा हा बाज विशेष आवडला. याच सूत्राचा (विक्रम वेताळ) वापर करून आणखी कथा तुम्ही लिहाव्यात ही विनंती.

<< पुस्तकी थेअरी आणि बापाचं प्रॅक्टिकल ज्ञानाचे खटके उडू लागले >>
<< तुमच्या पिढीला काय कळतंय शेतीतलं, चार बुकं शिकली म्हणजे शेती करता येते का? >>
निव्वळ अनुभव म्हणजे सर्वोत्तम आणि पुस्तकी ज्ञान कुचकामी असे काहीसे मत वाटले या लेखात. ते बरोबर नाही. अन्यथा इस्रायलसारखा देश इतक्या झपाट्याने शेतीत पुढे गेला नसता.

पाच एकर बागायती शेतीसाठी ट्रॅक्टर घेणे हा योग्य निर्णय होता की नाही, ते मला माहीत नाही. पण आता पिढ्यानपिढ्या वाटणी झाल्याने, प्रत्येकाच्या वाट्याला खूपच कमी शेती उरली असेल, असे वाटते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करावी असे वाटते. ते जमत नसेल आणि शेती फायदेशीर नसेल, तर सरळ आपली छोटी शेती कॉर्पोरेटना विकून त्यांच्याकडे नोकरी करावी किंवा दुसरा उद्योगधंदा करावा, असे माझे स्पष्ट मत आहे. शेती हा फार कष्टाचा आणि बेभरवशाचा व्यवसाय आहे.

छान आशय आहे कथेचा.
शेतात राबणाऱ्यालाचं यावर अधिकारवाणीने बोलता येईल.

हे अगदी असेच झालेले आहे आणि त्यामुळे सगळे बिघडलेले आहे. यंत्रांची गरज आहेच पण ती कुठे व किती याचे मार्गदर्शन शेतकर्‍याला मिळाले नाही. ज्यानी द्यायचे ते विक्रेत्यांचे गुलाम, त्याविरुद्ध बोलणारे टोकाची भुमिका घेणारे.. मधल्याम्ध्ये शेतकरी काठिच्या माकडासारखा..

आता घराघरात खरेच तुकड्यात शेती उरलेली आहे. मुळात तुकडे पडले भावाभावात सामंजस्य नसल्यामुळे व पुढचा विचार करायची कुवत नसल्यामुळे. त्यामुळे सामुहीक शेती हा विचार अशक्य आहे.

शेती तुम्ही स्वतः तिथे असाल तरच करण्यात अर्थ आहे... दुसऱ्याला करायला देणे वगैरे प्रकार कामाचे नाहीत..
आम्हीदेखील नव्वद एकर शेती विकली 2017 मध्ये... अजून तरी रिपेन्ट फील नाहीय...

कथेत ज्योतिबाला एकच मुलगा दाखवला आहे. असेच जर खरोखर राहिले असते , तर या गोष्टींच्या तातपर्याला अर्थ राहिला असता

पण प्रत्यक्षात 5 एकरवाल्या ज्योतिबाला 4 मुले असतात, पैकी 2 गावातच , इस्टेटीवरून भांडणारे असतात , त्यातला एक दारुडा असतो,

उरलेल्या 2 मधला एक जिल्ह्याच्या गावी कारकूनकी व दुसरा मुंबईत नोकरी करत असतो

चार वारसांनी मिळून शेताचे 4 वाटे असलेले अप्पेपात्र करून ठेवली की मग गायबैल न परवडणे, ट्रेकटर , रासायनिक खत , नगद पीक हे आपोआपच आवश्यक होऊन बसते.

कथा idealistic आहे , thermodynamics च्या नियमानुसार ideal machine अस्तित्वात नसते.

( अप्पेपात्राची उपमा घरात उच्चारू नये, अप्पे व्हायचे बंद होतात !! Sad )

Sad Sad
Sad Sad Sad
Sad Sad

छान लिहिलंय... हे अतिशय उत्तम प्रबोधन कीर्तन झाले आहे !

Bkack cat म्हणताहेत तसे "अपत्यांची संख्या मर्यादित ठेवावी " हा संदेशही त्यात घेतला तर आणखीन चांगले!

यंत्रांची गरज आहेच पण ती कुठे व किती याचे मार्गदर्शन शेतकर्‍याला मिळाले नाही.
>>>
+७८६

छान आहे कथा. अगदी वास्तव मांडले आहे.
शेतकरी हा खरेच सगळ्यात धाडसी जॉब वाटतो. गेले काही वर्षे जे हवामानात बदल होत आहेत, पाऊसपाणी आणखी लहरी होत आहे, कुठे पूर येतोय तर कुठे गारा पडताहेत, ते पाहून सगळ्यात जास्त वाईट शेतकर्‍यांबद्दलच वाटते.

आमच्याकडं दर दोनतीन वर्षाला दुष्काळ. दुष्काळ पडला तर तेव्हा चारा छावण्या नसायच्या मग शेतकरी बैलगाडी घेऊन साखर कारखाना असलेल्या स्थळी जात. तिथं बैलांना ऊसाचं वाढं मिळवायचं. हाताला रोजगार. ऊस तोडायचा गाडीनं वाहायचा. मग यावर उपाय म्हणून बैलजोडी कमी झाली. आता शेतीला पाणी मिळतं पण लोक बैलांपेक्षा ट्रॅक्टर पसंत करतात. नवीन पिढीला बैलांनी मशागत नको आहे. शेती विकून शेतात बंगला, गाडी हवी असाही काहींचा कल असतो कारण जे नोकरदार आहेत त्यांना गाडी आहे. शेतात बंगला आहे. मग आपल्याला का नको. दुधदुभत्या साठी गाई म्हशी आहेत. एकरी नांगरट खर्च ३-४ हजार सहज येतो. त्यामुळे कल नगदी पिकाकडे जास्त. हमीभाव हा कळीचा मुद्दा आहेच. कधी एखाद्या पीकाचा मेहनतानाही मिळतं नाही. चारदोन वर्षात एखाद्या पीकानं हात दिला तर मागची देणी फेडण्यात जातं. एकंदरीत लोकांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. हल्ली ९०% टक्के लोक ऊस करतात एकरकमी निश्चित पैसे हातात येतात. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा क्षेत्र घटले.