क्रिप्टो ( crypto )

Submitted by मिलिंद महांगडे on 21 May, 2022 - 06:51

" पुढचा प्रवास खूप अवघड आहे . "
" मला कल्पना आहे. "
" तुला खूप त्रास होईल "
" होऊ दे मी तो सहन करेन "
" एकटं रहावं लागेल … "
" मी राहीन "
“ खुप अडचणींचा सामना करावा लागेल . ”
“ मी करेन ”
" परत विचार कर "
" प्रश्नच नाही ! "
" ठीक आहे तर मग … जशी तुझी मर्जी "
" मी तयार आहे …. "
त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं . तिच्या डोळ्यांत त्याला निर्धार दिसत होता . त्याच्या समोर त्याचा लॅपटॉप होता . त्यावर क्षणाक्षणाला बदलणारे आकडे आणि सतत वर खाली होणारा ग्राफ सुरू होता . तो अधीरपणे समोरचे सतत बदलणारे आकडे पहात होता . त्याच्या डोळ्याची पापणीही लवत नव्हती . ती त्याच्या बाजूलाच बसली होती . त्याची घालमेल तिला समजत होती . तिने त्याच्या हातावर तिचा मुलायम हात ठेवला . त्याने काहीसं चमकून तिच्याकडे पाहिलं . तिने डोळ्यांनी दिलासा दिला . त्यानंतर त्याने पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रिनवर लक्ष केंद्रित केलं . नाकावर घसरणारा मोठा चष्मा त्याने पुन्हा व्यवस्थित डोळ्यांवर बसवला . आता त्याने एक ऑर्डर टाईप केली . आणि sell च्या बटणावर कर्सर आणला . समोरचा ग्राफ नवनवीन उंची गाठत होता . त्याचसोबत खाली असलेल्या इंडिकेटर्स कडेही त्याचं लक्ष होतं. तो ग्राफ जसजसा वर जात होता , त्याच्या चेहऱ्यावरील तणाव आणखी वाढत होता. त्याला श्वास घेणं जड जाऊ लागलं तसा त्याने तोंडावरचा मास्क काढून टाकला . आता लवकरच तो क्षण येईल असं त्याला वाटलं . त्याने तिचा हात हातात घेतला . ग्राफ अत्युच्च पातळीवर होता .त्याच वेळी खाली असलेल्या इंडिकेटरकडे त्याचं लक्ष गेलं. तो थोडासा खाली आलेला त्याने पाहिला. हीच ती वेळ ! इंडिकेटरने आधीच सूचना दिली होती . त्याने क्षणाचाही विलंब न लावता sell बटणावर क्लिक केलं. आणि त्यानंतर कड्यावरून धबधबा कोसळावा तसा तो ग्राफ खाली आला . तिने त्याच्याकडे पाहिलं , तोपर्यंत त्याने डोळे मिटले होते ….

₿₿₿

दि - १८ एप्रिल २०२१
रात्रीचे दोन वाजले होते . अमर त्याच्या राहत्या घरी हॉल मध्ये सोफ्यावर बसल्या बसल्याच पेंगत होता . त्याच्या समोर त्याचा लॅपटॉप चालू होता , बाजूला चहाचा कप , ऍश ट्रे मध्ये तीन चार अर्धवट जळलेल्या सिगारेट्स , त्याच्या बाजूला एक नोट पॅड आणि पेन पडलं होतं. अचानक अमरचा फोन वाजला , त्याची रिंगटोन एवढी जोरात वाजली की त्या आवाजाने तो दचकून जागा झाला . आधी तर त्याला त्या फोनचाच राग आला , चांगला डोळा लागला होता अन मधेच हा फोन वाजला . काहीशा वैतागानेच त्याने जडावलेले डोळे कष्टाने उघडत मोबाईल पाहिला , त्याला आणखीनच राग आला .
' हा साला आता कशाला फोन करतोय ? ' त्याने दुर्लक्ष करत फोन कट केला आणि बाजूला ठेऊन दिला . त्याचा डोळा लागतो न लागतो तोच फोन पुन्हा वाजला . वैतागून त्याने फोन घेतला .
" अबे क्या हुआ ? कायको फोन कर राहा है ? रात्रीचे दोन वाजलेत .... चांगली झोप लागली होती यार ... "
" साब , आपका निंद तो अब वैसेभी उडने वाला है " पलीकडून आवाज आला .
" क्या हुआ ? " , अमरच्या डोळ्यांवर अजूनही झोप होती. तो डोळे बंद करूनच फोनवर बोलत होता.
“ बहुत बडा कांड होगयेला है साब ”
" फिरोज , पका मत . क्या है वो जलदी बोल . " अमर वैतागला .
" ओमी मिरचंदानी मर गया ... " पलीकडून फिरोज दबक्या आवाजात म्हणाला .
“ ठीक आहे ना मग … मेला तर मेला . मी काय करू ? ” अमर बेफिकिरीने म्हणाला.
“ साहेब , तुमी नाव नीट ऐकला नाय वाटते … ओमी मिरचंदानी मेssलाsss ”, मेला हा शब्द ताणत फिरोज म्हणाला.
" अरे कोण ओमी मिरचंदानी ? " , वैतागून अमरने विचारलं . आधीच त्याला झोप अनावर होत होती , त्यात फिरोज नक्की कुणाबद्दल बोलतोय हे त्याला कळेना .
" क्रिप्टो कॉईन एक्स … आठवला का ? "
"काय ? काय बोलतोयस तू ? " सोफ्यावर नीट सावरून बसत अमरने अविश्वासाने विचारलं .
" अमर साहेब , जागे झाले की नाही ? मी सांगतो की , ओमी मिरचंदानी मेला आहे ... आणि आपले पैसे पण मेले त्याच्याबरोबर… ! " पलीकडून फिरोज हिंदी सोडून मराठीवर आला आणि अमर ताडकन उठून बसला . त्याच्या डोळ्यावरची झोप आता कुठच्या कुठे उडून गेली होती . एक अनामिक भिती त्याला जाणवली.
" काय बोलतोय तू ? आपले पैसे कसे जातील ? "
" ते काय माहीत नाय , पण आतली खबर हाय की जेवढ्या लोकांनी पैसे लावले होते ते सगळे बुडाले … "
" अरे देवा ... बातमी खरी आहे का पण ? " अमरने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारलं .
" एक हजार एक टक्का ... लै मोठा झोल झालाय असा वाटतोय ... माझ्यावर विश्वास बसत नाही तर अजून पाच घंट्यांनी सकाळच्या बातम्या बघा , तुमची तसल्ली होऊन जाईल ... " म्हणत फिरोजने फोन कट केला . अमरच्या कानांवर विश्वास बसत नव्हता . त्याचा घसा सुकल्यासारखा वाटला त्याला . त्याने बाजूच्याच जार मधून ग्लासात पाणी ओतलं आणि तो घाटघट पाणी पिऊ लागला. ओमी मिरचंदानी , 30 वर्षांचा तो तरुण अचानक मेला ? कसं शक्य आहे ? आता आपलं काही खरं नाही . आपण मेलो आता , गुंतवलेले सगळे पैसे गेले ते वेगळंच ! , पण तो वाघचौरे काय आता आपल्याला सोडणार नाही ... अमर डोक्याला हात लावून सोफ्यावर रेलून बसला .... आता काही त्याला झोप येईल असं वाटत नव्हतं . त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. तो उठला , बाजूच्या कपाटात ठेवलेली रमची बॉटल काढली आणि एक लार्ज पेग बनवला .

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users