आनंद चा रीमेक येतोय

Submitted by गारंबीचा शारूक on 19 May, 2022 - 03:54

धक्का बसला ना ऐकून ?

असाच धक्का बसला होता जेव्हां पहिल्यांदा फेसबुकवर एकाच्या वॉलवर बातमीची लिंक पाहिली. आनंद तसा उशिराच पाहिला. एक तर जन्माच्या आधीचा पिक्चर. त्यात टीव्हीवर पण कधीच आलेला नाही. थिएटर मधे लागलेला आठवत नाही. त्यामुळं जेव्हां युट्यूबवर बघायला मिळाला तेव्हांच पाहिला.

मी कबूल करतो कि शाहरूख खान सोडला तर दुसर्‍या नटाचा हा पहिलाच पिक्चर असेल जो खूप आवडला. यात अमिताभ बच्चन दिसायला एकदमच खप्पड आहे. त्याची अँग्री यंग मॅन इमेज त्याला या पिक्चरमधे सूट झालेली नाही. तो उगीच रागावलेला वाटतो. अँग्री अमोल पालेकर वाटला होता. पण पिक्चर मधे चालून गेला.

तर बातमी वाचून टण्णकन उडण्याचं कारण कि या पिक्चरचा रीमेक होईल असे कधीच वाटले नव्हते. शोलेच्या रीमेकला उडालो ते वेगळ्या कारणासाठी. कारण शोले हा ओव्हरेटेड पिक्चर आहे. काय आहे काय या पिक्चरमधे ? नुसते घोडे इकडून तिकडे पळतात. रीमेक मधे घोड्यांची अ‍ॅक्टींग सेम टू सेम व्हायला त्या ब्रीडचे घोडे आणणार कुठून ? बच्चन या पिक्चर मधे जरा चेहर्‍यावर मांस उगवल्याने चांगला वाटला. संजीवकुमार हे मूळचेच ठाकूर असल्याने त्यांनी ठाकूरची खानदानी लेहजीब वागण्याबोलण्यातून सांभाळली. त्याला अ‍ॅक्टींग म्हणता येईल का ? गब्बरची अ‍ॅक्टींग तेव्हढी टॉप होती. धर्मेंद्र पेक्षा वरूण धवन चांगले काम करतो. त्यामुळे अशा ओव्हरेटेड पिक्चरचा रीमेक पडणारच होता. रामूला हे कळायला पाहीजे होते.

पण आनंद हा एक चांगला पिक्चर आहे. त्यातल्या राजेश खन्नासारखी अ‍ॅक्टींग पुन्हा कुणी करू शकेल असा विचारच मनात कधी आला नाही. आणि जुना आनंद जर माझ्यासारखे नंतरच्या पिढीतले लोक बघू शकतात तर आताच्या पिढीतले पण बघूच शकतात. नवीन काढून हात दाखवून अवलक्षण कशाला ?

पण आता रीमेक येतोच आहे तर यातली पात्रं कोण साकारणार ही उत्सुकता निर्माण झाली. आणि मग विचार करताना लक्षात आलं की राजेश खन्नांकडून त्या वेळी होऊन गेलं. आनंदची भट्टी जमून गेली. त्यामुळं राजेश खन्ना शिवाय आनंद कुणी करूच शकत नाही असा विश्वास तयार झाला. पण असं नाही काही.

Anand.jpg

काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला कल हो ना हो आठवतो ना ? शाहरूख सरांनी त्यात जो अभिनय केलाय त्याला तोडच नाही. राजेश खन्ना काहीच नाही त्यापुढे. कल हो ना हो हा काही आनंदचा रीमेक नाही. देवदास आणि मुकद्दर का सिकंदर असावा तसं आहे. कल हो ना हो जास्त लॉजिकल आहे. यातल्या हिरॉइन्स सुंदर आहेत. लोकेशन्स श्रीमंत आहेत. आनंद मधे सेट्स बघून कंटाळा येतो. कुणीच ग्लॅमरस नाही. एखादे नाटक चालले आहे असे वाटते. याउलट कल हो ना हो हा चित्रपट वाटतो. पिक्चर आणि नाटकात फरक असायला पाहीजे. ऋषीकेश मुखर्जींना ते आनंद मधे जमले नाही. त्या काळात सेट उभारून पिक्चर काढणे म्हणजे भारी समजले जात असणार.

नविन आनंद मधे याचाही विचार करावा लागेल. थोडी अ‍ॅक्शन पण पाहीजे. सध्या आर आर आर, पुष्पा, के जी एफ अशा पिक्चर्सची चलती आहे. त्यामुळे कॅन्सर झालाच आहे तर एखाद्या गँगचा सफाया आनंद करतो अशी भर घातली तर पिक्चर तुफान चालेल.

यात अमिताभ बच्चनच्या डॉक्टरच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनला सहजच घेता येईल. याच न्यायाने राजेश खन्नाच्या रोलसाठी अक्षयकुमारला घ्यायला पाहिजे होतं पण डिंपलकाकूं चा आणि राजेश काकांचा घटस्फोट (मनाने) झालेला असल्याने अक्षयकुमार कॅन्सल ! डोण्ट टेक इट लाइकली अ‍ॅज ह्युमरस सेन्स. आय हॅज किडिंग.

रमेश देव यांचा रोल अजिंक्य देव करू शकतो. सीमा देव यांचा रोल करायला मराठी अ‍ॅक्ट्रेस सई ताह्मणकर आहे. जॉनी लिव्हरचा रोल जॉनी वॉकर करू शकतो. मेट्रन झालेल्या प्रसिद्ध नटीचा रोल बिग बॉस मधे होत्या त्या मराठी कॅरेक्टर आंटी अ‍ॅक्ट्रेस (खाष्ट सासू असतात त्या ) करू शकतात. त्यांचं नावच आठवत नाही. पण काही हरकत नाही. मायबोलीकर हुषार आहेत. ते ओळखतीलच.

आता उरला आनंद.
त्यासाठी शाहरूख सरांसारखा अभिनेता असताना दुसर्‍याला हा रोल देता येऊ शकेल. जेव्हां मूळचा आनंद बनला तेव्हां या पिक्चरचे भाग्य नव्हते कि शाहरूख सर त्याआधी जन्माला येऊन आनंदच्या रोलसाठी उपलब्ध होतील. हे बॉलीवूडचे आणि रसिकांचेही दुर्दैवच. पण आता शाहरूख सर आहेत. प्रत्येक चित्रपटानुसार त्यांचा अभिनय आसामान कि बुलंदीको छू रहा है. आंबा पिकावा तसा अभिनय सुद्धा अभिनयरसाने पिकत चालला आहे.

या पिढीचे भाग्य थोर म्हणून निर्मात्याच्या नातवाला आनंदचा रीमेक बनवायची बुद्धी झाली . ज्याप्रमाणे देवदास मधे शाहरूख सरांनी काम करून दिलीपकुमार यांना विसरायला लावले , डॉन मधे काम करून अमिताभ बच्चन यांचे मार्केट डाउन केले अगदी तसेच नवीन आनंद मुळे राजेश खन्ना यांचा अभिनय लोक विसरून जातील यात शंकाच नाही. अर्थात शाहरूख सरांना काही कारणाने जमले नाही तर स्वप्नील जोशी आहेच कि !

आता उत्सुकता आहे तो कधी येणार याचीच.
आनंद रीमेकला मनापासून शुभेच्छा !

बातमीची लिंक
https://www.news18.com/news/movies/rajesh-khanna-amitabh-bachchans-anand...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जे काही लिहिता ते छान लिहिता पण त्यात त्या शारुख ला का एवढं ओढून ताणून रिलेट करता। बहुदा शारुख च्या नावानेच तुमचा धागा तुम्हाला हजारी गाठून देतो म्हणून टाकता का ??? का सिक्रेटली तुम्हीच शारुख आहात आणि छान मराठीत लिखाण करून असे स्वतःचे गुणगाण गाता। कठीण आहे।

पण त्यात त्या शारुख ला का एवढं ओढून ताणून रिलेट करता। >> श्रास घेतो इतके नॅचरली शाहरूख सरांनी बॉलीवुड व्यापले आहे. एखाद्या माईलस्टोन असलेल्या पिक्चरचा विचार शाहरूख हे नाव घेतल्याशिवाय होऊच शकत नाही. जिथे अ‍ॅक्टींग पण पाहीजे आणि सुप्परस्टार पण पाहीजे तिथे आज कुणाला घेणार ? या प्रश्नाचं उत्तर एकाच नावाजवळ येऊन थांबतं. शाहरूख. त्याला नाईलाज आहे.

बहुदा शारुख च्या नावानेच तुमचा धागा तुम्हाला हजारी गाठून देतो म्हणून टाकता का ??? का सिक्रेटली तुम्हीच शारुख आहात आणि छान मराठीत लिखाण करून असे स्वतःचे गुणगाण गाता। कठीण आहे। >>>> ही कमेण्ट म्हणजे कॉम्प्लिमेण्ट आहे असे मी समजतो. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो शाहरूख खान होणे हे सोपे नाही. मीच शाहरूख असे म्हटल्याने बरं वाटलं तरी त्याने येणारी जबाबदारी पेलण्याइतका मी खंबीर नाही. शाहरूख हे एका जबाबदारीचे नाव आहे. धन्यवाद या कमेण्टसाठी.

जरा शुद्धीत असताना लिहीत जा. >> नो कमेण्ट्स. सत्य मांडल्यावर अशा प्रतिक्रियांची तयारी ठेवावीच लागते.

सत्य मांडल्यावर अशा प्रतिक्रियांची तयारी ठेवावीच लागते.
जॉनी लिव्हरच्या जागी आता जॉनी वॉकर काम करणार हे सत्य कां?

कॅन्सर झालाच आहे तर एखाद्या गँगचा सफाया आनंद करतो अशी भर घातली तर पिक्चर तुफान चालेल.

हे असं हस्तीमध्ये दाखवलं आहे.

गरीबांचे शारुक सर आपण महान आहात. आपले एकेक वाक्य म्हणजे सत्यवचन असते. शोले म्हणजे घोड्यांची पळापळ..! डोळ्यात अंजन घातलं की तुम्ही.
मागे कुठेतरी आपणच 'शोलेमध्ये बेस्ट अभिनय‌ धन्नो ने केला होता' असे सुवर्णाक्षरात कोरुन ठेवले आहे. तो धक्का कमी होता म्हणुन आजचा लेख.. आणखी काय बोलु..

श्रास घेतो इतके नॅचरली शाहरूख सरांनी बॉलीवुड व्यापले आहे. एखाद्या माईलस्टोन असलेल्या पिक्चरचा विचार शाहरूख हे नाव घेतल्याशिवाय होऊच शकत नाही >>>>>>शारुख सध्या तरी कुठेच दिसत नाही आहे (सिनेमात), त्याचा जो काही जलवा होता तो त्याच्या यंगपणीच आता असे काही खास नाही केले आहे त्याने कि त्याच्यासाठी कोणी रात्र रात्र जागून काढेल किंवा त्याच्यासाठी आपला स्क्रिन टाइम राखून ठेवेल। तो जेव्हा कार्यरत होता तेव्हा छानच होता पण आता काहीच करत नाही तर त्याचा स्वतःचा पी आर सुद्धा एवढं करत नसेल तेवढं तुम्ही त्याचा बोलबाला करत आहात। म्हणजे तुमची आवड निवड एक लिमिट पर्यंत दुसऱ्याला दाखवू शकता पण हे असे बॉम्बिंग करणे म्हणजे अगदीच येडछापपणा आहे। तुम्ही लहान असाल तर समजू शकतो एवढा ग्रोन अप व्यक्ती दुसऱ्याच्या एवढा कसा काय आहारी जाऊ शकतो ज्याला माहीतही नसेल कि तुम्ही एक्सिस्ट करता।

आनंदचा रिमेक म्हटला की एकच कलाकार डोळ्यासमोर आठवतो
पण त्याने सिमिलर रोल केला आहे आणि तो गाजवला सुद्धा आहे
त्यामुळे आता हा रिमेक न झाला तरच चांगले Happy

छान लिहिलंय. शारुखच्या बाबतीतला इतका उच्च कोटिचा सॅटायर वाचण्यात आला नव्हता. त्यापुढे प्रतिसादांतहि तेच बेअरिंग कायम ठेवण्याचं कौशल्य - आउटस्टँडींग...

आनन्दच्या रिमेकमध्ये शाह्रुख?? हम्म्म..

फक्त एकाच बाबतीत शाह्रुख राजेश खन्नाला मात देइल.
राजेश खन्ना अगदी टवटवीत दिसलाय,कँसर पेशंट वाटत नाही, शाह्रुख आता इतका खप्पड वाळलेला सुका बोम्बिल
झालाय की तो शेवटाला कँसर पेशंट म्हणुन शोभेल.

हे हिरो लोक जे कोणे एके काळी डोळ्यांना सुखकारक वाटले होते ते ४० पार झाले की परत विशीचे दिसण्याची खटपट करतात आणि त्या भानगडीत एकतर शाह्रुखसारखे पार सत्तरीचे दिसायला लागतात नाहीतर आमिरसारखे एलियन दिसायला लागतात. सैफ वयाला साजेसा अन्गापिन्डाने दिसतो. अर्थात तो यान्च्या स्पर्धेत कधी नव्हताच.

आणि त्या भानगडीत एकतर शाह्रुखसारखे पार सत्तरीचे दिसायला लागतात नाहीतर आमिरसारखे एलियन दिसायला लागतात>>
एलियन Lol

कॅन्सर झालाच आहे तर एखाद्या गँगचा सफाया आनंद करतो अशी भर घातली तर पिक्चर तुफान चालेल.

गोविंदाचा Gambler मूवी होता असा

आनंद, बावर्ची दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर पारायणे झाली पण कंटाळा कधीच नाही आला. अंगूर टीव्हीवर पहिल्यांदा पाहिला होता. तो ही इतक्यात दोन तीन वेळा पाहिला. अजून असे काही मूव्हीज आहेत जे मूळचेच पहायला आवडतील. रीमेकचा इतिहास पाहता त्या वाटेला न जाणेच इष्ट !

अंगूरचा रीमेक हा शब्द विनोदाने देखील उच्चारू नये. कुणा निर्मात्याला ऐकू गेला तर त्याचा विचार पक्का व्हायचा. आणि मग त्या रीमेकला अंगूर न म्हणता लोक लंगूर म्हणतील.
आनंद सारख्या सिनेमाचा रीमेक बनवायच्या भानगडीत कशाला पडावे ? त्या त्या काळाच्या चौकटीत गाजलेले असे सिनेमे लोभसवाणे वाटतात. आज रीमेक बनवताना काळानुसार / कलाकारानुसार बदल करावे लागतील आणि ते केले तर त्याची चवच बिघडून जाईल.

अंगूरचा रीमेक हा शब्द विनोदाने देखील उच्चारू नये. कुणा निर्मात्याला ऐकू गेला तर त्याचा विचार पक्का व्हायचा.
>>>टू लेट... सर्कस येतोय...रोहित शेट्टी...अंगूर रिमेक... रणवीर सिंग आणि चुचा आहे संजीव कुमार आणि देवेन च्या रोल मध्ये...

अंगूरचा रिमेक सुद्धा शाहरूखला घेत बनणार होता अशी बातमी होती.
पण मग राहिले ते राहिलेच. पुन्हा तश्या ताकदीचा उत्स्फुर्त कलाकार आज नाही मिळू शकत तर अवघडच आहे.

त्या त्या काळाच्या चौकटीत गाजलेले असे सिनेमे लोभसवाणे वाटतात. आज रीमेक बनवताना काळानुसार / कलाकारानुसार बदल करावे लागतील आणि ते केले तर त्याची चवच बिघडून जाईल.
>>>>

सहमत आहे,
आनंदची आपली एक जागा आहे. कल हो ना हो ची आपली एक जागा आहे. हे दोन्ही चित्रपट तुम्ही वेगवेगळे म्हणूनच एंजॉय करू शकता.
तेव्हाची सादगी आता कॉपी करू शकत नाही. केले तर ते कालबाह्य वाटेल.

शाह्रुख आता इतका खप्पड वाळलेला सुका बोम्बिल
झालाय की तो शेवटाला कँसर पेशंट म्हणुन शोभेल.
हे हिरो लोक जे कोणे एके काळी डोळ्यांना सुखकारक वाटले होते ते ४० पार झाले की परत विशीचे दिसण्याची खटपट करतात आणि त्या भानगडीत एकतर शाह्रुखसारखे पार सत्तरीचे दिसायला लागतात

>>>>

एक नजर पठाण वर टाका Happy

https://www.maayboli.com/node/81360

शाह्रुख आता इतका खप्पड वाळलेला सुका बोम्बिल झालाय की तो शेवटाला कँसर पेशंट म्हणुन शोभेल.
शेवटाला???????? सुरुवातीपासुनच म्हणा.
जिंदगी ( हुं हुं ...हं । हं । हं जिंदगी....पारो (सॉरी बाबुमोशाय) जिंदगी... अशा डायलॉगने डॉ. आधीच गळा दाबुन मारेल कॅन्सर वगैरे नंतरची गोष्ट)

अजुन एक,
त्याची अँग्री यंग मॅन इमेज त्याला या पिक्चरमधे सूट झालेली नाही. तो उगीच रागावलेला वाटतो.
ही मारामारी पण पहिल्या पासुनच आहे कां?

पुन्हा तश्या ताकदीचा उत्स्फुर्त कलाकार आज नाही मिळू शकत तर अवघडच आहे.>> शंभर टक्के सत्यवचन.
मी तर म्हणतो शोले पुन्हा बनवावा.
जय,वीरु,ठाकुरजी, गब्बर, सांबा, कालिया, गाववाले सगळ्यांच्या भुमिका शारुक सरांना द्याव्यात.

आणि अशा रीतीने अती स्तुती मोहीम अनेक वर्ष राबवून मायबोलीचे रूपांतर शाहरूख हेटर क्लब मधे करण्यात सर यशस्वी झाले. इथले सँपल साईज लक्षात घेतले तर जगभरात मायबोलीच्या माध्यमातून शाहरूख खान लोकांच्या मनातून उतरल्यानेच त्याचे सिनेमे पडायला लागले आहेत. मायबोलीच्या भीतीनेच गेली दोन वर्षे त्याचा चित्रपट आलेला नाही. आता नंबर स्वजो आणि सईचा ( त्यात सरांचा वाटा खारीचा).

Pages