जरा थंड घे..!

Submitted by Dr. Satilal Patil on 8 May, 2022 - 14:32

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.

पूर्वी एखादा देव रागावला की, हवेचा वेगवान झोत फेकून, वादळं निर्माण करून आपली हवा करायचा. इंद्रासारखा देव अतिवृष्टीसह मेघगर्जना करून आव्वाज कुणाचा म्हणत पृथ्वीची धुलाई करायचा. सध्याची सूर्याची सिंघम स्टाईल कामगिरी बघून आपल्याकडून काहीतरी आगळीक घडलीय की काय अशी गरम शंका चाटून जातेय.
सूर्यदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी, करंगळीवर पर्वत उचलून स्वतःचे संरक्षण करणे आपल्याला शक्य नाहीये. त्याच्या नुसत्या कल्पनेने करंगळी वरती करण्याची भावना उचंबळून येते. सध्या आलेल्या उन्हाच्या सुनामी पासून वाचण्यासाठी प्रत्येकजण सावली आणि थंड जागा शोधतोय. आपल्या शरीराचं तापमान मापात ठेवायचा प्रयत्न करतोय. उष्णतेमुळे येणाऱ्या घामाने त्रस्त झालाय.

गरम व्हायला लागलं की आपण एसी किंवा कुलर सुरु करतो. असाच एसी माणसाच्या शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्गाने दिलाय. आपल्या शरीराचा एसी सदतीस डिग्री तापमानाला सेट करून आपल्याला पृथ्वीवर पाठवलय. याला शास्त्रीय भाषेत थर्मोरेगुलेशन असं म्हणतात. सदतीस पेक्षा तापमान वाढलं की घामाच्या स्वरूपातील पाणी त्वचेवर येतं. हे पाणी शरीरातील उष्णता शोषून घेत वरती जाणाऱ्या तापमानाला आपली जागा दाखवत. निसर्गाचा खरा (आणि खारा देखील) स्मार्टपणा इथं दिसून येतो. जसं कुल्फीवाला बर्फात मीठ टाकून त्याचं तापमान वेगाने खाली आणतो. तसंच खारट घामामुळे शरीराचं तापमान सध्या पाण्यापेक्षा कमी वेळेत घसरतं.

या घामामुळेच उत्क्रांतीच्या शर्यतीत माणसाला बाजी मारता आली. साधारणतः करोडो वर्षांपूर्वी, आफ्रिकेत इतर प्राण्यांबरोबरच्या अस्तित्वाच्या लढाईत त्याने गाळलेल्या घामाचं चीज झालं. शिकारीचा पाठलाग करतांना शिकार आणि शिकारी दोघांनाही पाळावं लागतं. पळतांना दोघांचं शरीर तापनं स्वाभाविक होत. पण माणसाच्या शरीराच्या तापमाननियंत्रणासाठी घामाची व्यवस्था होती. घाम आली की त्याचं शरीर थंड होत. अश्या पद्धतीने माणूस लांब अंतर सलग पळू शकतो. चित्ता, वाघ किंवा इतर वेगाने धावणाऱ्या प्राण्यांपेक्षा माणूस लांबवर धावत जाऊ शकतो. पन्नासशंभर किलोमीटरच्या मॅरेथॉन पळणारे, याच तत्वाचा उपयोग करून धावतात. पण ज्याची शिकार व्हायची, त्या पुढे पाळणाऱ्या प्राण्यांकडे मात्र निसर्गाचं हे घामास्त्र नव्हतं. त्याचं शरीर थंड करण्यासाठी, त्याला थांबून, जीभ बाहेर काढून, लाळीद्वारे तापमान नियंत्रण करावं लागायचं. याचा फायदा घेऊन आदिमानव शिकारीचा सलग पाठलाग करायचे. शिकार दमून बसली की तिला टिपायचे. अजूनही आफ्रिकेतील जंगलात आणि सहारा वाळवंटात याच पद्धतीने लोकं शिकार करतात. घाम न येणारे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले पण स्मार्ट कुलिंग सिस्टीमने सज्ज मनुष्यप्राणी मात्र उत्क्रांतीच्या शर्यतीत शरीराच्या तापमानाला नियंत्रित करत सलग धावतोय आणि बाजीदेखील मारतोय.

मग आपल्याला प्रश्न पडला असेल की प्राणी आपला पारा कसा मापात ठेवत असतील? त्यांना घाम येतो का? प्राण्यांमध्ये तापमान नियंत्रित करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. घोडा, माकड, हिप्पो या प्राण्यांना घाम येतो. घोड्याचा घाम साबणासारखा असतो. हिप्पोचा घाम मात्र लालसर गुलाबी रंगाचा असतो. त्याच्या घामामध्ये असलेल्या जिवाणूरोधक रंगीत पिगमेंट मुळे तो रंगीत दिसतो. म्हणजे गुलाबी दिसणारी गुबगुबीत हिप्पो तरुणी लाजली नसून तिला घाम फुटलाय असं समजावं. हिप्पोसारखाच शरीरयष्टी असणारा हत्ती मात्र, हिप्पोसारखा लाजरा घाम गाळत नाही. राजेमहाराजांच्या शेजारी जसे पंखे हलवत सेवक उभे असायचे, तसेच नैसर्गिक पंखे कानाच्या रूपाने निसर्गाने या गजराजाला दिले आहेत. हत्तीच्या सुपासारख्या कानात रक्तवाहिन्यांचं जाळं असत. या रक्तवाहिन्यांमार्फत त्याच्या आवाढव्य शरीरातील तापमानाचं नियंत्रण होत.

वेगवान धावणाऱ्या मांसाहारी प्राण्यांचं थंड होणं जरा वेगळं आहे. वाघासारख्या प्राण्यांना घाम येत नाही. शरीर तापल्यावर, जीभ बाहेर ठेऊन ते धापा टाकत असतात. त्यामुळे त्यांचं शरीर थंड होतं. थोड्या अंतरावर वेगवान धावून ते धापा टाकत थांबतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचं वातानुकूलन अजून वेगळं असत. पाल, सरडा आणि मगर तोंड उघडं ठेऊन वरती बघत बसतात. या वायू-आसनामुळे त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रण होत. गिधाड पक्षाचं कुलिंग तर अजून जगावेगळं असत. ते स्वतःच्या पायावर विष्ठा टाकतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील गरमाई कमी होते. तसंही, पर्यावरणाचा गिधाडासारखा लचका तोडत, स्वतःच्या पायावर दगड टाकून घर थंड करणाऱ्या माणसापेक्षा, स्वतःच्या पायावर विष्ठा-विसर्जन करून शरीराच्या तापमानासह, पर्यावरणाचा समतोल राखणारा गिधाड समजदार आहे असंच म्हणावं लागेल.

झाडांना घाम येतो का? हा प्रश्न पडणं, घाम येण्याएवढा स्वाभाविक आहे. हो! स्वतःला थंड ठेवण्यासाठी झाडांना देखील घाम गाळावा लागतो. झाडाच्या पानावर बारीक छिद्र असतात. यांना स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्र म्हणतात. जेव्हा बाहेरील तापमान वाढतं तेव्हा या छिद्रावाटे झाडं पाण्याची वाफ बाहेर टाकतात. या वाफेमुळे पानाचा पृष्ठभाग थंड राहण्याला मदत होते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पानछिद्रांच्या झारीतून स्वतःवर पाणी मारून घेत झाडे कुल होतात. स्वतःला थंड ठेवायच्या नादात ते आजूबाजूचं वातावरणदेखील थंड करतात. वर्षभरात एक झाड हजारो लिटर पाणी बाहेर टाकतं आणि आपल्यासाठी नैसर्गिक एसीचं काम करतं. पण तापमान वाढलं म्हणून आपल्याकडील पाण्याची उधळपट्टी झाड करत नाही. त्याचा समजूतदारपणा त्याच्या पाणी बचतीच्या तंत्रातून दिसून येतो. आता तापमान वाढतंय आणि आपली व्रात्य पाने थंड होण्याच्या नादात, पाण्याची उधळपट्टी करतील याची त्याला जाणीव होते. ही पाण्याची होणारी संभाव्य नासाडी लक्षात घेऊन ते पानं गळायला सुरवात करतात. पानगळ झाडाला पाणीबचत करून देते. भविष्यातील धोका लक्षात घेऊन आपल्याकडील साधनांचं नियोजन करणं झाडाकडून शिकावं. एवढंच नाही तर पुढे पावसाळा येतोय, पाण्याची सोय होणार आहे हे लक्षात घेऊन वसंतात नवीन पालवी जन्माला घालून आपल्या कमावत्या कुटुंबच नियोजन ते करतात.

माणसाची घर थंड ठेवण्याची पद्धत मात्र अजब आणि पर्यावरणद्रोही आहे. आपण वापरात असलेले एसी, कुलर पर्यावरणाची नासाडी करत थंडावा देताहेत. सुरवातीला पेट्रोल डिझेल जाळून विहीर खोदायची. मग कोळसा जाळून, प्रदूषण करून वीज बनवायची. ही वीज वापरून विहिरीतून पाणी उपसून घराच्या टाकीमार्गे घरात आणायचं. त्याला कुलर मध्ये टाकायचं. कुलरचा पंखा फिरवून अजून वीज जाळायची. किंवा एसीमध्ये प्रदूषण करत बनवलेला गॅस भरायचा, याच मार्गाने बनवलेली वीज जाळायची आणि त्या थंडाव्याचा आस्वाद घेत घरात पडून राहायचं. हे म्हणजे चितेच्या गरमाईत अंग शेकण्यासारखं झालं. यापेक्षा झाडाच्या मुळाशी पाणी टाकून त्याच्या पानांद्वारे बाहेर येणारा पर्यावरणस्नेही गारवा साधा, स्वस्त आणि टिकाऊ आहे की नाही? थंडीत स्वतःला गरम करण्यासाठी झाडाला जळणाऱ्या माणसाने, उन्हाळ्यात स्वतःला थंड करण्यासाठी, झाडाला जागवायला नको का?

शेतीव्यवसाय मात्र या पर्यावरणपूरक एसीला पूरक आहे. शेतीत शेतकरी घाम गाळत अन्नधान्याबरोबरच, गारवा आणि ऑक्सिजन देखील पिकवतो आणि ते देखील पर्यावरणपूरक पद्धतीने, निसर्गाचा लचका न तोडता. एक दिवस असाही येईल, जेव्हा भविष्यात शहरातील लोकं खेड्यात शेतकऱ्याकडे जाऊन, दादा लै गरम होतंय थोडा गारवा द्या की, किंवा सध्या हवेतील ऑक्सिजन प्रदूषणाने खाल्लाय, दोन सिलेंडर ऑक्सिजन द्या की' अशी मागणी करतील.

निसर्गाने वनस्पती, प्राणी आणि इतर सजीवनिर्जीवांचा पाय एकदुसऱ्याला बांधलाय. तीन पायाच्या शर्यतीसारखं त्यांनी एकदुसऱ्याला सांभाळत पुढे जाणं आवश्यक आहे. त्यांची ही माळ एकदुसऱ्याच्या थर्मामीटरचा पारा सांभाळत पुढे जावी ही अपेक्षा. त्यात कुणी धसमुसळेपणा करून असमतोल आणला तर सर्वजण ही शर्यत हरतील यात शंका नाही. स्वतःला थंड ठेवण्याच्या नादात पर्यावरण तापवणाऱ्या माणसाला सांगावस वाटतंय... मित्रा, जरा थंड घे!

………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख.
(फक्त शेती पर्यावरण पूरक नाही)
सध्या अवस्था अशी आहे की उन्हाळ्यामुळे इतके विविध त्रास झालेत ह्या वर्षी की ac न घेणं ह्याकरता पूर्ण विल पॉवर वापरावी लागतेय.
दर वर्षी मी थोडे दिवस थांबून बघू हा मंत्र अवलंबते.

ह्या वर्षी प्रोपर त्रास होतोय.

डॉकटर म्हणाले "आधी जीव वाचवा, पर्यावरण कुठे वाचवताय".
पण त्यात paradox आहे.
यावर्षी मी चौकशी करायला दुकानापर्यंत पोहोचले.
(पण पर्यावरण ह्या कारणाने घेऊ शकले नाही.) .
आजपर्यंत, गाडी (upgrade), एसी आणि अशा अनेक गोष्टी घेऊ शकले नाहीये economically शक्य असताना.
१००% पर्यावरण पूरक अर्थातच नाहीये - त्याकरता पूर्ण उठून दुसरीकडे रहायला जाव लागेल आणि गोतावlaa सोडून अजिबातच नाही राहू शकत हे लक्षात आलंय.

जबरी ! मस्त लेख. जिथे झाडे नाहीत, आणी उघडे बोडके डोंगर आहेत, अश्या नासिक आणी मराठवाडा, जळगाव ठिकाणी पाण्याची टंचाई पण भीषण व्हायला लागली आहे. माणुसच खरा पर्यावरण द्रोही आहे. याची खा खा संपतच नाही. म्हणून निसर्गाला पण ओरबाडून खातोय.

खूप मस्त लिहिलंय
सगळीकडे रस्ते रुंदीकरण करण्याच्या नादात बेसुमार झाडे तोडली गेली आहेत आणि काँक्रीट रस्ते बांधले आहेत
त्यावरून जाताना अक्षरशः भट्टी पेटली आहे असं वाटतं आणि एखाद्या गल्लीत वळल्या वर झाडं असतील तर मनाला आणि शरीराला जो काही थंडावा मिळतो त्याला तोड नाही

छान लेख.

निसर्गाने वनस्पती, प्राणी आणि इतर सजीवनिर्जीवांचा पाय एकदुसऱ्याला बांधलाय. तीन पायाच्या शर्यतीसारखं त्यांनी एकदुसऱ्याला सांभाळत पुढे जाणं आवश्यक आहे>>>>

ह्या निसर्गात माणसाला काहीही स्थान नाही. निसर्गसाखळीत माणुस कुठेही नाही. त्याच्यावर कोणीही अवलम्बुन नाही. तो मात्र निसर्गावर अवलम्बुन आहे. त्याला मेन्दु आहे, विचार करु शकतो, मागिल घटनान्चा आधार घेऊन भविष्य जाणु शकतो. पण हे सगळे असुनही नसल्यासारखे आहे. कारण माणसाने आपले डोळे मिटुन घेतलेले आहेत व आजच्या फायद्यासाठी निसर्गाचा विनाश करुन तो उद्या पुर्ण मानवजातीला खड्ड्यात घालत निघालाय. ह्या भस्मासुराला थांबवणे कोणाला शक्य तरी आहे का याचा मला तरी अन्दाज येत नाहीये.

साधना खर आहे..
पॉलिसी ले व ल ला कुणीच फारसा पुढाकार घेत नाहीये.
त्या मस्क भाउ नी विमान शॉर्ट distance नेलं तर पब्लिक खवळलं, पण असे कितीतरी जण आहेत आणि इंडस्ट्री लेवल ला आणि त्याचा परिणाम म्हणून सामान्य लोकांच्या consumerism मुळे जे होतंय, आपल्या बेपर्वाईमुळे जितक्या गोष्टी (उदा. पाणी, टेंकर, ग्राउंड वॉटर, फुटक्या पाइप लाइन वगैरे) वाया जातात, हे सगळं unidirectional वाटायला लागतं