श्री नृसिंह स्तवन

Submitted by पुरंदरे शशांक on 8 May, 2022 - 10:29

श्री नृसिंह स्तवन

अतिऊग्ररुपे झणी स्तंभ फोडी
अचाटे अफाटे नखी दैत्य फाडी
महा गुर्गुरे तो ध्वनि गर्जताहे
नभी लख्लखाटे मही कापताहे

कडाडे धडाडे जणू वज्र ताडे
अकस्मात स्तंभातूनि येत कोडे
मुखा शार्दूलाचे रुपे उग्र साजे
स्वये धावते भक्त प्रल्हाद काजे

नृसिंव्हे रुपे रक्षि प्रह्लादिकांसी
असंख्यात रुपे तसे भाविकांसी
कधी कूर्म मत्स्यावतारी जनासी
ह्रदी नाम हो मागणे श्रीहरीसी
............................................................................
महाभक्त प्रल्हादाच्या पित्याला (हिरण्यकश्यपू) मारण्याकरता नरसिंहरुप धारण केलेल्या भगवंताचे वर्णन.
हिरण्यकश्यपूने या खांबात तुझा नारायण आहे का असे विचारुन त्या खांबाला (स्तंभाला) लाथ मारण्याचा अवकाश...अतिशय रौद्ररुप धारण केलेले भगवान क्षणार्धात त्या खांबातून प्रकटले. त्यांचे कमरेवरील शरीर सिंहाचे होते तर कमरेखालील शरीर माणसाचे होते.
या नरसिंहरुपाने अतिशय जोरात गर्जना केली तेव्हा आकाशभर विजांचा लखलखाट झाला व मही म्हणजे पृथ्वी जणू कापू लागली.
या नरसिंहाने अतिशय त्वेषाने हिरण्यकश्यपूला उचलून स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे पोट आपल्या
तीक्ष्ण नखांनी सहज फाडून काढले.

या रुपातून अवतीर्ण होताना कडाड धडाड असा प्रचंड ध्वनि झाला, जणू काय वज्रच कोसळले असे वाटू लागले.
त्या खांबातून बाहेर येणारे ते अतिविक्राळ रुप म्हणजे मानवी मनाला मोठे कोडेच वाटू लागले.
सिंहाचे मुख लाभलेले ते रुप महाभक्त प्रह्लादाचे रक्षण करण्यासाठीच अवतीर्ण झाले.

जसे प्रह्लादासाठी या रुपात भगवंताचे अवतरण झाले तसेच मत्स्य, कूर्म, वराह असे अनेक अवतार भगवंतांनी केवळ आपल्या भक्तजनांसाठी घेतले होते.
अशा या भक्तवत्सल प्रभूचे पावन नाम ह्रदयात राहो ही त्याच्याच श्रीचरणी प्रार्थना.
..............................................................................................

श्री लक्ष्मी नृसिंह चरणी प्रेमभावे सादर दंडवत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. https://bhaktikishakti.com/sri-narsingh-stotram/ ह्या संस्कृत नृसिंहस्तोत्राची आठवण झाली. माहीत नसल्यास नक्की वाचा. त्यातले शब्दप्रयोग, पदलालित्य, अनुप्रास इत्यादी खूप सुंदर आहेत. तुमचीही रचना आवडली हे नक्कीच.

__/\__

आवडले नरसिंह स्तवन. आमचे कुलदैवत (सासर-माहेर दोन्हीकडे) असल्याने खूप भावले.
नृसिंहाच्या नवरात्रात अगदी समयोचित आहे.
धन्यवाद!

स्तवन आवडले.
---------
नृसिंहावताराचे, लक्ष्मी-नृसिंह रुपच मला तरी प्रार्थनेस योग्य वाटते. उग्र रुप भीतीदायकच आहे पण त्या रुपात पुजू नये असे काहीसे. नृसिंह करावलंबम स्तोत्र फार आवडते. - https://www.youtube.com/watch?v=rnYdFCRwTL0&list=PLo4u5b2-l-fDJ5UYCJ9qkB...

सध्या कोणती नवरात्र चालू आहे?>> नृसिंहाचे
वैशाख शुद्ध षष्ठीला सुरू होते व शुद्ध त्रयोदशीला नरसिंह जयंती असते.

नृसिंहाचे- वैशाख शुद्ध षष्ठीला सुरू होते व शुद्ध त्रयोदशीला नरसिंह जयंती असते.
>>> हो... उद्या उपवास आहे … हे एकच नवरात्र काटेकोरपणे पाळतो...

आम्ही पण नवरात्र पाळतोय. आमचे कुलदैवत कर्नाटकातले शूर्पाली येथील लक्ष्मी - नरसिंह!
धन्यवाद या लिंक्साठी. नक्की ऐकेन.