रेसिस्ट..?

Submitted by SharmilaR on 2 May, 2022 - 00:20

रेसिस्ट..?

मानस बोलायला तोंड उघडतच होता, तर मयूरीचा चा फोन वाजला.

“तो फोन बंद ठेव बरं तू. चार आठ दिवसांनी भेटायचं, तर ती फोन ची टिंग टिंग नको..”
“अरे, चेक तर करू दे.. महत्त्वाचा नसेल, तर नाहीच घेत मी..” मयूरी पर्स मधून फोन काढता काढता म्हणाली.

दोघांच्या कामाच्या वेळा सांभाळून रोज भेटणं तसं शक्यच नसायचं त्यांना. वीकएंड ला कधी मानस त्याच्या गावी जायचा.. तर कधी मयूरी तिच्या घरी जायची... तेही ऑफिस मधे जास्तीचं काम नाही निघालं दोघांनाही…., त्यांच्या त्यांच्या ऑफिस मध्ये तर...... मग कधीतरी असं ठरवून, आठवड्याच्या मधल्या वारीच भेटायची ती दोघं. चांगली तीन चार वर्षे त्यांची मैत्री होती, पण ‘अजून एक दोन वर्षे तरी लग्न नको..’ असं दोघांनीही ठरवलं होतं. जरा आधी एकमेकांना आणखी समजून घेऊया.. घर बिर घेऊया स्वत:च .. मग बघू लग्नाचं असं म्हणत..

“आईचा फोन आहे.. घ्यायलाच पाहिजे.. नाही तर मग ती उगाच काळजी करत बसते.. आटपते लवकर.. ” आन्सर ला स्वॅप करत मयूरी म्हणाली.
“हॅलो आई.. बोल.. काय म्हणतेस..?”
“काही नाही.. बाहेर आहेस का तू..? कामात असशील तर नंतर..”
“बोल गं तू.. आता केलाच आहेस फोन, तर सांग.. काय झालं..?”
“अगं.., जरा महत्वाचं सांगायच होतं.. म्हणजे तशी तू काळजी नको करूस.. पण..”
“आता सांगणार आहेस का पटकन..? काय झालं ते..?”
“अगं.., अभीचं लग्न मोडलं..”
“अरे..! असं अचानक.. काय झालं.. नीट सांगशील का..?” तिने मानस ला कॉफी ची ऑर्डर द्यायची खूण केली. ‘जरा वेळ लागेल..’ खुणेनेच तिने त्याला सांगितलं.
“तसं म्हणशील तर, अचानक नाही झालं काही.. गेले काही दिवस सगळं धुमसतच होतं.. पण आम्हाला वाटलं.., आधी अभि लाच नक्की काय वाटतं, ते ठरवू दे.. म्हणून मग मी पण काही बोलले नाही..”
“जे होतं ते चांगल्या करताच होतं.. पण का ठरवलं त्याने असं..?”

अभी, मयूरीचा भाऊ. तिच्यापेक्षा चांगला पाच वर्षांनी मोठा. मयूरीने इतक्यात लग्न नाहीच करणार असं घरी जाहीर केल्यावर, मग अभी करता स्थळ बघायला सुरवात झाली घरी. तसंही त्याचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं. त्याने आपली आपली शोधली असती, तर सगळ्यांना आवडणारच होतं. पण नाही मिळाली त्याला कुणी. मग अगदी शिस्तीत वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवलं, आणी स्थळ बघायला सुरवात केली. चार महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न ठरलं होतं. अगदी चहा पोह्याचा कार्यक्रम करून. घाई नव्हती.. पण नोकरीत चांगला सेटल होता.. वय वाढत होतं.. तर आता मात्र करायला हवं लग्न.. बघूया.. कसं होतंय ते .. जमलं तर.. म्हणत मुली बघायला सुरवात झाली होती.
मुलगी अन तिचे आई बाबा असे तिघेही आले होते त्यांच्या घरी. तशी ती होती कल्याण ला राहणारी .. पण एका लग्ना करता म्हणून ती लोकं अनायसे नाशिकला आलीच होती, तर मग मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ या… म्हणून मग आले होते घरी. घरच्या मोठ्या माणसांच आधी फोन वर अगदी बेसिक बोलणं.. कौटुंबिक माहितीची देवाण घेवाण झालीच होत. मयूरीही गेली होती तेव्हा घरी.

“अगं आता काय काय सांगायचं..? बघण्याचा कार्यक्रम तुझ्यासमोर झाला, तेव्हाच ह्या दोघांचाही होकार झाला होताच...” आई सांगत होती..
“हो ना.. खरं सांगायचं तर मला तेव्हाही वाटलं होतं, किती घाई होतेय ह्या सगळ्याची..” मयूरी म्हणाली.
“अभी ला मुलगी शिक्षण अन् रंगरुपानी आवडली होती.. तो म्हणाला होता, घरदार.. कुटुंब.. मुलगी.. सगळं बरं वाटतंय.. लग्नाला वेळ आहे तोवर अजून भेटणं बोलणं होईलच.... तो तिला करायचा खूपदा फोन..”
“मग..?”
“अगं, ती बरेचदा फोन उचलायचीच नाही... मग तिला वेळ सोईची नसेल, असं वाटून तो आधी मेसेज करायचा तर ती रीप्लाय पण नाही द्यायची त्याला फारसा.. त्याने तिला खूपदा विचारलं, तिला केव्हा वेळ असतो ते.. पण ती क्वचितच उत्तर द्यायची.. मग अभी कडून मला हे कळल, तेव्हा वाटलं, हे लग्न कदाचित तिच्या मनाविरुद्ध असेल.. म्हणून मग मी तिच्या आईशी बोलले.. तर त्यांनी नाकारलंच सरळ, तिचं असं वागण वैगेरे.. .. सगळं तर ठीक ठाक आहे म्हणाल्या.. ”
“बरं.. मग काय झालं..? पुढे कुठे माशी शिंकली..?”
“तिचं तसंच वागणं कायम राहिलं.. अभी भेटायला येतो म्हणाला, तर ती सरळ वेळ नाही म्हणाली.. तो खूपच अस्वस्थ होता.. मग मीच तिला काल फोन केला.. विचारलं नीट.. तर वसकन ओरडलीच.. म्हणाली, तुम्हाला नको असेल तर मोडा लग्न मग..”
“बापरे.. डेंजरच म्हणायची..”
“हो ना.. मग आम्ही बोललो तिच्या आई वडिलांशी परत आज सकाळी.. ते खूप उडवाउडवी चं बोलत होते.. मग सरळ मोडलंच आम्ही .. काय करणार नं ..?”
“अगदी बरं झालं आई. लग्न झाल्यानंतर काही होण्यापेक्षा आधीच ते मोडलेलं बर.. उलट अभीचं पुढंच दु:ख्ख वाचलं म्हणायच. खरं सांगू का आई..? एकतर खूपच घाई झाली होती हे सगळं ठरवायची.. आणी मला तर तेव्हाही ती मुलगी खूप आवडली नव्हती. पण अभी ला आवडली म्हंटल्यावर.. मी काही बोलले नाही.. उगाच मध्ये खोडा नको म्हणून.. कसला मुस्लिम लुक होता नं तिचा..”
“हल्ली कठीण झालय गं... मुली शोधणं.. पूर्वी सारखं लग्नात लग्न जमत नाहीत आता... तरुण मुलं मुली येतातच कुठे आता नात्यातल्या लग्नाला.. ? सगळे आपले, आपापल्या करिअर मध्ये गुंतलेले.. कुणालाच वेळ नसतो असे नात्यातले कार्यक्रम अटेंड करायला.. ”
“तू नको काळजी करूस आई.. होईल सगळं ठीक.. मी रात्री करते परत फोन.. चालेल..?” मयूरीने विचारलं.
“ठीक आहे.. बोलू सावकाश.. तुला ही बातमी द्यायची होती.. अगदीच राहवेना.. म्हणून आता फोन केला.. बोलू मग.. ” आईने फोन कट केला.
मयूरीने पर्स मध्ये फोन ठेवत कॉफी चा कप हातात घेतला. मानस च्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता.
“अरे, अभी चं लग्न मोडलं, म्हणून आईचा फोन होता.. म्हणून बोलले जराशी..” मयूरी समजुतीच्या सुरात म्हणाली.
“काय म्हणालीस तू फोनवर..?” त्याने रागानेच विचारलं.
“मी..? काय म्हणणार..? हेच.. झालं ते बरंच झालं.. आता आणखी काय बोलायचं नं..? एकदा नुसतं बघून बिघून, अशी कुठे ओळख होते का कुणाची..?”
“ते नाही.. आणखी काय म्हणालीस तू..? तुला ती आवडली नव्हती..?”
“अरे, हो ना. खरंच. मला समहाऊ.... ती मुलगी खरंच आवडली नव्हती. पण ज्याला लग्न करायचं त्याला आवडल्यावर आपण काय बोलायचं नं मध्ये.. अरे तुला सांगते.. कसला ड्रेस घातला होता..”
“तिच्या लूकस बद्दल काय बोललीस तू..?” मानस अजूनही रागातच बोलत होता.
“तेच सांगते.. एका लग्नाहुन आली होती ती मंडळी.. तिच्या ड्रेस वरची ती जर.. ई.....ई.. आणी माहीत आहे..? ते टिपिकल झुमके घातले होते तिने.. डोळ्यात काजळ.. हल्ली टिकल्या बिकल्या तर तसंही कुणी लावत नाही.. पण खरंच टिपिकल मुस्लिम वाटत होती..”
“हेच.. हेच.. असं बोलू कसं शकतेस तू..?”
“म्हणजे..? मला नाही कळलं.. तिचा अॅपिअरन्स तसा होता.. म्हणून बोलले मी..”
“तुला असं बोलतांना काहीच वाटत नाही? यू आर रेसिस्ट..” मानस चिडून म्हणाला.
“अरे, रेसिस्ट कसली..? मी तिच्या लूकस बद्दल बोलले.. तिचा ड्रेस सेन्स तसा.... आय डिडन्ट मीन मोअर दॅन दॅट...”
“तुला कळतय का..? तू एका कम्युनिटी बद्दल रिमार्क देते आहेस..” मानसचा आवाज चढला होता.
“कुठून कुठे जातोयस तू.. माझ्या डोक्यात असं.... कम्युनिटी वगैरे काही नव्हतं.. जस्ट जसं आपण गुजराती पद्धत म्हणतो.. बंगाली साडी म्हणतो.. तसाच मी तो शब्द वापरला..”
“ते वेगळं.. आणी हे वेगळं.. तुझा रिमार्क एका जमाती बद्दल आहे.. यू आर रेसिस्ट.. तुझ्या मनात होतं ते बाहेर आलं ..”
“तू उगाच काहीही आरोप करत सुटू नकोस.... मा‍झ्या मनात तसलं काहीही नव्हतं बोलतांना.. किती सहजपणे आपण ब्राह्मणी स्वयंपाक.. मराठा पद्धतीचा तिखट रस्सा मटण.. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट.. पंजाबी ड्रेस .. असे शब्द वापरतो.. त्याच सहजतेने मी.. तिच्या फक्त दिसण्याबद्दल हा शब्द वापरला.. तू पराचा कावळा करतो आहेस..” आता मानसीही चिडली होती..
“जे आपल्या डोक्यात असतं.. मनात असतं.. तेच असं बाहेर पडतं कधी तरी.. मला नाही वाटत तुझे विचार पूर्ण बॅलेन्स्ड आहेत.. मी इतके दिवस तुला ओळखलंच नाही, असं वाटतंय मला..” मानसच्या संतापाचा आवेग अजून तसाच होता.
“मी तरी कुठे ओळखलं होतं तुला.. माझ्या इतक्या साध्या.. निरूपद्रवी वाक्याचा, तू एवढी टोकाचा विचार करशील.. असं मला तरी कधी कुठे वाटलं होतं..” मयूरी कडवटपणे म्हणाली.
“तुला हे सगळं क्षुल्लक आणी निरुपद्रवी वाटणं.. हे तर माझ्या दृष्टीने आणखीच भयानक आहे.... म्हणजे तुला सिरियसली विचारच करायचा नाही कशाचा..”
“नाही करायचा. कारण माझ्या मनात काही वाईट नव्हतच.. माझं बोलण सहज होतं...” मयूरीही आता हट्टाला पेटली होती.
“मला वाटतं, आपण यापुढे भेटणं थांबवू या.. माझ्या आयुष्यात रेसीझम ला जागा नाही.. आणी ह्या बाबत कॅज्यूअल अॅटीटयूड मला मान्य नाही.. ” मानस उभा राहिला.
“मलाही तसच वाटतंय.. माझ्या मनात नसलेले विचार.. माझ्यावर लादणं.. माझं सहज बोलणं एवढं अवघड करून घेणं.. तुझं एवढं टोकाचं वागणं.. मलाही सहन नाही करता येणार..” कडवटपणे मयूरीने त्याच्याकडे पाठ फिरवली..

पारंपरिक चहा पोह्याच्या कार्यक्रमात एकमेकांना नीट जाणून घेतलं नाही म्हणून अभिचा.. तर इतकी वर्षे बरोबर राहूनही एकमेकांना नीट ओळखलं नाही म्हणून, मानस मयूरीचा ब्रेकअप झाला होता..

********

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अंगपिंड भरलं म्हणून लग्नाच्या वयाला आलेली बालके म्हणावी का काय ही असा प्रश्न पडला एकदम>>>

भारतात किती टक्के लोक विचार करुन लग्न करतात व मुले जन्माला घालतात.? लग्नाचे वय झाले की पालक लग्न लावुन देतात व नातवंड व्हायची वाट पाहात बसतात. मुम्बई पुण्यात राहणारी मुले विचार पुर्वक सगळे करत असावित. बाकी त्या पलिकडे जो भारत पसरलाय तिथे अद्यापही मागील पानावरुन पुढे प्रकरण सुरु आहे.

विधवेला कुंकु पुसुन, बांगड्या फोडुन व समारंभाना न बोलावुन अपमानित करायचे नाही असा कुठल्यातरी ग्रामपन्चायतीने केलेला ठराव व्हाट्सॅप वर सध्या फिरतोय. अशा स्त्रियाना आमच्या गावात कसे वागवतात हे प्रत्यक्ष पाहतेय. अगदीच १०० वर्षान्पुर्वीसारखी स्थिती आज नसली तरी अशा स्त्रिने एक वर्ष कोणाच्यही दाराचा उंबरा ओलांडु नये असाही एक सन्केत आहे आणि तो चुकुन मोडणार्या स्त्रिला इतर स्त्रिया चान्गलेच सुनावतात हेही पाहिले आहे. आपला नवरा गेलाय म्हणुन रोज जिथे जायचो त्या शेजारणीकडे जायचे नाही हे सतत लक्षात ठेवणे किती दु:खद आहे हे त्या परिस्थितीतुन जाणारी व्यक्तीच जाणु शकते.

पोलिटिकल विचारधारा जुळत नाही म्हणून नकार देणे सगळ्यांनाच फार हास्यास्पद वाटत होतं. पण माझ्यासाठी महत्वाचं होतं.>> _/\_
लग्नाचा निर्णय घेतांना, पोलिटिकल विचारधारेला महत्व देणारे बरेच तरुण मुलं माझ्याही पहाण्यात आहेत.

जेम्स वांड, मला आपल्या मतांचा आणी विचारांचा मला पूर्ण आदर आहे. पण कथेच्या सोईकरता ह्यातली नाती बदलली असली, तरी ह्यातला बराचसा संवाद खरा आहे.

भारतात किती टक्के लोक विचार करुन लग्न करतात व मुले जन्माला घालतात.?
>>>>>

भारतात तर कमालीची विषमता आहे. पण कथेतील नायक नायिका ज्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहेत त्यांनी विचार करणे अपेक्षित असावे.

मला अजूनही जास्त चूक त्या मुलाचीच वाटते. कारण तो आपण फार विचारवंत असल्याचा आव आणतोय पण प्रत्यक्षात नात्यात डिल कसे करावे हे त्याला न समजल्याने अविचाराने तडकाफडकी निर्णय घेत आहे.

पोलिटिकल विचारधारा जुळत नाही म्हणून नकार देणे..
>>>>

जर निर्णय घेणाऱ्याला हा निकष महत्वाचा वाटत असेल तर जरूर त्यानुसार निर्णय घ्यावा..
जर एखाद्याला वाटत असेल की पार्टनरची राजकीय विचारधारा काही का असेना, आपल्याला काय पडलेय तर ते ही ठिक आहे..

अरेंज मॅरेजमध्ये समोरच्या घरात कोणते वृत्तपत्र येते त्यानुसार त्यांची विचारधारा जोखून नकार देणारे पाहिले आहेत.
लग्न हा एक जुगारच असल्याने आपण आपल्यापरीने कुठलेही निकष लावायला मोकळे असलो पाहिजे. त्यात काही चूक बरोबर नाही. अमुकतमुक बाबतीत आपली मते जुळत नाहीत असे सांगण्यात समोरच्याला हलके लेखल्यासारखे होत नसल्याने त्यालाही वाईट वाटायला नको. फक्त त्यात आमची विचारसरणी ऊच्च आणि तुमची जुनाट असा अहंकार नसावा..

मुम्बई पुण्यात राहणारी मुले विचार पुर्वक सगळे करत असावित. बाकी त्या पलिकडे जो भारत पसरलाय तिथे अद्यापही मागील पानावरुन पुढे प्रकरण सुरु आहे. >> हे धन्य आहे. केवढे जनरायझेशन. जणु काय मुंबई पुण्याबाहेर सगळे भारतीय बिनडोक आहेत.

जणु काय मुंबई पुण्याबाहेर सगळे भारतीय बिनडोक आहेत >> ह्याला आता लोक भूगोलिस्ट कमेंट म्हणतील (हलके घ्या Wink )

हे असे सोशल मीडिया वर मते जुळत नसलेली लोक घरात मस्त जुळवून राहतात हे पाहिले आहे... बाहेर वाचावचा भांडणारे घरात गुण्या गोविंदाने असतात...

>>>>अमुकतमुक बाबतीत आपली मते जुळत नाहीत असे सांगण्यात समोरच्याला हलके लेखल्यासारखे होत नसल्याने त्यालाही वाईट वाटायला नको. फक्त त्यात आमची विचारसरणी ऊच्च आणि तुमची जुनाट असा अहंकार नसावा..

-असहमत. काही मते चालवून घेण्यासारखी असतात तर काही मते चालवून घेण्यासारखी नसतात. काही वेळेस तुमची विचारसरणी जुनाटच असते, आणि आमची उच्चच असते !

साधना ताई,

आपल्याही मताचा आदरच आहे, पण आजकाल खूप विचारपूर्वक लग्न होतायत असे इथे ग्राउंड ऑब्झर्व्हेशन आहे, गावाकडे विधवांना प्रवास बंदी इत्यादी आपल्या पाहण्यात असले तर दुःखदच आहे, पण सुदैवाने माझ्या पाहण्यात असे नाही, पण अर्थात त्यामुळे मी तुमचे मत खोडणार नाही अजिबात. मला वाटते ह्या सगळ्यात वैयक्तिक एनेकडोट्स हे यार्डस्टिक न ठरवता काही सॉलिड सॅम्पल स्पेस असणारे डेटापॉईंट्स असले तरच मॅक्रो लेव्हल पिक्चर क्लिअर होईल असे मात्र प्रामाणिकपणे वाटते बुआ मला.

Pages