रेसिस्ट..?

Submitted by SharmilaR on 2 May, 2022 - 00:20

रेसिस्ट..?

मानस बोलायला तोंड उघडतच होता, तर मयूरीचा चा फोन वाजला.

“तो फोन बंद ठेव बरं तू. चार आठ दिवसांनी भेटायचं, तर ती फोन ची टिंग टिंग नको..”
“अरे, चेक तर करू दे.. महत्त्वाचा नसेल, तर नाहीच घेत मी..” मयूरी पर्स मधून फोन काढता काढता म्हणाली.

दोघांच्या कामाच्या वेळा सांभाळून रोज भेटणं तसं शक्यच नसायचं त्यांना. वीकएंड ला कधी मानस त्याच्या गावी जायचा.. तर कधी मयूरी तिच्या घरी जायची... तेही ऑफिस मधे जास्तीचं काम नाही निघालं दोघांनाही…., त्यांच्या त्यांच्या ऑफिस मध्ये तर...... मग कधीतरी असं ठरवून, आठवड्याच्या मधल्या वारीच भेटायची ती दोघं. चांगली तीन चार वर्षे त्यांची मैत्री होती, पण ‘अजून एक दोन वर्षे तरी लग्न नको..’ असं दोघांनीही ठरवलं होतं. जरा आधी एकमेकांना आणखी समजून घेऊया.. घर बिर घेऊया स्वत:च .. मग बघू लग्नाचं असं म्हणत..

“आईचा फोन आहे.. घ्यायलाच पाहिजे.. नाही तर मग ती उगाच काळजी करत बसते.. आटपते लवकर.. ” आन्सर ला स्वॅप करत मयूरी म्हणाली.
“हॅलो आई.. बोल.. काय म्हणतेस..?”
“काही नाही.. बाहेर आहेस का तू..? कामात असशील तर नंतर..”
“बोल गं तू.. आता केलाच आहेस फोन, तर सांग.. काय झालं..?”
“अगं.., जरा महत्वाचं सांगायच होतं.. म्हणजे तशी तू काळजी नको करूस.. पण..”
“आता सांगणार आहेस का पटकन..? काय झालं ते..?”
“अगं.., अभीचं लग्न मोडलं..”
“अरे..! असं अचानक.. काय झालं.. नीट सांगशील का..?” तिने मानस ला कॉफी ची ऑर्डर द्यायची खूण केली. ‘जरा वेळ लागेल..’ खुणेनेच तिने त्याला सांगितलं.
“तसं म्हणशील तर, अचानक नाही झालं काही.. गेले काही दिवस सगळं धुमसतच होतं.. पण आम्हाला वाटलं.., आधी अभि लाच नक्की काय वाटतं, ते ठरवू दे.. म्हणून मग मी पण काही बोलले नाही..”
“जे होतं ते चांगल्या करताच होतं.. पण का ठरवलं त्याने असं..?”

अभी, मयूरीचा भाऊ. तिच्यापेक्षा चांगला पाच वर्षांनी मोठा. मयूरीने इतक्यात लग्न नाहीच करणार असं घरी जाहीर केल्यावर, मग अभी करता स्थळ बघायला सुरवात झाली घरी. तसंही त्याचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं. त्याने आपली आपली शोधली असती, तर सगळ्यांना आवडणारच होतं. पण नाही मिळाली त्याला कुणी. मग अगदी शिस्तीत वधू वर सूचक मंडळात नाव नोंदवलं, आणी स्थळ बघायला सुरवात केली. चार महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न ठरलं होतं. अगदी चहा पोह्याचा कार्यक्रम करून. घाई नव्हती.. पण नोकरीत चांगला सेटल होता.. वय वाढत होतं.. तर आता मात्र करायला हवं लग्न.. बघूया.. कसं होतंय ते .. जमलं तर.. म्हणत मुली बघायला सुरवात झाली होती.
मुलगी अन तिचे आई बाबा असे तिघेही आले होते त्यांच्या घरी. तशी ती होती कल्याण ला राहणारी .. पण एका लग्ना करता म्हणून ती लोकं अनायसे नाशिकला आलीच होती, तर मग मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ या… म्हणून मग आले होते घरी. घरच्या मोठ्या माणसांच आधी फोन वर अगदी बेसिक बोलणं.. कौटुंबिक माहितीची देवाण घेवाण झालीच होत. मयूरीही गेली होती तेव्हा घरी.

“अगं आता काय काय सांगायचं..? बघण्याचा कार्यक्रम तुझ्यासमोर झाला, तेव्हाच ह्या दोघांचाही होकार झाला होताच...” आई सांगत होती..
“हो ना.. खरं सांगायचं तर मला तेव्हाही वाटलं होतं, किती घाई होतेय ह्या सगळ्याची..” मयूरी म्हणाली.
“अभी ला मुलगी शिक्षण अन् रंगरुपानी आवडली होती.. तो म्हणाला होता, घरदार.. कुटुंब.. मुलगी.. सगळं बरं वाटतंय.. लग्नाला वेळ आहे तोवर अजून भेटणं बोलणं होईलच.... तो तिला करायचा खूपदा फोन..”
“मग..?”
“अगं, ती बरेचदा फोन उचलायचीच नाही... मग तिला वेळ सोईची नसेल, असं वाटून तो आधी मेसेज करायचा तर ती रीप्लाय पण नाही द्यायची त्याला फारसा.. त्याने तिला खूपदा विचारलं, तिला केव्हा वेळ असतो ते.. पण ती क्वचितच उत्तर द्यायची.. मग अभी कडून मला हे कळल, तेव्हा वाटलं, हे लग्न कदाचित तिच्या मनाविरुद्ध असेल.. म्हणून मग मी तिच्या आईशी बोलले.. तर त्यांनी नाकारलंच सरळ, तिचं असं वागण वैगेरे.. .. सगळं तर ठीक ठाक आहे म्हणाल्या.. ”
“बरं.. मग काय झालं..? पुढे कुठे माशी शिंकली..?”
“तिचं तसंच वागणं कायम राहिलं.. अभी भेटायला येतो म्हणाला, तर ती सरळ वेळ नाही म्हणाली.. तो खूपच अस्वस्थ होता.. मग मीच तिला काल फोन केला.. विचारलं नीट.. तर वसकन ओरडलीच.. म्हणाली, तुम्हाला नको असेल तर मोडा लग्न मग..”
“बापरे.. डेंजरच म्हणायची..”
“हो ना.. मग आम्ही बोललो तिच्या आई वडिलांशी परत आज सकाळी.. ते खूप उडवाउडवी चं बोलत होते.. मग सरळ मोडलंच आम्ही .. काय करणार नं ..?”
“अगदी बरं झालं आई. लग्न झाल्यानंतर काही होण्यापेक्षा आधीच ते मोडलेलं बर.. उलट अभीचं पुढंच दु:ख्ख वाचलं म्हणायच. खरं सांगू का आई..? एकतर खूपच घाई झाली होती हे सगळं ठरवायची.. आणी मला तर तेव्हाही ती मुलगी खूप आवडली नव्हती. पण अभी ला आवडली म्हंटल्यावर.. मी काही बोलले नाही.. उगाच मध्ये खोडा नको म्हणून.. कसला मुस्लिम लुक होता नं तिचा..”
“हल्ली कठीण झालय गं... मुली शोधणं.. पूर्वी सारखं लग्नात लग्न जमत नाहीत आता... तरुण मुलं मुली येतातच कुठे आता नात्यातल्या लग्नाला.. ? सगळे आपले, आपापल्या करिअर मध्ये गुंतलेले.. कुणालाच वेळ नसतो असे नात्यातले कार्यक्रम अटेंड करायला.. ”
“तू नको काळजी करूस आई.. होईल सगळं ठीक.. मी रात्री करते परत फोन.. चालेल..?” मयूरीने विचारलं.
“ठीक आहे.. बोलू सावकाश.. तुला ही बातमी द्यायची होती.. अगदीच राहवेना.. म्हणून आता फोन केला.. बोलू मग.. ” आईने फोन कट केला.
मयूरीने पर्स मध्ये फोन ठेवत कॉफी चा कप हातात घेतला. मानस च्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता.
“अरे, अभी चं लग्न मोडलं, म्हणून आईचा फोन होता.. म्हणून बोलले जराशी..” मयूरी समजुतीच्या सुरात म्हणाली.
“काय म्हणालीस तू फोनवर..?” त्याने रागानेच विचारलं.
“मी..? काय म्हणणार..? हेच.. झालं ते बरंच झालं.. आता आणखी काय बोलायचं नं..? एकदा नुसतं बघून बिघून, अशी कुठे ओळख होते का कुणाची..?”
“ते नाही.. आणखी काय म्हणालीस तू..? तुला ती आवडली नव्हती..?”
“अरे, हो ना. खरंच. मला समहाऊ.... ती मुलगी खरंच आवडली नव्हती. पण ज्याला लग्न करायचं त्याला आवडल्यावर आपण काय बोलायचं नं मध्ये.. अरे तुला सांगते.. कसला ड्रेस घातला होता..”
“तिच्या लूकस बद्दल काय बोललीस तू..?” मानस अजूनही रागातच बोलत होता.
“तेच सांगते.. एका लग्नाहुन आली होती ती मंडळी.. तिच्या ड्रेस वरची ती जर.. ई.....ई.. आणी माहीत आहे..? ते टिपिकल झुमके घातले होते तिने.. डोळ्यात काजळ.. हल्ली टिकल्या बिकल्या तर तसंही कुणी लावत नाही.. पण खरंच टिपिकल मुस्लिम वाटत होती..”
“हेच.. हेच.. असं बोलू कसं शकतेस तू..?”
“म्हणजे..? मला नाही कळलं.. तिचा अॅपिअरन्स तसा होता.. म्हणून बोलले मी..”
“तुला असं बोलतांना काहीच वाटत नाही? यू आर रेसिस्ट..” मानस चिडून म्हणाला.
“अरे, रेसिस्ट कसली..? मी तिच्या लूकस बद्दल बोलले.. तिचा ड्रेस सेन्स तसा.... आय डिडन्ट मीन मोअर दॅन दॅट...”
“तुला कळतय का..? तू एका कम्युनिटी बद्दल रिमार्क देते आहेस..” मानसचा आवाज चढला होता.
“कुठून कुठे जातोयस तू.. माझ्या डोक्यात असं.... कम्युनिटी वगैरे काही नव्हतं.. जस्ट जसं आपण गुजराती पद्धत म्हणतो.. बंगाली साडी म्हणतो.. तसाच मी तो शब्द वापरला..”
“ते वेगळं.. आणी हे वेगळं.. तुझा रिमार्क एका जमाती बद्दल आहे.. यू आर रेसिस्ट.. तुझ्या मनात होतं ते बाहेर आलं ..”
“तू उगाच काहीही आरोप करत सुटू नकोस.... मा‍झ्या मनात तसलं काहीही नव्हतं बोलतांना.. किती सहजपणे आपण ब्राह्मणी स्वयंपाक.. मराठा पद्धतीचा तिखट रस्सा मटण.. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट.. पंजाबी ड्रेस .. असे शब्द वापरतो.. त्याच सहजतेने मी.. तिच्या फक्त दिसण्याबद्दल हा शब्द वापरला.. तू पराचा कावळा करतो आहेस..” आता मानसीही चिडली होती..
“जे आपल्या डोक्यात असतं.. मनात असतं.. तेच असं बाहेर पडतं कधी तरी.. मला नाही वाटत तुझे विचार पूर्ण बॅलेन्स्ड आहेत.. मी इतके दिवस तुला ओळखलंच नाही, असं वाटतंय मला..” मानसच्या संतापाचा आवेग अजून तसाच होता.
“मी तरी कुठे ओळखलं होतं तुला.. माझ्या इतक्या साध्या.. निरूपद्रवी वाक्याचा, तू एवढी टोकाचा विचार करशील.. असं मला तरी कधी कुठे वाटलं होतं..” मयूरी कडवटपणे म्हणाली.
“तुला हे सगळं क्षुल्लक आणी निरुपद्रवी वाटणं.. हे तर माझ्या दृष्टीने आणखीच भयानक आहे.... म्हणजे तुला सिरियसली विचारच करायचा नाही कशाचा..”
“नाही करायचा. कारण माझ्या मनात काही वाईट नव्हतच.. माझं बोलण सहज होतं...” मयूरीही आता हट्टाला पेटली होती.
“मला वाटतं, आपण यापुढे भेटणं थांबवू या.. माझ्या आयुष्यात रेसीझम ला जागा नाही.. आणी ह्या बाबत कॅज्यूअल अॅटीटयूड मला मान्य नाही.. ” मानस उभा राहिला.
“मलाही तसच वाटतंय.. माझ्या मनात नसलेले विचार.. माझ्यावर लादणं.. माझं सहज बोलणं एवढं अवघड करून घेणं.. तुझं एवढं टोकाचं वागणं.. मलाही सहन नाही करता येणार..” कडवटपणे मयूरीने त्याच्याकडे पाठ फिरवली..

पारंपरिक चहा पोह्याच्या कार्यक्रमात एकमेकांना नीट जाणून घेतलं नाही म्हणून अभिचा.. तर इतकी वर्षे बरोबर राहूनही एकमेकांना नीट ओळखलं नाही म्हणून, मानस मयूरीचा ब्रेकअप झाला होता..

********

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रेसिस्ट कसं खरं ? मानस एव्हढा sjw टाईप आहे तर निदान करेक्ट आरोप तरी करेल कि... बिगोट वैगेरे...

पण खरंच, मानसीला फक्त ड्रेस आवडला नाही इतपत कमेंट असती तर ठीक होतं, पण ड्रेस 'तसल्या' लोकांचा होता हे ड्रेस का आवडला नाही ह्याचे अंतर्मनात दडलेले कारण दाखवून तिनेच स्वतःला उघडं केलं की. मानवचं वागणं आतातायी असेल, हार्ष असेल पण त्याचा मुद्दा काय चूक नाहीये.मुलगी दिसायला चांगली, शिक्षणाने सुद्धा चांगली, पण 'तसला' ड्रेस घातला म्हणून लग्न मोडावं वाटत असेल तर अवघड आहे.

हो, नुसता मुस्लिम टाईपचा ड्रेस आहे म्हणणं वेगळं आणि ई..तसा ड्रेस घालून आली हा न आवडण्यातला एक मुद्दा आहे म्हणणं वेगळं.
तुमच्या कथा ओपन एन्डेड असतात हे आवडतं Happy

पण जर ती म्हणतेय की she didn't mean more than that, तर तो विषय तिथेच थांबायला हवा ना, मानस over react झालाय इथे आणि यावर नंतर शांतपणे विचार करायचा सोडून थेट तोडण्याची भाषा करतोय, एवढ्या वर्षांचं नातं असूनही, हे साफ चुकीचं आहे.

मयुरीने पण दिसण्यावरून कमेंट करणं चुकीचच आहे,,,, पण कदाचित तिच्या मनात हे कम्युनिटी वगैरे काही असेलच हे गरजेचे नाही.

हो, कॉमेंट रेसिस्ट होती म्हणू शकतो. कथेत मुस्लिम धर्मावर होती पण ईतरही जातीप्रांताबद्दल अश्या कॉमेंट दिसतातच की..

पण मानसने या कारणासाठी संबंध तोडण्याऐवजी मयुरीला योग्य ते समजवायला हवे होते. तिच्यासोबतच राहून तिचे विचार बदलायचा प्रयत्न करायला हवे होते. ते खरे आदर्श ठरले असते.

मानस ला काहितरी कारण हवे होते ब्रेकप करायला ते त्याला अशा प्रकारे मिळाले.... या ना त्या कारणाने ब्रेकप होणारच होता Happy

छान कथा. मानसीने तिची बाजु मांडलीय की. मला कथेच्या ओघात ते वाक्य आले तेव्हा खटकले. पण मानसीने तिला काय अभिप्रेत होते हे स्पष्ट केल्यावर ठिकाय वाटले. ते ऐकल्यावर ब्रेकप करण्याईतपत गाडी जायला नको, ती तशी जात असेल तर मुदलातच काहीतरी गडबड आहे.

हा मानस बहुधा सोशल मिडीयावर एक बाजू एक तत्व घेऊन कचाकचा भांडणारा असावा. सर्वांना सर्वधर्मसमभावाच्या उपदेशाचे डोस पाजणारा असावा. त्यामुळे त्याला भिती वाटली असावी की त्याच्या जोडीदाराचे विचार थोडे वेगळे निघाले तर सोमिवरचे लोकं त्याला चिडवतील की आता तुझ्या घरातच असा विचार करणारी व्यक्ती आहे बघ.. त्यामुळे त्याने हट्टीपणाची भुमिका घेत सरळ एक घाव दोन तुकडे केले असावे. वाचली नाचे मयुरी. नंतर अवघड झाले असते तिचे.

धन्यवाद कॉमी, वावे, भाग्यश्री१२३, ऋन्मेऽऽष, मी अमि, साधना.

हा मानस बहुधा सोशल मिडीयावर एक बाजू एक तत्व घेऊन कचाकचा भांडणारा असावा. सर्वांना सर्वधर्मसमभावाच्या उपदेशाचे डोस पाजणारा असावा.>> मानस हा तरुण वर्गाचा प्रतिनिधी.. हट्टी...स्वत:ची ठाम भूमिका आहे असं समजणारा.. आणी दुसऱ्यांना समजावून घेण्यात कमी पडणारा.

आणी मयुरीला ती बोलतांना चुकलीय ह्याची जाणीवच नाही.

मानस मायबोलीवर असणार नक्कीच. Wink
मुस्लिम लुक, गुज्जु भाभी दिसते, कसली भंगी फॅशन हे सहज पण बोललं जातं. त्यात रेसिजम असेलच असं नाही.

मला कथेच्या ओघात ते वाक्य आले तेव्हा खटकले. पण मानसीने तिला काय अभिप्रेत होते हे स्पष्ट केल्यावर ठिकाय वाटले
>>>सहमत!

हा मानस बहुधा सोशल मिडीयावर एक बाजू एक तत्व घेऊन कचाकचा भांडणारा असावा. सर्वांना सर्वधर्मसमभावाच्या उपदेशाचे डोस पाजणारा असावा>>त्याचं माबोवर अकाउंटपण असावे.

छान.
मानस मायबोलीवर असणार नक्कीच. Wink
मुस्लिम लुक, गुज्जु भाभी दिसते, कसली भंगी फॅशन हे सहज पण बोललं जातं. त्यात रेसिजम असेलच असं नाही. >>> +1

मुस्लिम लुक, गुज्जु भाभी दिसते, कसली भंगी फॅशन हे सहज पण बोललं जातं. त्यात रेसिजम असेलच असं नाही. >>>
तेच तर सांगायचा मयूरी प्रयत्न करतेय.. पण मानस काही ऐकायलाच तयार नाही.

हो

यूपी वाले मराठी लोकांना घाटी बोलतात .... आपण कुठल्याही साउथ इंडियनला मद्रासी बोलतो त्याच प्रकारे वरील सर्व विशेषणे लक्षात घ्यायला हवीत.

छान कथा.

हो, कॉमेंट रेसिस्ट होती म्हणू शकतो. >> +१

पण मानसने या कारणासाठी संबंध तोडण्याऐवजी मयुरीला योग्य ते समजवायला हवे होते. >> +२

कॉमी+१००००००
जर तुम्ही सवर्ण असाल तर काहीही बोलताना, लिहिताना शंभर वेळा विचार करूनच बोला अन्यथा कोर्टकचेरी अटळ आहे.

Bhangi Remark: Punjab & Haryana High Court Refuses To Quash FIR Against Yuvraj Singh
https://www.livelaw.in/news-updates/punjab-and-haryana-high-court-refuse...

Salman, Shilpa in legal trouble for using word 'bhangi' on TV
A police complaint has been registered against Bollywood actors Salman Khan and Shilpa Shetty for allegedly using a derogatory word in a TV show.
https://www.wionews.com/india-news/salman-shilpa-in-legal-trouble-for-us...

Actress Yuvika Chaudhary gets arrested, know why
A case was filed against her by the complainant Rajat Kalsan in the police station town of Hansi, Haryana under the Scheduled Castes and Tribes Atrocities Act, for using the word ‘Bhangi’ by Bollywood actor Yuvika Chaudhary in her blog.
https://www.siasat.com/yuvika-chaudhary-arrested-for-using-casteist-slur...

#ArrestMunmunDutta: Tarak Mehta … Babita i.e. Munmun Dutta’s ‘Bhangi’ statement created a ruckus, apologized for growing anger
https://nationworldnews.com/arrestmunmundutta-tarak-mehta-babita-i-e-mun...

जातपात न मानणार्या घरात जन्मले वाढलेय.
लग्न पण अशाच घरात झालंय. माझ्या मुलांनाही हे लोक ते लोक कधीही शिकवलं नाही. स्वतःहुन आजुबाजुला बघुन जे माहित झालं असेल ते जसं मला माहित झालंं.
कुठल्याही जाती धर्माबद्दल वाईट मनात येत नाही.

जे सहज शब्द येतात ते येत असतील हे मी समजु शकते.

आजकाल तर एखादीचं वर्णन करताना पण सावळई नाही काळईच आहे जरा (वेलांटी चा ळ लिहिता येत नाही) असंही म्हणायची ही मुश्कील आहे.

काही लोक उगाच भोकाड पसरणारे असतात. हा मानस त्यातलाच. रीड बिटवीन द लाइन्स. जे नाही तेही बघणारे एक कवि आणि एक हे रडे.

भंगी फॅशन असे कोणाला बोलताना मी अजून ऐकले नव्हते...
>>>>>

मुंबईत आमच्याईथेही म्हटले जायचे. मान्य आहे की भंगी फॅशन यातील भंगी हे त्या समाजाला हलके लेखण्यातूनच आले आहे. पण बरेचदा बोलणार्‍याच्या तेव्हा हे जातपात डोक्यातही नसायचे. तो जातीयवाचक शब्द आहे हे माहीतही नसायचे. कारण त्याचवेळी बिल्डींगच्या झाडूवाल्याला मामा म्हटले जायचे, त्यांच्या सोबत मांडीला मांडी लाऊन महाप्रसादाचे जेवले जायचे.

अर्थात ज्यांचे बालपण वेगळ्या एरीयात गेले त्यांना हे समजणे अवघड आहे, तो कल्चरल शॉकचा धागा आहे ना त्यातला प्रकार आहे हा. लिहायला घेतले तर असे बरेच किस्से निघतील. त्यामुळे असा शॉक बसणारे सुद्धा आपल्या जागी बरोबर आहेत आणि सस्मित सुद्धा.

पण त्याचवेळी आपल्या आजूबाजूला असे कैक लोकं आढळतील जे जातीयवाचक शब्द टाळत असतील पण मनात मात्र पराकोटीचा जातीयभेद घेऊन वावरत असतील. म्हणून एखाद्याला त्याच्या वर्तनावरून ओळखावे. त्याच्या तोंडात सवयीने बसलेल्या शब्दांवरून नाही. ते चुकीचे आहेत हे समजूनही एक काळ जावा लागतो त्या सवयी बदलायला.. हे म्हणजे शिव्यांसारखेच आहे. जर एखाद्याच्या तोंडात तो ज्या वातावरणात वाढला त्यामुळे शिव्या बसल्या असतील ज्या सहसा आयाबहिणींवरून असतात तर हे जरूरी नाही की ती व्यक्ती स्त्रियांचा अनादर करणारीच असेल.

पचायला जड आहे, पण आपण जेवढी दुनिया बघितली असते त्यावरूनच आपले विचार तयार झाले असतात. आपण तेच निकष पकडून समोरच्याला जोखत असतो.

भंगी फॅशन असे कोणाला बोलताना मी अजून ऐकले नव्हते.. << मी पण
मुस्लिम लुक, गुज्जु भाभी दिसते, कसली भंगी फॅशन हे सहज पण बोललं जातं. त्यात रेसिजम असेलच असं नाही. << पण जेव्हा त्यात रेसिजम आहे हे कळतं तेव्हा तो शब्द वापरणं टाळायला पाहीजे ना? की त्याच एक्प्लानेशन - सहज बोलले, मनात नव्हतं अस आहे?
आणी जाती बद्दलच्य रिमार्कला रेसिझम म्हणायच नाही का? मग रेसिझम मधे नेमकं काय काय येतं??
कथा आवडली. पण रिमार्क नाही.
तुला हे सगळं क्षुल्लक आणी निरुपद्रवी वाटणं.. हे तर माझ्या दृष्टीने आणखीच भयानक आहे < हे पटलं.

सामो, ऋ +१
रेसिजम मयुरीच्या नाही तर मानसच्या मनात आहे.
आणि ह्या कारणाने नातंतुटलं तर सुटली की मयुरी.
मानस सारखे पराचा कावळआ करुन नको तिथे दिखाव्याचे उपदेश करणारे लोक पाहिलेत.
बोल्या था मैने मानस माबोवर असणार.

अदिति+१.

अदिति यांनी जे लिहिलंय ते मानसच्या तोंडून आलं असतं तर चांगलं झालं असतं. त्याचं पात्र उगाच आक्रस्ताळेपणा , राईचा पर्वत करणारं झालंय.

दुसरं उदाहरण देतो. अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन्स अशी एक संज्ञा वापरली जाते. ब्लॅक्स - काळे लोक ही संज्ञा कितपत स्वीकारार्ह आहे माहीत नाही. त्या आधी निग्रो म्हटलं जायचं . ती तर पूर्णच बाद मानली जाते.
समजा अन्य देशातून तिथे जाणार्‍या व्यक्तीने ते वापरली आणि माझ्या मनात तसं काहीच नव्हतं , असं म्हटलं तर चालेल का? त्या त्या लेबल्सचा इतिहास माहीत असला तर आपल्या मनात तसं काही नसलं तरी ते न वापरणंच योग्य - कुठेही.

Submitted by ऋन्मेऽऽष >> एखाद्याला त्याच्या वर्तनावरुन ओळखावे >> पटतं!
आपल्या जवळच्या माणसांशी बोलतांना तो आपल्याला ओळखून आहे, हे गृहित धरलेलं असल्याने असं होत असावं..

मला कथेच्या ओघात ते वाक्य आले तेव्हा खटकले. पण मानसीने तिला काय अभिप्रेत होते हे स्पष्ट केल्यावर ठिकाय वाटले>> मला ही.

नेहमीच्या बोली भाषेत भंगी, केस तेल लाऊन चपट केले तर चिंगी (चायनिज), मोठी टिकली लावली तर बाँग दिसतेयस असे शब्द सहज वापरले गेलेले पहिलेयत..मुंबई मधे वाढलेय मी.

काजळ लावल्यास मुस्लिम लूक येतो हे उलट आवडायचे तरूणपणी, काही जवळच्या मैत्रिणी मुस्लिम होत्या त्यामुळे.
पण तो लूक न आवडणारेही असुच शकतात.. त्यासाठी लग्न पसंती द्यायला नको होती वगैरे वाटणे हे जरा जास्तच झाले.

Pages