या मृत्यूने मला काय शिकवलं?

Submitted by पियू on 31 March, 2022 - 14:49

लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.

माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.

कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती ही कोणी बोलत असेल.
1), जीवन क्षण भंगुर आहे .
तरी जगण्याची तीव्र इच्छा प्रतेक माणसात असते.
२) कितीही कोणी तत्व ज्ञान सांगत असेल .
संपत्ती इथेच राहते लोकांचे प्रेम टिकते.
पण संपत्ती चा हवं शेवटच्या क्षण पर्यंत सर्व माणसात असतो
.
त्यासाठी कट कारस्थान प्रतेक व्यक्ती मरे पर्यंत करत असतो.
.मोठ मोठे तत्व ज्ञान हे फक्त दुसऱ्या साठी असते
.
स्वतः साठी नसते.
जगात आज पर्यंत असंख्य कुबेर होवून गेले .
प्रचंड संपत्ती चे मालक पण त्यांनी त्यांची संपत्ती गरीब जनतेच्या भल्यासाठी दान केल्याचे एक पण उदाहरण नाहीं

लबाडी,भ्रष्टचार,लूट,ह्या मार्गे मिळणारी संपत्ती मधील अगदी थोडा हिस्सा चांगल्या कामात वापरून स्वतःचा स्वार्थ sadhya करणाऱ्या लोकांची संख्या मात्र अफाट आहे.
त्या मुळे जीवन जागा खूप संपत्ती मिळवून जगा,संपत्ती स्वतः साठी वापरा.
राखून ठेवू नका.
पाप पुण्य हा प्रकार अस्तित्वात नाही.
त्याचा विचार करू नका.

कोणी तत्व ज्ञान सांगत असेल .
संपत्ती इथेच राहते लोकांचे प्रेम टिकते.
पण संपत्ती चा हवं शेवटच्या क्षण पर्यंत सर्व माणसात असतो
>>>>

काही उदाहरणे आसपास पाहिली आहेत,

एकुलते एक मूल दगावले. आता संपत्तीचे काय करायचे म्हणून आपली लाईफस्टाईल पुर्णपणे साधी करून ते दांपत्य तो पैसा ईतर अनाथ गरजू मुलांंच्या भवितव्यासाठी खर्च करू लागले. (सेम असेच एक उदाहरण आमच्या घरातही होते)

एरीयातील भाई, बारचा मालक, गळ्यात जाडजूड सोन्याच्या साखळ्या घालून फिरणारा. पण बायकापोरे अपघातात दगावली. बार विकून सत्संगाला लागला.

संपतीची हाव असते माणसाला हे मान्य. पण अश्या एखाद्या अनुभवानंतर ती नाहीशीही होते. जर हे उदाहरण आपल्या जवळच घडली असतील, पाहण्यात आली असतील, तर आपल्यालाही ही जाणीव होतेच.

हि मृत्युनेच दिलेली शिकवण म्हणू शकतो. काही जण स्वतः मृत्युच्या दाढेतून परत येतात आणि अचानक आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो.

माझ्या दहावीच्या परीक्षेला दोन दिवस बाकी असताना माझे बाबा गेले. साधं तापाचं कारण होऊन गेले. घरी आलेले नातेवाईक म्हणायला लागले जाऊदेत नको देऊ परीक्षा. मात्र मी दु:खात आकंठ बुडालेले असूनही परीक्षाच देऊ नये असं एकदाही मनात आलं नाही.

त्याच दिवशी मामाकडे रहायला गेले आणि तिथूनच केंद्रावर जाऊन सगळे पेपर दिले. शेवटचा पेपर संपल्यावर घरी आले आणि खुप रडले आईला ताईला बिलगून. त्यानंतरही कित्येक दिवस वाटत राहीलं आणि आजही वाटतं की अरे, आज इतकी वर्षे झाली बाबांना जाऊन पण आपण जगलोच की. तेही चांगल्या प्रकारे जगलो. खरंच आपण किती स्वार्थी आहोत, ते होते तेव्हा त्यांच्या शिवाय आयुष्याची कल्पनाच केली नव्हती, पण तरीही आपलं कोणी गेल्याचं दुःख प्रत्येकाला पचवावंच लागतं आणि पुढे जावंच लागतं, हेच आयुष्यातलं अंतिम कटु सत्य आहे.

आज इतकी वर्षे झाली पण एकही दिवस जात नाही की तुमची आठवण आली नाही. तुमचे आशिर्वाद आहेत कायम हे पदोपदी जाणवतं.

दरवर्षी माझ्यासोबत शाळेत रिझल्ट घ्यायला येणारे, खिडकीतून मला खुणांनी कितवा नंबर आला विचारणारे , मी दोन किंवा तीन आकडे दाखवले की पहीला नाही दाखवला म्हणून माझ्या समोरच खटटू होणारे , तरीही नंतर आनंदाने पेढे विकत घेणारे बाबा,,,,, तुम्ही मी सर्व तुकड्यांतून पहीले आलेल्या त्याच दहावीच्या रिझल्टला त्या खिडकीत नव्हतात, याची खंत कायम मनात आहे. Sad

माझे आजोबा- त्यांच्या बँकेत भरपूर रुपये असूनदेखील त्यांना वाचवता नाही आले... पाहिजे तितके पैसे खर्च करा पण मला नीट करा असे त्यांचे उद्गार अजूनदेखील ताजे आहेत... पैसे कामाला आले नाहीत.. त्यामुळे हे शिकलो कि पैसे योग्य वेळी खर्च करून लाईफ एन्जॉय करावी- शेवटी त्याचा काहीही उपयोग नाही...
शेवटी उरतो तो फक्त नंबर- अकाउंट मधल्या रकमेचा...

२८ जुलै ,२१ला अचानक माझे सासरे गेले.. रुटिन चेक अप साठी माझ्यासोबत चालत आले हॉस्पिटलमधे आणि ४ दिवसात गेले. या धक्क्यातुन सावरत असतानाच डिसेंबर मधे माझ्या बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला ४ स्टेज.. आणि १२ जानेवारीला माझे वडिल गेले.

यातुन मी काय शिकले .. काय नाही शिकले हेच अजुन कळत नाहीये. पण कितीही डोळे भरुन आले तरी पाणी खाली येऊ द्यायचे नाही हे मात्र या दोन मृत्युंनी नक्की शिकवलं.

ह्र्दयस्पर्शी आणि विदारक अनुभव आले आहेत प्रतिक्रियांमधून Sad काही काही प्रतिसाद तर केवळ नि:शब्द करणारे आहेत _/\_

१. मृत्यूवर केलेले विनोद, हे केवळ ते विनोद तयार करणाऱ्यांच्या अपरिपक्वतेतून आलेले आहेत. जवळचे नातलग/प्रियजनांच्या मृत्यूनंतर एक खाड्कन थप्पड बसते आणि मृत्यू ही विनोद करण्याची गोष्ट नाही हे काळ आपल्याला सांगतो. एकेकाळी मी अशा विनोदांवर हसत असे. आता अशा विनोदांवर हसायला येत नाही Sad याशिवाय वेड्यांच्या हॉस्पिटल मधले पेशंट, कुत्रे चावल्यानंतर भुंकणारी व्यक्ती इत्यादी हे विनोदाचे विषय नाहीत. भयाण भयाण आणि केवळ भयाण अवस्था असलेल्या व्यक्ती असतात ह्या. काही वर्षापूर्वी वृत्तपत्रात एक बातमी आली होती. कुत्रे चावलेल्या एका मुलाला हॉस्पिटलमध्ये अखेरच्या अवस्थेत (वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार?) अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते. तो वडलाना हाक मारत रडत ओरडत होता व त्याचे वडील हताशपणे बाहेरूनच त्याच्या हाकांना प्रतिसाद देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. पहाटे कधीतरी त्या मुलाचा आवाज कायमचा शांत झाला Sad ते वर्णन वाचल्यावर हादरायला झाले होते.

२. कर्करोग किंवा तत्सम आजारांची भयानकता जे त्याच्यातून जातात त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाच त्या वेदना कळतात. त्यामुळे त्यावरच्या काल्पनिक गोष्टी कुणीही लाईक फोरवर्ड करू नयेत _/\_ (काही वर्षापूर्वी, ब्रेन ट्युमर झालेले एक जोडपे सिनेमा नाटक पाहत, बागेत मजेत फिरत वगैरे असते. आणि अखेर ते दोघे ट्रीटमेंट साठी लंडन ला का कुठे जायचा प्लान करतात. अशी तद्दन भंकस कथा व्हायरल झाली होती आणि शेवटी लेखक महोदयांनी संदेश दिला होता "आयुष्य थोडेच आहे. घ्या कि जगून" वगैरे!). अशा अनेक अवास्तव कथा फिरत असतात. वास्तव जीवनात मात्र "रात्री भूक लागली म्हणून उठून मुठ भरून मिरच्या घेऊन डायनिंग टेबलवर खात बसले होते" हा ब्रेन ट्युमरच्या रुग्णाच्या नातेवाईकाने रडत रडत सांगितलेला विदारक अनुभव आहे.

३. टर्मिनल इलनेस, ज्यांची सुटका केवळ मृत्यूद्वारेच होते, अशा रुग्णांना विशेषतः अखेरच्या स्टेजमध्ये असेल तर आयसीयू मध्ये दाखल करण्याबद्दल फार विचार करून निर्णय घ्या. कारण या सगळ्यात ती व्यक्ती प्रचंड वेदनेतून जाते. आणि आयसीयूमध्ये आसपास कुणीही आप्तेष्ट नाहीत अशा अवस्थेत त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. हे लिहिताना सुद्धा तो विदारक भूतकाळ आठवून प्रचंड मानसिक वेदना होत आहेत. तेंव्हा कृपया करून हा निर्णय घाईघाईने घेऊ नका. मृत्यू निसर्गाची हाक आहे, रोखण्यात अर्थ नाही. मन मानत नसते. पण पेशंट चे हाल होतात Sad .......

काही वर्षापूर्वी वृत्तपत्रात एक बातमी आली होती. कुत्रे चावलेल्या एका मुलाला हॉस्पिटलमध्ये अखेरच्या अवस्थेत (वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार?) अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते.
>>>
वैद्यकीय प्रोटोकॉल Sad
काहीतरी वेगळा प्रकार असू शकतो..

माझी आई अशीच अचानक गेली १ ऑगस्ट २०१९, साधे ताप आला म्हणून मी माझ्याकडे आणिली पुण्यात , ताप बारा झाला थकवा होता
रात्री जेवली बेसिन मध्ये हात धुवून बेडरूम मध्ये जात असताना कार्डिक अरेस्ट ने गेली , चक्कर आली बेड वर ठेवण्याच्या आधी गेली ,ऍम्ब्युलन्स यायची पण
वाट पहिली नाही, भयंकर पोरके वाटते , कुणाची आई पहिली कि आपण काय गमावले हे लकश्यात येते. काही आजार नव्हता ( बीपी, डायबेटीस, इतर काहीही आजार नव्हते ) , वय ५५ वर्षे फक्त.
मी काय शिकले आपण फार गृहीत धरतो आई बाबाना , मला दिवसांतुन २ -३ वेळेस फोन करायची , मी तिला एकदा चिडून भांडणात ;म्हटले कायमचे फोन बंद कर , आणि आता त्या फोन वरून फोन येईल अशी वेडी आशा वाटते

सुन्न करणारे आहे सर्व. >>+१
कुत्रा चावल्यावर ४ महिन्यांनंतर रेबीज होऊ शकतो का?
मला माहीत नाही म्हणून विचारले.

कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावला तर रेबीज कधी ही होवू शकतो असे ऐकले आहे.
वेळेत इंजेक्शन घेतली पाहिजेत.
रेबीज असेल किंवा धनुर्वात ह्या एकदा झाला की काही उपचार नाहीत.
होवू नये म्हणून मात्र लसी आहेत.

हॉस्पिटलमध्ये जात असताना मी गाडी चालवतो म्हणणारे वडील जेव्हा परतच येत नाहीत, तेव्हा सगळंच किती नश्वर आहे हे अगदी चांगलं समजलं. पण आपल्याला काही प्रयत्न करण्याची संधी मिळाली हे तरी बरं असं वाटलं. ज्यांना ही संधी मिळालीच नसेल त्यांच्याविषयी वाईटही वाटलं.

ते किंवा आजोेबा सिंक होत आहेत हे डॉक्टर सांगत असताना ते आपल्याला नीटच समजतं आहे यापेक्षा अडाणी असतो तर निदान भ्रमात राहिलो असतो का असंही वाटून गेलं. आपण ते मनात ऍक्सेप्ट केलंय का, आपण फार प्रॅक्टिकल आहोत का याचं वैषम्यही वाटलं.

आईवडील असणारच हे किती ग्रुहीत धरतो ते जाणवलं. कुणाच्याही आपल्याला सामान्य वाटणार्या, सहजशक्य असणार्या इच्छा उद्यावर ढकलायच्या नाहीत ही खुणगाठही बांधली आहे.

२०१५ ला माझी आई गेली. मी दिल्लीवरुन कराडला पोचलो. ती ventilator होती आणि ओ२ खुपच कमी होती. हॉस्पिटलमधे गेल्यावर डॉक्टरांनी सगळे सांगीतले व ventilator काढु का विचारले? आयुष्यात असा निर्णय घ्यायची वेळ कुणावरही येवु नये असे वाटते. पण practical निर्णय घ्यायला लागतात.

मृत्यू स्वीकारणे खूप गरजेचे आहे.
इथे सर्वांस मृत्यू आहे..
हे ग्रह,तारे,आकाश गंगा ह्यांना पण मृत्यू आहे..
तो योग्य वेळी येणारच आहे..
माणूस अमर होण्याचे तत्व शिकेल तेव्हा पृथ्वी आणि सूर्य ह्यांचा मृत्यू होईल .
मृत्यू त्रिवार सत्य आहे ते नाकारू नका.

त्या कुत्रे चावलेल्या मुलाबद्दल वाचुन तर फार वाईट वाटले. दे कोणालाही असे हाल न देवो. भयाण आहे हे.

अश्विनी दिक्षीत Sad

माणसाच्या ढोंगी आणि स्वार्थी वृती चा मला खूप तिरस्कार आहे.
इथे जी विषय आहे मृत्यू चा. .त्या वर गोड गोड प्रती उत्तर येत आहेत.
मृत्यू वर जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रतेक व्यक्ती स्वतःच्या मृत्यू ची कल्पना करून कॉमेंट करतो..
त्या सर्व साफ खोट्या असतात.
पुत्र प्रेम
मुलगा किंवा मुलगी जन्म पासून
बुद्धी भ्रष्ट आहे अनेक आजाराने त्रस्त आहे.
हागणे mutane सर्व जागेवर आहे
दोन चार वर्ष पण अपत्य प्रेम टिकत नाही.
कधी हा मरतोय ही इच्छा असते
ह्या ठिकाणी .
अपत्य ह्या जागेवर
आई,वडील,नवरा ,बायको,सासू ,सासरा,बाप कोणालाही ठेवा .
कधी एकदाच मरतोय हीच भावना असते.
पण माणूस मुळातच स्वार्थी,ढोंगी आहे .
त्या मुळे सत्य न स्वीकारता खोटी स्वार्थी मत व्यक्त करत असतो.

कधी एकदाच मरतोय हीच भावना असते.
पण माणूस मुळातच स्वार्थी,ढोंगी आहे .
त्या मुळे सत्य न स्वीकारता खोटी स्वार्थी मत व्यक्त करत असतो.

प्रतिक्रिया आवडली नाही. इथे असलेल्या प्रत्येकाने कोणाचेना कोणाचे असे बघितले असेल किंवा स्वतः जवळच्या नातेवाईकांसाठी असा त्रास घेतला असेल. कधी एकदाचा मरतोय हीच भावना नसते. काही वेळा तो जीव यातून सुटावा असेही वाटत असते. जाणार्‍या माणसाचे दु:ख असतेच. पण त्यामागे प्रत्येकाची अशीच स्वार्थी भावना असते असे नाही. एका कुणाच्या अनुभवावरून सगळेच तसे असतील असे नाही.

तसेही कोणी स्वार्थीपणे व्यक्त झाले असेल तर त्यातही काही तितके वावगे वाटत नाही. काही लोकांची करीयर जवळच्या माणसांचे करत बसल्याने पणाला लागलेली पाहिली आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे इच्छामरण किंवा दयामरण सारखा कायदा नाही त्यामुळे हे भोग भोगावेच लागतात.

लहान असताना आजोबा, पणजोबा गेले तेव्हा वाईट वाटलं, पण काही शिकण्याइतकी अक्कल नव्हती.
जॉबला असताना बाजूच्या टीम मध्ये एक मुलगी होती. माझी फार जवळची, टीममेट नसली तरी, पूर्ण फ्लोरवर आम्ही दोघीच मुली होतो, त्यामुळे एक छान नातं होतं. तिचं लग्न ठरलं तेव्हापासून खूप गप्पा चालायच्या. रोज काय शॉपिंग केली, हनीमूनला कुठे जाणार सगळ्या गमती सांगायची. तोपर्यंत बऱ्याच मुली आमच्या टीम मध्ये आल्या. ३ जणींची लग्न एकाच महिन्यात होते. त्यामुळे वॉशरूम मध्ये मिटींग्स व्हायच्या Happy पहिले हिचंच लग्न होतं. तिचा सुट्टीवर गेली तेव्हा खूप चिडवाचिडवी झाली. आम्ही काही कारणाने लग्नाला जाऊ नाही शकलो. आणि दोन दिवसांनी बातमी अली की ती गेली! लग्नानंतर ते देवाला जात असताना accident मध्ये ती जागची गेली. प्रचंड मोठा धक्का बसला. आपल्या वयाचं (२३-२४) पण कोणी जाऊ शकतं, याची जाणीव झाली.

जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूने आयुष्य कसं जगू नये, हे शिकवलं. त्यांचा व्यवसाय होता, आणि पार्टनर सोबत काहीच लिखापढी नव्हती. कुठलेच इन्शुरन्स घेतले नव्हते. कायम घरूनच काम करत, त्यामुळे अजिबात हालचाल नव्हती. कोणी काही सांगायला गेलं तर तुम्ही किती जुन्या विचारांचे आहेत, जग कुठे चाललंय, तुम्ही आहेत तिथेच आहेत, असा वर आहेर देत. त्यामुळे कोणी काही सांगणं सोडून दिलं होतं. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर बायको मुलगा रस्त्यावरच यायचे बाकी होते. ते असताना राजेशाही थाट होता, पण सेविंग्स काहीच नाहीत, इन्शुरन्स नाही, व्यायसाय असल्याने पगार, PF, पेन्शन असं काहीच नाही. शिवाय पार्टनरने सरळ हात वर केले, त्याच्याविरुद्ध काहीच पुरावाही नाही. दयनीय अवस्था झाली कुटुंबाची. financials नेहमी क्लिअर असावेत, जमेल तेवढा इन्शुरन्स (घर, हेलथ, मोठ्या महागड्या सामानाचा) घेऊन ठेवावा, आणि नवरा-बायको दोघांना सगळे आर्थिक व्यवहार माहित पाहिजे. त्याचबरोबर ४० नंतर दर वर्षी मेडिकल चेकअप करून घेणे, थोडातरी व्यायाम करणे रोज, एकच जण नोकरी करत असल्यास दुसर्याने थोडातरी पार्टटाईम काम करावे, निदान वेळ पडल्यास आर्थिक हातभार लावता येईल, इतपत तयारी असावी, असं वाटतं. शिवाय विल करून ठेवणे आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी अत्यंत जवळच्या मैत्रिणीने केलेल्या आत्महत्येने गालावर एक चपराक बसली. आपलं कोणी इतकं जवळचं दुःखात असूनही आपल्याला कळलं नाही, याची guilt नेहमी राहील. त्याचबरोबर कितीही संकटं आले तरीही suicide कधीच उत्तर असू नये, हे नव्याने जाणवलं. मनातले सल कोणाशीतरी बोलावेत, मनात ठेऊ नाही, हे पण शिकले. शिवाय कोणी हसून बोलतंय, म्हणजे सगळं छान आहे, हे समजू नाही. मैत्रिणीने फोन नाही केला तर आपण आवर्जून करावा, आपला अहंकार दुसऱ्याच्या जिवापेक्षा मोठा नाही, हेच शेवटी सत्य आहे.

Pages