झुंड... नाही टीम!

Submitted by अमितव on 4 March, 2022 - 23:53
By Twitter, Fair use, https://en.wikipedia.org/w/index.php?curid=60841204

****** झुंड चित्रपट बघणार असाल तर तो बघुन झाल्यावर हा लेख वाचा. अर्थात चित्रपटात स्पॉयलर देण्यासारखं काही नाही पण कोर्‍या पाटीने बघायला कधीही जास्त मजा येते. ******

प्रा. विजय बोराडे (अमिताभ) निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले नागपूरच्या बहुतांशी पांढरपेशी उच्चवर्गीय विद्यार्थ्यांच्या कॉलेज मधील प्राध्यापक. ह्या कॉलेजच्या जवळच एक झोपडपट्टी आहे. तिथली युवा पिढी ड्रग्स, व्यसने, मारामार्‍या, भुरट्या चोर्‍या यात आकंठ बुडालेली आहे. या कॉलेज आणि झोपडपट्टीत आहे एक साधी भिंत. खरतर साधी नाही. तर जातीपाती, वर्ग, आर्थिक परिस्थिती यांना उभी विभागणारी भिंत. या भिती पलीकडे कॉलेजमध्ये यायला झोपडपट्टीतील मुलांना प्रवेश वर्ज; आणि अलीकडील कोणी पलिकडे जाऊ इच्छित नाही, अपवाद फक्त बोराडे सरांचा.

एकदा बोराडे सरांना हीच तरुणाई एक डबड्याबरोबर फुटबॉल खेळताना दिसते, आणि त्यांना या मुलांना परिस्थितीतून, व्यसनातून, चोर्‍यामार्‍यातून बाहेर काढण्यासाठी खेळाचा मार्ग दाखवावासा वाटतो. झुंड चित्रपट ह्याच तरुणाईची खेळाच्या माध्यमातून बाहेर पडायची कथा सांगतो. बोराडे सर यात कितपत यशस्वी होतात? ही मुलं त्यांचं कितपत ऐकतात? आपला पीळ सोडून नळीत शेपुट घालतात का? त्यांचा भूतकाळ ते करायची त्यांना मुभा देतो का? त्या भूतकाळाला मागे टाकून येणं खरोखर कितपत शक्य होतं? याची उत्तर चित्रपट पाहुन मिळतीलच.

उच्चवर्गातील, ती ही मुख्यत्त्वे शिक्षक, मुख्याध्यापक अशा प्रौढ व्यक्तींतील आणि या मुलांतील दरी अनेक प्रसंगांत दिसत रहाते. ती समोरासमोर व्यक्त होतेच असं नाही. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागणुकीतून, सर्वसामान्य रुजलेल्या स्टिरिओटाईप्स मधुन ती दिसत रहाते. बर्‍यापैकी असेच आपण ही कधी ना कधी व्यक्त झालेलोच असतो, त्यात काही चूक आहे हे न सांगता थोडा विचार केला की खजिल होऊन आपलं मन कुरतडत राहिल.... असा खास मंजुळे टच! पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी, वर्गणी, जल्लोश... अशा निरिक्षणात्मक पातळीवर, कधी चक्क डॉक्युमेंटरी प्रकारे पात्रपरिचय करत तर कधी काल्पनिक आणि तरीही वास्तव वाटेल असे प्रसंग घेत चित्रपट पुढे जात रहातो.

नागराज मंजुळेचा चित्रपट आहे, त्यामुळे फँड्री/ सैराटशी तुलना होणे अटळ आहे. तर ज्या प्रमाणे फॅन्ड्री/ सैराट मध्ये नागडं सत्य कसलाही मुलाहिजा न ठेवता धाडकन समोर येते तसं दलित लोकांचे वास्तव इथे धगधगीतपणे पुढे येतच नाही, कदाचित मराठी प्रेक्षकाच्या प्रगल्भतेच्या तुलनेत हिंदीत कितपत धोका पत्करावा असा हेतू असेल. बॉलिवुड मध्ये अशा भूमिका प्रस्थापित कलाकारांकडून ब्राउनफेस/ ब्लॅकफेस करुन करण्याची रुढ परंपरा तर मोडली, पण कथेत रोमँटिसिझम कायम ठेवूनच कथा प्रवास करते.

झोपडपट्टी टीमचा कर्णधार डॉन उर्फ अंकुश मेश्राम ह्या कथेचा नायक. तो साकारला आहे अंकुश गेडाम याने. काय काम केलंय याने! त्याच्या कडून इतकं सहज सुंदर काम करुन घेण्यात मंजुळ्यांचा हात कोण धरणार! चित्रपटात याची पार्श्वकथा उत्तम प्रकारे उभी केली आहेत. त्याच्या पात्राला असलेले कंगोर व्यवस्थित उभे केले आहेत. पण दुर्दैवाने अंकुश सोडून कुठल्याच खेळाडूची बॅक स्टोरी चित्रपटात येत नाही. त्यांचा मनाचा ठाव लागत नाही. एक रझियाची कथा थोडी फार आहे, पण तिच्याही मनाची आंदोलने आणखी हवी होती. तब्बल तीन तासाचा चित्रपट आहे, म्हणून हे जास्तच जाणवतं. इतर पात्र कोण आहेत हे डॉक्युमेंटरी स्टाईल थोडंफार समजतं, पण मंजुळे स्टाईल दृकश्राव्य असतं तर मजा आली असती वाटत रहातं.

अजय- अतुलच्या सैराट मधल्या जादू नंतर इथलं संगीत अगदीच तोकडं वाटलं. 'लफडा झाला' तर झिंगाटची कॉपी वाटते. सुरुवातीचं 'झुंड' छान आहे, पण सैराटचा साऊंड ट्रॅक आठवला की... असो... Happy
असंच सुरुवातीला बोराडे सर त्या फुटक्या डब्या बरोबर फुटबॉल खेळताना बघतात तेव्हा अचानक पाऊस चालू होतो. तो प्रसंग जादुई आहे, पण त्यात व्हिएफएक्स पाऊस आणि त्यात अमिताभच्या चष्म्याच्या काचेवर एक पावसाचा टिपुसही पडत नाही, कपडे, केस भिजणे तर दूरची गोष्ट असल्या चुका का राहिल्यात कोण जाणे. (का माझं काही चुकतंय?)

हिंदीत असे रांगड्या प्रवाहा बाहेरच्या नागड्या व्यक्तिरेखांना घेऊन, त्यांच्यावर मेहेनत करुन, त्यांच्याकडून काम काढून घेऊन चित्रपट फारसे नसतात. त्यामुळे एकुणात चित्रपट आवडला. पण नागराज मंजुळेचा म्हटल्यावर कदाचित फारच जास्त अपेक्षा ठेवून गेलो असेन, त्यामुळे थोडी निराशा झालीच.
अंकुशला ती गोरी मुलगी आवडते ते ठीकच. पण इतर टीम मधल्या मुलींबरोबर कुणी कनेक्ट होईल, संवाद साधेल. एक टीम म्हणून सगळे खेळाडू एकत्र येतील. तर असं काहीच दिसत नाही. सगळ्यांचा पासपोर्ट काढायला जे श्रम लागतात ते दाखवायला जो वेळ दिला आहे, त्यातला थोडा वेळ एक टीम म्हणून उभं रहायला दिला असता तर?

बाकी पूर्ण चित्रपट अनेकदा टिपिकल वळणावर येतो पण टिपिकल न होता काही सकारात्मक संदेश, दृष्टी देऊन जातो. नक्की कुठे ते आणखी लोकांनी बघितला की प्रतिसादांत बोलूच.

तर लोकहो पटपट बघा, म्हणजे वचावचा बोलता येईल. शेवटी मंजुळेचा आहे, त्यामुळे अनेक लहान लहान पात्र, लकबी इ. वर बोलण्यासारखं बरंच आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ती बॅकग्राऊंड शिट्टीची ट्युन मात्र फार आवडली. घरी जाताना रिपिटवर एकली गाणी. ते रॅप साँग पण चांगलं झालय खरं. टायटल साँग एक नंबर!!

आज परत सगळी गाणी ऐकली..
Sid Sriram च्या आवाजावर एकदम लव्ह झालंय राव..
परत परत ऐकतेय..

क्यू रेहेती है तू धूप के मौसम को कोसती..
बेहेतर है कर ले जिंदगी बादल से दोस्ती..

गाणी हळूहळू चढतायत..

टायटल ट्रॅक वर तर आधीच फिदा आहे.. जमलंय..

भरत, लेख शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
काल रात्री हा लेख वाचलेला आणि चित्रपट बघून खरतर जसं अस्वस्थ व्हायला हवं होतं ते काम या लेखाने केलं. साती आणि सोनूंची लेखातून ओळख असल्याने चटकन कनेक्ट करता आलं म्हणून का काय कोण जाणे. इथे लिंक द्यावी वाटले होते पण सातींची पर्सन वॉल शेअर करावी का नको म्हणून दिली न्हवती.
इथे अनुचित असेल सांगणं कदाचित, पण सातीना म्हणावं परतोनी यायचा विचार करा. हे पर्सपेक्टीव्ह मायबोलीवर वाचायला आवडलं असतं.
प्रिव्हलेज शब्द सतत डोक्यात असू द्यावा आपण.

सेम पिंच.. मलाही सातींचा लेख फेसबूकवर वाचून तो ईथे शेअर करावासा वाटलेला. फेसबूक लिंक म्हणून ईथे शेअर केली नाही.

ते साधारण असं होतं की जर पहिल्या अंकात सेटच्या बॅकग्राऊंड मध्ये बंदूक दाखवली असेल तर पुढे दुसर्‍या अंकात ती वाजली पाहिजे. >> मूळ वाक्य चेकॉव्ह चे

भरत, सातींचा लेख इथे शेअर केलात ते योग्य आहे का? त्यांना माहित आहे का?
मी फेबुवर वाचला सातींचा लेख. आत कुठेतरी हलंलं. हा संघर्ष साधा नाही/ नव्हता.
मंजुळए त्याच्या सिनेमांतुन जे सांगतोय ते थोडंजरी पोचलं तरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल.

सातीचा लेख वाचला. हॅट्स ऑफ त्यांच्या कुटुंबाला. इतक्या प्रतिकूल, अनफेअर, निराशाजनक परिस्थितीत त्यांनी शिक्षणाच्या, प्रगतीच्या मार्गावर राहण्याचे मोटिवेशन कसे मिळवले आणि टिकवले असेल याची कल्पनासुद्धा करता येत नाही. त्यांनी आणि अशा परिस्थितीत वाढलेल्या कोणीही केलेला संघर्ष वाचला की सर्वाथाने अनुकूल परिस्थितीत वाढलेल्यांच्या अचीवमेन्ट्स थिट्या वाटायला लागतात.
त्या लेखावर पण तिथे काही टिपिकल कॉमेन्ट्स आलेल्या आहेत " हे झोपडपट्टीतले लोकच घाण अन कचरा करण्याला जबाबदार असतात "वगैरे.

डॉक्टर साती यांचा लेख वाचून नि:शब्द झाले. भरत शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

सातीचा लेख वाचला. हॅट्स ऑफ त्यांच्या कुटुंबाला. इतक्या प्रतिकूल, अनफेअर, निराशाजनक परिस्थितीत त्यांनी शिक्षणाच्या, प्रगतीच्या मार्गावर राहण्याचे मोटिवेशन कसे मिळवले आणि टिकवले असेल याची कल्पनासुद्धा करता येत नाही. त्यांनी आणि अशा परिस्थितीत वाढलेल्या कोणीही केलेला संघर्ष वाचला की सर्वाथाने अनुकूल परिस्थितीत वाढलेल्यांच्या अचीवमेन्ट्स थिट्या वाटायला लागतात. >>> अगदी अगदी.

सातीचा लेख फेसबुकवर वाचला तेव्हा मीही नि:शब्द झाले होते. मैत्रेयी म्हणाली तसंच आपल्या तथाकथित अचिव्हमेन्ट्समध्ये आपल्या प्रिव्हिलेज्ड बॅकग्राउंडचा भाग किती मोठा आहे याची नव्याने जाणीव झाली.
अनेकदा आर्थिक तफावतीबद्दल बोललं जातं यासंदर्भात - पण आर्थिक टंचाईत जगत असतानाही शिक्षणाचं महत्त्व कळणारे वडिलधारे, सुरक्षित वातावरण इत्यादी मिळालेली व्यक्ती तुलनेत सहज प्रगती करून घेईल यात नवल काय.

>>> प्रिव्हलेज शब्द सतत डोक्यात असू द्यावा आपण.
अगदी!

आज काल परवा
तीन दिवस झुंडचे टायटल साँग ऐकतोय रिपीटवर..
त्यात जैसे के भारत बंद है आणि तुम्हारे दिल मे गंद है या दोन लाईन नंतर येणारा म्युजिक पीस खतरनाक आहे. आपल्यालाही ऊठून ओरडावेसे वाटते. कुठली वाद्ये वाजवली आहेत त्यात. कोणाला यातले काही ज्ञान?

https://youtu.be/GLSfLLjcX8U

ह्यात तो पिपाणीवर वाजवलाय

पण तो पीस मला सतरंगी रे गाण्यातल्या सुरुवातीच्या पीससारखा वाटतो

आलाप संपला की लगेच तो पीस आहे

https://youtu.be/OClXVLsI4jM

हो पण मस्त आहे.. तसेच वर उल्लेखलेल्या आधीच्या लाईन सुद्धा मस्त बीटवर येणाऱ्या पंचलाईन असल्याने आणखी भारी वाटते.

आमच्याकडे ज्या चित्रपटगृहांत हा लागलाय, ते फार लांब आहेत. त्यापैकी जे कमी लांब आहे तिथे रात्री १०:५० चा शो फक्त. ओटीटीवर केव्हा येईल अद्याप नक्की नाही.

कॅनडा, उसगावकऱ्यांनी कुठे बघितला?

आम्हीही आज वीस किलोमीटरवरच्या थिएटरला जाऊन पाहिला. परवापर्यंत जवळच्या थिएटरमध्ये होता.
आवडला. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहिते.

काल विवियानात काठीयावाडी फुल्ल आणि झुंडचा शो निम्मा रिकामा होता. पावनखिंड पण फुल्ल. प्रभासच्या रद्दड राधेशामला पण जास्त शो.. (इति बायको ती काठीयावाडी बघायला गेली होती) झुंडचे रिलीज चे टायमींग गंडले आहे. ओटीटी वर बघुया आता.

सर्वप्रथम भरत यांना लिंककरिता धन्यवाद!

परवाच मी झुंड पहिला.खरेच फारसा आवडला नव्हता.मंजुळे टच जाणवत होता,तरी देखील सैराट कुठेतरी डोक्यात गच्च होताच.सिनेमा आहे तेव्हा झोपडपट्टी टीम जिंकणार हा अंदाज होताच.त्यामुळे कथानकाचा जीव लहान होताच.
पण मंजुळेंनी,त्या मुलांकडून मस्त काम करवून घेतले आहे.तो डोळ्यावर केस असणारा लहान मुलगा ज्या उर्मट बेफिकिरीने अमिताभपुढे उभा राहतो,त्याला तोड नाही.

पावसाचं सीन मात्र तद्दन फालतू वाटला.अमिताभच्या अंगावर एक थेंब पाणी नाही.लहानपणी चित्रात काढतात तशा पावसाच्या पांढऱ्या रेषा विचित्र वाटल्या.अंकुश ने आणि सगळ्यांनीच कामे मस्त केली आहेत.शेवटचा सीन (ब्लेड टाकताना) छान आहे.त्या मोनिकाचे कथानक उगीच घुस्वल्यासारखे वाटले.
Amitabhvishayi म्हणायचे झाल्यास ,त्यानेही चांगली मेहेनत घेतल्याचे जाणवते.मलाच उगीच धाकधूक वाटत राहिली की KBC मधल्या प्रमाणे मिश्किल हसेल किंवा डाव्या हाताने टाळी vajavel म्हणून.पण अगदी वेगळा अमिताभ दिसतो यात.फक्त त्याचे पडद्यावर दिसणारे दिसणारे वय पाहता आता हा रिटायर होणारा टीचर म्हणून मान्य करणे कठीण वाटते.प्रेक्षकांच्या हातात दिसेल ते मान्य करण्यावाचून काय असते?

अमितव यांचा हा धागा वाचून सिनेमा पाहायला जायला हवे होते.अधिक कळला असता.धाग्यातील बरेच प्रतिसाद चांगले आहेत.धन्यवाद!

Pages