मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - शान्ता शेळके - भरत.

Submitted by भरत. on 1 March, 2022 - 09:51

शान्ता शेळके माझ्या सर्वाधिक आवडत्या कवयित्री. त्यांचं नाव, चेहरा आणि त्यांच्या रचना यांची एकत्रित ओळख ठसठशीतपणे केव्हा झाली ते आठवायचा प्रयत्न करतोय. माझं दहावी १९८३ चं. १९८२ मध्ये घरी टीव्ही आलेला, पण त्याने तोवर घड्याळातल्या सगळ्या घरांवर हक्क सांगितला नव्हता. कवी-लेखक दिसायचे ते पाठ्यपुस्तकात तेही नववीपासूनच्या - म्हणजे कुमारभारती आणि मग युवकभारती ; क्वचित वर्तमानपत्रात. पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज आणि त्यांचं भव्य कपाळ, केवळ माझा सह्यकडा सोबतच्या वसंत बापटांचा चौकडीचा शर्ट हे लक्षात होते. बालकवींनी मात्र आधीपासूनच मनात जागा पटकावून तिथे नावही लावलं होतं. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसुत, नाटककार म्हणून आधीच माहीत असलेले गडकरी हेही ओळखीचे झाले. शान्ता शेळक्यांची अशी ओळख मला आठवते ती अकरावीच्या पुस्तकातल्या एका पाठामुळे.
(नावाआधीचं प्राध्यापक हे बिरुद आणि डोक्यावरचा पदर - कॉलेजात डोक्यावर पदर घेऊन त्या शिकवत असतील का, असा एका प्रश्न पडला होता. ) तो लेख कवितांबद्दल , कवितेच्या निर्मितीबद्दल होता. 'हे एक झाड आहे' ही कविता आपल्याला कशी सुचली असेल याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. माझं कवितांशी तिथेच नातं जुळलं.
ग्रंथालयातून कवितासंग्रह घेऊन वाचायचे, त्यातल्या आवडत्या कविता वहीत सुंदर अक्षरांत उतरवून घ्यायच्या, पुन्हा पुन्हा वाचायच्या असा छंद लागला. नक्षत्रांचे देणे, रंग माझा वेगळा , एका पावसाळ्यात आणि गोंदण या पुस्तकांतल्या निम्म्याहून जास्त कविता लिहून घेतल्या असतील.
यातल्या शान्ताबाईंच्या कविता तेव्हा सगळ्यांत जवळच्या वाटल्या. पुढे माझ्या हातून कविता लिहिल्या गेल्या. त्या नंतर कधी सजगपणे वाचल्या तेव्हा त्यांत शान्ताबाईंच्या कवितांच्या छाया दिसल्या. अर्थात हे काही शान्ताबाईंची कविता समोर ठेवून आता आपण कविता करू असं झालं नव्हतं. सारा सुप्त मनाचा खेळ.
shanta-kavita.png
तेव्हापासून ते अगदी आजही शान्ताबाईंच्या कविता मला माझ्या फार जवळच्या वाटत आल्या आहेत. विशिष्ट परिस्थितीत, मनस्थितीत एखादी कविता, काही ओळी अगदी माझ्यासाठीच लिहिल्या असाव्यात असं अनेकदा वाटलंय. शान्ताबाईंच्या या कविता आत्मपर आहेत ; अंतर्मुख आहेत. पण तरीही त्या खाजगीपणा जपतात. काय घडलं हे त्या कधी सांगत नाहीत. पण ते काही घडल्यानंतर काय वाटतंय, काय झालंय हे सांगतात. स्वतःबद्दलचे प्रश्न, एकाकीपणा, अपूर्णता , विकल करणार्‍या आठवणी यांचे रंग लेवूनही ही कविता दु:ख उगाळत नाही. तक्रारीचा सूरही लावत नाही. तिला जगण्याचं भान आहे ; स्वतःची तटस्थ जाणीव आहे. सौंदर्यासक्ती तर आहेच. कविता- शब्द यांच्यातून मिळणारा दिलासा आहे. शान्ताबाईंच्या कवितांत कविता, शब्द हे सुद्धा आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीसारखे दिसतात. मला अवचित कधीतरी आपसूक आठवणार्‍या कवोता/ओळींपैकी काही इथे लिहितोय. त्यांच्याबद्दल अधिक काही लिहिण्यासारखं नाही. लिहायची गरजही नसावी.

स्मरणाच्या पार कुठेसे
विमनस्क कुणीतरी असते
ती राख हलविता हाती
बोटाला ठिणगी डसते

सहज फुलू द्यावे फूल , सहज फुलू द्यावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास ....
.. मुखवटाही असेल असो.... मागले काहीच नये दिसू
साधे शब्द पुरेत तेच , एक साधे सोपे हसू (सहजखूण)

आज परंतू मुकी आणखी सोशिक आहे माती ( कळते आहे)

कधीतरी एकेदिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

गेलेल्या असंख्य दिवसांमधून काहीच हातात राहिले नाही....
... वाटते गेले वायाच सारे - वाटते झाला उशिर फार

माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही
शब्दांहून वेगळी मी नाही, नाही ,नाही

प्रत्येक सुकलेल्या पाकळीत
अंतर्भूत असते सुगंधाची गाथा
अमलण्याची व्यथा

दारे लावून सर्व येथ मजला केले कुणी बंद ? का?
नाही मी रडले, कुठून मग हा आला बरे हुंदका?

एखाद्या रात्री पहिल्या झोपेतून अचानक जाग आल्यावर
सारे अंथरूणच एक अजस्त्र सराटा कसे बनते?

एक नवा ताजा दिवस येत आहे देवाघरून
प्राणांत सुख मावत नाही, जीव येतो भरून भरून

कविता वाचायच्या, त्यांच्यात रमायचं हे कळल्यावर रेडियोवर वाजणार्‍या गीतांतल्या शब्दांकडे अधिक लक्ष जाऊ लागलं. इथेही गीतकार शान्ताबाईंनी कवयित्री शान्ताबाईंच्या शेजारीच मनात जागा पटकावली. शान्ताबाईंच्या गीतांच्या लोकप्रियतेबद्दल मुद्दाम लिहायची गरज नाही. पण तरीही - बिनाका गीतमालेसारखं वेगवेगळ्या गीतप्रकारांना क्रम दिले तर प्रत्येक प्रकारात शान्ताबाईंची काही ना काही गीतं सगळ्यांत वरच्या पायर्‍यांवर उभी राहतील.
गणराज रंगि नाचतो आणि गजानना श्री गणराया या गाण्यांशिवाय महाराष्ट्राचा गणेशोत्सव अपुरा राहील. तोच चंद्रमा नभात आणि जिवलगा ही सर्वश्रेष्ठ भावगीतांत मिरवतील. कोळीगीत म्हटल्यावर पारंपरिक गीतं न आठवता - मी डोलकर डोलकर आठवेल. ही गीतं लिहायला त्या कोळ्यांची भाषा शिकल्या तशा महानंदाची गीतं लिहायला त्या कोकणी शिकल्या.
लावणी ? संगीतकार लता. गायिका आशा. शब्द सांगायला हवेत?
आणखी एक लावणी आहे. मला आणा एक हिर्‍याची मोरणी. आवाज लताचा.
देशभक्तीपर गीत ? शूर अम्ही सरदार
पिकनिक साँग? कशी नागीण सळसळली ; मनाच्या धुंदीत , लहरीत
बालगीत ? किलबिल किलबिल पक्षी बोलती

हृदयनाथ मंगेशकर आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या नव्या , अवघड वाटा धुंडाळणार्‍या संगीतकारांसोबत शान्ताबाई होत्या.
काटा रुते कुणाला हे नाट्यगीत एका उर्दू शेरावरून बांधलंय. ते आणि छेडियल्या तारा या दोहोंत गझलियत ओतप्रोत आहे.
किशोरी आमोणकरांनी गायिलेली दोन भावगीतं शान्ताबाईंनी लिहिलीत.
चालीवरून गाणी लिहिणं हा प्रकार अनोखा राहिलेला नाही. पण शान्ताबाईंनी मानस मुखर्जींच्या बंगाली गीतांच्या चालीत शब्द बसवले.
सलिल चौधरींनी एका मराठी चित्रपटाला संगीत दिलंय. माझी आवडती गाणी या अल्बमसोबतच्या पुस्तिकेत लता लिहिते -"नंतर आमच्या ' सूनबाई' या चित्रपटाची गाणी करण्याच्या निमित्ताने शान्ताबाई आमच्या घरी आल्या.....

तुझा सहवास

प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी

ही ती गीतं. मूळ बांग्ला गीतांच्या वजनावर लिहिलेली.

सी रामचंद्र यांनी आपल्या संगीताची जादू मराठीतून दाखवायला म्हणून की काय, घरकुल या चित्रपटाची निर्मिती केली. हे राष्ट्र देवतांचे, मलमली तारुण्य, जोगिया -ही कविता , याच चित्रपटातल्या. त्यांनी शान्ताबाईंकडूनही तीन गीते लिहून घेतली. पप्पा सांगा कुणाचे, नंबर फिफ्टी फोर. इंग्रजी गाण्यांना मराठी पेहराव दिला.

शान्ताबाईंनी अनुवादही आवडीने केले. कादंबर्‍यांचे, माहितीपर पुस्तक , भाषणांचे संकलन , इंग्रजी चित्रपटांच्या कथा -पटकथा. यातून त्यांचे अर्थार्जन झाले. पण त्यांनी कवितांचेही अनुवाद केले. हायकूंंच्या अनुवादांचा संग्रह पाण्यावरल्या पाकळ्या. हायकूंचा अनुवाद करताना त्यातल्या तांत्रिक भागा पेक्षा काव्यगुणावर त्यांनी भर दिला. पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिरीष पै आणि प्रा सुरेश मथुरे यांनी केलेल्या अनुवादांची प्रशंसापर नोंदही त्यांनी केली आहे.
अनुवादकाच्या रूपातून समोर येतो त्यांचा एक रसिक हा पैलू. ही रसिकता आपल्याला जे आवडले ते इतरांपर्यंत पोचवून त्यांनाही त्या आनंदयात्रेत सहभागी करून घेणारी. ही रसिकता कवितांबाबत ओसंडून वाहत असे. पूर्वसूरींच्या कविता , ओव्यांसारखे लोकसाहित्य, समकालीन कवींच्या कवितांइतकेच प्रेम त्यांनी त्यांच्या नंतरच्या पिढीच्या कवितांवरही केले. अंतर्नाद मासिकासाठी 'स्मरणातल्या कविता' या सदराखाली त्यांनी आवडलेल्या कवितांचे रसग्रहण केले.
आठवणीतल्या कविता या संग्रहाच्या प्रस्तावनेतून - कवयित्री शांताबाई शेळके यांचं मुळातच कवितेसंबंधीचं प्रेम आणि त्त्या बाबतीतली स्मरणशक्ती जबरदस्त. श्री बरवे त्यांना भेटले तेव्हा सतत काव्यातच अवगाहन करीत असल्याप्रमाणे शांताबाईंनी बोलता बोलता असंख्य कवितांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री बरवे यांच्या हातातल्या जुन्या क्रमिक पुस्तकांना प्रेमाने कुरवाळले , अनेक संग्रहांची - व ते कुठे कुठे उपलब्ध होतील याची माहिती पुरवली आणि भारून गेल्याप्रमाणे स्वतःसाठी एक आणि लता मंगेशकर यांच्यासाठी एक अशा पावत्या फाडायला लावल्या.

shanta-gadya.png
धूळपाटीच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात - धूळपाटी हे माझे आत्मचरित्र नाही. माझे व्यक्तिगत पातळीवरचे जे खासगी आयुष्य आहे त्यातले तपशील जाहीर करावेत असे मला वाटत नाही. एकतर त्या तपशिलांशी वाचकांना काही कर्तव्य नसते आणि दुसरे म्हणजे असले तपशील सांगून स्वतःचे समर्थन करणे किंवा वाचकांची जिज्ञासा चाळवणे यात व्यक्तिशः मला कधीही रस वाटलेला नाही.
त्यांनी स्वतःचे खासगी आयुष्य लपवून ठेवले होते असे नाही. एका पुस्तकाची अर्पणपत्रिका याला साक्ष आहे. पण जे तपशील त्यांना सांगायचे नव्हते असे तपशील सांगणारे लेख हल्लीच वाचनात आले . व्हॉट्स अ‍ॅप फॉर्वर्ड आलेला एक लेख पहिल्याच परिच्छेदात कोणाचा असेल ते ओळखून पुढचं न वाचताच उडवला. त्यांच्याबद्दलच्या लेखांचं वेगवेगळ्या परिचितांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन असलेल्या एका पुस्तकातले काही लेख वाचून त्यांची करुण प्रतिमा काही काळ होईना टोचून गेली. पण त्यांची माझ्या मनावर उमटलेली मुद्रा मात्र एका गोष्टीवेल्हाळ तरीही ज्ञानी, संवेदनशील , रसिक , उत्साही कवयित्री आणि काव्यप्रेमी व्यक्तीचीच राहील.

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध गूज सांगते
तृणात फूलपाखरू तसे बसेल गीत हे
फुलाफुलात येत्थल्या उद्या हसेल गीत हे
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, लेखात घेतलेल्या शान्ताबाईंच्या कवितांच्या ओळींमुळे प्रताधिकारभंग होऊ नये. पण तसं असेल तर सांगा. त्या वगळेन.

काय सुरेख लेख आहे. उत्कट आहे. आवडला.
भरत तुमच्या कविता इथे जरुर लिहा/मांडा कधीतरी. कारण एक हिंदी कविता अनुवाद तुम्ही फार म्हणजे खूपच छान केलेला आठवतो मला. बहुतेक किल्लीच्या 'गाण्यांच्या अनुवादाच्या' धाग्यात किंवा कोणत्या तरी खेळात. वाचायला आवडतील.
----------------------
हे पहा सापडलं - Happy
अचानक
कुणीतरी
समोर
आरसा बनून
उभं ठाकलं
आणि जाणवलं
चेहर्‍यावर
एक वाळवंट
आक्रमण करतंय.
...
त्याला थोपविण्यासाठी
दोन अश्रू
डोळ्यांत उभे.

>>>>एक नवा ताजा दिवस येत आहे देवाघरून
प्राणांत सुख मावत नाही, जीव येतो भरून भरून

आयुष्याचे ध्येय ब्रीदवाक्य करावे अशा ओळी!!!

निवडक दहात...लेख संपल्याची चुटपुट लागली.
अतिशय आवडला लेख...
शांताबाई माझ्याही आवडत्या पण तुमच्यासारखे अवलोकन नाही जमणार मला...
तुमच्या कविता वाचायला आवडेल...

खूपच छान आढावा.
गीतकार शांताबाई बऱ्याच जणांना माहिती असतात. कवयित्री शांताबाईंवर लिहिलेलं विशेष आवडलं.
आवडत्या साहित्यिकांवर लिहिणं आणि लाडक्या, प्रेरक साहित्यिक व्यक्तिवर लिहिणं यातला फरक खूप छानपणे लेखातून व्यक्त होतोय.
लेख आवडलाच..

आवडला लेख.

त्यांनी कालीदासाच्या मेघदूताचा केलेला अनुवादही आवडला होता.

कॉलेजच्या ग्रंथालयात अचानक एक सुंदर अनुवादीत कथांचे पुस्तक हाती लागले होते - सुरस आणि चमत्कारीक कथा. खात्रीशीर आठवत नाही पण त्यांचा अनुवादही शांता शेळके यांनी केला होता बहुतेक. आंतरजालावर आता शोधून पाहिले पण त्याबद्दल माहिती मिळाली नाही. कदाचित तुम्ही सांगू शकाल.

किती सुंदर लिहिलं आहे!
तुमच्या कितीतरी ओळी अगदी थेट भिडल्या.
एखादी कविता आपल्यासाठीच आहे असं वाटणं, गीतांतल्या शब्दांकडे अधिक लक्ष असणं इत्यादींबद्दल सहर्ष अनुमोदन!
लेखनात प्रतिबिंबित होणाऱ्या त्यांच्या प्रसन्न, शालीन, सौंदर्यासक्त आणि सहृदय व्यक्तिमत्वाचं अगदी डोळस आणि नेमकं वर्णन केलं आहात.

खूप सुंदर लिहिलंयत भरत.. खूप आवडला लेख.

कवितासंग्रह मुद्दाम वाचायला घेऊन कविता वाचणाऱ्यांपैकी मी नाही. याला एक प्रकारचा बौद्धिक कंटाळा म्हणता येईल. गद्य वाचन जास्त आवडतं. पण कुणी आवर्जून कविता वाचायला दिली/ऐकवली तर नक्की ऐकते, वाचते. कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकरांच्या अनेक कविता मनापासून आवडतात. मराठीच्या पुस्तकातल्या अनेक कविता अजूनही पाठ आहेत. शांताबाईंची मला सर्वाधिक आवडलेली कविता म्हणजे 'पैठणी'. त्यांनी अनुवाद केलेलं 'चौघीजणी' हेही खूप आवडलं होतं.

नितांत सुंदर लिखाण. मनापासून लिहिलेलं जाणवतंय अगदी.
अजूनही अशा इतरही काही कलाकारांबद्दल लिहिलेले वाचायला आवडेल.

काल शांताबाईंचा जन्मदिन. लोकसत्तेतील या लेखात त्यांच्या समग्र साहित्याचा आणि व्यक्तिमत्वाचा आढावा घेतलाय. ललितलेखन आणि कवितांबद्दल लिहिलेलं पटलंच.
त्यांचा एक कथासंग्रह वाचला होता. त्यातल्या कथाही ललित लेखनात सांगायचं ते कथेतून प्रसंग रचून सांगितल्यासारखं वाटलं. नव्हता आवडला.
गझलाही नाही आवडल्या.
https://www.loksatta.com/chaturang/songwriter-poet-of-marathi-in-literat...

छान लेख!
त्यांचे साहित्य वाचून मला ‍वाङ्मयााची जाण आली.(जी काय थोडीफार आहे ती )