मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार (शेवट) - १ मार्च - आजचा अलंकार 'श्लेष'

Submitted by संयोजक-मभादि on 28 February, 2022 - 20:58

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल. आज ह्या उपक्रमांचा शेवटचा दिवस.

म्हटलं तर सोपा, आणी त्याबरोबरच विचारांना चालना देणारा आजचा अलंकार म्हणजे श्लेष अलंकार

काय आहे हा श्लेष अलंकार?
या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो.

उदाहरणार्थ -
१) ‘ हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. ‘ (आयुष्य/ पाणी)
२) श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न-वरी ॥
३) कुस्करु नका ही सुमने ॥ जरि वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने ॥ (फुले/ चांगली मने)
४) मला एस.टी. लागते. (गरज असणे/ त्रास होणे)

आजच्या खेळात येऊद्यात अशी वाक्ये, छोटासा संवाद ज्यात आहे श्लेष अलंकाराची गम्मत.

नियम-
१. एका सदस्याने पाठोपाठ, एकाच पोस्ट मध्ये अनेक उदाहरणे दिली तरी चालतील
२. स्वतः तयार केलेली असतील तर उत्तम ( ऐकलेली, वाचलेली ही चालतील)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेषा,

शिर्याचा जो शेष राहिला आहे तो गोड मानून खा. त्यात शिरू मात्र नकोस.

हिची खिचडी बघूनच उपासाची इच्छा होते. (.... म्हणजे आता नक्की खिचडी कशी झाली ते कसं समजायचं?? वाईट झाली काही खाऊ नये? की इतकी उत्तम झाली की उपास न करणारे ही उपासाला लागले).

मनीमोहोर तुझे तर कधीच लक्षात आलेले नव्हते. खूप छान >> थॅंक्यु सामो.

मनीमोहोर मग तुमच्या आयडीत आणखी एका अर्थाने श्लेष आहे. मोहोर हा शब्द पूर्वी चलन या अर्थानेही वापरत - सोन्याच्या मोहरा ई. त्यामुळे मनात पैसा या अर्थाने मोहोर असेही होउ शकते Happy >> फारएन्ड, खूप च मस्त. मी वर लिहिलं आहे तो विचार करूनच मी मनी मोहोर आयडी घेतला पण तुम्ही सांगत आहात ते नव्हतं लक्षात आलं माझ्या कधी.

तो वाघ रात्री येई आणि गायबकरी गायब करी.
सूर्यग्रहण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पहाणे चांगले नसेल तर आरशात कारवी का रवी कडे पहातील./?

असं ठरवून मुद्दामून दोन अर्थ असलेले शब्द योजून श्लेष केलेले वाचायला मजा नाही येत.
सहज परिस्थितीत बोलण्यात/ लिहिण्यात आले की मजा येते.

आज महा शिवरात्रीच्या निमित्ताने लहानपणी ऐकलेला
शंकरास पुजिले सुमनाने . - तीन अर्थ

सहज परिस्थितीत बोलण्यात/ लिहिण्यात आले की मजा येते. >>> एका गटगच्या चर्चेतले उदाहरण आहे. नवीन श्लेष सुचत नसल्याने जुनाच देतो.

गटगची चर्चा दुसर्‍या तिसर्‍या पानापर्यंत गेल्यावर कोणीतरी गटगच्या मेनूचा विषय काढला. तेव्हा भा की कोणीतरी विचारले की इतक्या लौकर मेनूची चर्चा करताय का. तेव्हा "पाने वाढल्यावर मेनूची चर्चा करून कसे चालेल" असे मी म्हंटले होते Happy

मला एक शंका आहे . एका वाक्यात एकाच शब्दाचे एका ठिकाणी दोन अर्थ म्हणजे श्लेष ही माझी समजूत वरील लेखातील दुसरे उदाहरण श्लेष म्हणता येईल काय ?
"तो सलमान मी नवरी " असे कॅटने म्हणले तर तो श्लेष होईल .
तसेच तिसऱ्या उदाहरणात दुसऱ्या सुमनात श्लेश आहे . पहिल सुमन श्लेषाचा भाग नाही .

विक्रमसिंह आधी मलाही तसेच वाटले.
लिहिले ले वाचताना श्लेष वाटत नाही. पण असे कुणी म्हटले आणि आपण ऐकतोय तेव्हा श्लेष होईल.

एका गावात एखादा चांगला शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. ते ही श्लेषाचेच उदाहरण आहे. सामान्य लोकांना ती स्तुती वाटते, जाणकार सर्व जाणून असतात. वापरून गुळगुळीत झालेली उदाहरणे म्हणजे..

"काय ! सरकारचा पाहुणचार झोडून आलात, नशीब काढलंत नशीब "
( कुणी तुरूंगात जाऊन आल्याची बातमी दाबून ठेवलेली असल्यास )

Pages