मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार (शेवट) - १ मार्च - आजचा अलंकार 'श्लेष'

Submitted by संयोजक-मभादि on 28 February, 2022 - 20:58

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल. आज ह्या उपक्रमांचा शेवटचा दिवस.

म्हटलं तर सोपा, आणी त्याबरोबरच विचारांना चालना देणारा आजचा अलंकार म्हणजे श्लेष अलंकार

काय आहे हा श्लेष अलंकार?
या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो.

उदाहरणार्थ -
१) ‘ हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. ‘ (आयुष्य/ पाणी)
२) श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न-वरी ॥
३) कुस्करु नका ही सुमने ॥ जरि वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने ॥ (फुले/ चांगली मने)
४) मला एस.टी. लागते. (गरज असणे/ त्रास होणे)

आजच्या खेळात येऊद्यात अशी वाक्ये, छोटासा संवाद ज्यात आहे श्लेष अलंकाराची गम्मत.

नियम-
१. एका सदस्याने पाठोपाठ, एकाच पोस्ट मध्ये अनेक उदाहरणे दिली तरी चालतील
२. स्वतः तयार केलेली असतील तर उत्तम ( ऐकलेली, वाचलेली ही चालतील)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लक्ष्मीचे श्रीपतिप्रिया नाव मला नेहमी दोन अर्थी वाटते -
श्रीपती = विष्णू

श्री पति प्रिया म्हणजे पतीस प्रिय अशी श्री.

श्लेष अलंकाराचं पुस्तकात दिलेलं उदाहरणच नेहमी आठवतं.

औषध नलगे मजला / औषध नल गे मजला

माझ्या आजारावर कसलंही औषध नाही.
नल राजा हेच माझ्या आजारावर औषध.

काठीसारखी अंगकाठी असणारे आजोबा एका हातात काठी घेऊन अन् दुसरा हात म्हातारपणाच्या काठीच्या हातात देऊन नदीच्या काठाकाठाने सावकाश येत होते.

दोन सुतार गप्पा मारत असतात . पहिला दुसऱ्याला म्हणतो " अरे , खूप काम आहे माझ्याकडे , पण काय करू , करवतच नाही ".

पु ल - मी पुढचे दोन तास एका हातात घरची आणि एका हातात बाजारची वीट धरून फिरत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात ते मला तेव्हा कळलं.

च्रप्स यांनी लिहिलेला वजन - काटा हेही पुलंच्या माझा उपास (बटाट्याची चाळ ) यातलं आहे. च्रप्स पुल वाचत असतील तर छान आहे.

माझ्या मायबोलीच्या "मनीमोहोर " ह्या आयडी मध्येही श्लेष अलंकार
दिसून येतो.

मनी हे दोन अर्थानी वापरले आहे. एक म्हणजे मनात आणि मनी म्हणजे money सुद्धा. Money शिवाय मी अपूर्ण आहे कारण माझी कर्मभूमी भारतीय रिजर्व बँक आहे
मोहोर म्हणजे आंब्याचा मोहोर. सासरी आमच्या आंब्याच्या बागा आहेत देवगड तालुक्यात आणि आंबा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मोहोरणे म्हणजे फुलणे सुद्धा
म्हणुन मनीमोहोर

नव्याने मराठी शिकलेली स्त्री मराठी मैत्रिणीला - अगं काल दुपारी १ ते ४ च्या दरम्यान मी तुला फोन केला होता. तू घेतलाच नाहीस.
मराठी मैत्रीण - अगं मी जरा पडले होते.
नमशिस्त्री - अगं अशी कशी पडलीस? फार लागलं नाही ना?
म मै - अं... नाही गं. ते जाऊ दे. फोन कशासाठी केला होतास?
नमशिस्त्री - अमेझॉनवर फ्लॅश सेलमध्ये एअर फ्रायर एक दशांश किंमतीला होता.
ममै - अरेरे! ही दुपारची झोप मला केवढ्याला पडली!
नमशिस्त्री - आता परत पडलीस की काय? डॉक्टरना दाखव बरं एकदा.

मनीमोहोर मग तुमच्या आयडीत आणखी एका अर्थाने श्लेष आहे. मोहोर हा शब्द पूर्वी चलन या अर्थानेही वापरत - सोन्याच्या मोहरा ई. त्यामुळे मनात पैसा या अर्थाने मोहोर असेही होउ शकते Happy

सप्त सूरांतील कुठला स्वर कुणास मोही सांगता येत नाही.
सामो ला मोही सा तर मोहिनीला मोही नि.

भरत आता बँकेत पैसे भरत असतील.

आपल्या मनातलं बोलणारी व्यक्ती सामोरी असली की सामो री ओढते.

मोहिनीच्या मनी पानगळ तर मनीमोहोरच्या मनी मोहोर

(हे सगळे श्लेष म्हणता येतील का?)

सर्वच मस्त.

श्लेष अलंकाराचं पुस्तकात दिलेलं उदाहरणच नेहमी आठवतं.

औषध नलगे मजला / औषध नल गे मजला >>> अगदी अगदी.

हा हा हा मस्तच सगळी उदाहरणे

आजच्या शुभ दिनी तू शुंभासारखा उभा का ?
आजच्या शुभ दिनी तू इतका दीन का ?

नवे वस्त्र पाहून ती म्हणाली "हे तर पातळ आहे."

ती म्हणाली ज्वारी दळायला जाते आहे.

धाकटा आला तर ज्येष्ठ महिन्यात येईल.

Pages