संजीव गुरूनाईक - भाग - ५ - श्रीनू

Submitted by विजयश्रीनन्दन on 20 February, 2022 - 10:40

इझी चेअरवर बसून फ्रेंच विन्डो मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत, हातातल्या मग मधून चहाचे घुटके घेत होतो. कोकण चा पाऊस जितका चांगला तितकाच वाईट. झोडपायला लागला तर थांबतच नाही. नाही तर, क्षणात आहेआणि क्षणात गायब. घराच्या पुर्वेला टेकडीवर धो धो कोसळणारा पाऊस आणि पश्चिमेला समुद्रात मावळत्या सूर्याचे दर्शन. कोकणाच्या पावसाचं खरच काही खरं नाही.

आज पश्चिमेला पाऊस होता. वादळाची चिन्ह दिसत होती. अशाच वादळात श्रीनू बुडालेला. त्याच नाव श्रीनिवास. त्याच्या आधी गावाचा नाव, घरच नाव आणि चार पाच नावं होती. ती कधी कळलीच नाहीत. श्रीनू हे आम्ही ठेवलेलं नाव. नंतर कळलं , आंध्रप्रदेश मध्ये श्रीनू आवाज दिला तर गर्दीमधील जवळपास निम्मे लोकं हात वर करतात. अर्ध्या अधिक लोकांच टोपण नाव श्रीनूच असतं.

नेव्हीच्या ट्रेनिंग मध्ये माझ्या शेजारच्या बंकवर आंध्र प्रदेश चा मुलगा आलेला. काहीही सांगितलं तर "हिंदी नहीं आती, गाली नहीं देनेका" दोनच वाक्य म्हणणारा. गम्मत वाटली. आणि इंग्लिश तर एकदमच हाय एंडच होतं. पण नाव विचारलं तर काहीतरी भलमोठ्ठ होत. शेवटची चार अक्षरं कळली. श्रीनिवास. नामकरण केलं श्रीनू.

पुढची काही वर्षे हाच श्रीनू माझा खास मित्र बनला. सुरूवातीला खूपच डोईजड वाटायचा. शेजारीच बंक असल्याने सोबतच राहायचा. उठून बाथरूम ला गेलो तरी हा पठ्ठ्या मागेच असायचा. त्याला हिंदी मोडक तोडक कळायचं आणि तसल्याच हिंदीमध्ये "गुरूभाऊ मैं भी आती" म्हणत माझ्या सोबत असायचा. हळूहळू हिंदी शब्द, वाक्य शिकत गेला. ट्रेनिंग संपेपर्यंत अहिंदी भाषिकांनी फक्त हिंदी बोलायचं हा नियम केलेला होता. तो त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करायचा.

एकदा गार्डन मध्ये गवत कापणी सुरू होती. कुठूनतरी पळत आला आणि मला म्हणाला 'कलम चाहिये'. मला कळेना त्याला कुठल्या झाडाचं कलम पाहिजे. त्याला दुसरा शब्द सुचेना. आमच्या परेड उस्ताद नी त्याला पाठवलेलं आणि हिंदीमध्येच बोलणं आवश्यक होतं. बिचारा रडवेला झाला. तो परत परत सांगत होता. मला कळत नव्हतं. सोबत त्रिपाठी होता. त्याच्या लक्षात आलं. त्यानं खिशातून पेन काढून दिला. नंतर कळलं हा हिंदी मधला कलम म्हणजे पेन मागत होता आणि मी मराठी कलमाचा विचार करत होतो. रात्री जेवताना त्याला झालेली गफलत सांगितली. त्रिपाठी, मी आणि तो हसायला लागलो. मेस सेक्रेटरी ने बघितलं त्याला बकरे सापडले. जेवण करताना गोंधळ माजवला म्हणून रात्रीची भांडी धुणे आणि डायनिंग हॉल ची सफाई करायची पनिशमेंट दिली.

ट्रेनिंग संपेपर्यंत हा हिंदी मध्ये परफेक्ट झालेला. ट्रेनिंग संपलं आणि दोघेही एकाच शिप मध्ये आलो. विशाखापट्टणम ची पोस्टिंग होती. त्रिपाठी कोचीनला गेला.

विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेश आणि तिथली भाषा तेलुगू. आता श्रीनू मला तेलुगू शिकवायला लागला. रोज संध्याकाळी बाहेर पडायचं, बस धरून बीच वर जायचं सूर्यास्त बघायचा आणि रात्री जेवणाला परत शिपवर हा नियम ठरलेला. शिप हार्बर मध्ये असेल तर आमची जोडी एकत्रच बाहेर पडणार आणि भटकणार. सुरूवातीला शिपवरच्या लोकांना आश्चर्य वाटायचं एक तमडू आणि एक घाटीभाऊ एकत्र कसेकाय? तेलुगू भाषेत लहान भावाला तमडू म्हणतात मग नेव्ही मध्ये प्रत्येक दक्षिण भारतीय हा तमडूच असतो. आणि मराठी लोकं नेव्हीमध्ये कमीच. पण जे असतात ते सहसा एकलकोंडे. 'सत्या' पिक्चरच्या कृपेने मराठी माणूस हा भाऊ बनलेला आणि संजय दत्तची बंबईया हिंदी हीच त्यांची भाषा असा समज. माझं नाव ट्रेनिंग मध्येच गुरूभाऊ पडलेलं. आमच्या शिपमध्ये 'श्रीनू आणि गुरूभाऊ'ची जोडी फेमस झालेली.

रविवार आला की विशाखापट्टणम च्या आजूबाजूची गाव दाखवत हा श्रीनू मला घेऊन जायचा. कैलासगिरी, मछलीपट्टणम, श्रीकाकुलम, आराकू अशा ठिकाणी फिरणं व्हायचं. अनंतगिरीच्या पर्वतरांगा खूपच अद्भुत. विशाखापट्टणम ते मछलीपट्टणम चा समुद्र किनार्याचा रस्ता, सगळच नयनरम्य.अहमदनगरमधील चांदबीबी चा महाल आणि डोंगरगण बघितलेला मी या ठिकाणी भान हरपून जायचो.

एका रविवारी ऋषीकोंडा बीचवर गेलेलो. वारा होता. मोठ्या लाटा येत होत्या. पण लोकं समुद्रात खेळत होती. श्रीनूला पण पाण्यात जायची हुक्की आली. मी भाजलेलं कणीस खात बसलो होतो. मी नकार दिला. तोपण कणीस घेऊन बसला. तितक्यात मोठा गोंधळ ऊडाला. एक ४-५ वर्षांच बाळ लाटेनी पाण्यात ओढलं गेलं.

हातातलं कणीस फेकत श्रीनू पाण्यात गेला. घातल्या कपड्यात पाण्यात पोहत बाळाला धरलं. मी पण जवळच पोहोचलो होतो. समुद्र किनारी खडकाजवळ आलो. बाळाला खडकावर बसवलं. मुलाचे आई वडील बघत होते. दहा बारा मीटर वर पाचेक फुट पाण्यात वडील होते. आई किनारी थांबून रडत होती. श्रीनू म्हणाला. 'भाऊ बच्चे को ले जाओ'. आणि हसला. विचित्रच गूढ वाटलं त्याच हसणं. तो खडकावर बसला. मी बाळाला घेऊन किनारी आलो.

परत गलका झाला. मोठ्ठी लाट आली होती. श्रीनू खडकावर आपटला गेला. आणि पाण्यात ओढला गेला.. कुठेच दिसेना. पायातलं त्राण गेलं तिथच पडलो. डोळ्यांसमोर अंधार झाला.

डोळे उघडले तेव्हा मिलीटरी हॉस्पिटलमध्ये होतो. कळलं जिल्हाधिकार्यांनी बाळाला वाचवण्यासाठी श्रीनूला पुरस्कार जाहीर केला. मरणोत्तर पुरस्कार होता तो..

बाळाला वाचवताना श्रीनू पाण्यात गेलेला. डोक्याला मार बसल्याने मृत्यू मुखी पडलेला. तो का हसला ते कधीच न सांगता गुरूचा जहाजावरील एकमेव मित्र गेला. ....

हात थरथरत होते. चहा हातावर सांडला. परत भानावर आलो. Life is not so easy, you are blessed if you are alive म्हणत चहाचा घोट घेतला..

पावसामुळे बाहेर जायला न मिळाल्याने उदास झालेला ब्राऊनी शेजारीच बसला होता..,.

विजयश्रीनंदन

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults