पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

Submitted by पाषाणभेद on 20 February, 2022 - 06:23
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय Sound Pollution

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.

ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.

वातावरणातील जल, वायू इत्यादी प्रदूषणाबाबत अनेकदा बोलले जाते, परंतु आपण ध्वनी प्रदूषण, आवाज याला फार हलक्यात घेत असतो. ध्वनी निर्माण करण्यास फारसे श्रम लागत नाहीत. मोबाइलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्‍याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्‍याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.

अवाजवी आवाजाचा ध्वनी जेव्हा हानिकारक पातळीवर पोहोचतो तेव्हा सजीवांवर न दिसणारे नुकसान त्याने केलेले असते. ध्वनी प्रदूषणाने मानव प्राणी तसेच इतर सजीवांत अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.

आवाजाचा त्रास आपणापैकी अनेकांना होत असेल यात शंका नाही. या अनुभवाला आपल्यासमोर मांडतांना आपणही समाजात या अवाजवी आवाजाबद्दल इतरांना सांगावे व त्याच्या परिणामाबाब लिहावे असे वाटल्याने त्या लेखनाचे रुपांतर पुस्तकात झाले आहे. यातील काही मुद्दे मिसळपाव.कॉम व मायबोली.कॉम या मराठी संकेतस्थळावर लिहीले. तेथे अनेकांनी आवाजाबाबत आपली मते व्यक्त केली. मग आवाजाचा त्रास होणे हा सार्वत्रीक अनुभव आहे फक्त त्याला जाहीर वाचा कोणी फोडायला धजावत नाही हे लक्षात आले. म्हणूनच सदर पुस्तकात कायद्याने ध्वनी प्रदूषण कमी करायला काय मदत होवू शकते याचा उहापोह केला आहे. त्याचप्रमाणे या प्रदूषणामुळे सजीव तसेच प्राणी, पक्षी, जलचर यांवर काय परिणाम होतो व त्यावर उपाययोजना काय असावी याबद्दल लिहीले आहे. वाहनांच्या आवाजावर तसेच आपल्याला शांत झोप लागावी यासाठीही स्वतंत्र्य प्रकरणे लिहीली आहेत त्याचा तुम्हाला लाभ होईल अशी आशा आहे.

या आधीच्या 'वगनाट्य: वैरी भेदला' पुस्तकात सर्व काम - अगदी टायपींगपासून ते कव्हर डिजाईन, पेज लेआऊट, इंडेक्सींग इत्यादी स्वत:च करतांना जो त्रास झाला तो अनुभव असल्याने या पुस्तकाच्या निर्मीतीत तो त्रास झाला नाही.

ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे (Open Source) लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.

वाहनांमुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणावर स्वतंत्र प्रकरण लिहिले असल्याने वाचकांना ते सुद्धा मार्गदर्शक ठरावे.

एकूणच ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करणारे हे पुस्तक वाचकांना पर्यावरणाबाबतच्या एका दुर्लक्षिलेल्या समस्येविषयी ओळख करून देते हे नक्की.

येथील सर्व सदस्यांचे आभार.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय
ISBN: 978-93-5578-807-8
लेखक: सचिन सुधाकर बोरसे (पाषाणभेद)
प्रकाशन: अमीगो बूक पब्लिशर, नाशिक.
किंमत: रू. ११५/-
वितरण: ऑनलाईन - अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!

व्यस्ततेमुळे>> व्यग्र लिहावे किंवा बिझी असा मराठमोळा शब्दही चालू शकेल.