हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

Submitted by मार्गी on 2 February, 2022 - 05:04

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक

३ नोव्हेंबर २०२१! हिमालयातून परत येऊन अडीच महिने होऊन गेले तरी ते दिवस डोळ्यांपुढे आहेत. आपण सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो आणि पुढचे अनुभव शेअर करतो. बुंगाछीना ह्या गावामध्ये असलेली पूजा हेच ह्या कौटुंबिक भेटीचं मुख्य कारण होतं. त्यासाठी सगळे बुंगाछीना ह्या गावी जमलो. सत्गड- पिथौरागढ़- बुंगाछीना असं आलो. अंतर जेमतेम ५० किमी, पण अडीच तास लागले. बुंगाछीनामध्ये काही दिवसांपूर्वी आलो होतो तेव्हा प्रदीपजींसोबत जवळच्याच डोंगराकडे फिरलो होतो व पायवाटांवर मस्त ट्रेकिंग झालं होतं. आता त्याच डोंगरावर अदूला फिरायला न्यायचं आहे. आम्ही गूंजीकडे गेलो असताना ती इथे मस्त राहिली. घरातल्या शेळ्या- मेंढ्या, शेताचा परिसर, नातेवाईक व वेगवेगळे लोक, कडक थंडी, राती वाघाची दहशत हे सगळं वातावरण तिने खूप एंजॉय केलं. कडक थंडीमुळे तिचा चेहरा काळा पडत जातोय. किंबहुना आम्हा सगळ्यांचाच! तिचे गाल नंतर थोडे लाल होतील अशी मी वाट बघतोय!


.

सकाळी थंडीत आवरून निघालो. बुंगाछीनाची उंची सत्गडपेक्षा थोडी कमी आहे, त्यामुळे इथे थंडी किंचित कमी वाजते. अदू उत्साहाने तयार झाली. निघतानाच तिला सांगितलं होतं की, फिरायला नेईन तुला, पण माझी अट आहे. अट म्हणजे नो कडेवर! तिनेही हो हो केलं आणि निघालो. हिमालयाच्या इतक्या आतमध्ये वसलेलं अग्न्या- बुंगाछीना गांव आणि चढणारी पायवाट! थोड्याच वेळात मुख्य रस्त्यावर आलो आणि मुख्य गावात पोहचलो. काही दिवसांपूर्वीच प्रदीपजींसोबत गेल्यामुळे मुख्य रस्ता तर परिचित आहे. फक्त पायवाटांवरून जाता येणार नाही, कारण तिथे सराईत वाटाड्याच हवा. अदूच्या गतीने रमत गमत चढत राहिलो. हळु हळु घाटाचा रस्ता सुरू झाला आणि दुकानं- घरं मागे पडली. रस्ता जरा उंचावर आल्यावर मागे वळून बघितलं तर कोवळ्या केशरी सूर्यप्रकाशात जागी झालेली हिमशिखरं दिसली! रस्ता जसा वर चढतोय, तशी ती अजून वर येत आहेत आणि मस्त चमकत आहेत. अदू खूप मस्त एंजॉय करतेय! पण हे काय! अट मोडावी लागली! ती चालतच नाहीय! थोडं थांबू, ब्रेक घेऊ म्हणालो पण ऐकलं नाही! मग तिला कसबसं कडेवर घेऊन थोडं थोडं थांबत पुढे आलो. तिला घेऊन चालणं हे आता खूप खडतर वेट ट्रेनिंग झालंय!


.

सुंदर नजा-यांमध्ये मनसोक्त फोटो घेत घेत निघालो. चढ असल्यामुळे थंडी वाजेनाशी झाली. मध्येच एक गाडी क्रॉस झाली. नंतर गवताचा भारा घेतलेल्या एक ताईही भेटल्या. इथले लोक इतके साधे आणि निसर्ग- सम्मुख आहेत की, एकमेकांशी खूप जोडून राहतात. त्यांनीही आमची विचारपूस केली. अदूला कडेवर घेताना नीट चालता येत नाहीय. जेव्हा मंदीर आणि डोंगर अगदी समोर आला, तेव्हा तिला बोललो की, आता तू शक्ती लाव. जोर लाव. आणि इतकं चाललीस की परत जाताना तर सगळा उतारच आहे. तेव्हा मग तयार झाली. हा रस्ता पुढे दुस-या गावात जातो. मंदिराजवळ पोहचलो. तिथे थोडा वेळ बसलो. मागच्या वेळी इथूनच कोल्हा दिसला होता हे तिला सांगितलं. वस्ती जवळ असली तरी तसा हा परिसर निर्जन आहे. त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही. उतरताना तिला परत थोडा वेळ कडेवर घ्यावं लागलं! पण एक सुंदर ट्रेक झाला.


.

.

दुस-या दिवशी पूजा आहे, त्यामुळे तयारीसाठी परत गावामध्ये चकरा मारल्या. कुमाऊँ भागात गावं छोटी असली तरी शहरात जाणं तसं खर्चिक असल्यामुळे छोट्या गावांमध्येही ब-याचशा शहरांतल्या वस्तु मिळतात. दुकानं तशी वैविध्यपूर्ण असतात. इथे सगळीकडे समुदायामधील जिव्हाळा खूप बघायला मिळतो. सगळे लोक एकमेकांना धरून असतात. गावामध्ये पूजा आहे व शंभर जणांना जेवण आहे. पण इथे त्याची तयारी व व्यवस्था सामुहिक प्रकारे केली जाते. गावातल्या मंदिरात सामुदायिक स्वयंपाकाची मोठी भांडी आहेत. ती तिथून आणली. पाण्याच्या व्यवस्थेसाठी धबधब्यातून घेतलेला नळ आहे! असाच कार्यक्रम शहरात करायचा असता तर मोठा खर्च आला असता! इथल्या सगळ्या गोष्टी छान आहेत. फक्त गुळाचा किंवा खडीसाखरेचा चहा मला कठीण जातो! गुळाचा किंवा खडीसाखरेचा (मिशरीचा) तुकडा चहात बुडवून चहा पीता येत नाही. त्याऐवजी मी अगोड चहा पूर्ण पितो आणि नंतर गुळाचा किंवा खडीसाखरेचा तुकडा तोंडात टाकतो! तसंही इथे चहाच्या स्वादापेक्षाही चहाची ऊब आणि वाफसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.


.

.

नंतरचा दिवस तुलनेने आरामात गेला. सत्गडमध्ये नेटवर्क जवळजवळ येतच नाही. ते इथे पूर्णच येतंय. त्यामुळे एका अर्थाने परत बाहेरच्या जगात कनेक्ट होण्याचं मन होतंय. अशा सुंदर जागी असूनही नेहमीची सवय बाजूला जात नाही! पण इथलं वातावरण अक्षरश: सुंदर वॉलपेपरसारखं आहे. कुठेही बसावं आणि समोरच्या दृश्यामध्ये स्वत:ला विसरावं. अट एकच, की आपण आपल्या मनामध्ये बाहेरची कोणतीच गोष्ट आणली नाही पाहिजे! अशा दृश्यांचा पुरेपूर आनंद घेतला. जिथे बसलो होतो, तिथून सहज बघितलं तर एकाच दृष्टीक्षेपामध्ये बारा लहान- मोठी मंदिरं आहेत- मुख्य गावातली, वस्तीतली आणि अगदीच डोंगराच्या व दरीच्या आतमधलीसुद्धा!


.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक

माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

आदु गोड आहे अगदी. Happy निसर्गाच्या कुशीत तिचे बालपण असणे हीच मोठी दैवी देणगी. थंडी तर इकडे पुण्यात सुद्धा जाम आहे, पण तिथल्या थंडीत अगदी कस लागत असेल. आदुला मनमुराद फिरु द्या, आमच्या सारखे कित्येक आसुसलेले आहेत या निसर्गाच्या भेटी करता.

युथ होस्टेल वगैरे आयोजित सहलीला अदु पुढे जाईलही परंतू आईबाबांबरोबर जाण्यातली गंमत वेगळीच असते. फोटो काढा आणि शंभरांत पाच फोटोंचे प्रिंटस नक्की काढा. फोटो लावून एक वही करा.
वीस पंचवीस वर्षांनी ती पाहा.

सर्वांना धन्यवाद! Happy

@ रश्मी जी, हो. ती एक महिना आमच्यानंतर थांबली होती. पण नंतर ओमीक्रॉन- लॉकडाउनच्या सावटामुळे तिला आणावं लागलं. पण तिने सगळं खूप एंजॉय केलं होतं.