
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
अपघाताने स्विगीचा पाकिटं
अपघाताने स्विगीचा पाकिटं पोहोचवणारा मनुष्य लेखक कसा होतो.... सामान्य माणूस अचानक प्रतिभावंत होतो आणि कोट्याधीश. Pocket FM ला कथा लिहून देणारा अजित कुमार. ( हिंदुस्थान टाइम्स बातमी.)
छान पूरक माहिती सर्वांची !
छान पूरक माहिती सर्वांची !
खरंय,मनोरंजन ब्यापारी हे नाव मनोरंजक आहे खरं. बंगालीमधली अधिकारी वगैरे नावे सुद्धा आपल्याला क्षणभर मजेशीर वाटतात.
अधिकारी बंधू मालिकांच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेतच.
महाश्वेता देवी यांच्या अनेक
महाश्वेता देवी यांच्या अनेक पुस्तकातून तळागाळातील लोकांच्या दुःखांना वाचा फोडलेली आहे. स्तनदायिनी या पुस्तकातील कथा तर अंगावर काटा आणणारी आहे. गरीबीमुळे एका स्त्रीला सतत गरोदर राहून दुसऱ्यांच्या मुलांना स्तन्यपान करण्याचा व्यवसाय पोटापाण्यासाठी करावा लागतो हे किती दारूण आहे.
>>>>>>गरीबीमुळे एका स्त्रीला
>>>>>>गरीबीमुळे एका स्त्रीला सतत गरोदर राहून दुसऱ्यांच्या मुलांना स्तन्यपान करण्याचा व्यवसाय पोटापाण्यासाठी करावा लागतो हे किती दारूण आहे.
अरेरे!!! कॅल्शिअम लॉस. किती सिव्हीअर!
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या
अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गुलजार यांनी नुकतेच ‘आमची मुंबई’( कथा + कविता) हे पुस्तक लिहिले आहे. सन 1950 मध्ये ते जवळपास निर्वासित म्हणून मुंबईत दाखल झाले होते आणि पुढे ते शहर त्यांचे घरच झाले. त्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबईसंबंधी असे उद्गार काढले,
“मुंबई एखाद्या मोठ्या भावासारखी आहे. कधी ती जवळ करते, कधी ती आपल्या कानफाटीतही लावून देते परंतु ती आपल्याला कधी दूर लोटत नाही”.
गेल्या 75 वर्षात मुंबईत झालेला सामाजिक बदल ते असा नोंदवतात,
“गरीबीमें जो गरिबी की डिग्निटी थी, आज उसमे शर्मिंदगी है”.
संपूर्णसिंह कालरा @ गुलजार _/
संपूर्णसिंह कालरा @ गुलजार _/|\_
मला वाटते अब्राहम लिंकन नंतर सगळ्यात जास्त ज्यांचे फोटो लावून "कोट्स" इंटरनेट वर प्रसवले जातात त्यात पहिल्या पाचात गुलजार असावे !
गुलजार वाचून वाचून झालेली आमची एक कन्सेप्ट/ संकल्पना (बहुतांशी परप्रकाशित) खालीलप्रमाणे -
मुंबई म्हणजे मदर सिटी/ मातृ नगरी ! इथे कोणीच उपाशी झोपत नाही, खायला वडापाव अन् झोपायला फूटपाथ देईल पण मुंबई उपाशी झोपू देणार नाही. ह्याला अट मात्र एकच खांद्यावर डोक्यावर बोजा वाहण्याची तयारी हवी, जितका मोठा बोजा अन् घाम तितके मोठे फळ, धावत सुटण्याची तयारी हवी खांद्यावर घेऊन. उपाशी हे शहर झोपू देत नाही पण मेहनतीला चुकलो किंवा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर कच्चा गिळून ढेकर न देता स्वतः पुढे धावत राहते ती मुंबई....
*पहिल्या पाचात गुलजार असावे !
*पहिल्या पाचात गुलजार असावे !
>>> अगदी अगदी !
प्रख्यात पार्श्वगायक रवींद्र
प्रख्यात पार्श्वगायक रवींद्र साठे यांचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त त्यांच्या ‘कुणाच्या खांद्यावर’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले आहे. सामना चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर . . . ‘ हे गीत ऐकल्यानंतर जब्बार पटेल यांनी त्यांच्या पुढील महत्त्वाच्या चित्रपटांसाठी रवींद्र साठे यांचीच गायक म्हणून निवड केली होती.
पुस्तकातील एक किस्सा रंजक आहे. प्रख्यात सतारवादक रविशंकर यांना सद्दाम हुसेन आणि रवींद्र साठे यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य दिसले होते. त्यावर ते साठेंना म्हणाले होते,
“इराकमध्ये तुला डुप्लिकेट सद्दामची नोकरी आहे !”
साठे यांना रेखा आणि हेमामालिनी यांच्यासोबत हिंदी चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली होती परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली.
अनेक चांगल्या पुस्तकांच्या
अनेक चांगल्या पुस्तकांच्या पहिल्या ओळी साहित्यात अजरामर झालेल्या आहेत. मागच्या पानांवर यासंबंधी एकदा चर्चा झाली होती. अशा काही ओळींची पुढे वचनेच बनली आणि त्याचे श्रेय अर्थातच संबंधित प्रतिभावंत लेखकाला आहे.
इंग्रजी साहित्यप्रेमी लोकांसाठी इंग्रजी पुस्तकांच्या पहिल्या ओळीवरुन पुस्तक ओळखण्यासंबंधीची ही प्रश्नमंजुषा नक्कीच रोचक वाटेल. गुगल न करता जरूर सोडवून पहा :
https://www.buzzfeed.com/tanishtha_kotian/match-opening-lines-to-books-quiz
(उत्तर चुकले तरी हरकत नाही; सोडवण्यात एक वेगळीच मजा आहे ! 25 पैकी माझी 13 बरोबर आली. बाकी पुस्तके वाचलेली नाहीत).
नाटककार मंडळी तर प्रतिभावंतच.
नाटककार मंडळी तर प्रतिभावंतच. त्यांच्या आपापल्या तऱ्हा असणार. परंतु काही नाट्यप्रेक्षक देखील तऱ्हेवाईकच. त्यांच्या तऱ्हेचा हा एक किस्सा.
- शांता गोखले यांच्या ‘Of Ancestors and Friends: A Life With Books’ या पुस्तकातून साभार :
A Doll's House हे 1879 मधील इब्सेनकृत स्त्रीमुक्तीचे प्रतिक असणारे नाटक. याचा 1942 मधील मराठी नाट्य अवतार म्हणजे संगीत कुलवधू. ते लिहिले मो ग रांगणेकरांनी. मूळ डॉल्स हाऊसमध्ये त्यातली नोरा घराचा दरवाजा धाडकन नवऱ्याच्या तोंडावर बंद करून स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी बाहेर पडते. हे दृश्य तेव्हाच्या मराठी प्रेक्षकांना कितपत रुचेल याची शंका असल्याने रांगणेकरांनी नाटकात सोयीस्कर बदल केलेला आहे. कुलवधूमधील नायिका नवऱ्याला सोडून जाते खरी, परंतु ती राहायला जाते ती खेड्यात असलेल्या त्याच्याच आई-वडिलांकडे.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत झाला आणि तो आटोपून रांगणेकर आपल्या घरी जायला निघाले. घरापाशी पोचताच त्यांना दोन अनोळखी व्यक्ती त्यांची वाट पाहत असलेल्या दिसल्या. ते दोघे या पहिल्या नाट्यप्रयोगाचे अस्वस्थ झालेले प्रेक्षक होते. रांगणेकरांना पाहताच त्यांनी विचारले,
“काय हो लेखक, तुमची नायिका काही दिवसांनी पुन्हा तिच्या नवऱ्याकडे परत जाईल ना?”
महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ
महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ साहित्यिक वि स खांडेकर यांचा यंदा पन्नासावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही आठवणी वाचण्यात आल्या.
https://www.weeklysadhana.in/view_article/Who-was-V-S-Khandekar?
त्यातील हे निवडक :
“... त्या वेळी नवसाहित्याचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ यांनी म्हटलं होतं, 'खांडेकर हे सामान्य लेखक आहेत.' खांडेकरांचे त्या वेळचे प्रकाशक रा.ज. देशमुखांना ते वाक्य इतकं जिव्हारी लागलं की, त्यांनी आपल्या प्रकाशनाची एक जाहिरातच केली होती, "आम्ही सामान्य लेखकांची अशी सामान्य पुस्तके छापतो, ज्यामुळे महाराष्ट्र असामान्य होतो."
..
तामिळनाडूतील द्रमुक पक्ष खांडेकरांच्या साहित्याने प्रभावित होऊन स्थापन झाला होता, ही वरील मुलाखतीतील माहिती रोचक वाटली.
Pages