
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा (इतरांचे दृष्टीने) तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणार्या किश्शांची संख्याही भरपूर असते.
अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास या बाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१. दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले, “नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?” त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले, “हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर (तांत्रिक मुद्द्यावरून) साहित्य क्षेत्रात टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. चि त्र्यं खानोलकर (आरती प्रभू) यांचा किस्सा तर अजब आहे. ते लोकांना छातीठोकपणे सांगत, "साहित्यबाह्य गोष्टींना वगळून निव्वळ गुणवत्तेच्या जोरावरच ज्ञानपीठ पारितोषिक द्यायचे ठरले तर मराठी भाषेत तरी तो मान फक्त आपल्या एकट्याकडेच जातो !"
अनेकांना हे ऐकून अचंबा वाटे.
एवढेच नाही तर खानोलकरांनी वि स खांडेकर यांच्याबद्दलही असे वक्तव्य केले होते,
" येत असतील त्यांना वाचकांची ढिगांनी पत्रे आणि तामिळनाडूतील एखादी मुलगी त्यांना पूज्य पिताजी म्हणूनही संबोधत असेल. पण ते वेगळं आणि चांगलं लेखक असणं वेगळं".
स्वतःचे साहित्यिक यश डोक्यात गेल्याने त्यांनी अनेकांना उद्धटपणे बोलून दुखावलेले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने :
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले, “नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा दुर्गम भागांत दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत, “आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना? नाहीतर बरोबर ठेवाव्यात ”. त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
आणि हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
८. जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींनी ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले, “मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
असे गमतीशीर किंवा तर्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी काही क्षेत्रांतील व्यक्ती निवडल्या आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात वाचलेले आहेत. प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा. तुमच्या माहितीतील एखाद्या व्यक्तीचा (जरी वलयांकित नसली तरी) जर काही वैशिष्ट्यपूर्ण किस्सा असेल तरी लिहायला हरकत नाही.
....................................................................................................................
सॉफ्ट पॉर्न' हा शब्द सुद्धा
सॉफ्ट पॉर्न' हा शब्द सुद्धा 'अपमान करता काय' म्हणून माघार घेईल. >>>
साजिरा, मस्त पोस्टी. खांडेकर नाव लिहीता-लिहीता थांबले होते.
फडक्यांचं 'जादूगार' हे
फडक्यांचं 'जादूगार' हे त्यांचं मास्टरपीस आहे हे सांगून एकाने वाचायला दिले होते. जेमतेम पाव पुस्तक वाचले गेले, अजून वाचवेना. कृत्रिम भाषा, पाश्च्यात्य वळणाची नक्कल - आता अजून सगळं आठवतही नाही पण भयानक होतं.
ययाती कादंबरीही मला आवडली नव्हती. त्यात तो सोनेरी केस, आठवण म्हणून केसांची बट जपून ठेवणे, वनराणी आणि फुलराणीची school gathering style dance competition हे सगळं त्या काळाशी किती विसंगत होतं असं वाटतं.
प्रतिभा रानडेंनी एका मुलाखतीत
प्रतिभा रानडेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे, की त्या लिहायला लागल्या, तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं, कादंबर्या लिहीणार असशील, तर शरदचंद्रांसारख्या लिही. फडके - खांडेकरांसारख्या नको!
एकूण चर्चा रंगली आहे खरी
एकूण चर्चा रंगली आहे खरी
खांडेकरांबद्दल चि त्र्यं खानोलकर काय म्हणाले होते ते तर मी या लेखातील मुद्दा क्र. 3 मध्ये लिहिलेच आहे.
त्याची पुन्हा एकदा आठवण झाली . . .
असो.
फडके यांना आम्ही नितंब व
फडके यांना आम्ही नितंब व उरोजांचे घाऊक व्यापारी म्हणत असू.
* घाऊक व्यापारी >>>>
* घाऊक व्यापारी >>>>

माझ्या 'मनातली बात' तुमच्याकडून आल्याने सुखद वाटले !!
फडक्यांच्या एक दोन कादंबऱ्या
फडक्यांच्या एक दोन कादंबऱ्या वाचल्या होत्या आधी. नंतर त्यांचं आत्मचरित्र (भलं मोठं )हातात पडलं तेहीवाचून काढलं. (हे सगळं सुमारे तीस वर्षांपूर्वी ). ते वाचून तर इतका राग आला त्याचा... की पुढे कधीही काहीही वाचलं नाही त्यांचं.
घाऊक व्यापारी आणि मनातली बात
घाऊक व्यापारी आणि मनातली बात >>>
छान चर्चा, वाचतेय सगळ्या पोस्टी.
खांडेकर यांच्या ययाती मधे वर चीकू यांनी लिहिल्याप्रमाणे केसांची सोनेरी बट आणि कलिका नावाच्या मित्रासारख्या सारथ्याच्या पुतणीचे (जिला अंगाखांद्यावर खेळवले होते) कुण्या तरी मदनिका नावाच्या गणिकेकरवी बेशुद्ध करून कौमार्य घालवणे ही माझ्यासाठी विकृतीची परिसीमा होती. खऱ्या ययातीने त्या थराला जाणाऱ्या गोष्टी केल्या आहेत का नाही माहीत नाही पण ह्या लेखकांच्या विकृत फॅन्टेसी असाव्यात असे वाटते. फडके आणि खांडेकर दोघेही विकृत फॅन्टेसीजना वाट करून द्यायचे. स्वतःच्याही आणि वाचकांच्याही.
Bacho:.xxxxxxx........Yeah,
Bacho:.xxxxxxx........Yeah, that's a real
warworld story. There arenever anynot always good stories like inmoviesjust-world - they're shit.A man was there, boom... stomach. I was so scared I didn't pull the trigger again for the rest of the day.I thought, well, that's it, Bacho.You put a bullet in someone.You're not you anymore. You'll never be you again. But then you wake up the next morning and you're still you. And you realize: that was you all along. You just didn't know.भारतीय इंग्रजी कवितेला आधुनिक
भारतीय इंग्रजी कवितेला आधुनिक वळण देणाऱ्या निस्सिम एझिकिएल या कवींच्या जन्मशताब्दीस यंदा प्रारंभ झाला. त्यांचे नाव पूर्वी विजय तेंडुलकर यांच्या 1966 दरम्यानच्या एका लेखात वाचले होते.
निस्सिम मुंबईतील मराठी भाषक बेने इसराएली या समाजात जन्मले आणि ते खऱ्या अर्थाने मुंबईकर होते. तिथला सर्व अधिक/उणेपणा आयुष्यभर अनुभवल्यानंतर ते असे म्हणून जातात :
I cannot leave the island,
I was born here and belong.
यांच्याबद्दल वाचलंय. प्रसिद्ध
यांच्याबद्दल वाचलंय. प्रसिद्ध अभिनेत्री आशा भेंडे या त्यांच्या भगिनी. त्या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासकही होत्या.
*आशा भेंडे
*आशा भेंडे
अच्छा ! म्हणजे या आत्माराम भेंडे यांच्या पत्नी.
त्यांचे माहेरचे नाव Lily Ezekiel.
धन्यवाद !
You're not you anymore. You
You're not you anymore. You'll never be you again. But then you wake up the next morning and you're still you. And you realize: that was you all along. You just didn't know. >> पुसट सन्दर्भ लागतात. नीट कळलं नाही. रशिया किंवा शीतयुद्धासंबंधात काहीतरी?
* नीट कळलं नाही. >>> +१ ?
* नीट कळलं नाही. >>> +१
?
फडके यांना आम्ही नितंब व
फडके यांना आम्ही नितंब व उरोजांचे घाऊक व्यापारी म्हणत असू. >>>
फडके व खांडेकर यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही. निदान तसे आठवत नाही. दोन्ही अवस्था सारख्याच
सेक्श्युअल फॅण्टसी वर्णने लिहीण्यात व वाचण्यात काही गैर नाही. पण अस्मिताने दिलेले त्यांच्या पुस्तकातील उदाहरण टोटल विकृत आहे.
मी नेहेमीच म्हणत असतो- फडके आणि खांडेकर- दोघांनी मराठी साहित्य (त्यावेळीच नव्हे तर आजही. आजही दाखले दिले जातात) साचेबद्ध केलं, सडवलं. (कला आणि जीवन असला काहीतरी मूर्ख वाद होता दोघांत) >>> हे असे इतर लेखकांबद्दलही म्हंटले गेले आहे. मला हे सहसा पटत नाही. लोकांना "फक्त" हे वाचायची सक्ती नव्हती किंवा इतरांना दर्जेदार रोमॅण्टिक कादंबर्या लिहिण्याची बंदी नव्हती.
अशा लेखकांना आपण ग्लॅमर मिळवून दिलं हे आपलंच दुर्दैव म्हणायला पाहिजे. >>> यात आश्चर्य जरूर वाटते. पण ५०-६० सालची सोशल सिस्टीम काय होती हे आपल्याला केवळ अंदाजाने कळेल. तेव्हा एकूण विकत घेउन वाचणारे कमीच असावेत. प्रसिद्ध पुस्तकांच्या सुरूवातीला त्यांच्या प्रती केव्हा निघाल्या याची माहिती असते. उदाहरणार्थ पुलंच्या बहुतांश पुस्तकांवर साधारण ९० च्या दशकापासून आवृत्त्या जास्त लौकर प्रकाशित होत गेल्या असे चित्र दिसते. तोपर्यंत इतक्या नव्ह्त्या. त्यामुळे बहुतांश लोक लायब्ररीज मधूनच पुस्तके वाचत असावेत. म्हणजे यांचे नाव झाले ते बहुधा इतर लेखकांनी किंवा मराठी साहित्यविश्वातील लोकांनी तारीफ केल्याने असेल. पुस्तकाच्या खपामुळे नव्हे.
दुसरी बाजू अशीही असू शकते की तेव्हा सेक्श्युअल फॅण्टसी वाचायला ममव लोकांना हाच एक पर्याय असावा. बाकी काही उपलब्धच नव्हते. आणि केवळ या करता एखादे पुस्तक वाचले तर लोक त्याला सहसा "दर्जेदार" कॅटेगरीत टाकत नाहीत. म्हणजे असेही असू शकते की या वर्णनाव्यतिरिक्त आणखी काहीतरी लोकांना त्यात सापडले.
हा नंतरचा मुद्दा थोडा रानोमाळ वाटेल
पण तेव्हाच्या वातावरणाचा एक अंदाज लावतोय. कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवलेले नाही. तेव्हाचे वातावरण फार भारी नसावे. मग व्हॉटसॅप फॉरवर्ड्स काहीही सांगोत 
ययाती ची कथा पटू ब शकणारी
ययाती ची कथा पटू न शकणारी असली तरी केवळ भाषिक सौंदर्याच्या कसोटीवर, एक कादंबरी म्हणून नक्कीच वाचकाला खिळवून ठेवते. फडक्यांचं काही आवर्जून वाचलेलं आठवत नाही. पण फारएण्डचं म्हणणं पटतं कि “ लोकांना "फक्त" हे वाचायची सक्ती नव्हती किंवा इतरांना दर्जेदार रोमॅण्टिक कादंबर्या लिहिण्याची बंदी नव्हती.”
दुसरं म्हणजे ७०-७५ वर्षांपूर्वीच्या साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्याची त्यांच्या समकालिनांबरोबर तुलना करता येईलही कदाचित. पण आजच्या मापदंडाने अशी तुलना अस्थायी ठरते. प्रत्येक साहित्याची/सामाजिक नॉर्म ची एक एक्स्पायरी डेट असते.
खांडेकरांच्या ययातीला
खांडेकरांच्या ययातीला ज्ञानपिठ मिळालेला म्हणुन ती मुद्दाम वाचलेली. भाषिक सौंदर्य दिसुनही त्याचे वेगळेपण कळले नसणार कारण मी ययाती नव्वदीच्या दशकात वाचली. त्याआधी इतर वाचन केले होते ज्यात त्या भाषिक सौंदर्याची कॉपी केली असणार. आधी भरपुर डुप्लिकेट वाचुन नंतर मुळ वाचले तर ते मुळ चांगले कसे वाटणार? त्यांची अमृतवेलही नंतर वाचली, बोअर झाले. ती प्रख्यात इन्ग्रजी कादंबरीवर बेतली आहे हे नंतर कळले. फडके वाचले नाहीत. त्यांची पुस्तके लायब्ररीत नव्हती. शालेय अभ्यासक्रमात एखादा ललित लेख वगैरे असेल तर वाचले असेन.
खांडेकर, फडके इत्यादींची लेखनशैली जुनी, वेगळी होती. मी वाचायला लागले तोवर लेखनशैली बदलली होती. त्यामुळे मला खांडेकर व त्यावेळचे इतर लेखक फारसे आबडले नाहीत. बंगाली अनुवादीत कादंबर्याही वाचल्या. पण तिथेही भाषेचे जुनेपण खटके. तेव्हाचे समाजनियम, मुल्ये मी वाचु लागेतो बदलली होती. त्यामुळे तेही खटके. (हे सेम जुने चित्रपट पाहताना होते)
हे सगळे लायब्ररीच्या जीवावर केले. तेव्हा सगळी पुस्तके घेण्याइतपत पैसे नव्हते. (तसेही नवी पुस्तके कुठली हे कुठे कळायचे? गल्लोगल्ली पुस्तक प्रदर्शने भरत नसत). त्यामुळे जे मिळेल ते वाचले. पिक अँड चुझ करण्याची ऐपत नव्हती पण हाती भरपुर वेळ होता. त्यामुळे बकरीसारखे मिळेल ते खात गेले
मी योगिनी जोगळेकर, कुसुम नाव अस्लेल्या एक बाई, दसनुरकर, बाबा कदम असले जंकफुड वाचनच भरपुर केले आहे. ते वैचारिक मोड आलेले आरोग्यदायी धान्य वगैरे लायब्ररीत नसायचे 
कि “ लोकांना "फक्त" हे
कि “ लोकांना "फक्त" हे वाचायची सक्ती नव्हती किंवा इतरांना दर्जेदार रोमॅण्टिक कादंबर्या लिहिण्याची बंदी नव्हती>>>>
पण इतरांची, नव्या, लोकप्रिय नसलेल्यांची पुस्तके प्रकाशित करणार कोण हा प्रश्न तेव्हा असु शकतो.
प्रत्येक लेखक कधीतरी नवा असतो, त्या काळी पुस्तक प्रकाशन हा एकमेव मार्ग होता लेखक बनायचा. नव्याला संधी मिळाली नाही तर तो दर्जेदार आहे हे लोकांना कसे कळणार? प्रस्थापित मंडळीना प्रकाशक लाभत असावेत, इतरांचा आवाज दाबला जात असावा म्हणुन तर प्रस्थापितांविरुद्ध बंडही पुकारले गेले होते.
आज कोणी काहीही लिहुन नेटवर प्रसिद्ध करु शकतो. इथेच किती लेखक भयकथा लिहितात ते समोर धारप उघडे ठेऊन, फक्त नावे बदलुन कॉपी मारतात असे वाचताना वाटते. तेव्हा अशा नव्या लेखकांना प्रकाशकाने उभे केले असते का?
लोकांना "फक्त" हे वाचायची
लोकांना "फक्त" हे वाचायची सक्ती नव्हती किंवा इतरांना दर्जेदार रोमॅण्टिक कादंबर्या लिहिण्याची बंदी नव्हती.”
>>> हे फडके किंवा समकालीन लेखकांपुरते लिहीत नाही. पण घाऊक प्रमाणात बाजारात जे साहित्य येत जाते किंवा चर्चिले जाते, त्यावर ती पिढी पोसत जाते. त्यांची अभिरुची बदलून जाते, खास करून संस्कारक्षम वयात. सक्ती नसते पण साहित्यिक मूल्य वगैरे शोधण्याची प्रेरणाही नसते. लहान शहरात कुणी दिशा दाखवणारे नसते. जसं निकृष्ट खाल्ल्याने आपण कुपोषित होतो, तसं याने मेंदू किंवा मनाचे कुपोषण होते. त्यात लैंगिक साहित्य असेल तर नैसर्गिकपणे शरीराची ओढही तिकडेच जाते. सगळी फक्त तीच पुस्तके कायम वाचत असतील असे नाही हे ठाऊक आहे. तरीही या साहित्यातील विकृत गोष्टी वगळूनही पॉर्नचे व्यसन जसे लागू शकते तसेच याचेही लागू शकतच असेल. आजच्या मापदंडाने वगैरे तुलना इथे गैरलागू आहे हे वरवर पाहता खरं आहे पण पॉर्न पुरतं नाही. शरीर, शृंगार आणि सेक्शुअल फॅन्टसीज पहिले स्त्री-पुरुष पृथ्वीवर आल्यापासून आहेत. ते वाचणं गैर नाहीच पण फक्त त्यावरच एखादी पिढी पोसली जाणं मात्र धोकादायक असावं.
या गोष्टी कालसापेक्ष आहेत,
या गोष्टी कालसापेक्ष आहेत, त्यामुळे आताच्या आपल्या वैचारिक परिसरातून ( आणखी )योग्य शब्द सुचत त्यावर मत बांधणं उचित असेलच असं नाही. ( किती गुळमुळीत झालंय हे वाक्य!). हेच मी चित्रपटाच्या धाग्यावरही लिहिलं होतं.
फडक्यांनी शृगांरिक लेखन सुरू केलं तेव्हा त्या आधी तसं लिहिलं जात होतं का? मराठी कथा कादंबर्यांचा पट कसा विणत गेला ते पाहायला हवं.
त्यांचं लिखाण पुढच्या काळात टाकाऊ झालं असं म्हणायला काही हरकत नाही. (पुन्हा गुळमुळीत)
. आता नुसतंच वाचून पाहेन. नाटकंही फार पाहिली वा वाचली नाहीत, पण त्यांच्याबद्दल वाचलं आहे. मराठी नाटकांचा प्रवास पौराणिकतेकडून सामाजिकतेकडे झालाय. ( शाप्याला/ सौभद्र / स्वयंवर- संशयकल्लोळ / शारदा / एकच प्याला). पुढे आणखी फांद्या फुटल्या.
कथा- कादंबर्या तेवढ्या प्रमाणात वाचल्या नाहीत किंवा त्यांच्याबद्दलही फार वाचलं नाहीए. बी ए चा अभ्यास करताना वाचलं. पण ते अभ्यासासाठी वाचलं , त्यामुळे नीट लक्षात नाही
हिंदी चित्रपटांत सुरुवातीच्या काळात नग्नता , चुंबन दृश्य असत. ललिता पवार यांनी नग्न दृश्य दिल्याचं वाचलं आहे. पुढे कसं काय झालं ते आपल्याला माहीत आहेच.
तसंच फडक्यांनी शृंगार, प्रेम यांची वर्णनं आणून त्याही भावना मांडल्या जाऊ शकतात हे दाखवून दिलं असेल.
ययातीतलं ते वर्णन खांडेकरांनी रचलंय की त्याचं मूळच तसं आहे ?
वर फडक्यांच्या प्रतिभा साधन या लेखाचा उल्लेख आला आहे. तो मलाही दहावीला होता. त्या पाठाचा मी धसका घेतला होता. त्यातलं ओ की ठो काहीही कळलं नव्हतं आणि त्यावर दीर्घोत्तरी प्रश्न आला तर, ही धास्ती होती, एवढं आठवतंय. असाच धसका profit and loss account and balance sheet should depict a business's true and fair picture या दीर्घोत्तरी प्रश्नाचा घेतला होता.
फडके खांडेकर आखाड्यातली चर्चा
फडके-खांडेकर आखाड्यातली चर्चा अगदी विड्याच्या मसाला पानाप्रमाणे रंगतदार होत आहे
ती आवडली आणि त्याच्या अनेक बाजूही समजल्या.
. . .
*आजच्या मापदंडाने अशी तुलना अस्थायी ठरते >>> बऱ्यापैकी सहमत.
एक नामवंत संपादक एकदा संपादकीयात म्हणून गेले होते,
"प्रत्येक लेखक हा त्याच्या समकालीनांसाठीच लिहीत असतो".
आता यातील "प्रत्येक' या शब्दावर आक्षेप /वाद नक्कीच होऊ शकतो. परंतु हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा.
तिथे प्रत्येक ऐवजी बहुतेक लेखक असे म्हटल्यास अधिक बरे !
प्रत्येक साहित्याची/सामाजिक
प्रत्येक साहित्याची/सामाजिक नॉर्म ची एक एक्स्पायरी डेट असते. >>> सहमत
अस्मिता, साधना - आता फक्त "नोटेड". मुद्दे समजले. आणखी काही सुचले की लिहीतो.
ते वैचारिक मोड आलेले आरोग्यदायी धान्य वगैरे लायब्ररीत नसायचे >>>
वैचारिक परिसरातून ( आणखी
वैचारिक परिसरातून ( आणखी )योग्य शब्द सुचत त्यावर मत बांधणं उचित असेलच असं नाही.
>>> मग वेळ कसा घालवावा.
आंतरजालाने काळ आणि थोड्याफार परिसराच्याही सीमा पार केल्या आहेत. आज आपण शंभर वर्षांपूर्वीचे गाणंही बघू शकतो आणि शंभर वर्षे वय असलेल्या जपानमधील खेड्यात राहणाऱ्या माणसाचा दिनक्रमही. सगळे सगळ्या काळातले सगळ्यांनाच अव्हेलेबल आहे, ग्लोबल सिटिझन/ वाचक/ प्रेक्षक म्हणून ते आपोआपच होत जाणार. मुद्दाम नाही पण चर्चा वाचून ऑरगॅनिकली लिहिलेही जाणार. दोन दिवसांत विसरणार पण..
काळच बदलला आहे.
वैचारिक मोड आलेले आरोग्यदायी धान्य वगैरे लायब्ररीत नसायचे >>
अमृतवेल कंटाळवाणीच आहे साधना.
*दुसरी बाजू अशीही असू शकते की
*दुसरी बाजू अशीही असू शकते की तेव्हा सेक्श्युअल फॅण्टसी वाचायला ममव लोकांना हाच एक पर्याय असावा. बाकी काही उपलब्धच नव्हते. >> +११
* तसंच फडक्यांनी शृंगार, प्रेम यांची वर्णनं आणून त्याही भावना मांडल्या जाऊ शकतात हे दाखवून दिलं असेल. >>> +११
. .
वरील मुद्द्यांशी सहमत असून 1980 च्या दशकात माझ्या तारुण्यात मी जे काय अनुभवलं त्याची कबुली पूर्वी मी या (https://www.maayboli.com/node/80447) लेखात दिलीच आहे. त्यातला निवडक भाग फक्त पुन्हा इकडे घेतो :
. . .. Voluptuous हा शब्द मी आयुष्यात प्रथम 'या' ( म्हणजे तथाकथित पिवळ्या) पुस्तकांत वाचला आणि तो मेंदूत कायमचा कोरला गेला. त्याकाळी थेटरातले चित्रपट वगळता एकूणच रंजक दृश्यमाध्यमांचा तुटवडा होता. त्यातही काही प्रौढांसाठीचे इंग्लिश चित्रपट सोडले तर बाकी चित्रपट लैंगिकदृष्ट्या सामान्य प्रकारचे असायचे. त्यामुळे लैंगिक वाचन हे महत्त्वाचे मनोरंजनसाधन होते. त्यातून जर का अशा पुस्तकाचे वाचन एकांतात केले, तर त्यातून होणारे विलक्षण कल्पनारंजन हे वर्णनातीत असायचे. . . .
. . .
आता गतकाळातील साहित्याकडे सध्याच्या चष्म्यातून पाहणे योग्य नसेलही. परंतु साहित्यातील शृंगार याबाबत असे म्हणेन, की 'असल्या ' गोष्टींचा घाऊक व्यापारी असण्यापेक्षा अधूनमधून किरकोळ विक्रेता असलेले बरे !
“ वैचारिक मोड आलेले
“ वैचारिक मोड आलेले आरोग्यदायी धान्य वगैरे लायब्ररीत नसायचे” -
कलेच्या दृष्टीने, आर्थिक
कलेच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने, नैतिक दृष्टीने, वैद्यकीय दृष्टीने- सर्व दृष्टीने सिनेमाची करमणुक सर्वथैव त्याज्ज्य ठरते असे लिहिणार्या फडक्यांनी जर नंतर नाटक सिनेमा निर्मिती -लेखन-दिग्दर्शन मध्ये गुंतवणुक केली असेल तर त्यांच्या वैचारिक मोकळेपणाचे कौतुकच करावे लागेल.
https://vishwakosh.marathi.gov.in/27520/
पण असे दिसते की फडक्यांनी काही नाटके लिहिली आणि त्यांच्या एका कादंबरीवर आधारित चित्रपट निर्माण केला गेला.
कथा, कादंबर्या, लघुनिबंध-संग्रह, चरित्र लेखन, समीक्षात्मक लेखन ह्यांखेरीज तर्कशास्त्र, मानसशास्त्र, संततिनियमन इ. विषयांवरही त्यांनी इंग्रजीतून आणि मराठीतून पुस्तके लिहिली आहेत.
त्यांची एकूण ग्रंथसंख्या १८९ इतकी आहे.
अवांतर -
बहुपत्नीकत्व म्हणजे एकापेक्षा अधिक पत्नी असणे. हा विषय वैयक्तिक कायदे आणि भारतीय दंड विधान या कायद्यांद्वारे नियंत्रित करण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीनुसार बहुपत्नीकत्व हे पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसायचे. भारतीय पुरुष पूर्वी एकाहून अधिक पत्नी करत असत. हिंदू विवाह कायदा, १९५५ ने या पद्धतीला बंदी घातली.
हि सगळी चर्चा ज्या पोस्ट्स
हि सगळी चर्चा ज्या पोस्ट्स वरून सुरू झाली त्या पोस्ट्स डिलीट झालेल्या दिसत आहेत त्यामुळे उत्सुकता वाढली.
ते वैचारिक मोड आलेले
ते वैचारिक मोड आलेले आरोग्यदायी धान्य वगैरे लायब्ररीत नसायचे >>> जबरदस्त
* हिंदी चित्रपटांत
* हिंदी चित्रपटांत सुरुवातीच्या काळात नग्नता , चुंबन दृश्य असत.
>>> यावरून फ्रेंच पटकथाकार Carriere यांनी केलेले भाष्य इथे लिहावेसे वाटते.
ते म्हणालेत,
“ज्या भारतात कामसूत्रसारखा ग्रंथ आणि खजुराहोसारखी मैथुनशिल्प कोरली गेली त्याच भारतात तयार होणाऱ्या चित्रपटात चुंबनदृश्य दाखवण्यालाही बिचकतात, याची खंत वाटते”
(‘लीळा पुस्तकांच्या’ मधून साभार !)
पियू
अवांतर :
@पियू
तुमच्या अन्य धाग्यावर तीन दिवसांपूर्वी मी तुम्हाला (अन्य विषयावर ) संपर्क केल्याचे लिहिलेले तुम्ही वाचले नाहीत का ?
Pages