मनातल्या उन्हात मी.....

Submitted by संयम.... on 11 January, 2022 - 13:45

मनातल्या उन्हात मी ......

मनातल्या उन्हात मी, का असा हिंडतो
कारण माझ्या असण्याचं, सतत शोधू पाहतो

असेल काही उद्देश त्याचा, मनाची समजूत घालतो
गुमान मुंग्यांच्या रांगेमध्ये, नाकासमोर चालत राहतो
मनातल्या उन्हात मी ......

अचानक जेव्हा पेपरमध्ये, दुर्बल सोशीत वाचतो
विस्तवास माझ्यातल्या, फुंकर पुन्हा घालतो
स्वकर्तृत्वावर जग बदलण्याची, पुन्हा खूणगाठ बांधतो
भारावलेल्या सरड्यासारखा, कुंपणापर्यंतचं धावतो
मनातल्या उन्हात मी ......

वास्तवाच्या तीव्र आगीत, होरपळून जेव्हा निघतो
मनातल्या मनात मी, मला विझताना पाहतो
मनातल्या उन्हात मी ......

पुन्हा केव्हातरी लहरीबरोबर, गांधी-विवेकानंद वाचतो
लोककल्याणाच्या सेवेसाठी, उंच भरारी घेऊ पाहतो
माझ्यातली समिधा तेव्हा, आधीच विझलेली जाणतो
मनातल्या उन्हात मी ......

फिनिक्सला स्मरून, नव्याने उभा ठाकतो
बाळकडू त्या गरुड पंखांना, विचारांचं पाजतो
कर्तृत्वाच्या अंकुराला, आशेच्या किरणांनी सावरतो,
बदल घडावा याचसाठी, अविरत झगडत राहतो

मनातल्या मनात मी असाच धडपडत राहतो,
मनातल्या उन्हात मी, का असा हिंडतो !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे.
>>>>>>>.स्वकर्तृत्वावर जग बदलण्याची, पुन्हा खूणगाठ बांधतो
भारावलेल्या सरड्यासारखा, कुंपणापर्यंतचं धावतो
Happy
Martin Luther King Jr. said, “If you can't fly then run, if you can't run then walk, if you can't walk then crawl, but whatever you do, you have to keep moving forward.”