कवी होणं खायचं काम नाही

Submitted by शांत प्राणी on 8 January, 2022 - 09:19

रवी व्हावं पण कवी होऊ नये म्हणतात.
रवी आनि कवी नेहमी जळत असतात. पण कवीला मन असतं. भावना असतात.
दोघेही स्वत: जळून दुसर्यांना प्रकाश देतात.
एक हार्डकोअर प्रकाश देतो तर दुसरा काव्यानंदाचा प्रकाश देतो.

मात्र कवीला काय काय सहन करावं लागतं याची वाचकांना कल्पना येणे शक्य नाही.
कवीचं मनच नाही तर पावलं सुद्धा नाजूक. नाजूकशा खड्यांनीही त्याला ठेस लागते तर मनाचं काय !
ती जर दोन तास दिसली नाही तर कवी कासावीस होतो.

तर जर ती डोळ्यादेखत कुणाच्या मागे बसून हसत खिदळत गेली तर काय होईल ?
मग कवी ऐकत नसतो. तो हट्टाने यमक शिकतो. त्यावेळचा त्याचा आवेश आणि दु:खावेग एव्हढा पराकोटीला गेलेला असतो कि बस्स...
कोणत्याही वृत्तात बसणारे शब्द त्याच्याकडे त्या वेळी पाझरत असतात.
तर मग अशा वेळी गझल प्रसवणे अशक्य नाही महाराजा..

आणि मग अशा एखाद्या विद्ध कवीचे आक्रंदन एका नवगझलेत उतरते..

कसाई होवून नभी मी, रात्रीत वार केला
झाकोळले ब्रह्मांड, मी तो सूर्य ठार केला

अगागागागा
इतका आवेश, रौद्ररस !
असे दोन चार विद्ध कवी जर चायना बॉर्डरवर पाठवले तर चायना आर्मी पाय लावून पळू लागेल. सूर्य ठार करणारा अ‍ॅव्हेंजरचा बाप समोर बघून धडकी का भरणार नाही ?

तशी गझलकार ही मूळची कष्टाळू जमात असते. त्यांना जे दु:ख असते ते कधीच थेट सांगत नाहीत.
ते कधी दुस-यांना त्रास देत नाहीत.
त्यांना त्रास होऊ लागला की मग ते कुहाड उचलतात आणि जंगलाकडे चालू लागतात.
त्यांना छोट्या काटक्या तोडायचा शॉर्टकट उपलब्ध असतो.
पण मुळातच कष्टाळू असल्याने ते मोठमोठ्या फांद्या तोडत राहतात.
मग त्याची मोळी बांधतात.
ती उचलून आणतात.
गावाबाहेर एका मोकळ्या जागेत मग त्या लाकडांची चिता रचू लागतात.
त्या चितेवर बसूनच मग ताजे ताजे जळते शेर ते लिहीतात.

माझ्याच मरणाने होईल शांत सारे,
सरणावर तेव्हां कळले मला हे सारे

कवी जगाचा शेवटचा निरोप घेत असताना एखादी अलामत, काफिया चुकलीय का बघणारेही असतात. त्यावर ते गोंधळ घालतात. पण कवी जिवानिशी गेला याबद्दल कुणालाही खंत नसते. कवीचा शेर किती वास्तववादी असतो याची ही जिवंत पावतीच नव्हे का ?

कोकणात पावसाबरोबर बेडकं उड्या मारू लागतात तसेच कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र कवीही उड्या मारू लागतात. पावसाचा थेंब पडला रे पडला की यांच्या पेनाला कीबोर्डला पान्हा फुटतो .

या प्रकारच्या कवींचा आणि यमक, वृत्ताचा काही एक संबंध नसतो.

एक वाफाळता चहा रूपालीचा
आणि उडीदवडा
आठवतोय का तुला ?
त्यानंतर पुन्हा घेतलेला चहा
आणि काउंटर वर दुस-या मागवलेल्या चहाचं बिल दिलेलं
आठवतेय का तुला
वेटरच्या लक्षात वड्याचं बिल येईपर्यंत आपण दोघे झटकन बाहेर
आणि तितक्यात वेड्यासारखा सैरावैरा पाऊस
छपराछपरावरून कोसळतो
सौमित्रच्या कवितेसारखा
वेटरचा आवाज आपल्या हसण्याच्या आवाजात ऐकू येऊनासा होतो
त्याला पाऊस आवडत नाही
आपल्याला आवडतो
एका छत्रीत मावत नाही तरीही
आपण भिजत गावभर फिरतो
आजही वाफाळता चहा आहे
पाऊस आहे, वडा आहे आणि पैसेही आहेत
पण तूच नाहीस.
बापाने झोडल्यावर लग्न करून गेलीस
ते पुन्हा दिसलीच नाहीस.
त्याचं दु:खं नाही गं
पण गण्याला जे बोललीस
ते जिव्हारी लागलंय
बरं झालं बापाने झोडलं आणि
माझी लाईफ बनली
नाहीतर बंदर के हाथ सुंदरी
अशी अवस्था झाली असती
असे म्हणालीस..
खरं वाटत नाही

असा आर्त टाहो फोडणार्या कवींना दगा देणाया सुंदया कोण असतात ?
मुळात त्या अशा सडकछाप भणंगांना पटतातच का ? त्यांना अक्कल नेहमी बापाने झोडल्यावरच का येते ?
बरं लग्न झाल्यावर त्या खूष कशा राहू शकतात ?
असे अनेक प्रश्न पडत रहायचे..

तोपर्यंतच
जेव्हां पहिली कवितेत दु:ख ओतण्यासाठी
जिला पाहिले सुद्धा नाही तिला बेवफा व्हायला लावले
आणि
त्या दु:खाने दोन आवंढे गिळले
अगदी हुकमी ढेकर द्यावेत तसे
मग डोळ्यातून पाणी येऊ लागले
स्क्रीनवर शब्द उमटत असताना
डोळ्यातून पाणी वाहू लागले

आणि एका बेवफाई मुळे जर्जर झालेल्या काळजाचा दुखडा

स्क्रीनवर उमटत गेला.

तेव्हांच समजलं
कवी होणं खायचं काम नाही.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवी जंगलात जातो कुऱ्हाड घेऊन आणि मग शेर.. Lol
मस्त लिहिलं आहे.

गावातील एका होतकरू साहित्यीकांच्या मंडळात मला एका संध्याकाळी निमंत्रण आले आणि तिथे आधी मिटिंग होऊन मग कवी संमेलनच झाले. तो किस्सा मी वाहत्या पानावर लिहिला होता, सेव्ह केला असेल मी तर देईन इथे.

शुभ्र वाळूत ती आली
श्वेत वस्त्रं लेऊन आली
ठळक गोलाई घेऊन आली
अंगांग भिजवून आली

काय वाटते तुला म्हणाली
आठवते ती रात्र मखमली
धुंद झालास तू मी गंधाळलेली
तू भुकेला मी उपासलेली

अरे हो, ट्युब पेटली
आठवले भूक होती लागली
साबुदाणा खिचडीसारखी ती भासली
भिजवला का?
पोस्ट लगेच टाकली
.
.
साबूदाणा खिचडी.. अरे हे तर खायचंच काम आहे Proud

कोकणात पावसाबरोबर बेडकं उड्या मारू लागतात तसेच कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वत्र कवीही उड्या मारू लागतात. पावसाचा थेंब पडला रे पडला की यांच्या पेनाला कीबोर्डला पान्हा फुटतो >> अगदी अगदी.. पाऊस आला रे आला कि हिरवी शाल पांघरून गवताचा गालिचा येतोच

Mast मस्त!
त्यांना त्रास होऊ लागला की मग ते कुहाड उचलतात आणि जंगलाकडे चालू लागतात...... हे भारीच.

अंतास रात्र नाही
रात्रीस अंत नाही
गंधाळलेल्या वेदनेस
कसलीच खंत नाही

का कुणी उशाशी
पेटवून दिप झोपे
आठवांत रात्र ओली
स्वप्नास बंध नाही

मी असा ऐकला
भणभणत्या तमात डुंबे
रात्रीत युगे युगे सरली
काळजास थांग नाही

(असंच असतंय का ओ ते कविता करणं म्हणजे? आमच्या इथे ऑर्डरप्रमाणे इन्स्टंट कविता पाडून मिळेल)

सापडले:
कनिष्ठ महाविद्यालयात असताना बऱ्याच लोकांचा याला साहित्यातले बरेच कळते असा गैरसमज झाला होता. मला पहिली पासूनच्या बहुतेक कविता तेव्हाही तोंडपाठ होत्या, आणि मी काही लिखाण करण्याचा प्रयत्नही केला होता म्हणुन असेल. त्यामुळे गावातील साहित्य साधना या हौशी साहित्यिकांच्या मंडळात एकदा मला बोलावणे आले. त्या रात्री तिथे वीस पंचवीस जण होते, १८ ते ५० वयोगटातील.
तिथे मिटिंग झाल्यावर कवि संमेलनच झाले.
मला त्यातील काही कवितांची काही कडवी अजून आठवतात.
त्यांची फक्त सुरवात देत आहे.

एक कवि आपली कविता प्रचंड जमली आहे, आणि आपल्या प्रत्येक कडव्या माशाह अल्लाह मिळणार आहे या आवेशात सुरू झाले:
"हंगामातच कणसं खुडून नेली
तर पक्षीच कशाला पिकावर येतील?
सगळे ऋतूच पालटले
तर तूच कशाला येशील?"

मग विजयी मुद्रेने माशा अल्लाह साठी पॉज घेऊन सगळ्यांकडे अपेक्षेने पाहू लागल्यावर, काहींनी वा!, मस्तच ! वगैरे दाद दिली.

दुसरे कवी:
"माझ्याच खंजिराने उपसून काढलेली
माझीच आतडी मी दारात टांगलेली"

तिसरे कवी, भडक शब्दांचा भडिमार करत:
"निपटून टाक वाटा चिखलात गुंतलेल्या
सोडू नकोस लाटा विषयुक्त दग्धलेल्या"

चौथ्या कवींची चारोळी:
"जन्म मरणांच्यामध्ये
असा आयुष्याचा छळ
जेथे टेकवावा पाय
तेथे नेमके शेवाळ"

पाचव्या कवींचीही चारोळी:
"मी पाहिले एक झाड
त्याला वैराग्याची मुळे
मी पाहिले एक झाड
शून्य देहा पलीकडे"
यांना प्रचंड दाद मिळाली. मला अर्थ कळला नाही.

यानंतरच्या एका कवींनी मात्र दु:खाच्या असल्या तरी बऱ्या म्हटल्या, त्याही चालीत.
१.
ग्रीष्मातल्या उन्हाची तडकून काच गेली
वृक्षात गुंतलेली छाया उडून गेली।
याचे शेवटले कडवे होते:
फांदीस टांगले मी आयुष्य वाळलेले
ही लक्तरे व्यथेची नाही झडून गेली

२.
आभाळ वाकले खाली, दुःखाचे घेऊन ओझे
ही ओंजळ भरण्या आधी, अश्रूच हरपले माझे।
मन शापीत होऊन बसले, हे उदास केविलवाणे
डोहावर अंधाऱ्याच्या, सळसळते पाऊस गाणे।

पुढच्या काही कवींनी एवढ्या भयानक कविता सादर केल्या स्वतःचे केस ओढावे वाटले. त्यातील एकाने "मी पाहिला एक मच्छर" अशी कविता ऐकवली, त्यात पुढे त्याला अंघोळ घातली वगैरे काहीही होते.

उबो, अस्मिता. ,फेफ, म्हाळसा, मानव, मृणाली, देवकी, सीमंतिनी आणि हपा आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
म्हाळसा Lol कविता भारी आहे पण.

मानव >> एकच नंबर प्रतिसाद. जरा वाढवलं तर एक भन्नाट लेख होईल पुलं सारखा. स्वासुगम्मत आठवले. एव्हढे सगळे लक्षात राहीले यासाठी २१ तोफा कबुल करो

अ तुल >>> गंमतीत पण तुम्ही एखाद्या कसलेल्या फिल्मी गीतकाराप्रमाणे शब्द वापरले आहेत. यावरून तुम्ही उत्तम कवी आहात हे लक्षात आले. गंमतीत सुद्धा इतक्या दर्जेदार कविता ! तुमच्या सिरीयस कविता वाचायला आवडतील.
(हा विरंगुळा आहे. कुठल्याच कवीचा उपमर्द करायचा नाही म्हणून असेच गंमत जंमत म्हणून लिहीले आहे. कुणीही ओढवून घेऊ नये ही विनंती.)