"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

Submitted by फारएण्ड on 30 December, 2021 - 00:21

"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..."

१९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते.

पण भारताने त्या पहिल्या सामन्यात विंडीजला हरवले याचे आश्चर्य वाटले होते इतके आठवते. त्यानंतरही या स्पर्धेबद्दल फारशी चर्चा कोठे झाल्याचे आठवत नाही. त्यावेळेस भारत नुकताच दोन महत्त्वाच्या मालिका खेळलेला होता. आधी पाकिस्तान मधे आणि नंतर वेस्ट इंडिज मधे. दोन्हीकडे पराभव झालेले होते, अपेक्षितपणे. तोपर्यंत फक्त अधूनमधून नाव ऐकलेला मोहिंदर अमरनाथ अचानक प्रकाशात आलेला होता - पाक मधे ३ व वेस्ट इंडिज मधे २ शतके मारून. पाक विरूद्ध हरल्यावर गावसकरचे कप्तानपद काढून घेउन कपिल कडे देण्यात आले होते, व गुंडाप्पा विश्वनाथलाही संघातून वगळण्यात आले. नंतरची वेस्ट इंडिज सिरीज आपण जरी हरलो तरी नवीन कप्तान व संघाच्या मानाने इतक्या बलाढ्य संघाविरूद्ध त्यांच्याच घरी कामगिरी ठीकठाक होती.

हा वर्ल्ड कप या सिरीजनंतरचा. मधे दोन महिने होते. पण तेव्हा मुळात इतक्या सलग सिरीज नसत. मार्च-एप्रिल मधे आधीचा सीझन संपला, की मग जर इंग्लंड दौरा नसेल तर कधीकधी ५-६ महिने क्रिकेट नसे. ही स्पर्धा सुरू झाल्यावरही भारतात फारशी हवा नव्हती. एकतर वन डे क्रिकेट फारसे माहीत नव्हते. कसोटी सामन्यांच्या अधेमधे फुटकळ सामने असत. स्थानिक संघाविरूद्ध तीन दिवसांचा सामना, अध्यक्षीय संघाविरूद्ध सामना वगैरे प्रमाणेच. त्यातले विजय पराजय कोणी फारसे लक्षात ठेवत नसत, त्याला काही महत्त्वही नसे.

त्यामुळे हा पहिला सामना जिंकल्यावरही फारशी काही हवा झाल्याचे लक्षात नाही. मग नंतर झिम्बाब्वेला हरवले. त्यानंतर मात्र एकदा विंडीज कडून आणि एकदा ऑस्ट्रेलियाकडून भारत हरला (याचीही इतकी चर्चा आठवत नाही. ही सगळी माहिती नंतर काढलेली). त्यानंतर आला तो टनब्रिज वेल्स चा झिम्बाब्वे विरूद्धचा सामना. त्यातील कपिलच्या नाबाद १७५ ची बातमी संध्याकाळी की दुसर्‍या दिवशी आली, आणि मग हळुहळू लोकांना इण्टरेस्ट वाढू लागला. टीव्ही/रेडिओ व पेपर्स मधे बातम्या येउ लागल्या.

या १७५ बद्दल ती एकच बातमी तेव्हा आली होती. तोपर्यंत भारतात या कपमधल्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवतच नव्हते. तेव्हा सरकारचे "माहिती आणि नभोवाणी मंत्री" जाहीर करत कोणत्या स्पर्धेचे प्रक्षेपण दूरदर्शन वर होणार ते. त्यातही परीक्षांचा काळ वगैरे विचारात घेत. एकूणच इतर मंत्री माहीत नसले तरी या एका खात्याचे मंत्री आम्हाला नेहमीच माहीत असत Happy विठ्ठलराव गाडगीळ व एच के एल भगत ही दोन नावे लक्षात आहेत. पण या सामन्याचे प्रक्षेपण मुळात उपलब्धच नाही हे नंतर समजले.

१७/५ अशी अवस्था असताना कपिलने शेपटाला बरोबर घेउन स्कोअर २६२ पर्यंत नेला इतपत माहीत होते. पण यातील अनेक डीटेल्स नंतर माहीत झाले. एकतर १७५ हा स्कोअर तेव्हा highest individual score होता वन डे मधला. एक दोन वर्षांनंतर रिचर्ड्स ने तो मोडला, पण केवळ रिचर्ड्सच तो मोडू शकेल असे लोकांना वाटे इतका मोठा स्कोअर तो तेव्हा होता. अगदी ९०च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत १०-१२ शतके म्हणजे खूप असे आणि शतकांचे स्कोअरही फार मोठे नसत. वर्ल्ड कप मधल्या गेम्स ६० ओव्हर्सच्या होत्या हे धरले तरी तीन स्पर्धांमधे इतका मोठा स्कोअर कोणी केलेला नव्हता. बाकी मॅचेस मधे तर नाहीच. रिचर्ड्सचा १८९ चा इंग्लंड विरूद्धचा स्कोअर व ती इनिंग ही अनेक वेळा सर्वोच्च गणली जाते. पण माझ्या मते कपिलची ही इनिंग सुद्धा तितकीच भारी होती - काकणभर जास्तच. दोन्ही डाव हे पहिल्या विकेट्स पडल्यावर तळाच्या लोकांना बरोबर घेउन केलेले होते. एक इंग्लंड विरूद्ध असला तरी त्या दिवशी त्या मैदानावर झिम्बाब्वेच्या बोलर्सनीही जबरदस्त बोलिंग केली होती. त्यात वर्ल्ड कपचे प्रेशरही आलेच.

यातील आणखी एक गंमत. त्या दिवशी त्या मैदानावर हे पिच मधल्या स्क्वेअरच्या एका बाजूला होते. त्यामुळे पिचच्या एका बाजूला बाउण्ड्री जवळ तर दुसरीकडे खूप लांब होती. पण कपिलने मारलेल्या ६ सिक्सेसपैकी बहुतांश या त्या लांब बाउण्ड्री असलेल्या बाजूला मारल्या होत्या, हे खुद्द झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हॉटननेच नंतर सांगितले. कपिलचा हा असला अचाटपणा त्याला फॉर्म मधे खेळताना पाहिलेल्यांना लक्षात असेल. जेव्हा १०० हा स्ट्राइक रेट फार महान समजला जात असे तेव्हा त्याच्या अनेक इनिंग्ज ३० बॉल मधे ५०, ३६ बॉल मधे ७२, ५६ बॉल्स मधे ८९ असल्या प्रकारच्या आहेत, त्या ही टॉप क्वालिटी बोलिंग विरूद्ध, आणि परदेशातील पिचेस वर. आणि नुसती धुलाईच नाही, तर त्याचे "रनिंग बिटविन" सुद्धा भारी होते. दुसरा फलंदाज तिकडे जेमतेम पोहोचेपर्यंत हा इकडे बॅट टेकवून पुन्हा ३-४ पावले निघाला आहे अजून एक रन काढायचा आहे का बघायला, हे कायम दिसणारे दृश्य होते.

या विजयापासून भारताची घोडदौड सुरू झाली. मग ऑस्ट्रेलियाला हरवून आपण सेमी मधे पोहोचलो. आणि तेव्हा सेमी फायनल व फायनल दूरदर्शनवर लाइव्ह दाखवणार असे जाहीर झाले. आता तेव्हाचे कॅलेण्डर पाहिले तर २२ जून ची सेमी फायनल ही बुधवारी होती. या गेम्स साधारण दुपारी ३ वाजता सुरू होत भारतातल्याप्रमाणे. तेव्हा शाळा सुरू झालेल्या होत्या. म्हणजे ही शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी पुढे पाहिली असावी. भारताचा डाव पाहिल्याचे लक्षात आहे. चेस सुरू असताना मोहिंदर व यशपाल चांगले खेळत होते पण रन रेट अजून वाढायला हवा होता. आता संदीप पाटील यायला हवा असे लोक म्हणू लागले ते ही लक्षात आहे. मग तो आला आणि धुंवाधार खेळला. मॅन ऑफ द मॅच जरी त्याला मिळाले नसले तरी माझ्या दृष्टीने मॅच त्यानेच खेचली. संदीप पाटील याआधीही इंग्लंड मधे चांगला खेळला होता. एकदा एका टेस्ट मॅच मधे बॉब विलीसविरूद्ध त्याने एकाच ओव्हर मधे ६ फोर्स मारून ८० वरून १०४ वर जात शतक पूर्ण केले होते (त्या ओव्हर मधे एक नो बॉल होता). या सेमी फायनल मधेही त्याने बॉब विलीसला मारला होता.

फायनलमधेही भारताला जिंकण्याचे चान्सेस नव्हतेच. त्यात १८३ वर सगळे ऑल आउट झाल्यावर तर नाहीच. पण भारत मॅच हरणार यात काही फारसे नावीन्य नव्हते. तरी आम्ही बघत बसलो. संधूचा एक बॉल एरव्ही आक्रमक खेळणार्‍या ग्रीनिज ने सोडला व तो ऑफ स्टंपची बेल घेउन गेला तेव्हा एकदम आता काय होते याबद्दल कुतूहल निर्माण झाले. पण तरी येणारा बॅट्समन रिचर्ड्स होता. ही मॅच बघताना साधारण या वेळेस आमच्याकडे व आसपास लाइट्स गेले. तेव्हा स्कोअर समजण्याचे इतर मार्ग सोपे नव्हते. कोणीतरी जेथे लाइट्स आहेत अशा भागापर्यंत गाडीने जाउन स्कोअर "आणला" तरच. रेडिओ वर धावते समालोचन होते का लक्षात नाही पण कोणाकडे बहुधा ट्रान्झिस्टरही नसावा आसपास. कारण पुन्हा लाइट्स येईपर्यंत स्कोअर माहीत नव्हता. मग लाइट्स आले तेव्हा अजून तीन विकेट्स उडालेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यात रिचर्ड्स होता हे समजले. नंतर लगेच लॉइडही परतला. आता मात्र एकदम इंटरेस्ट ने सगळे पाहू लागले. मग मधे थोडा वेळ दुजाँ व बहुधा होल्डिंगने स्कोअर बराच पुढे नेला. ओव्हर्स भरपूर होत्या त्यामुळे हे आता असेच चिकटपणे खेळून जिंकतात की काय अशी शंका आली. साधारण तेव्हाच मोहिंदर बोलिंगला आला.

त्याची बोलिंग अ‍ॅक्शन अफाट होती. रन अपची सुरूवात जरा वेगाने करून मग बॉल टाकावा की नाही याचा फेरविचार करत असल्यासारखा तो स्लो होत असे क्रीजजवळ येताना. त्याने मध्यमगती गोलंदाजी करून ही जोडी फोडली. मग पुढचे लौकर गुंडाळून आपण मॅच जिंकली. मग ते चार्ल्स च्या हस्ते पारितोषिके देणे वगैरे लक्षात आहे. दुसर्‍या दिवशी 'केसरी' मधे "विंडीजचा धुव्वा, विश्वचषक भारताकडे" अशी पहिल्या पानावरची मोठी बातमी व कपिलचा हातात कप घेतलेला "फावड्या" फोटो - तो पेपर अनेक वर्षे जपून ठेवला होता. नंतर कोठे गेला माहीत नाही.

या विजयानंतर जागतिक व भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. सुनील गावसकर ने १९७५ च्या वर्ल्ड कप मधे ६० ओव्हर्स खेळून फक्त ३६ रन्स केले होते ही बातमी या दरम्यान कधीतरी फुटली. तोपर्यंत त्याबद्दल ऐकल्याचे आठवत नव्हते. या सामन्यांना महत्त्व आले. या मॅचेस टीव्हीवर दिसू लागल्या, लोक पाच दिवस कसोटी सामनेही पाहात, हे तर एका दिवसात संपायचे. १९८५ सालच्या वर्ल्ड सिरीज कप मधला भारत-पाक अंतिम सामना बहुधा रविवारी होता. ऑस्ट्रेलियात डे-नाइट असल्याने भारतात तो सकाळी उशीरा सुरू झाला. तेव्हा रस्त्यांवर असलेली सामसूम लक्षात आहे. १९८४ मधे शारजालाही मॅचेस सुरू झाल्या. १९८४ मधेच भारतात नवी दिल्ली मधल्या नेहरू स्टेडियमवर भारत-पाक सामना डे-नाइट खेळला गेला. तेव्हा त्याचे अप्रूप वाटले होते. खेळाडूंच्या दिसणार्‍या चार सावल्या वगैरे. ती मॅच भारताने जिंकली होती. आता रेकॉर्ड पाहिले तर नंतर तो "बेनिफिट" सामना धरला गेला असे दिसते. याच सिरीज मधे मुंबईत झालेल्या आणखी एका बेनिफिट मॅच मधे संदीप पाटील व कपिल ने जबरी धुलाई केली होती ते ही लक्षात आहे.

तरीही हे सामने एकाच सिरीज मधे कसोटी मॅचेसच्या अधेमधे होत. वेगळी वन डे सिरीज नसे. कपडेही पांढरेच असत. नियमही फार वेगळे नव्हते - पॉवर प्ले, नो बॉल्स चे नियम साधारण कसोटीसारखेच होते. २२०-२४० रन्स म्हणजे भरपूर होत. आणखीही विविधता होती. ऑस्ट्रेलियामधे पांढरा बॉल व रंगीत कपडे असत. इंग्लंड मधे ५५ ओव्हर्सच्या मॅचेस असत. भारत, इंग्लंड ई. ठिकाणी कॅमेरे एकाच बाजूला असत. त्यामुळे बोलर्सची अ‍ॅक्शन दोन्ही बाजूनी दिसत असे. आणि कपिल, इम्रान, मार्शल, होल्डिंग, हॅडली सारख्यांच्या अ‍ॅक्शन अगदी रन-अप पासून बघायला मजा येत असे. प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात नसल्याने ओव्हर झाली, की विकेट कीपर व स्लिप फिल्डर्स दुसर्‍या क्रीजकडे जात आहेत हे दिवसभर बघायला मिळे. साधारणपणे अर्धशतक वगैरे केलेल्याला मॅन ऑफ द मॅच मिळे. बोलर्सना त्यामानाने कमीच मिळत असे. याच काळात कसोटी सामने निर्जीव होउ लागले होते. त्यामानाने हे सगळे बरेच वेगवान वाटे.

तरीही कसोटी सामन्यांचे महत्त्व होतेच. एक उदाहरण - तेंडुलकरची पहिली पाच-साडेपाच वर्षे व पहिले ७५-७६ सामने वन डे मधे एकही शतक नव्हते. पण त्याचे नाव कसोटीतील कामगिरीमुळे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले होते. अर्थात वन डे मधे निकालावर परिणाम करणारी अर्धशतके होतीच. पण शतक नव्हते.

या वर्ल्ड कप विजयाचे आणखी पडसाद उमटले ते त्याच वर्षी वेस्ट इंडिज भारत दौर्‍यावर आले तेव्हा. त्यांनी ६ कसोटीत आपल्याला ०-३ असे व ५ वन डे मधे ०-५ असे हरवले. त्याबद्दल आणखी माहिती या लेखात आहे.

आता नंतर भारताने पुन्हा २०११ मधे कप जिंकलेला आहे. पण तरीही हा १९८३ चा विजय भारी वाटतोच. माझा समाजशास्त्रीय अभ्यास वगैरे नाही पण गेल्या एक दोन दशकात एकूणच भारताची आंतरराष्ट्रीय पत वाढलेली आहे. आपले एकूणच लोक व खेळाडू जगात कोठेही आत्मविश्वासाने वावरतात. इव्हन प्रेक्षकांची तुलना केली तर ८०-९० मधे मैदानावर कोठेतरी पुंजक्यांमधे दिसणारे कोट वगैरे घालून आलेले भारतीय आणि आता जगातील कोणत्याही मैदानावर मोठ्या संख्येने दिसणारे, खूप "आवाज" करणारे आणि कसलाही कमीपणा न बाळगणारे भारतीय प्रेक्षक यातील फरक सहज जाणवतो. तेव्हा कपिल व कंपनी हे शिक्षकांनी दिलेल्या पारितोषिकाचा स्वीकार करत असल्यासारखे नम्र होते. आता आपले खेळाडू कोठेही कप वगैरे स्वीकारताना एकदम सहजपणे वावरतात. इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियालाही आपण हरवू शकतो याचा सेल्फ बिलीफ त्यांच्या खेळात, वागणुकीत दिसतो (तो मैदानावर खेळात नेहमी उतरतोच असे नाही Wink ) आयपीएल मुळे व भारत एकूणच क्रिकेटची मोठी बाजारपेठ झाल्याने इतरांनाही भारताची दखल घ्यावीच लागते. पूर्वी एरव्ही एकमेकांविरूद्ध खेळणारे रिचर्ड्स व बोथम सॉमरसेट मधे एकाच संघात असत तसे आता आयपीएलमुळे झाले आहे.

बाकी पैसा, सोयी व हाय लेव्हल कोचिंग वगैरेही फरक आहेच. सध्या बर्‍याच शोज मधे १९८३ च्य खेळाडूंच्या मुलाखती पाहिल्या. अगदी तुटपुंजे मानधन, राहण्याच्या सोयीतील अडचणी वगैरेंचा सामना करून या लोकांनी विश्वचषक जिंकला हे पाहिले की 'टोटल रिस्पेक्ट' शिवाय दुसरे काही मनात येत नाही. आता सुपरस्टार कल्चर मुळे काही खेळाडू 'अनटचेबल' झालेत. सचिन कितीही भारी असला तरी त्याच्या करीयरच्या उत्तरार्धात त्याच्या खेळावर टीका ही फार क्वचित होत असे. कॉमेण्टेटर्स, ज्युनियर खेळाडू व इतर सपोर्ट स्टाफ यांना मुख्य खेळाडूंना दुखावणे परवडत नसावे असे चित्र अनेकदा दिसते. संजय मांजरेकर, हर्ष भोगले वगैरेंबद्दल ऐकले आहे. तेव्हा आता जर एखाद्याने विजयाचे पूर्ण श्रेय जर कोहली किंवा रोहित शर्माला दिले तर त्यात आश्चर्य वाटत नाही.

या पार्श्वभूमीवर १९८३ च्या संघाच्या मुलाखतींमधे झाडून सगळे जे कपिलला निर्विवाद श्रेय देतात त्याचे महत्त्व जाणवते. २००८ मधे आयपील सुरू व्हायच्या आधी एक "आयसीएल" घोषित झाली होती - त्यात बीसीसीआयचा सहभाग नव्हता. किंबहुना विरोधच होता. तेव्हा कपिल त्यात असल्याने बरीच वर्षे त्याला संघाशी संबंधित कोणत्या पदावर घेतले गेले नव्हते. गावसकर, शास्त्री, द्रविड, कुंबळे, गांगुली वगैरे जसे बीसीसीआयच्या इनर सर्कलमधले वाटतात तसा तो अजूनही नाही. त्यामुळे कपिलची तारीफ करण्यात या खेळाडूंना कसलाही स्वार्थ नाही, किंवा न केल्यास काही नुकसान नाही. तरीही संघातील लोक त्याच्याबद्दल जे बोलतात त्यावरून त्याने एक कप्तान म्हणून एक अशक्यप्राय कामगिरी तेव्हा सर्वांकडून करून घेतली याची खात्री पटते.

पुढे हा संघ बराच टिकला. कपिलचे कप्तानपद त्यानंतर वर्षातच गेले, आणि पुन्हा एका वर्षाने त्याच्याचकडे परत आले - आणि मग १९८७ च्या वर्ल्ड कप पर्यंत राहिले. उपकप्तान मोहिंदर भारताबाहेर जितका चांगला खेळला तितका भारतात खेळला नाही. पुढे ५-६ वर्षे संघात होता इतके लक्षात आहे. गावसकर या कपमधे विशेष चमकला नाही पण नंतर त्याने वन डे मधला खेळ आत्मसात केला. वेंगसरकर, शास्त्री, श्रीकांत हे पुढे अनेक वर्षे खेळले, तिघेही कप्तानही झाले (शास्त्री एक दोन सामने "बदली" कप्तान होता. वेस्ट इंडिज विरूद्ध एक विजयही त्याच्या नावावर आहे). संदीप पाटील पुढे एक दोन वर्षे चमकला पण अझर आल्यानंतर त्याला पुढे फार संधी मिळाली नाही. यशपालचे ही तसेच झाले असावे. किर्ती आझाद २-३ वर्षे होता. किरमाणी तर होताच. तो कसोटीत अनेकदा नाइट वॉचमन म्हणून येत असे (आणि त्याला ती संधी आपले लोक अनेकदा तत्परतेने देत), त्यामुळे कप्तान हे जसे पद असते तसे नाइट वॉचमन हे किरमाणीचे पद आहे असेच तेव्हा वाटे. बिन्नी व मदनलाल अनेक वर्षे संघात होते. भारतात फार चालत नसत पण परदेशात विकेट्स काढत. बलविंदर संधूबद्दल मात्र पुढे फार खेळला नाही. पुलंच्या 'दोन वस्ताद' मधल्या त्या वस्तादांप्रमाणेच त्याचे झाले असावे. फायनलमधे वेस्ट इंडिज च्या अभेद्य फलदांजीला पहिला सुरूंग त्याने लावला होता. आजही तो बहुधा ग्रिनीज ने बॉल सोडण्याकरता वर उचललेली बॅट व अचानक आत येउन ऑफ स्टम्प वरची बेल घेउन गेलेला बॉल - याची कहाणी सांगत असेल. ते लाइव्ह पाहिलेल्यांना ती सांगायचीही गरज नाही - कारण ती कोणीच विसरलेले नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतर्रनाक ! लेखातला ९० टक्के भाग माझ्यासाठी नवीन आणि १०० टक्के भाग वाचनीय होता. अश्या धाग्याची वाट बघतच होतो. प्रतिसादात जुनेजाणते जाणकार भर टाकतील ती वाचायलाही मजा येईल.
येत्या विकेंडला हा पिक्चर बघायला जायचा विचार करतोय.. त्यासाठीही एक मूड तयार होईल Happy

मस्त लेख आहे. आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही नुकतेच क्रिकेट खेळायला सुरूवात केलेली असेल. कॉलनीत बांधकामासाठी बांधलेला एक पाण्याचा मोठा हौद होता. तो बुजवल्यामुळे वर बसायची सोय होती. त्याच हौदाला विटकरीने तीन स्टंप्स काढले की झाले. जिथे बॅटींग करायचो, तिथे मोठा खड्डा झाला होता. हाप पीच मधे त्या खड्ड्यात बॉल टाकला कि तो वळून विकेट मिळत असे. पण बॉल स्टंप्सना लागला कि नाही यावरून वाद होत.

त्या वेळी पेपर वाचत नसायचो. पण आई कपिलदेवचे पराक्रम सांगायची. ती पहिल्या पानावरचे आम्हाला आवडतील असे मथळे वाचून दाखवायची. तेव्हां चौकटीत भरपूर मजकूर असायचा. त्यात कपिलदेवने सशासारखे दात दाखवले वगैरे महत्वाची माहिती दिलेली असायची. कालीचरणच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजची टीम भारतात सपाटून मार खाऊन गेली होती हीच वेस्ट इंडीजची ओळख. आमच्यातल्या एका मुलाने कोलंबसने वेस्ट इंडीजचा शोध लावला अशी महत्वपूर्ण माहिती दिली होती. इंडीया वरून पश्चिमेचे वेस्ट इंडीज असे आसेमी म्हाला वाटायचे. तेव्हां अमेरिकेच्या मधोमध हा देश असेल असे वाटत होते.

सेमी फायनल पर्यंत वर्ल्ड कपचा पत्ताच नव्हता. फारेण्डने म्हटल्याप्रमाणे वन डे, थ्री डेज या मॅचेस बद्दल अजिबात उत्सुकता नसायची. ऑस्ट्रेलियात कपिलदेवने खूप विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याला बाहेरच्या देशातले बॅट्समन घाबरतात इतके माहिती झाले होते. त्याला पाकिस्तानचा इम्रानखान टफ देतो ही माहिती बाहेरून मिळाली होती. ईम्रान खान आनि कपिलदेव एकमेकांकडे खुन्नसने बघतात. गावस्कर नसता तर दोघांच्यात फाईट झाली असती. बोथम कपिलदेवचा मित्र आहे अशा खूप बातम्या मार्केटमधे असायच्या.

सेमी फायनलच्या वेळी सर्वांना वर्ल्ड कप माहिती झाले. मुंबईचा मामा , काका आणि वडील तसेच ज्यांच्याकडे टीव्ही नाही अशी काका मंडळी मॅच पहायला आली होती. त्यांच्या चर्चेतून बरेच काही समजायचे. सर्वांनी (पेपरमधे वाचलेले) महत्वाचे काही सांगतोय असा आव आणून माहिती दिलेली. त्यात मुंबईचा मामा कधी कधी ठोकून पण द्यायचा. तो मुंबईचा असल्याने त्याच्याकडची माहिती खरी असेल असे इतरांना वाटायचे.

वेस्ट इंडीजच्या टीमची मागची आठवण होती. फायनलला आपण सहज जिंकू असे मी म्हणालो होतो. पण समोरच राहणार्‍या आणि रणजी खेळणार्‍या खेळाडूच्या लहान भावाने इज्जत काढली होती. ती टाईमपास टीम होती. ही असली टीम आहे. त्याने जी माहिती दिली होती त्याने भीतीने गाळणच बसली. त्यानंतर त्या सायकॉलॉजिकल प्रेशरखालीच मॅच पाहिली. गार्नरची विशेष भीती वाटायची. मार्शलबद्दल हा खुन्न्नस ठेवतो, फोर मारला कि रागाने बघतो, लगेच विकेट काढतो अशी वदंता होती. त्याने रागाने बघितले की धडकीच भरायची. होल्डिंगचा चेहरा मवाळ असल्याने तो घातक वाटला नाही. नंतर समजले तोच सर्वात जास्त घातकी बॉलर होता.

कळायला लागल्यानंतर कपिलदेवचं गारूड मनावर राहीलं. तो रिटायर झाल्यानंतरच्या टीमबरोबर जास्त भावनिक संबंध राहिले नाहीत. अमिताभ आणि कपिलच्या जोरावर लहानाचे मोठे झालो. वयात आल्यानंतर माहिती झालेले खेळाडू हे बरोबरीचे वाटले. सुपरहिरो नाहीत वाटले. श्रीकांत आवडायचा. तळाचे मारामारी करणारे बॅट्समन आवडायचे. किर्ती आझाद, बिन्नी, मदनलाल यांनी बरेचदा तळाला येऊन हाणामारी करून उपयुक्त धावा काढल्या होत्या.

मस्त!
'इकबाल' ची सुरुवात या विजयाने आहे Happy

सुरेख लेख!काय त्यावेळी भरुन आले होते.
४-५ दिवसांपूर्वी यू ट्यूबवर कपिल शर्मा शो पाहिला होता.त्यात ८३ची पुरी टीम होती.मजा आली त्यांचे अनुभव ऐकायला.बाकीचा धांगडधिंगा सोडा.

फा फारच मस्त आठवणी. आजही वेस्ट इंडिज सोबत पहिल्या कसोटीचा शेवट आहे. शामा गमतीशीर किस्से. त्याकाळी वर्तमान पत्रातून खेळाडूंची छायाचित्रे कापून कोऱ्या कागदी वहीत चिटकवण्याचा छंद होता.

*मी तिथे होतो..*
- द्वारकानाथ संझगिरी

१९८३ साली भारतीय संघाने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यावर बनलेला चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाद्वारे त्या गोड, सुखद, सोनेरी आठवणी पुन्हा जागवल्या जातील. खरं तर माझ्यासाठी त्या कधीच झोपलेल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा जागं होण्याचा प्रश्नच नाही. सदाफुली प्रमाणे त्या आठवणींचं झाड नेहमीच फुललेलं असतं.
कारण,
त्यावेळी मी तिथे होतो.
माझा तो पहिला परदेश दौरा. मी आदल्या वर्षी दिल्लीत एशियाड कव्हर केले होते. इंजिनिअरिंग सांभाळत त्यावेळेला मी क्रीडा लेखनात रांगत होतो. पाळण्यातून थेट इंग्लंडला जाईन ही कल्पनाही मला नव्हती. पण "क्रीडांगण," "लोकप्रभा " या दोन नियतकालिकांनी पंख दिले आणि मी उडून थेट हिथ्रोवर पोहचलो. तो माझा पहिला विमान प्रवास होता. पहिल्या गोष्टी माणूस सहसा विसरत नाही. पहिला नंबर, पहिला पगार, पहिली रात्र वगैरे वगैरे. तसं हे पहिलं उड्डाण. ते ही अशा शहरात की, ज्या शहराबद्दलचं आकर्षण मी अनेक वेळा तिथे जाऊनही कमी झालेलं नाहीये. अर्थातच म्हणजे लंडन.

इथून जाताना देवाने प्रकट होऊन जर मला म्हटलं असतं, ''वत्सा भारतीय संघ विश्वचषक जिंकून येणार आहे. तू नशीबवान ठरशील.'' तरी मी देवाला म्हटलं असतं, ''श्रीहरी का घेतोय फिरकी?''
माझ्या अपेक्षा फार माफक होत्या. लंडन हे शहर सर्वप्रकारच्या क्रांतिकारकांचं आश्रय स्थान. जगातल्या क्रांतीकारकांना या शहराने छप्पर दिलं. मग तो मार्क्स असो किंवा एंजेल्स. सावरकर असोत किंवा आंबेडकर. लेनिन असो किंवा गांधीजी. मॅचेस पहाव्यात, इंग्लिश वातावरण ज्याबद्दल वाचलं होतं ते अनुभवावं आणि मस्त, मनसोक्त लंडन फिरावं, आपले आवडते खेळाडू पाहावेत आणि परत यावं. भारतीय संघ जिंकेल वगैरे स्वप्नातही नव्हतं.
मी तिथे पोहचलो तेंव्हा भारताची एक मॅच होऊन गेली होती. त्यात काय झालं मला कल्पना नव्हती. हिआहे थ्रो विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने मला नेहमीचे विचारले. आणि मग त्याने मला विचारलं, ''हा वर्ल्ड कप कोण जिंकेल असं तुला वाटतं?''
मी म्हटलं, ''वेस्टइंडिज किंवा इंग्लंड.'' त्या इमिग्रेशन ऑफिसरला स्टॅम्प मारण्यासाठी किंचित खुश करण्याचा तो प्रयत्न होता. तो हसला जोरात आणि म्हणाला, ''You are underastimating your team. You have humbled the world champions yesterday.'' तेव्हा कळलं की भारताने वेस्टइंडिजला पहिल्या मॅचमध्ये हरवलंय. आणि तिथल्या तिथे मी रोमांचित झालो.
पण तो इमिग्रेशन ऑफिसर सोडून आणखीन एक माणूस असा होता की वर्ल्ड कपच्या सुरवातीलाच त्याला वाटलं होतं की, भारत काहीतरी गडबड करू शकतो. आणि तो म्हणूनच गेला, ''India is a dark horse.'' तो होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार किम ह्युज.
तिथे गेल्यानंतर एका ब्रिटिश पत्रकाराने लिहलेलं पण मी वाचलं. त्यात त्याने असं म्हटलं होतं की, ''गेल्यावर्षी इंग्लिश संघाला भारतामध्ये भारताच्या वनडेतल्या बदललेल्या आणि थोड्याशा आक्रमक अॅप्रोचचा प्रत्यय आला. त्यांचा नवा कर्णधार कपिल देव तर एक हाती सामना फिरवू शकतो. पण सध्या मात्र त्यांनी त्यांचा जुना इतिहास थोडा फार बदलण्याच्या पलीकडे जास्त काही महत्त्वाकांक्षा बाळगू नये.''
त्यानंतर भारताने झिम्बाब्वेला ५ विकेट्सने हरवलं. आणि त्याच झिम्बाब्वेने चक्क ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यामुळे ब गटात भारतीय संघ थेट टॉपला जाऊन बसला.
आम्ही सर्व भारतीय पुन्हा शहारलो.
पण पुढच्याच मॅचने आम्हाला जमिनीवर आणलं. कारण ऑस्ट्रेलियाने ३२१ धावा केल्या आणि तो पाठलाग भारताला जमला नाही. पण त्या मॅचमध्ये मी एक अविश्वसनीय असं दृश्य पाहिलं. साक्षात डेनिस लिली ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. त्याला संघातून चक्क वगळलं होतं. मग आपली पुढची मॅच होती वेस्टइंडिज बरोबर. आणि तिथे मी आणखीन एक दृश्य पाहिलं. ते ही तितकंच अविश्वसनीय होतं. भारतीय संघ खेळत होता आणि सुनील गावस्कर ड्रेसिंग रूममध्ये बसला होता.भारताने वेस्टइंडिजविरुद्ध चक्क सुनील गावस्करला वगळलं होतं. मला आठवतंय की, प्रेस बॉक्समध्ये अँटिगाचा एक पत्रकार होता. त्याने मला विचारलं, ''तुम्ही गावस्करला कसं वगळलं?''
एक भारतीय पत्रकार पुढे आला आणि तो त्याला म्हणाला की, ''गावस्कर हा बायकॉट सारखा आहे. त्याचा वनडेमध्ये फारसा उपयोग नाही.''
तो अँटिगन पुन्हा उसळला आणि म्हणाला की, ''गावस्करची तुलना तुम्ही बायकॉटशी करता? अजिबात करू नका. गावस्करकडे बायकॉट पेक्षा कितीतरी प्रचंड फटके आहेत.''
वेस्ट इंडिजच्या पत्रकाराला भारतीय पत्रकारापेक्षा सुनीलचा जास्त अभिमान दिसला. आणि ती मॅच भारताने गमावली. पण ती मॅच मी दोन गोष्टींसाठी कधीही विसरू शकणार नाही. एक, विव्ह रिचर्ड्सचं शतक मी पाहिलं. आणि तृप्त झालो. सर नेव्हिल कार्डस् ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच असली की प्रार्थना करत ''व्हिक्टर ट्रंपरचं शतक होऊ दे पण इंग्लंड मॅच जिंकू दे.'' माझीही त्यादिवशी प्रार्थना अशीच होती ''विव्ह रिचर्ड्सचं शतक होऊ दे, पण भारत जिंकूदे.'' पण ही प्रार्थना देवाने अर्धीच ऐकली. त्याने विव्ह रिचर्ड्सचं शतक होऊ दिलं.
आणखीन एक गोष्ट, त्या मॅचमधला माल्कम मार्शलचा स्पेल मी कधीही विसरणार नाही. अक्षरशः तो आग ओकत होता. ज्या वेगात तो चेंडू टाकत होता तो वेग पाहून प्रेस बॉक्समध्ये सुद्धा मला कापरं भरत होतं. मला वाटतं त्याच मॅचमध्ये त्याने दिलीप वेंगसरकरला जखमी केलं. मी त्या प्रेस बॉक्समध्ये बसून विचार केला की, आपण पवित्रा घेतला आणि समोर माल्कम मार्शल धावत येत आहे. तुम्हाला सांगतो की, माझा पाय रुळात अडकलाय आणि समोरून डेक्कन क्वीन धडधडत येतेय, असा भास मला झाला. ती मॅच हरलो आणि पुन्हा भारतीय संघ जमिनीवर आला. आणि पुन्हा आम्ही सर्व जमिनीवर आलो.
आणि मग ती टर्नब्रिज वेल्सची झिम्बाब्वे विरुद्धची मॅच. जिथे कपिलने दाखवून दिलं की, तो एक हाती मॅच फिरवू शकतो. ती मॅच पाहणं हा तोपर्यंत माझ्या आयुष्यातला क्रिकेटमधला सुदैवाचा उच्चांक होता. आणि तिथे मला असं वाटलं की, या भारतीय संघाकडे काहीतरी अद्भुत करायची ताकद आहे. आणि पुढच्या मॅचमध्ये ते सिद्ध झालं.
पुढची मॅच होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध. आणि त्या मॅचमध्ये भारताने २४७ धावा केल्या. ज्या संघाने आधीच्या मॅचमध्ये ३२१ धावा केल्या, त्यांना २४७ चा पाठलाग कठीण नव्हता. पण बिन्नी, मदनलाल आणि संधू यांनी त्यांच्या फलंदाजीचं अक्षरश: दिवाळं काढलं. बिन्नी, मदनलाल आणि संधू सारखे गोलंदाज तुम्हाला ऑस्ट्रेलियात अनेक सापडतील. कदाचित हे तिघेही गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात बसले सुद्धा नसते. पण त्यांनी ऑस्ट्रेलियाला एका मागोमाग एक धक्के दिले. आणि १२८ धावांमध्ये अख्खा ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. मदनलालने ४ बळी घेतले. बिन्नीने ४ आणि संधूने २. आणि तरीही काही जीभा या वळवळतच राहिल्या. टेड डेक्स्टर म्हणाला होता की, ''भारत ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारत जिंकला तर बरं होईल. कारण इंग्लंडला भारताला हरवणं सर्वात सोपं जाईल.''
त्यांनतर मॅच होती इंग्लंड विरुद्ध. सुदैवाने डेव्हिड गाॅवर या माझ्या लाडक्या इंग्लिश फलंदाजाचे पाय मात्र जमिनीवर होते. तो म्हणाला की, ''कपिल देव हा आजचा जगातला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. आणि तो इंग्लंडच्या विजयी आगेकुचीत अडथळा निर्माण करू शकतो. मला झिम्बाब्वे विरुद्धचा त्याचा डाव पाहायला आवडलं असतं. सुनील गावस्करची आम्हाला काळजी वाटते. तो अजून फॉर्मात नाहीये. पण तो सगळं मागचं उट्ट इंग्लंड विरुद्ध काढू शकतो.''
आणि त्या इंग्लंडविरुद्ध सामन्यात सगळ्यांचे दात भारतीय संघाने अक्षरशः घशात घातले. इंग्लंडची मॅच संपवताना संदीप पाटीलने बॉब विलिसला लागोपाठ ४ चौकार मारले. आदल्याच वर्षी त्याने इंग्लंडमध्ये बॉब विलिसच्या एका षटकामध्ये ६ चौकार ठोकले होते. संदीप पाटील पॅव्हेलियनमध्ये आला आणि आपल्या सवंगड्यांना म्हणाला, ''अरे मला वाटलं हा सुधारला असेल रे. पण अजून सुधारलेला नाहीये.''
आणि मग भारतीय संघ चक्क अंतिम सामन्यात पोहचला. पण अंतिम सामन्यात होता वेस्टइंडिजचा संघ.! लॉईड, रिचर्ड्स, ग्रीनिज, हेन्स, मार्शल, गार्नर सगळेच एकापेक्षा एक. खरं सांगायचं तर तिथपर्यंत पोहचणं हेच आमच्यासाठी दैवी होतं. त्याच्यावर कळस होईल, असं वाटलं ही नव्हतं. आणि विशेषतः १८३ धावांमध्ये भारतीय संघ संपल्यानंतर तर मुळीच नाही. पण त्यादिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. बलविंदरसिंग संधूने टाकलेल्या आउटस्विंगने इनस्विंगच रूप घेतलं. आणि तो चेंडू ग्रीनिजचा ऑफ स्टंप घेऊन गेला. विव्ह रिचर्ड्सने मॅच संपवण्याची घाई असल्याप्रमाणे येऊन आक्रमण केलं. आणि एक अतिशय कठीण झेल कपिल देवने घेतला. आणि त्यानंतर लंगडत क्लाइव्ह लॉईड बॅटिंगला आला. त्यावेळेला जाणवलं की, भारतीय संघ जिंकू शकतो. कारण ज्या पद्धतीने लॉईड बॅटिंगला आला, त्यावेळी लक्षात आलं की, हा फिट नाहीये. आणि फटके मारताना त्याचे पाय चेंडू जवळ पोहचणार नाहीत. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करून लॉईडची विकेट काढली. मला आठवतंय मला संदीपने सांगितलेलं, ''विव्ह रिचर्ड्स बॅटिंग करत असताना त्याला सुनील म्हणाला की, अरे बहुतेक हा आपल्याला शॉपिंगसाठी वेळ देईल.'' खरंय त्याने शॉपिंगसाठी नुसता वेळ नाही दिला तर एक अतिशय अमूल्य असं शॉपिंग भारतीय संघाने केलं. त्यांनी चक्क वर्ल्ड कप जिंकला.
इथून जाताना हा वनडेमध्ये कसाबसा मॅट्रिक पास झालाय असा वाटणारा विद्यार्थी चक्क ऑक्सफर्डमध्ये पहिल्या क्रमांकाला यावं, तसं भारतीय संघाचं त्या महिनाभरात घडलं. भारतीय खेळाडूंचं जे हॉटेल होतं ते लॉर्ड्सच्या समोरच होतं. तिथे पोहचायला त्यांना रात्र झाली. आणि मला आजही रवी शास्त्रीने सांगितलेलं आठवतं की, अंगावर त्यांच्या फारसे कपडे उरलेले नव्हते. इतका जल्लोष, इतका आनंद होता.
या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नशीब पालटलं. आज आपण जे आयपीएल पाहतोय, आज जो आपण क्रिकेटमधला पैसा पाहतोय ना त्याचं बीज हे या विजयानंतर रुजलं. आणि त्याचं आता हे प्रचंड मोठं फळांनी भरलेलं झाड झालेलं आपण पाहतोय.
त्यानंतर माझं आयुष्यही बदललं. आम्ही षटकार काढला आणि काही वर्ष तो तुफान चालला. आणि इंजिनिअरिंग सांभाळत मी पत्रकारितेत उडी घेतली. २०११ साली भारतीय संघाला मी पुन्हा वर्ल्ड कप जिंकताना पाहिलं.
पण १९८३ ची गोष्ट वेगळीच होती.
पहिला हनिमून तो पहिला हनिमून असतो. नंतर पुढे फक्त उजळणी असते.
ह्या लेखाबरोबर माझा हा स्तंभ
संपतोय.
सकाळचे खूप खूप आभार आणि तुम्हा वाचकांचे सुद्धा.
तुम्ही फोन करून, सोशल मीडियावर जो प्रतिसाद दिलात तो ह्या १९८३ च्या विश्र्वकपच्या आठवणीप्रमाणे मनात टवटवीत राहणार आहे.

#1983WorldCup in

फार छान वाटल॔ वरचं सारंच वाचतांना , पुन:प्रत्ययाचा आनंद म्हणण्याइतपत !! धन्यवाद.
'83च्या विजयाने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, हें निर्विवाद. त्या विजयाचा एक पैलू मात्र कांहींसा दुर्लक्षित झाला असं मला वाटतं. 1983 पर्यंत कसोटी क्रिकेटमधे आपलं एक स्थान निर्माण झालं होतं ( वाडेकर संघाचे यशस्वी दौरे ) पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधे आपण ' लिंबूटिंबू ' संघच होतो व सर्व खेळाडूःची त्यातील रुची , तयारी उदासीनच म्हणण्यासारखी होती. ' 83च्या विजयाने भारतीय खेळाडूंचे डोळे खाडकन उघडले व मर्यादित षटकांच्या क्रिकेटचं एक प्रचंड दालन अलीबाबाचया गूहेसारखं त्याना खुणावूं लागलं. त्याचे दूरगामी परीणाम आज दिसताहेत !!!

मस्त लेख! बाबांमुळे मला क्रिकेट बघण्याचा नाद लागला होता. या वर्ल्ड कप च्या वेळी त्यांच्याकडूनच दर मॅच, त्यातल्या खेळाडूंची हवा तयार व्हायची. आमच्याकडे तर टिव्ही सुद्धा नव्हता तेव्हा. रेडिओ वर कॉमेन्टरी ऐकायचो. ते इतके काही समजायचे पण नाही. बाबाच सांगायचे काय झाले Happy की आम्ही लगेच एक्सायटेड! दुसर्‍या दिवशी पेपरात वर्णने वाचण्याची पण तेवढीच उत्सुकता असयाची. शेजार्‍यांकडे टिव्ही वर फायनल बघितल्याचे अन ऐन वेळी दिवे गेल्याचेही आठवतंय. मला झोप आली. अन बाबांनी एकदम उठ उठ, ७ विकेट पडल्या, मॅच रंगतीये चल बघायला असे म्हटल्याचे आठवतंय. मग तो ऐतिहासिक जल्लोष! लॉर्ड्स वर मैदानात लोक पळत येणे, कपिल ने करंडक उंचावणे हे लाइव्ह पाहण्याचे भाग्य मिळाले!!
नंतर आता जसे मीम्स येतात तशी ती एक कविता गाजली होती, मला बाकी काही आठवत नाही " ...पण लक्षात ठेवा, प्रुडेन्शियल आहे आमच्याकडे" एवढा तो शेवटचा पंच आठवतो Happy

फा - मस्त लिहीलंयस. ८३ च्या वर्ल्डकप च्या अनुशंगानं दिलेले बाकीचे रेफरन्सेस - भारतातली पहिली डे-अँड-नाईट मॅच वगैरे - तसे कमी प्रकाशझोतात आलेले असल्यामुळे, त्यांच्याविषयी वाचताना ते जास्त रोचक वाटले. 'माहिती आणि नभोवाणी मंत्री - विठ्ठलराव गाडगीळ' तर एकदम नॉस्टॅल्जिक!

बाकी त्या काळातल्या स्टार मोमेंट्सपैकी शारजातली (नाही.. जावेद - चेतन शर्मावालीनाही) इंडिया-पाकिस्तान ची एक भारताने जिंकलेली लो स्कोअरिंग मॅच , चेतन शर्मा ची १९८७ वर्ल्डकपमधली न्यूझिलंड विरूद्धची हॅट्रिक, शास्त्रीची ऑडी (अत्यंत कॅल्क्युलेटेड खेळून मिळवलेली), एका वन-डे मधे श्रीकांतने काढलेल्या ५ विकेट्स अशा काही आठवणी तुझा लेख वाचून ताज्या झाल्या.

>>तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे...<<
हे वाचुन किंकर्तव्यविमुढ का काय म्हणतात तसा झालेलो आहे. अहो, तिसरा वर्ल्ड कप होता तो. असो...

फायनल पाहिलेली आठवतेय, अंधुकशी. पण लक्षात आहेत ते संदिप पाटिलने विलिसला मारलेले टपाटप फटके... Happy

फारएण्ड, उत्तम लेख. तेव्हाचा सगळा माहौल फारच चांगला उभा केला आहे... नॉस्टॅल्जिया बरा असतो तब्बेतीला Happy

मी त्यानंतर बऱ्याच वर्षांनी जन्मल्यामुळे यातल्या बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. अर्थात ते गावामध्ये लाइट्स‌ गेल्यावर स्कोअर कळेपर्यंतची तगमग, रेडिओवरची कॉमेंट्री मात्र माझ्याही आठवणींचा भाग आहे..‌ (१९९८ ला ढाक्यामध्ये इंडिपेंडन्स कपची फायनल होती पाकिस्तानविरुद्ध..! गांगुलीची सेंच्युरी आणि हृषीकेश कानिटकरची शेवटची विजयी बाउंडरी ! तिथून आम्हाला जरा क्रिकेटची गोडी लागली)

फार छान लिहीलेत फारएण्ड.... एकदम आवडले.

या मॅचच्या वेळी मी लहान (४ थी मध्ये) होतो. त्यावेळी कोल्हापुरला रेडीओवर ही मॅच ऐकत होतो. बरोबर शेजारचे ही बरेच जण होते व वडीलांचे मित्र होते. १८३ स्कोर झाल्यावर मी एकटा म्हणत होतो की आपण जिंकणार पण बाकी सर्वांनी आशा सोडली होती. (मला ही फार काही कळत नव्हते त्यावेळी.. मी असचं म्हणत होतो). नंतर मॅच जिंकल्यावर तर माझी मिनी मिरवणूक काढली लोकांनी. त्यांना वाटले की माझ्या बोलण्यात काहीतरी लक फॅक्टर आहे. नंतर काही दिवस आजूबाजूची लोकं घरी येऊन माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे काहीबाही बोलवून घ्यायची.

त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम विभाग वि. वेस्ट इंडीज अशी तीन दिवसांची मॅच कोल्हापुरला झाली. माझ्या आयुष्यातली ही एकमेव क्रिकेट मॅच जी मी मैदानावर पाहिली. त्याच्या बर्‍याच आठवणी अजूनही आहेत. आख्खी वेस्ट इंडीज टीम व त्यांचा खेळ जवळून पाहिला होता. गॉर्डन ग्रिनिज व डेसमंड हेन्स हे अही-मही सारखे ओपनर, रिची रिचर्डसन, गोम्स, रॉबर्टस, लोगी आणि रिचर्डस वगैरे. रिचर्डसने फार काही खेळी केली नव्हती पण तो मैदानात आहे यानेच धडकी भरत होती. आपल्या खेळाडूंपैकी गुलाम परकार हा फार आवडला होता. तसेच राजू कुलकर्णी, रेंडाल डॅनियल, बलबिंदर संधू यांनीही छान खेळी केली होती. दुसर्‍यांदा बॅटींग करताना रिची रिचर्डसनने कॉमेडी सारखे काही प्रकार करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

या मॅचची आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी आमच्या बाबांकडे मॅचचे पासेस होते. त्यामुळे बरेचसे नातेवाईक एकदम जवळचे झाले होते. अशीच कोणीतरी (त्यावेळी तरूण असणारी) आईची कोणती तरी बहीण आमच्याकडे मॅचच्या निमित्ताने आली होती. आज जवळ जवळ ३८ वर्षे झाली पण मावशी मला नंतर कुठेच समारंभात वगैरे भेटली नाही.

कोल्हापुरच्या मॅच चा स्कोअर कार्ड..
https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-india-1983-84-61...

मस्त लेख !!

तो कसोटीत अनेकदा नाइट वॉचमन म्हणून येत असे (आणि त्याला ती संधी आपले लोक अनेकदा तत्परतेने देत), त्यामुळे कप्तान हे जसे पद असते तसे नाइट वॉचमन हे किरमाणीचे पद आहे असेच तेव्हा वाटे. >>>> Happy Happy मस्त लिहिलं आहे !!! छान लेखन शैली !! असेच लिहीत रहा !

रॉजर बिन्नी बद्दल थोडे अजून लिहायला हवं होते - त्याची पण गोलंदाजी ची action , runup खूप छान होता , स्विंग पण छान करायचा तो
विशेषतः इंग्लंड मध्ये खूप एफ्फेक्टिव्ह होता

वर्ल्ड कप नंतर आपली ODI संघ खूप फॉर्म मध्ये होता नंतर रॉथमन्स कप जिंकला होता आणि कसोटीत मात्र वेस्ट इंडिज ने भारतात येऊन चांगलेच हरवले होते , तेंव्हाच्या ओन्ली विमल जाहिराती music सकट आठवतात !!

धन्यवाद सर्वांना! काल हा पिक्चरही पाहिला. मस्त आहे. फुल रेको माझ्याकडून.

अशा खूप बातम्या मार्केटमधे असायच्या. >>> शां मा - हे परफेक्ट आहे Happy अशा बर्‍याच गोष्टी आठवल्या लहानपणी ऐकलेल्या. आमच्यापेक्षा वयाने (व तब्येतीने) मोठे असलेले लोक साहजिकच क्रिकेट भारी खेळायचे आमच्याविरूद्ध. त्यामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू भारी वाटायचे ते बरेचसे धिप्पाड असल्याने - त्यांचे कौशल्य त्यापेक्षा भारी होते हे नंतर समजू लागले. खरे म्हणजे मार्शल इतका धिप्पाड वगैरेही नव्हता. पण त्याने १९८३ च्या नंतरच्या सिरीज मधे भरवलेली धडकी लक्षात आहे.

योगी९०० - धन्यवाद त्या लिन्कबद्दल. आधी पाहिली नव्हती. जबरी अनुभव असेल ही मॅच म्हणजे.

रॉजर बिन्नी (आणि मदनलालही) इंग्लंडमधे व जेथे बोलिंगला सपोर्ट आहे तेथे जबरी इफेक्टिव्ह असत हे खरे आहे. मला बिन्नीसंदर्भात त्यावेळचे (म्हणजे त्या कप मधले) फार लक्षात नाही. १९८३ च्या नंतरच्या त्या टेस्ट सिरीज मधली ओन्ली विमलची जाहिरात आठवते. ती फक्त ड्रिन्क्स च्या वेळेत दाखवत असे काहीतरी लक्षात आहे. दर ओव्हरनंतर जाहिरात नसे. या सिरीज वे वर्णन गावसकरबद्दलच्या लेखात मी लिहीले आहे आणि ती लिन्कही आहे वरती.

१९९८ ला ढाक्यामध्ये इंडिपेंडन्स कपची फायनल होती पाकिस्तानविरुद्ध. >>> हो ती तर जबरी होती. त्यावेळेस मला ऐन शेवटच्या २-३ ओव्हर्स बाकी असताना बाहेर जायचे होते. त्यावेळेस गाडीने जाताना सारखे आजूबाजूला काही माहिती मिळते का बघत होतो. शेवटी एका ठिकाणी फटाके वाजवताना पब्लिक दिसले तेव्हा लक्षात आले.

हे वाचुन किंकर्तव्यविमुढ का काय म्हणतात तसा झालेलो आहे. अहो, तिसरा वर्ल्ड कप होता तो. असो... >>> हे तेव्हाच्या शाळकरी पोरांच्या माहितीनुसार लिहीलेले आहे, तेव्हा त्या दृष्टिकोनातून वाचा. तेव्हा जी जनरल मोघम माहिती होती त्याचे वर्णन आहे.

भाऊ - तुम्हाला तर अजून बरीच माहिती व आठवणी असतील. लिहा जमल्यास.

सर्वांचे आभार पुन्हा एकदा.

रॉजर बिन्नी बरेचदा महत्वाच्या विकेट्स काढायचा. त्याने ३ विकेट्स घेतलेल्या बर्‍याच मॅचेस पाहिल्या आहेत. अनेकदा १८/३ असे त्याचे विश्लेषण असायचे. नंतर तो जखमी होऊन मॅच सोडून परतायचा. त्याला कसलेतरी दुखणे होते. मोहिंदर अमरनाथ वर मात्र आमच्या पिढीने अन्याय केला. खरे तर आम्हाला मोहिंदरचं मह्त्व समजलेच नाही. हिरोगिरी आवडायच्या वयात के श्रीकांत, कपिलदेव आणि तळाला येऊन बॅट फिरवणारे शेपटाचे फलंदाज आवडायचे. खूप वर्षांनी अमरनाथचे महत्व समजले. दिलीप वेंगसरकर मात्र वर्ल्डकप नंतर लगेच झालेल्या भारतातल्या मालिकेमुळे आवडायला लागला. त्या मालिकेत त्याने भरपूर धावा केल्या. शतके काढली. सुनील गावसकर आउट झाल्यावरही त्याने भारताच्या डावाला आकार दिला. कपिलदेवला त्यानेच साथ दिली. पण बाकीच्यांनी नांगी टाकल्याने ती मालिका आपण हरलो.
कपिलने ८३ धावात ९ विकेट्स घेऊनही फलंदाजांनी हाराकिरी केल्याने एक मॅच हरल्याचे आठवते.

हे अवांतर आहे पण आठवणी असल्याने नमूद करतो. कपिलच्या त्या ८३ मधे घेतलेल्या ९ विकेट्स या लाईव्ह पाहिल्याने कायमच्या लक्षात राहिल्या. पण त्यानंतर अनेक वर्षांनी आलेल्या पिढीने कपिलने वेस्ट इंडीजच्या विरूद्ध कधीही ९ विकेट्स घेतलेल्या नाहीत. आठ विकेट्स म्हणायचेय का इथपासून ते टर उडवण्यापर्यंत प्रतिक्रिया दिल्या होत्या. लोक असे का करत असतात हे समजले नव्हते. पण गुगलल्यावर कपिलच्या आठच विकेट्स दिसतात हे लक्षात आले. याउलट ऑस्ट्रेलिया विरूद्ध कपिलने आठ विकेट्स घेतल्याच लक्षात होते. पण तिथे गुगलवर नऊ विकेट्स दर्शवतात. काही तरी गोंधळ आहे. जिथे जिथे संपर्क साधणे शक्य होते तिथे याबद्दल ईमेल्स पाठवले होते. त्यानंतर अहमदाबादच्या दुसर्‍या मॅचच्या ९ विकेट्सचे अपडेट काही ठिकाणी पहायला मिळाले. गुगळल्यावर जी माहिती येते ती अचूकच असते या विश्वासामुळे लोक टर उडवायला कमी करत नाहीत.
https://www.cricketcountry.com/articles/west-indies-rattle-india-at-ahme...

लल्लनटॉपनेही काही दिवसांपूर्वी त्यावर व्हिडीओ बनवला होता.
https://www.youtube.com/watch?v=O-IAyqYLpw8

*मोहिंदर अमरनाथ वर मात्र आमच्या पिढीने अन्याय केला* - सुरवातीला आंखूड टप्पयाच्या गोलंदाजीचा ' बकरा' समजला जाणारा हा अत्यंत गुणी खेळाडू स्वतच्या जिद्दीने तशी गोलंदाजी , विशेषतः हूक शाॅट, खेळणारा जागतिक स्तरावरचा एक अप्रतिम फलंदाज झाला होता.

मस्तच लिहिलय ,

तेव्हा सोलापुरला T V नव्हता , फायनल बघायला गुलबर्ग्याला गेलो होतो. त्या दिवशी गुलबर्ग्यातील घराघरात मुक्त प्रवेश होता बाहेरील लोकाना.
सर्वबाद १८३ नन्तर जेवायला कामत ला गेलो , तर वेटरने सान्गीतले ३ विकेट गेल्य्यात , परत येउन बसलो व तो थरारक क्षण अनुभवला , आजही सगळे जसेच्या तसे आठवते.

झिम्बाब्वे सामन्याच्या वेळी Commentator चे शब्द आठवतात , बहुधा टोनी कोझीअर असावा , India 17 for 5 , Duncans Fletcher the happiest man in the world standing in the slip. काही दिवसानी कपील १७५ काढुन ड्रेसी.ग रुममध्ये जातानाचा फोटो पेपर मध्ये बघितला त्यावेळी त्या comment ची आठवण झाली कारण मागुन थकलेला फ्लेचर निराश दिसत होता.

१९८३ मधे मी ४० वर्षाचा होतो नि भारत सोडून १३ वर्षे झाली होती, तोपर्यंत इन्टरनेट वगैरे काही नव्हते, त्यामुळे भारतातील कुठलीहि बातमी समजत नसे. त्यामुळे हे सर्व मला काहीहि माहित नव्हते.
पण बहुधा त्याच वर्षी भारताची टीम एलिझाबेथ, न्यू जर्सीला आली होती. सामना दहा वाजता सुरु होणार होता. सकाळी दहाच्या आधी आम्ही जाऊन बसलो. गर्दी नव्हतीच. जेमतेम दहा बारा भारतीय. सुनील गावास्करचा पाय मोडला होता म्हणून तो व्हीलचेअरवर होता, पण एकटाच. माझ्या सासर्यांनी कुठून तरी गावास्करची ओळख काढली.
आम्ही त्याला विचारले, बाकीचे लोक कुठे आहेत. तर तो म्हणाला काल रात्री न्यू यॉर्कला गेले आहेत. सगळेजण पिऊन तर्र्र असणार, १२ वाजेपर्यंत आले तरी नशीब!

मग एकदाचे सगळे आले - त्यांच्या खेळात काहीहि जाणवले नाही की व्वा, ग्रेट!
भारतीय संघ हरला. दोन्ही संघात अमेरिकेतले भारतीय, वेस्ट इंडिजचे बरेच खेळाडू होते.
मध्यंतरी एक दोनदा इंग्लंडला जाणे झाले होते, तेंव्हा कुणितरी सांगितले, गावास्कर एकदम टॉप फलंदाज आहे. आणि त्याच्याबद्दलचे एक पुस्तक मला त्यांनी भेट दिले होते. मी त्या पुस्तकावर लगेच गावास्करची सही घेऊन टाकली, नंतर बाकीच्यांच्याहि सह्या घेतल्या. आता ते सर्व कुठे गेले कुणास ठाऊक.

पुढे २००५ नंतर हळू हळू भारतीय क्रिकेटच्या, सिनेमांच्या बातम्या कळायला लागल्या. तेंडूलकर, द्रविड ही नावे कळली. आता यू ट्यूबवर हाय्लाइट्स बघतो, पंत अय्यर वगैरे.

१९८३ मधे मी ४० वर्षाचा होतो
>>>
भारी.. आपल्या नावातील ४३ जन्मसाल आहे तर Happy
या संदर्भातील आठवणीही आपल्या वेगळ्याच आहेत.
बाकी पंत माझाही सध्याचा सर्वात आवडीचा खेळाडू. त्याच्या ईनिंग चुकवू नका. भले त्याला अजून धोनीसारखे प्रेशर हाताळता येत नाही. पण समोरच्यावर टाकता येते. आणि तो देखील येत्या काळात भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणार हे नक्की Happy

आता नेटफ्लिक्सवर ८३ बघत होतो. कपिलची १७५ विश्वविक्रमी खेळी पाहिली आणि नेट गेले. दुर्दैवाने ती खेळी आपण कधी बघू शकत नाही. पण या सिनेमाने तो रोमांच दाखवला. आमच्या लहानपणी कोणीही १८०+ खेळी केली तरीही सारे हेच म्हणायचे की तरीही सर्वात बेस्ट खेळी कपिलचीच.. आणि आज पिक्चर बघताना ते जाणवतेही की आजच्या तारखेला भले आठदहा द्विशतक का झाले असेना. आजवरची सर्वात बेस्ट वन डे खेळी कपिलचीच Happy
९-४… १७-५… ७७-६… १४० ला ८ वगैरे आकडेही लक्षात राहिलेत.. सिंपली अमेझिंग
आणि ईंटरेस्टींग गोष्ट.. पुन्हा आज मॅच बघताना जाणवली.. ब्रेकनंतर कपिल धुलाई करायला मंगूस बॅट घेऊन आलेला .. म्हणजे काय जबरदस्त ठरवून आलेला बघा.. लेकीने कालच हा पिक्चर पाहिला. तरी आज पुन्हा आमच्यासोबत बघायला बसलेली.. आणि तिलाही ही खेळी बघताना मजा आली.. आधीपासूनच बोलत होती आता तो तलवार काढणार.. म्हणजे तीच बॅट

अप्रतिम लेख.

८३ थियेटर मध्ये बघायचा होता पण राहून गेला. टीव्ही वर बघताना मजा आली पण मोठया स्क्रिन चा फील गेल्यामुळे हळहळ वाटली.
नवरा आणि सासरे खूप excite झाले होते. तेव्हा मॅच बघताना घरी कलर टीव्ही असल्यामुळे कॉलनीमधील मित्र आले होते. तेव्हा गोल्डस्पॉट च्या बॉटल्स आणलेल्या म्हणून परवा मॅच बघताना स्लाइस आणि स्प्रआईट घरी आणण्यात आले. पूर्ण माहोल क्रिएट करून फायनल बघण्यात आली.

कपिलची १७५ विश्वविक्रमी खेळी पाहिली आणि नेट गेले. दुर्दैवाने ती खेळी आपण कधी बघू शकत नाही. पण या सिनेमाने तो रोमांच दाखवला.>> खरच .

Pages