कवितेचं रान

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 December, 2021 - 07:05

आलं भराला भराला असं कवितेचं रान
कणसा कणसात भरलं सब्दाचं गं दाणं

सबूददाणा भरघोस असा भरला भरला
कागूद रानाचा लिवाया नाही पुरला पुरला

माझ्या अडाणी ववीचा हाय बाणा रांगडा
कव्हा मिरच्याचा तोडा, कव्हा रस ऊसाचा गोडा

तिचं रापल्यालं त्वांड पण मन हिरवंगार
पाटाच्या गं पाण्याला ओली मायेची धार

बोरीबाभळीचं काटं तिच्या पुजलं पाचवीला
दैवगतीचं फेरं नाही चुकलं गं रामाला

पानाफुलांनी सजला देह तिचा झिजलेला
हिरव्या बोलीचा सबूद रानोमाळ गुंजलेला

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ओव्या मीटरमध्ये बसत नाहीयेत. पण तुमच्या कल्पना आणि शब्द इतके सुंदर आहेत, की मीटरकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही.

@ हरचंद पालव
खूप धन्यवाद...
मी तसा कच्चाच आहे मीटर बाबत...
प्रयत्न असतो तसाच पण कुठे, कुठे नाही जमत.

छान!