ती

Submitted by सामो on 26 December, 2021 - 05:19

She was a troubled soul. तिच्या आठवणींचं कोलाज मनात रेखाटू लागते आणि वळवाच पाऊस भरुन येतो. ढग, वीजा, कुंद हवा, वावटळ आणि एक चिमटीत न पकडता येणारं, गदगदुन आलेला मूड. पण पाऊस काही केल्या पडत नाही. तिच म्हणायची "असं आभाळ दाटून आलं की तुला गलबलल्यासारखं होतं का गं?" आणि न कळणा र्‍या त्या वयात मी म्हणत असे "नाही. असं काही होत नाही मला." मला कुठे माहीत असायचं तो र्हेटॉरिक प्रश्न असायचा. 'आईच्या नसलेपणातून आलेला' ..... त्यामुळे आपल्या लहानग्या मुलीलाच विचारला गेलेला र्‍हेटॉरिक प्रश्नं. पावसाळी हवेत कासाविस होत असे ती, डोळे विनाकारण ओलावायचे. तिच्या आईची आठवण येत असेल का तिला? ते काहीही असो. खंत ही आहे की I was inadequate to understand depth of her feelings then. चला तेव्हा तर मी लहान होते पण ते समजून घेण्याचे अपुरेपण जेव्हा आयुष्यभर राहते तेव्हा खरच मनास लागते. तिला समजून घेण्यात आलेलं अपुरेपण. Why would she bare her soul ? मी तिची मुलगी होते म्हणुन? खरच एक नातं पुरे असतं का आपलं मन दुसर्‍यापुढे नग्न करायला? समुद्रात एकत्र वहात आलेले ओंडके असतो आपण. बाय हॅपनचान्स , निव्वळ योगायोगाने जवळ आलेले. तितकं पुरेसं असतं का कोणाला आपले confide बनवायला? त्या व्यक्तीची लायकी नको, अधिभौतिक पात्रता नको समजून घेण्याची? आणि तिला समजून घेण्याची माझी पात्रता नव्हती-नाहीये.

आता आयुष्याचे, अर्धशतक पूर्ण करतिला, तिला,समजून घेण्याची क्षमता माझ्यात आली असावी - किंचीत का होइना. निदान वैचारीक प्रतलावर! ती खूप वेगळी होती. आपण पहातो काही लोक कानाला इयरफोन्स लावुन आपल्याच धुंदीत गर्दीत, नाचत असतात, थिरकत असतात. आपल्याला विचित्र वाटते नाही? का? तर आपल्याला ते जे संगीत ऐकत असतत त्याचा मागमूसही , इवलासा आवाजही आपल्याला ऐकू येत नसतो. म्हणुन ते वेडे असतात का ? नाही. तशी होती ती. वेगळीच ट्युन ऐकण्यात रमलेली. अगदी जगावेगळी ट्युन. मला नाही समजली ती ट्युन कधी. आणि आपल्याला ती कळत नाही हे सुद्धा मला कळले नाही , हे दुर्दैव.

करवंदी जांभळा रेशमी पोत होता तिच्या मनाला. वरुण ग्रहाचे गूढ, वलय. अगदी पाण्यात पडलेल्या निळ्या दिव्याच्या प्रतिबिंबासारखे झिग-झॅग झिग-झॅग. आम्ही प्रवासाला निघालेलो असताना, आम्ही सगळे, ऑन टॉप ऑफ वल्ड असताना तिच्या मात्र डोळ्यात खळकन पाणी यायचे का तर रेल्वे फलटावरती गरीब भिकार्‍याचे लहानसे पोर दिसले. पण इतरांचा मूड बिघडायचा त्याचे काय? माणसाने संवेदनशील असावे, हळवे असावे पण नकारात्मक हळवे असू नये, निष्क्रिय, नपुंसक हळवे असू नये. हे माझे मीच ठरवलेले असायचे. आणि मग मला तिचा राग-राग यायचा. अविचारी राग.

किती इन्टेन्स आणि किती किती वैयक्तिक नातं असतं नाही आपलं आपल्या आईबरोबर. ती गेल्यानंतर, तिच्या किती किती आठवणी दाटून येतात. खूप उदास वाटतं. वाटतं होती तेव्हाच का नाही तिला विचारलं - तिचं आवडतं गाणं कोणतं, तिची सर्वात आणि, प्रिय अशी लहानपणीची आठवण कोणती? तिचं मनाच्या तळघरात कोंडलेलं दु:ख कोणतं? सांगीतलं असतं का तिनी? मानी स्वभाव होता तिचा. अंहं दु:ख नक्कीच नसतं सांगीतलं. माझ्या आठवणीत आता येते ती ९ वर्षाची चिमुरडी बनून. मला मीठी मारते. हं ९!!! बरोबर! सिग्निफिकन्स आहे तिच्या आयुष्यात, या वयाचा. काही का असेना. निद्रा-जागृतीच्या सीमारेषेवरती आम्ही भेटू तर शकतो. खूप लाड करते मी तिचे. लहानगीचे. ९ वर्षिय बालिकेचे. तिला हृदयाशी लावते, तिच्या वेण्या घालते. दोन लाल लाल रिबीनी बांधून, गळ्यात लाल मण्यांची दूड घालून. तरतरीत, किती सुंदर दिसते ती. मी लायक असो वा नालायक. ती माझी होती. मी तिची. काहीकाळापुरता का होइना, मी तिला अतोनात आनंद दिला, बाळलीलांनी तिचे मन रिझवले. माझ्या दुबळ्या झोळीची क्षमताच तेवढीच होती-आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती जीवघेणं लिहीतेस गं.>> +१
आई ग्गं, मनाचा तळ ढवळला गेला हे वाचून.
शेवटचा परिच्छेद या सगळ्या तगमगीवर हळूवार फुंकर .

खरंच.. वरच्या सर्व प्रतिसादांना अनुमोदन.. मी दोनदा वाचले..

खरंच.. वरच्या सर्व प्रतिसादांना अनुमोदन.. >>+११ तुला एक घट्ट मिठी

हृदयस्पर्शी !!!
करवंदी जांभळा रेशमी पोत होता तिच्या मनाला. वरुण ग्रहाचे गूढ, वलय. अगदी पाण्यात पडलेल्या निळ्या दिव्याच्या प्रतिबिंबासारखे >>> अप्रतिम वाक्यांची पेरणी झालीय. अगदी सहज.

हा लेख माझ्या मर्मबंधातील ठेव आहे/राहील. काल म्हणजे ३१ डिसेंबरला, ११ वाजून ११ मिनिटांनी माझे लक्ष घड्याळाकडे गेले व आज सकाळीही ११ वाजून ११ मिनिटांनी.
एंजल नंबर्स वरती विश्वास असल्यामुळे, माझ्याकरता ही अनुभूती आहे. It is a confirmation that the article was appreciated by a wider audiance - in heaven

नि:शब्द झालोय.
काय लिहावं याचा थांग लागत नाहीये.
पण ही अशी अवस्था होणं हीच प्रतिक्रिया खरंतर पूर्ण भावना व्यक्त करण्यासाठी पुरेशी आहे.

Pages