या आधीचे भाग :
१ : https://www.maayboli.com/node/79841
२ : https://www.maayboli.com/node/79865
३ : https://www.maayboli.com/node/79885
४ : https://www.maayboli.com/node/80640
५ : https://www.maayboli.com/node/80642
६ : https://www.maayboli.com/node/80653
७ : https://www.maayboli.com/node/80691
८ : https://www.maayboli.com/node/80701
समथिंग इज डिफ्रंट टूडे.. हे शांत रस्ते. झोपलेलं जग. वेगळ्याच वळणावर उभं असलेलं मन. आणि सोबत चालणारा हा वेडा माणूस. अनुराग.
गाडी तशीच पार्किंग मध्ये ठेऊन त्याने माझी स्कूटी बाहेर काढली. ‘किती दिवस झाले!’ म्हणत लहान मुलाच्या उत्साहात ती चालवायला घेतली. मी मागे बसून पाहतेय त्याचा वेडेपणा. मग मोकळ्या रस्त्यांवरून ती भरधाव चालवण्यापासून, हे बघ इथे आम्ही पोरींवर लाइन मारत थांबायचो, या इथे माझं पहिलं हॉस्टेल होतं, नंतर इथे-इथे मी पीजी म्हणून शिफ्ट झालो, या इथे आम्ही प्रचंड राडा केला होता, इथली भेळ, तिथली कॉफी, मिसळीची घरं तर गल्लोगल्ली. हे अमुक-अमुकचं घर.. कितीवेळ भटकलो काय माहित. शहर पालथं घातलं. त्याच्या सगळ्या आठवणींवरून त्याने हात फिरवला, मला सोबत घेऊन. स्वत:च्या जुन्या अस्तित्वाची ओळख करून दिली. अगदी मनापासून. अगदी पहिल्या गर्लफ्रेंडला कुठे प्रपोज केलं हेही दाखवायचं सोडलं नाही पठ्ठ्याने. आणि तो प्रेमाचा पहिला-वहिला किस्सा सांगत पुढे त्याने थेट त्याच्या कॉलेज कॅम्पसकडेच मोर्चा वळवला. मग स्कूटी बाजूला लाऊन नुसतेच चालत राहिलो खूप वेळ.
तो आता शांत झाला होता. मी तर शांतच होते कधीपासून. त्याला ऐकत होते नुसती. बोलायचं ठरवलं होतं खरंतर. पण आत्ता इथे त्या कशाचीच आवश्यकता वाटत नव्हती. मन आपोआप शांत होत होतं. प्रश्न न विचारताच त्यांची उत्तरं मिळाल्यासारखं वागत होतं. कसं असतं ना.. एखाद्याचं आपल्यासोबत असणं, त्या असण्याचे अर्थ, खर्या-खुर्या भावना हे सगळं आपोआप converse होत असतं. भाषेची गरज नसते अशा primitive संवादासाठी. यालाच vibe म्हणतात बहुतेक..
‘मग काय चालूये मनात?’ झाडाखाली माझ्या शेजारी बसत त्याने विचारलं.
मी हसून पाहिलं फक्त.
‘काहीच नाही अॅक्चुअली. उलट खूप शांत वाटतंय बर्याच दिवसांनी.’
‘हाहा.. माझ्यासोबत रहा गं तू फक्त.. अशीच जादू होत राहील..’
‘हो का? संत अनुराग.. हाहा’
‘हे काय संत-बिंत?’
‘ते हम्पीमध्ये आम्ही ठेवलेलं नाव आहे तुझं..’
‘हाहा.. अरे बापरे.. संतच बनवून टाकलंय तुम्ही मला..’
‘मग वागतोस की तसाच.. शांत.. समंजस.. क्लेवर..’
‘ओहह.. इज इट!’
‘हो ना मला कधी कधी नवल वाटतं इतका कसा तू गुणी. तुझ्याएवढे patience आणि calmness नाही बुवा माझ्यात.’
यावर माझ्याकडे हसून पाहत तो म्हणाला,
‘असंच काही नाही गं.. मीही होतो की impatient, अधीर कधी-कधी. पण इतक्या वर्षात मनाला लागलेलं वळण आडवं येतं आणि थिंक बिफोर यू अॅक्ट/react असं ओरडून सांगतं. मग काय थिंकिंग हा तर आपला एक्का आहे. ते बरोब्बर जमतं. आणि त्यामुळे वाटत असेन इतरांना बॅलेन्स्ड वगैरे. बाकी मी चार-चौघांसारखाच..नॉर्मल’
मी त्याच्याकडे पाहत राहिले.
‘अनुराग एक विचारू?’
‘परवानगी?? विचार की..’
मी जराशी घुटमळले.
त्याने मग त्याची आश्वस्त नजर माझ्यावर पांघरली. मी विचारलं,
‘काय वाटतं तुला, आपलं निभेल एकमेकांबरोबर नीट?’
‘हम्म.. ते अनुभवल्याशिवाय कसं कळेल. हो पण, आत्तापर्यन्तच्या आपल्या भेटींवरून आणि ओळखीवरून तर खूप ग्रेट गट्टी जमेल असं वाटतंय. मला comfortable वाटतं तुझ्यासोबत. हलकं. आता आपल्या पहिल्या जीएफ चा किस्सा कोण जिच्याशी आपलं लग्न ठरू पाहतंय तिला सांगत बेसल. पण मी सांगितला. कारण तू ते otherwise घेणार नाहीस याची कुठेतरी वाटणारी खात्री. आणि खरं सांगू, हे असं वाटण स्पेशल आहे. खूप कमी लोकांसोबत असं फीलिंग येतं. आणि जर का त्या समोरच्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल असंच वाटत असेल ना तर तर मग तो दुग्धशर्करा योगच. अशा माणसांनी स्वत:ला प्रचंड नशीबवान समजावं. ही नाती फारशी सहजा-सहजी कोणाला गवसत नाहीत गं..’
किती खरं बोलत होता तो. मी ऐकत राहिले. आणि मग विचारातही पडले.
‘..मग सांग, मी समजू का स्वत:ला असा नशीबवान?’
त्याच्या प्रश्नाने मी विचारांमधून बाहेर आले. तो काय विचरतोय ते मला अर्थात उमगलं. आणि चेहर्यावर नकळत हसूही उमलून आलं.
‘तेही समजलं असेलच की तुला..’
‘नाही बुवा. काही गोष्टी ऐकण्यात मजा असते. समजण्यात नाही.’
यावर काहीच न बोलता मी नजर खाली वळवली. चेहरा अगदी निर्मळ आनंदात न्हावून निघत होता.
‘ओह माय गॉड... लाजतेयस तू?’
‘ह्या.. काहीही काय.. छे. ते तसलं गर्ली वागणं जमत नाही मला..’
‘हाहा.. साफ खोटं. इतकं सुंदर लाजलीस आत्ता. हे असले रुक्ष शब्द पेरु नकोस त्यावर.. मॅच होत नाहीत!’
दोघांची मग नजरा-नजर झाली. आणि शेवटी डोळ्यांनी सांगूनच टाकलं सगळं. सोहळा वाटावा इतका सुंदर क्षण तो. दोघं पाहत राहिलो नुसते एकमेकांकडे.
थोड्यावेळाने पुन्हा वास्तवात येत मी म्हटलं,
‘हे सगळं ठीक आहे. पण मी आपलं आपल्या करीयर्सच्या दृष्टीने निभेल का असं विचारतेय. उद्या रिजल्ट पॉजिटिव आला तर? मला पुन्हा काही महीने जावं लागेल.’
‘ओह दॅट विल बी ए ग्रेट थिंग.. जा की मग. जायलाच हवंस. त्यात काय एवढं!’
‘अरे पुन्हा लग्न लांबणीवर पडेल. तुला अजून वाट पहावी लागेल.. घरचे सगळे..’
‘अरे! याचं टेंशन घेतलंयस तू? वेडे.. या सगळ्याचा मी विचार केला नसेल असं वाटतं तुला?
हे सगळं महितीय मला. आणि माझी वाट पाहण्याची पूर्ण तयारी आहे. अगदी आनंदाने. उलट यावेळी तू तुझं स्वप्न पूर्ण करावस असं मनोमन वाटतं मला.’
हे म्हणजे मनावरचं ओझं मणाने विनासायास कमी व्हावं तसं झालं अगदी. मी पाहत राहिले केवळ त्याच्याकडे. पण मग भानावर येत पुढचा महत्वाचा आणि प्रॅक्टिकल विचार बोलून दाखवला.
‘आणि पण पुढे? समज झालं माझं selection. तर? पोस्टिंग देशभरात कुठेही मिळू शकते. शिवाय त्याआधी जवळपास वर्षभराचं ट्रेनिंग. मग तेव्हा कसं करणार आपण?’
‘हाहा.. मला सोडून राहण्याचा विचार सहन होत नाहीये की काय तुला?’
‘गप रे. चेष्टा नको करूस. मी seriously विचारतेय.’
यावर मग जरासा गंभीर होत तो म्हणाला,
‘तुला भेटल्यावर या सार्याची कल्पना मनाने केलीच होती. अवघड वाटलं होतं पण अशक्य नाहीये. करूया manage. आणि असंही conventional गोष्टी मला फारशा आवडतही नाहीत. थोडी हटके होईल आपली गोष्ट इतकंच. पण बघ त्यातपण मजाय की. नव्याची नवलाई संपल्यावर रोज उठून एकमेकांशी भांडल्यापेक्षा हे आयुष्य नक्कीच सुंदर असेल. स्पेस जपायची आपापली. थोडं दूर राहून. थोडं जवळ राहून. होईल गं manage सगळं.. इतका नकोस विचार करू. आत्तापासून.’
त्याच्या बोलण्याने जरासं आश्वस्त वाटलं खरं पण मनात अजून धाक-धुक होतीच. खरंतर माझ्या मनातलंच बोलला तो सगळं. मनातल्या मनात आनंदत बसून राहिले मग नुसती. काहीवेळाने मग स्वत:चा हात माझ्यापुढे करत तोच म्हणाला,
‘सो देन.. मे आय?’
मला क्षणभर कळलं नाही. पण मग कळलं तेव्हा शहारलेच. पण तसं काहीही न दाखवता उठून उभी राहत म्हणाले,
‘पेहले घरवालोंसे तो मिलवाइये.. फिर सोचेंगे..’ आणि हसत चालायला लागले.
‘ओहह..’
असं काहीतरी म्हणत मागून येऊन मला गाठत हळूच कानांशी ‘जरूर!’ म्हणाला तेव्हा मात्र मी खरी-खुरी लाजले.. त्याच्यादेखत!
सांज
www.chaafa.com
छान !
छान !
चांगली चाललीय कथा.
चांगली चाललीय कथा.
पुढील भागाच्या प्रतिक्शेत...
पुढील भागाच्या प्रतिक्शेत...
मस्तमस्तमस्त
मस्तमस्तमस्त
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
ह्या शिर्षकामुळे गोष्ट वाचली.
ह्या शिर्षकामुळे गोष्ट वाचली. कारण हे गाणं माझं अतिप्रचंड आवडतं गाणं आहे. मग सगळेच भाग वाचले. मस्त आहेत.