दिगंत २.१ : पाऊस कधीचा पडतो..

Submitted by सांज on 28 August, 2021 - 04:30

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने..’

आहाहा.. ग्रेस!! किती दिवसांनी ओठात ओळी आल्या आज. बाहेरचा पाऊसही तसाच आहे म्हणा. ही दुपार, हा पाऊस.. वेरी मच nostalgic! पण आजकाल केवळ nostalgia का उरलाय कळत नाही. पूर्वी म्हणजे अगदी आत्ता-आत्ता पर्यन्त गोष्टी कशा ‘फील’ व्हायच्या. पाऊस असो, कविता असो, पुस्तकं असो, गाणी असो.. गेलाबाजर वर्तमानपत्र सुद्धा. मजा यायची वाचताना. काही पुरवण्यांसाठी तर डोळ्यांत प्राण आणून वाट पाहिलेली आठवतेय. एखादी मनाजोगती कविता, अगदी अवचित कानांवर पडलेलं आवडीचं गाणं, जमून आलेला पेपरातला एखादा लेख, खूप हवं असलेलं पुस्तक बर्‍याच दिवसांनी मिळणं, एखादा सकस चित्रपट पाहणं.. या साध्या-साध्या गोष्टींनीही दिवस स्वर्गीय आनंदात जायचा.

आता अचानक कुठे गेल्या त्या सार्‍या गोष्टी? पडणार्‍या पावसात आता चिखलच तेवढा दिसतो. पेपर दिवस-दिवस टेबलवर पडून असतो. माहीत असतं, चांगला मजकूर आहे आज, वाचायचंय, पण ती आधीची ओढ मात्र जाणवत नाही. गाणी.. गाणी ऐकून तर काळ लोटल्यासारखं वाटतंय. अट्टहासाने ऐकलीही जात नाहीत. दर्जेदार सिनेमे तयार होणं बंद झालंय की मलाच कशात रस वाटेनासा झालाय. काय झालंय काय नक्की?

फोन.. हा फोन.. किती क्रेझ होती याची. एकेक एमबी जपून वापरण्याची कसरत करण्याचे दिवस गेले. आता सगळं अनलिमिटेड. पण मग uninterested का होत चाललेय मी? की सगळ्यांचच असं होतंय थोड्याफार प्रमाणात? निवांत सकाळी चहा घेत रविवारच्या दर्जेदार पुरवण्या वाचण्यातला आनंद कसा काय अचानक नाहीसा होतोय. फोन, टॅब, लॅपटॉप वर वाचण्यात मजा वाटत नाही. हेच कारण आहे की आणखी काही. पूर्वी एकेका गाण्यासाठी जंग-जंग पछाडलेला आठवतोय. आता वाट्टेल ती गाणी एका टिचकीवर उपलब्ध असताना ती ऐकण्याची असीम उर्मी मात्र मधल्या काळात कुठेतरी हरवून गेलीये असं वाटायला लागलंय. की ते वयच तसं असतं आणि हे वय असं? शी वय वगैरे काय.. तिशीत आहे मी अजून फक्त. मागे ग्रुप मध्ये असं म्हटल्यावर कोणीतरी म्हटलं होतं, ‘आधी जिंदगी तो निकल गयी फिर.. 60 avg मानके चलो.’ मनात वाटलं अरे खरंच की. अर्धं आयुष्य तर खरंच संपत आलं. पण मग लगेच तो नकोसा विचार झटकला आणि पेपर सॉल्व करत बसले.

अरेच्चा! पाऊस थांबला की. चहा करावा का मस्त की कॉफी? नाही काहीच नको. पळणार्‍या ढगांकडे पाहत पडून राहावं फक्त. एक्झॅम संपून आठवडा होत आला. मी अजून अशीच लोळतेय. पेपर तसे बरे गेलेयत. पण निकाल हाती आल्याशिवाय यूपीएससीचा काही भरोसा वाटत नाही. आता महिनाभर पुन्हा ही अशी अधांतरी अवस्था. पास की फेल? एकच प्रश्न सदैव डोक्यात. घरी जावंसं वाटत नाही. पुन्हा सगळ्यांच्या नजरा, न बोलले गेलेले शब्द, ‘आहे का यावेळी तरी काही?’ टाइप्स डोळ्यांतले प्रश्न आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे ‘लग्न कधी करणार?’. नकोच ते.

अभ्यासासाठी न झोपण्याची इतकी सवय लागलिये शरीराला की आता वेळ असूनही झोप येत नाहीये. संहिताची धावपळ पाहत बसून असते इथे नाहीतर तिथे. समोर असतंच पुन्हा हे फोन नाहीतर टॅब नाहीतर लॅपटॉप. Pdfs, नोट्स, बुलेट्स.. सो अँड सो अँड सो.. वेबसिरीज तरी किती पहाव्या? एखाद दुसरी चांगली निघते. मग ती पाहत असताना पुन्हा कसं ताजं-तवानं वाटू लागतं. जीने के लिए वजह मिल गई टाइप्स. पण मग अनलिमिटेड इंटरनेट आणि भरपूर वेळ यांच्या कृपेने तीही काहीच तासांत संपून जाते. मग पुन्हा सगळं uninterested होऊन जातं.

त्यात सध्या डोक्यावर एक अनाम दडपण आहे. अनुराग! खरंतर एक्झॅम झाल्या-झाल्या त्याला मी फोन करणं अपेक्षित होतं. आठवडा होत आला तरी मी नाहीच केला. तो वाट पाहत असणार. आधी प्रेलिम्स मग निकाल मग पुन्हा मेन्स चं preparation या सगळ्या काळात मी खूप गृहीत धरलंय त्याला. सरल भाषेत टाळलं असंही म्हणू शकतं कोणी. पण करणार तरी काय होते मी. तो काही करत नव्हता पण मी उगाच distract होत होते. मग त्यानेच उमजून मौन पत्करलं. त्यालाही आता तीन महीने उलटले असतील. खरंतर ठरवलं होतं मेन्स झाल्या झाल्या जावून भेटायचं. पण कसलं काय मला जागचं हलावसंही वाटत नाहीये. निकाल लागेपर्यंत आता हे असंच होणार..

अरे पुन्हा सुरू झाला की पाऊस..

‘संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा !’

मी काय म्हणते, करावा का फोन?

------

बराच वेळ वाजणारा फोन, बाथरूममधून बाहेर येऊन अनुरागने उचलला.

‘हॅलो..’

‘अरे किती वेळ रे.. किती कॉल केले मी’

‘आई.. अगं अंघोळ करत होतो मी..’

‘यावेळी? संध्याकाळी करू नये रे बाबा..’

‘मातोश्री..... मुद्द्यावर या!’

‘हो येतेय मुद्द्यावर. त्या मुलीला भेटायला का गेला नाहीस तू काल? किती तोंडघशी पडले महितीय का मी?’

‘भेटायला मी गेलो नाही तर तू कशी काय पडलीस तोंडघशी?’

‘मस्करी सुचतेय तुला??”

‘अगं आई, मग मी नाही म्हणत असताना तू कशाला ठरवलीस भेट वगैरे?’

‘तेच विचारतेय मी, नाही का म्हणतोयस तू? सहा महीने होत आले आता. तू एकही नवीन स्थळ पाहिलेलं नाहीयेस. अशाने कसं होणारे लग्न तुझं? की करायचंच नाहीये तुला? की झालंय ऑलरेडी? लपवून ठेवतोयस का काही? की आणखी काही आहे वेगळंच?? सांगून टाक बाबा एकदाचं. टेंशन सहनच होत नाही आजकाल..’

‘आई.. त्या मालिका पाहणं बंद कर आधी तू.. काहीही काय बोलतेयस? मी सांगितलं होतं की नाही मुली पहायच्या थांबू आपण काही महिने.. मग का पुन्हा पुन्हा तेच सुरू करतेयस?’

‘कारण काळजी वाटते बाबा.. काय काय कानांवर येतं आजकाल..’

‘नको काळजी करूस तू.. चल काम आहे. बोलतो नंतर’

अनुरागने फोन कट केला. आणि केस पुसत तसाच बेडवर बसला. आईला असं खुपवेळ थोपवून धरता येणार नाही हे त्यालाही कळत होतं. पण आधी रियाची प्रेलिम्स म्हणून दोघे थांबले आणि त्यानंतर लगोलग मेन्सचा अभ्यास म्हणून थांबले. अभ्यासात डिस्ट्रॅक्शन नको म्हणून दोघे तसे अंतर राखूनच होते. मागचे दोन-तीन महिने तर त्यांच्यात फोनवर सुद्धा बोलणं झालं नव्हतं.

अनुराग आता अस्वस्थ व्हायला लागला होता. पण त्याने कॉनटॅक्ट केला नाही. तो तिची एक्झॅम संपण्याची वाट पाहत बसला होता. पण तीही होऊन आता आठवडा होत आला होता. तरी रियाकडून काही फोन-मेसेज काहीच नव्हतं.

खिडकी बाहेरच्या पावसाकडे पाहत मनातले विचार झटकत मग त्याने लॅपटॉप ऑन केला..

आणि पुन्हा त्याच्या फोन ची रिंग वाजायला लागली.. रियाचा फोन??

क्रमश:

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक
पण हे २.१ काय आहे ?
कथानक फ्लॅशबॅकमधे आहे की पुढे

अरे व्वा, नवीन भाग. ..
रियाची हुरहूर खूप व्यवस्थित शब्दात पकडली आहे.

मृणाली, धनवंती.. थॅंक यू Happy

हर्पेन, 2.1 म्हणजे पर्व दुसरे, भाग एक
कथा सलग सुरू आहे. नो फ्लॅशबॅक

मी जनरली तुमच्या ब्लॉगवर वाचते. आताशा तिकडे जाहिरातींनीच पान भरलेलं असतं. त्यात लिखाण शोधावं लागतं.

आई अ‍ॅ डल्ट मुलग्याला लग्नाचा धोशा लावते हा प्लोट डिव्हाइस आता इतका इतका घिसा पिटा झाला आहे की त्याची म उसूत होईल पोळी खरपूस. पुढील लेखनास शुभेच्छा.

वाचते आहे.
>>>>>>>पळणार्‍या ढगांकडे पाहत पडून राहावं फक्त.
ज्जे बात!!