अंधार पडायला लागला तसा कधीतरी बाहेर दार उघडल्याचा आवाज झाला. संहिता आली असणार म्हणत मी तशीच बसून राहिले. संहिता सोबत आणखी कोणाचा तरी पुरुषी आवाज कानांवर आला. मला चाहूल लागली. अनिकेत. हो अनिकेतचाच आवाज. मी खुश झाले. अनिकेत म्हणजे कमाल माणूस. तो आला की माहोल बनतो. मुख्य म्हणजे आम्ही दोघे मिळून संहिताला भरपूर चिडवून घेतो. एरवी तिच्या काटेकोरपणामुळे फार bossing सुरू असते तिची. अनिकेतची आणखी एक भारी गोष्ट म्हणजे तो वाचतो. खूप वाचतो. तर्हेतर्हेचं वाचतो. त्यामुळे त्याच्याकडे दरवेळी काहीतरी नवीन असतंच बोलायला. आणि स्वभावाच्या बाबतीत तो एकदम टवाळ. मजा-मस्करी आणि धमाल. त्याला सीरियस वगैरे क्वचितचं पाहिलं. त्याचं आणि संहिताचं म्हणजे opposites attract टाइप्स आहे!
हम्पीहून आल्यावर त्या दोघांचं patch-up झालं. आणि मग त्याचं येणं-जाणं वाढलं. मग तो माझाही मित्र झाला. नंतर संहिताने जॉब स्विच केला. नुकतीच ती कामानिमित्त जर्मनीलाही जाऊन आली. तिचं तसं आता एकदम उत्तम चाललंय. चिंट्या, तिचा लहान भाऊपण पुण्यात आलाय. मॅनेजमेंट करतोय. संहिताच करतेय त्याचा सगळा खर्च. इथेच होता काही दिवस रहायला. पण मग कॉलेज दूर पडायला लागलं. मग तो शिफ्ट झाला त्याच्या मित्रांसोबत. संहिताची कमाल वाटते. कमी वयात सगळ्या जबाबदार्या पार पाडतेय ती. त्यामुळेच थोडी स्ट्रीक्ट आणि कधीकधी चीड-चिडी वागते. पण दॅट्स ओके.
तिच्याकडे पाहिल्यावर मला माझंच वाईट वाटत राहतं. ती इतकं सगळं करतेय आणि माझं अजून कशात काही नाही. अभ्यासच चालूये अजून. एकाच वयाच्या आम्ही दोघी. मग प्रचंड गिल्ट येतो. वाईट वाटतं. मग पुन्हा अभ्यासात डोकं बुडवून बसते. बाहेरच्या जगाशी त्यामुळे संबंधच तुटल्यासारखा झालाय. अलिप्त. अलिप्त. एकलकोंडी. एकलकोंडी? खरंच झालेय का??
सबू को दौर में लाओ
बहार के दिन हैं..
कोण गातंय इतक्या मोठयाने? अनिकेत!! हम्म.. संहिताने सांगितलं असणार अनुरागविषयी. अरे हा इकडेच येतोय..
ठहर ठहर के न बरसो
उमड परो एकदम
सितम-ज़रीफ़ घटाओं
बहार के दिन हैं..
शेवटची ओळ जवळपास तो माझ्या कनांशी येऊन म्हणाला.
‘वाह.. नुसरत फतेह जी वाह..!’
मी फक्त एक लुक दिला.
‘काय झालं स्कॉलर? लाजतेयस की काय तू? म्हणजे येतं तुला?’
‘वेरी फनी! गप्प बस रे. आधीच माझ्या डोक्याचं दही झालंय आज.’
‘दही? मला वाटलं गुलाबजाम झालेयत. डबा पाहिला मी टेबलवर. अनुरागने आणले? छान आहेत ’
यावर मी त्याच्याकडे हसून बघितलं,
‘अनुरागने नाही. आई-बाबांनी आणलेत!’
‘ते कधी आले होते? आणि मला काही म्हणाली नाहीस येणारेत वगैरे?’ संहिता रूममध्ये येत म्हणाली.
‘मला माहित असतं तर सांगितलं असतं ना! आले आणि कहाणीला ट्विस्ट देऊन गेले.’
‘म्हणजे?’ दोघांनीही जवळपास एकदाच विचारलं.
‘म्हणजे संत अनुराग आणि मी या अस्ताव्यस्त घरात सकाळी मोमोज खात बसलेले होतो आणि तेव्हाच आई-बाबांनी सर्प्राइज विजिट दिली.’
‘काय??’ संहिता.
‘हो!!!’
‘फिर?’ अनिकेत.
‘फिर क्या? वाट लागली.
एकतर आम्ही घरी अजून काही सांगितलेलंच नव्हतं. मुळात आमचंच अजून काही नीट ठरलेलं नव्हतं. म्हणजे किमान माझं तरी. त्यात हे सगळं आई-बाबांना प्रत्यक्ष दिसलं! अनुरागचा फोटो त्यांनी पाहिलेला होताच त्यामुळे ओळखलं त्यांनी त्याला लगेच.
मग नाइलाजाने सगळं सांगावं लागलं आम्हाला.’
‘मग?’
‘मग काय, त्यांना सरप्रायझिंगली खूप आनंद झाला. आता आमची एंगेजमेंट ठरवायच्या मागे लागलेयत!’
‘काय सांगतेस काय तू?? वॉव.. भारीच म्हणजे’
‘काय भारी? मला नको होतं इतक्यात हे सगळं. माझं लग्न करायचं की नाही हेच मुळात अजून ठरत नाहीये.’
‘काय? अगं, हम्पीमध्ये तूच काबुल केलेलंस ना तुला अनुराग आवडायला लागलाय आणि तुम्ही विचार करताय लग्नाचा असं? मग आता काया झालं?’
संहिताचे प्रश्न थांबत नव्हते.
‘हो. म्हणजे आत्ताही तो आवडतोच मला. पण लगेच लग्न? माझं अजून कशात काही नाही. मला असं इतरांवर फायनॅनशीयली dependant असताना लग्न-बिग्न नाही करायचं.’
‘मग त्याला थांबायला सांग’ अनिकेत म्हणाला.
‘दडपण येतं या गोष्टीचं मला. तो थांबलाच आहे पण यूपीएससी यू नो.. काय होईल काही सांगता येत नाही. यावेळीही हुकलं थोडक्यात तर? असं त्याला थांबवून ठेवणं वाइज वाटत नाहीये मला. तेव्हा भावनावेगात वाटलं जमेल. पण आता अवघड वाटतंय.’
‘रिया! तू अति विचार करतेयस. आता जे होतय ते होऊदे.’
ती चहा करायला गेली.
मी पुन्हा टेंस्ट. अनिकेत माझ्याकडे पाहत होता. मला खरंच सुचत नव्हतं काय करावं.
‘रिया एक विचारू?’
‘हम्म..’
‘तुला तो मनापासून आवडतो?’
मी विचार केला. सावळा, उंच, स्मार्ट, कर्तबगार अनुराग समोर आला. त्याचं वागणं, बोलणं, तो सोबत असताना मला येणारा फीलिंग सगळं आठवलं. मी नकळत बोलून गेले,
‘हो..’
उठून उभा राहत मग तो म्हणाला,
‘बस फिर. ज्यादा मत सोच.. उससे बात कर.
सगळं सांग.. निघेल मार्ग’
त्याच्या बोलण्यात मला आशा दिसली. हलकं वाटलं. मी किंचित हसले.
मग माझ्याकडे पाहून तो पुन्हा त्याच गझलेच्या ओळी गायला लागला.. अर्थ माझ्यापर्यंत पोचावा अशा उद्देशाने..
जूनून का हुक्म सुनों
और अमल करो उस पर
ख़िराद को आग लगाओ
बहार के दिन हैं..
सबू को दौर में लाओ
बहार के दिन हैं..
(ख़िराद – intellect)
(गझल : नुसरत फतेह अली खान)
क्रमश:
सांज
www.chaafa.com
नेहमीप्रमाणे खुप खुप छान.
नेहमीप्रमाणे खुप खुप छान.
च्यवनप्राश, थॅंक यू!
च्यवनप्राश, थॅंक यू!