अग्नी-५

Submitted by पराग१२२६३ on 29 October, 2021 - 11:33

अग्नी-5 या भारताच्या दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पाच हजार किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी यशस्वीपणे पार पडली होती. आशिया खंडाचा बहुतांश भाग अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्यामुळे पहिल्या चाचणीनंतर लगेचच चीनमधील सरकारी वृत्तपत्रांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत अतिशय नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तसेच भारताच्या एकूणच क्षेपणास्त्र क्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. यामुळे आशियातील शस्त्रस्पर्धा वाढेल आणि सैन्यसमतोल बिघडण्याची शक्यताही चीनने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर अग्नी-5 क्षेपणास्त्र प्रथमच नवी दिल्लीतील राजपथावरील 2013 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आवर्जून प्रदर्शित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनावरही बीजिंगने नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.

अग्नी-5 चा प्रक्षेपक रस्त्यावरून कोठेही वाहून नेता येत असल्याने क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची नियोजित जागा शत्रूच्या नजरेपासून दूर ठेवता येऊ शकते. अग्नी-5 हे अग्नी वर्गातील सर्वांत दीर्घपल्ल्याचे क्षेपणास्त्र असल्याने त्याचे आरेखनही या मालिकेतील अन्य क्षेपणास्त्रांपेक्षा भिन्न आहे. मालिकेतील इतर क्षेपणास्त्रांच्या मानाने त्याचा व्यास मोठा म्हणजेच 2 मीटर आहे.

अग्नी-5 रस्त्यावरील किंवा लोहमार्गावरील प्रक्षेपण वाहनावरून वाहून नेले जाते. त्यामुळे त्याची एका ठिकाणाहून दुसरीकडे लवकरात लवकर तैनाती करून प्रक्षेपण करणे शक्य होते. तसेच नळकांड्यात (Canister) हे क्षेपणास्त्र ठेवले जात असल्यामुळे त्याच्या बाह्य आवरणाचे आयुर्मानही वाढलेले आहे. प्रक्षेपणाच्यावेळी गॅस जनरेटरच्या मदतीने अग्नी-5 त्या नळकांड्यातून बाहेर फेकले जाते. या नळकांड्यामुळे अग्नी-5 ला प्रक्षेपणासाठी लागणारा वेळही कमी झालेली आहे. यावर बसवण्यात आलेल्या Ring Laser Gyroscope based Inertial Navigation System मुळे क्षेपणास्त्राला वेगवेगळ्या उपग्रहांच्या मदतीने निश्चित लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे शक्य होते.

आपली सामरिक हितं लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी सहा हजार किलोमीटर लांबच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे अग्नी-6 आणि दहा ते बारा हजार किलोमीटरपर्यंत पल्ला असलेले क्षेपणास्त्रही (सूर्य) विकसित करण्याची योजनेवर भारत गेली अनेक वर्षे काम करत आहे. ‘भारत अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करणार नाही, त्याचवेळी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता बाळगेल’ या आपल्या आण्विक धोरणातील पायाभूत तत्वाशी बांधिलकी राखतच भारत आपल्या क्षेपणास्त्रांचा विकास करत आलेला आहे.

अग्नी-5 च्या चाचण्या

पहिली : 19 एप्रिल 2012
दुसरी : 15 सप्टेंबर 2013
तिसरी : 31 जानेवारी 2015
चौथी : 26 डिसेंबर 2016
पाचवी : 18 जानेवारी 2018
सहावी : 3 जून 2018
सातवी : 10 डिसेंबर 2018
वापरकर्ता चाचणी : 27 ऑक्टोबर 2021

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/5.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान