कोलाज

Submitted by Priyadarshi Dravid on 29 October, 2021 - 07:20

प्रिय वाचकांनो

मी ऑस्ट्रेलिया मध्ये अडिलेड शहरात राहतो. मी भूग्रभ, भूजल आणि पर्यावरण क्षेत्रात पुष्कळ ठिकाणी काम केले आहे. मी तामिळभाषि असूनही मला मराठी वाचायला लहानपणापासून आवडायचं. तीस पस्तीस वर्षानंतर मराठी पार विसरून गेलो होतो पण आईला खुश करण्यासाठी मराठी शिकणे आणि लिहिणे पुन्हा शिकणे सुरु केले आणि अजूनही शिकतोच आहे. कथा तुम्हाला आवडली तर तुमचं अभिप्राय जरूर कळवा . Happy Reading! . .

प्रियदर्शी द्रविड
envirofriend@yahoo.com

कोलाज

मराठवाडा विद्यापीठाच्या बीएससी सायन्सच्या परीक्षेत सुधाकर सर्वप्रथम आला. गणित आणि भौतिकशास्त्रात विशेष नैपुण्य मिळाले आणि ऐपत नसताना देखील आई बाबांनी एक, दोन नाही, तब्ब्ल दहा किलो पेढे चाळीतल्या सर्वांना एकेक करून वाटले. त्याला पुढच्या शिक्षणासाठी हजार रुपये महिने मेरिट शिष्यवृत्ती आणि दोन सुवर्ण पदके मिळाली, हे सुद्धा सर्वांना सांगितले. मराठवाडा टाइम्स आणि इतर दोन दैनिकांच्या गाड्या जवळपास एकाच वेळी आल्या आणि त्यांना आपापल्या गाड्या चाळीबाहेर उभ्या कराव्या लागल्या होत्या. त्याचे घर अगदी अरूंद बोळीत होते. तसा सुधाकर थोडा गांगरून गेला होता पण त्याचा हा दुसरा इंटरव्यू होता; पहिली मुलाखत मॅट्रिकच्या परिक्षेत मराठवाड्यात पहिला आल्यानंतर घेतली गेली होती. त्याने स्वतःवर ताबा ठेवून सर्व प्रश्नांची उत्तरे मोघम शब्दांत दिली. थोडक्यात ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले; प्रथम आई बाबांचे प्रेम, आर्थिक मदत नंतर भैतिकशास्त्राचे प्राध्यापक मोहरील आणि गणिताचे प्राध्यापक मंगळगिरी यांच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद दिले. शेवटी एका गिरणी कामगाराच्या मेहनतीचे पैसे सत्कारणी लागले या बद्दल व्यक्तिगत संतोष व्यक्त केला.

त्याला खगोलशास्त्रात एम एस सी करायचे होते आणि ही त्याची जीवनातील महत्वाकांक्षा होती आणि त्याचे मुख्य कारण प्राध्यापक मोहरील आणि प्राध्यापक मंगळगिरी! त्या दोन धुरंधर, मुरलेल्या शिक्षकांनी त्याला गणित आणि भौतिकशास्त्र कसे भाऊबहिणी प्रमाणे एकत्र प्रेमाने विस्तारत राहिले होते हे दाखविले आणि त्याला कित्येक भौतिकशास्त्रात नोबेल प्राईझ मिळालेल्या शास्त्रज्ञाची पुस्तकं आणि आत्मचरित्रं सुद्धा वाचायला प्रवृत्त केले होते. त्या आत्मचरित्राद्वारे त्याला कित्येक धुरंदर, अफलातून असे शास्त्रज्ञ भेटले. त्यांत कोणी बाईबाज, तर कोणी चर्चचा पाद्री, कोणी प्रिन्स होता, कोणाला गीता आणि वेदान्ताच्या द्वारे प्रेरणा मिळाली, आणि कोणाला बुद्धाच्या आत्मज्ञानाच्या आठ योग्य तत्त्वांद्वारे - म्हणजे, योग्य आकलन, योग्य हेतू, योग्य भाषण, योग्य कृती, योग्य जीवन- निर्वाह, योग्य लक्ष, योग्य एकाग्रता आणि योग्य ध्यान. मुख्य म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी १९ व्या शतकात क्वांटम फिजिक्सच्या क्षेत्रात अनेक शोध लावले तेव्हा त्यातले कित्येक पंचवीस ते तीस वर्षाचे होते. जयंत नारळीकर यांनी लिहिलेली सर्व मराठी आणि इंग्रजी पुस्तके मोहरील सरांनी त्याला आपल्या स्वतःच्या लायब्ररीतून वाचायला दिली होती.

मग मुंबई आयआयटी च्या परीक्षेत खच्चून अभ्यास करून मोठ्या आत्मविश्वासाने त्याने एन्ट्रंस परीक्षा दिली. मुंबईत छत्रपती शिवाजी स्टेशन जवळच्या एका खानावळीत तो राहिला होता पण दोन दिवसांत त्याला मुंबईला जास्त फिरता आले नाही. पण त्याने एक म्युझिअम आणि एक आर्ट गॅलरी पाहिली होती. शेवटी महिन्याभरात पर्सनल इंटरव्ह्यू पत्र आले. ज्या दुपारी पवईत इंटरव्ह्यू होता त्या दिवशी नेमका जोरदार पाऊस झाला आणि बस, ऑटो रिक्शा आणि टॅक्सी असा प्रवास करता करता, छत्री असूनही तो ओला चिंब झाला होता आणि त्याचे पाय गुडघ्यापर्यंत ओले झाले होते. दहा मिनिटे लावून इस्त्री केलेला टाय तर एकदम चिंबून बोळा बनला होता. फिजिक्स डिपार्टमेंट समोर ऑटो थांबवला तेव्हा थोडे उघडले होते. त्याने टाय काढला आणि त्यानेच चेहरा पुसून पॅन्टच्या खिश्यात मुडपून टाकला.

ओले केस विंचरत तो आत शिरला आणि ओले झालेले पत्र रिसेप्शन मध्ये बसलेल्या बाईला दिले. तिने त्याला बाजूच्या हीटर लावलेल्या उबदार खोलीत बसविले. पाच मिनिटांत दरवाजा उघडला गेला आणि इंटरव्ह्यू पॅनलशी ओळख झाली. डॉ पाध्ये ऍस्ट्रोफिजिक्स विभाग प्रमुख पॅनेलचे अध्यक्ष होते. त्याला थँक यु म्हणत बसवताना प्रोफेसर पाध्ये म्हणाले, “मिस्टर सुधाकर खोब्रागडे, तुम्ही मॅट्रिक आणि बीएस्सी परीक्षेत सर्व प्रथम होऊन जे यश मिळवले आहे त्या बद्दल तुमचे विशेष अभिनंदन." त्याने तो ओला असल्याबद्दल प्रथम माफी मागितली. “डोन्ट माईंड" म्हणत त्यांनी त्याला वेगवेगळे किचकट प्रश्न अगदी मोजक्या शब्दांत विचारले, जसे, कोणत्या शास्त्रज्ञाने काँटम फिजिक्सचा शोध लावला? आणि प्रश्नाचे उत्तर त्याच्या जवळ होते. त्याने मोजक्या शब्दांत मॅक्स प्लॅन्कच्या शोधाबद्दल सांगितले आणि प्लॅन्क कॉन्स्टन्टचे समीकरण सुद्धा सांगितले. काही वेळा त्याला "एलोबोरेट इन डिटेल्स प्लिस" असे सांगितले गेले तेव्हा त्याने लांब उत्तर दिले. “व्हेरी गुड. थँक यू. प्लीज स्टॉप हिअर.” प्राध्यापक पाध्येंनी त्याला मध्येच थांबवले.

दुसरा प्रश्न विचारला, “तुम्ही मला हे सांगा, १८ व्या आणि १९ व्या शतकात काय असे नवे समजले ज्याला आपण खगोलशास्त्रात इपॉक मेकिंग डिस्कवरी म्हणू शकतो? मनात उत्तर हळूहळू तयार झाले आणि त्याला "टेक युअर ओन टाइम" चा सल्ला दिला गेला. आणि काही क्षणात त्याला उत्तर सापडले आणि जसे मनात आले तसे सांगितले. "१८ च्या उत्तरार्धात खगोलशास्त्रज्ञ समजत होते की हे विश्व आपल्याला जसे दिसते त्याप्रमाणे आपली पृथ्वी आणि आणि बाकी नवग्रह या सीमित एक "फायनाईट" असे विश्व आहे. मग १९०० व्या शतकात नवा आणि मोठा टेलिस्कोप निर्माण झाला. आणि १९३०-३५ च्या दरम्यान टेलिस्कोप द्वारे असे कळले की सर्व तारे एकमेकापासून दूर पळत होते. मग एकदम समजून आले की जर हे विश्व असे एकमेकांपासून दूर पळत असेल तर हे सर्वत्र पसरलेले आणि सतत एक्सपांड होणारे विश्व एकेकाळी एकत्र होते आणि रेडिओ टेलिस्कोप, प्रोब आदी उपकरणे पाहून नंतर बिग बॅंग च्या नव्या विश्वात कळले की आपले स्थान, आपली मिल्की वे गॅलॅक्सी ही एक सर्व सामान्य अशी गॅलॅक्सी आहे आणि अगणित असे तारे आणि तारेसमूहाचे हे सर्व विश्व एक क्षणात बिग बॅंग नंतर निर्माण झाले आणि फुग्यासाखे फुगत गेले, ज्याला आपण एक्सपांडींग युनिव्हर्स म्हणतो ..." त्याला पुन्हा थांबवले गेले. बाकी तीन लोकांनी मॅटर आणि अँटी-मॅटर या कल्पनेबद्दल प्रश्न विचारले आणि त्याने पॉल डिरॅकच्या शोधाबद्दल सांगितले आणि शेवटी फक्त गणित वापरून त्याने एका विलक्षण अँटी-मॅटर कल्पनेबद्दल थोडक्यात सांगितले. शेवटी हे सुद्धा सांगितले की आज टेलिस्कोप द्वारे आपल्याला जे सतत विस्तारणारे जग दिसते, ते फक्त ५ टक्के आहे आणि ९५ टक्के विश्व "अदृश्य" असे आहे ज्याबद्दल आपण फक्त गणित, टेलिस्कोपद्वारे अनुमान करू शकतो हे न विचारता सांगून दिले. शेवटचा प्रश्न प्रोफेसर पाध्येंनी विचारला: “तुम्हाला खगोलशास्त्र शिकायचे आहे तर दोन, तीन मिनिटांत हे का शिकावेसे वाटते या बद्दल इन जनरल सांगा.” सुधाकर थोडा चमकला खरा. “प्रोफेसर पाध्ये," थोडा आवंढा गिळून घसा मोकळा करून त्याने सुरुवात केली. “गेली कितीतरी वर्षे मी रात्रीच्या आकाशाकडे पाहतो आणि मला हे माहीत आहे की, होय, आपण या विश्वाचा भाग आहोत, आपण या विश्वात आहोत, परंतु कदाचित त्या दोन्ही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विश्व आपल्यात आहे. जेव्हा मी त्या वस्तुस्थितीवर विचार करतो आणि मी वर पाहतो - मला फार लहान वाटते, कारण आपली उंची, पृथ्वीच्या समोर अगदी नगण्य आहे. आणि त्याच प्रमाणे हे ब्रह्मांड तर इतके मोठे आणि अमर्यादित आहे की, त्याची कल्पना करणे ही शक्य नाही. आणि वस्तुस्थिती अशी आहे की, ते ब्रह्माण्ड सतत विस्तारत आहे. माझे शरीर आणि त्यातले अणू एक वेळा या ताऱ्याच्या नुक्लिओसिंथेसिस मधून निर्माण झाले आहेत आणि त्याबद्दल माझ्या मनात एक अतृप्त अशी - कधी तृप्त न होणारी, ओढ निर्माण झाली आहे की किती तरी पुस्तके वाचून मला कधी तृप्त असे कधी वाटले नाही. म्हणून मला भौतिकशास्त्र, विशेषतः, खगोलशास्त्र शिकावेसे वाटणे हे स्वाभाविकच आहे.” आणि एका तासात इंटरव्ह्यू संपला. सुधाकरने सर्वांशी शेक हॅन्ड केला आणि बाहेर पडताना त्याला फार मोकळे वाटले. आता पाऊस पण संपला होता आणि चक्क ऊन पडले होते.

दुपारचे तीन वाजले होते आणि त्याला वखवखून भूक लागली होती.
कॅम्पसच्या बाहेर वडापाव खाताना तो लांब दाढीवाल्या डॉ पाध्ये बद्दल विचार करत होता आणि त्याला मनापासून वाटले की एकूण इंटरव्ह्यू चांगला गेला होता. नंतर तो मुंबईत नवी स्थळे, आर्ट गॅलऱ्या, समुद्र पाहायला तो मोकळा झाला. तसा मुंबईत राहण्याचा मोह सर्वांनाच पडतो. विशेषतः लहान शहरात राहिल्यामुळे, कदाचित. तो बस, ऑटो मधून पायपीट करून सुप्रसिद्ध स्थळे पाहत होता आणि आर्ट गॅलऱ्या धुंडाळत होता. आर्टीस्ट बनण्याचे स्वप्न पाठीशी बांधून त्याने मनातल्या मनात पार जिरवून टाकले होते. खूप शिकून, चांगली नोकरी गाठी बांधून बख्खळ पैसे मिळवून आईवडील याना सुखी करण्याचे एक भाबडे स्वप्न त्याचे होते. आणि कलेची ऊर्मी नेहमी उसळत बाहेर घेई, त्यावेळी आपल्या मूड मध्ये तो छान छान निसर्गचित्रे, पोर्ट्रेटस, स्केचेस, वगैरे चितारून मन रमवीत असे.

मुंबईत आल्यानंतर त्याचे मन मोकाट सुटले. आर्ट गॅलऱ्यांतील पेंटिंग्जस, स्केचेस, स्कल्पचर्स वगैरे पाहून त्याचा जीव दडपून गेला. आणि मन तृप्त झाले. पण टाटा आर्ट गॅलरीत शिरल्यानंतर तो भुरळ पडल्यासारखा दोन वेळा तिथे गेला कारण तेथे "कोलाज" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन तीन दिवसांसाठी लागले होते आणि तिसऱ्या दिवशी ती चित्रे विकण्यात येणार होती. तेथील चित्रे ऑईलपेंट किंवा शेडेड टाईप किंवा ब्लॅक अँड व्हाईट व रंगीत वगैरे माध्यमात नव्हते तर चक्क प्रिंटेड कागदाच्या बारीक बारीक तुकड्यांनी जोडून तयार केलेली ती पेंटिंग्ज होती आणि तेच त्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. काही चित्रे तशी ढोबळ दिसत होती. अर्थात प्रदर्शनातील असल्याने त्यांत काहीतरी विशेष होतेच, एका चित्रात एक चौकोनी फ्रेम वर काढला होता आणि वर "जॉय" आणि "लाईफ" आणि खाली "डेथ" आणि "रिबिर्थ" असे शब्द चिपकवले होते. चौकोनात एक माणूस दोन्ही हात वर करून उभा होता. जवळच एक चित्रकार फ्रेंचकट दाढी असलेल्या माणसाला त्या कलाकृती बद्दल सांगत होता. “जन्म मृत्यूच्या मध्ये जॉय आहे आणि नंतर मृत्यू आणि पुनर्जन्म दाखविला आहे आणि मधील हे जे माणसाचे चित्र आहे ते मंगळ ग्रहाला पाठवलेल्या चित्रांपैकी एक आहे." तो चौकोन दुरून पाहताना त्याला एक लहान मुलगा एका मोठ्या माणसाचा हात पकडलेल्या प्रतिमेप्रमाणे दिसत होता. कोपऱ्यातून पाहिले तर एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला आणि वर त्याची उलटी प्रतिमा वर तरंगत दिसत होती आणि सुधाकर एकदम चकित झाला.

पुढे एक असे चित्र होते, ज्यात सुरवातीला पाहताक्षणीच त्याला एक साधू नदीत उतरताना दिसला. त्याच्या हातात त्रिशूल होते. पण पुन्हा तो थोडं चित्राजवळ सरकला, तोच त्याला एक झोपडी दिसली आणि झोपडीच्या मागे एक गाय आणि वासरू दिसले. आणखी जवळ गेल्यावर त्याला प्रिंटेड कागदाचे तुकडे दिसले. आणि त्या तुकड्यातही दिलखेचक अशा म्हणी आणि संवाद दिसला: “झोपडी झाडाला म्हणते, तुझ्या कापलेल्या तुकड्यांनी मला बनविले गेले आहे तर तूच माझा निर्माता आहे आणि तुझे धन्य हो. झाड उत्तर देते: मला वाटते मी पावसाशिवाय मेले असते म्हणून त्या पाण्याचे धन्य हो. मग पाणी म्हणते, मी वेगवेगळ्या प्रकारे जमिनीवर किंवा जमिनीखाली, वरून सतत खाली प्रवास करते आणि त्या दगडांच्यातले पोषक तत्त्वे मला मिळतात म्हणून त्या दगडाचे धन्य हो. मग दगड म्हणतो, खरे तर माझे घर उंच पर्वतात असते पण मी नेहमी खाली घरंगळत येतो आणि माझे तुकडे तुटून पोषक माती तयार होते तर त्या मातीचे आभार. आणि नंतर गाय, वासरू आणि गवत आदी मिळून ती मोठी लांब कविता होती ज्यात सर्व एकमेकांना धन्यवाद देताना दिसतात.

आणखी एका चित्राने त्याचे मन फार वेधून घेतले होते. ते पूर्ण चित्र अक्षरांनी बनविलेले होते ज्याला “अक्षर पोर्ट्रेट” म्हणता येईल असे. दुरून एका मुलीचा चेहरा दिसला पण त्यातच सूर्योदय झाल्यासारखा सुद्धा दिसला. मग एक चेहरा आणि चेहऱ्याच्या बाजूला विखुरलेल्या बटा दिसल्या. चित्राजवळ जाताच त्याला त्या बटांत लिहिलेली काही अक्षरे स्पष्ट दिसली. एक इंग्रजी कविता तो वाचू लागला. “We are the bees of the invisible. We wildly gather the honey of the visible in order to store it in the great golden hive of the Invisible.” सुधाकरने तेच वाक्य दोनदा वाचले आणि तो विचार करू लागला. invisible आणि visible बद्दल. त्याला पूर्ण अर्थ कळला नाही. पण त्या शब्दात काहीतरी विलक्षण असे सत्य गुंफले गेले होते असे वाटत होते. आपण bees प्रमाणे मध गोळा करतो आणि त्याला सोनेरी Invisible अश्या पोळ्यात जमवतो असे त्याने मनात ट्रान्सलेट केले. गर्दीत मान उंच करून तो पुढे वाचू लागला. मग त्याला कळले की त्या चित्रातल्या मुलीला डोळे होते आणि तिने चष्मा लावला होता. आणि ते एक पूर्ण चित्र पेन्सिल आणि पेन वापरून तयार केले होते.

एकदम स्पीकरवर अनाउन्समेंट झाली की दहा मिनिटांत प्रदर्शन बंद होणार होते. सुधाकरने घड्याळाकडे पाहिले आणि तो चकित झाला. तब्बल दीड तास पाच मिनिटांसारखे संपले होते आणि सात वाजले होते. अगदी आईन्स्टाईनने रीलेटिव्हिटीत सांगितल्याप्रमाणे, जेव्हा आपण आपली आवडती गोष्ट करता तेव्हा दोन तासाचा वेळ दोन पळांत सुंकुचित झाल्यासारखा संपून जातो. त्याचप्रमाणे न आवडणाऱ्या व्यक्तीसोबतचा एक पळ, एक लांब तासासारखा वाटतो. कधीकधी एक वर्षे किंवा दहा वर्षे अगदी न कळत संपून निघून जातात, मग फक्त आठवणीचं कोलाज उरते.

लोक निघू लागले आणि सुधाकरने जवळ जाऊन चित्राकडे एकदा पाहून ते वाक्य पाठ केले. बाहेर निघताना त्याला कळले, उद्या प्रदर्शनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. दोनदा बस बदलत परतताना सुधाकर मनातल्या मनात त्या विलक्षण कवितेबद्दल, त्यात साकळलेल्या शब्दांचा पण न कळलेल्या अर्थाचा, अंदाज लावत राहिला. खानावळीत शिरताच त्याला वखवखून भूक लागली आणि जेवून रात्री तो आपल्या खाटेवर पडून पुन्हा पुन्हा त्या कवितेचा अर्थ लावत झोपून गेला.

त्या चित्राची मोहिनी इतकी होती की तो सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा चार वाजता त्या आर्ट गॅलरीत गेला, आत शिरताच त्याने त्या चित्राकडे दुरून पाहताना त्याला यावेळी वेगळेच चित्र दृष्टीस पडले. त्या अक्षर आणि शब्दाच्या तुकड्यांत मावळता सूर्य आणि एका पर्वतावरून येणारी नदी दिसली. तो चकितच झाला. काल इथे लावलेलीच ही कलाकृती आहे की बदलली गेलीय हे त्याला कळेनासे झाले पण जवळ जाताच त्याला बटांवर लिहिलेली ती गूढ कविता दिसली. मग तो अगदी समोर जाऊन पूर्ण मजकूर वाचू लागला.

एक मुलगी दोन लोकांना चित्रांबद्दल काहीतरी सांगत होती होती. दोन तीन इतर लोक वाट बघत उभे होते. तिचे लांब मोकळे केस, दिसायला साधीसुधी, भपका नसणारी, बहुतेक तिचंच पोर्ट्रेट असावे आणि ते त्याच्या मनात येताच त्याला एकदम जाणीव होते की हा तिचाच चेहरा होता आणि लांब बटा. त्याने तिची इतर चार चित्रे पाहिली आणि ती सर्व चित्रे लयबद्ध कॅलिग्राफीत लिहिल्यासारखी सुंदर अक्षरांनी आणि अनुरूप म्हणींनी भरली होती, ज्याने चित्राचे टेक्श्चर तयार झाले होते. वेगवेगळ्या चित्रांकडे तो किती वेळ पाहत राहिला पण शेवटी तो पुन्हा त्याच चित्राकडे परतला, ज्याने त्याला भुरळ घातली होती.

तिच्या चित्रात नक्कीच नजर खेचण्याची ताकद होती. नेहमीसारखे ते केवळ चित्र नव्हते. लक्ष वेधून घेणारं, असं त्यात नक्की होतं. एखाद्या जादूने भुरळ घातल्यागत प्रेक्षक खिळून राहिले होते, शब्द आणि म्हणी वाचून न्याहाळत होते, आणि तो तर अगदी मंत्रमुग्धच झाला होता. काल, आणि आज पण त्याला चित्र पाहणाऱ्यांची संख्या जास्त वाटत होती. आता कोणी चित्र विकत घेईल तर चित्राखाली विकत घेणाऱ्याचा टॅग लावला जाईल. तो जसजसा त्या आर्ट कोलाजच्या दिशेने सरकू लागला. तो काय आश्चर्य! तिचे विखुरलेले केस, सुंदर पाणीदार डोळे, कुसुम्बी रंगाचे ओठ, किंचित उंचावलेले धारदार नाक नि टोकदार नाकाचा शेंडा, सुरईसारखी मान! तिथे चक्क चेहऱ्यावरील डिटेल्स त्याला दिसू लागली. पूर्ण चेहरा छोट्या छोट्या अक्षरांनी भरून गेलेला दिसला. त्याला गंमत वाटली. त्याच्या मनांत आले की, आपल्याला काही चष्मा नाही. मग परवा न काल पाहिले ते काय म्हणून वेगळे दिसले? कदाचित आपण जे मनांत कल्पिले तेच दिसले असेल. पण आज का म्हणून स्त्री प्रतीत व्हावी तेथे? विलक्षण, अगदीच विलक्षण! त्याने त्या मुलीकडे पाहिले, तिने ओळखीचे जुजबी हास्य केला.

त्याला आता ते चित्र स्पष्ट दिसले. चित्राचे नाव होते “Essence of life!" म्हणजेच “जीवनाचे मर्म!” तो जरा बुचकळ्यात पडला. एखाद्या तरुणीच्या चेहऱ्यात कसे कळावे बुवा जीवनाचे सार, मर्म? त्याच्या भुंवया आकुंचन पावल्या, कपाळावर दोन आठ्या उमटल्या, डोळे बारीक झाले, आणि सरळ नाक गालांमध्ये रुतून बसले. आणि ओठ आवळून तो त्या चित्राकडे एकटक पाहू लागला. त्याच्यातील बदल त्या तरुणीने नेमका हेरला. चित्राच्या समोर जाऊन तो बारकाईने चित्र निरखू लागला. मग एकेक गोष्टी त्याच्या डोळ्यांवर स्पष्ट होऊन अर्थपूर्णतेने आदळू लागल्या. त्याला तीव्रपणे जाणवले की, तिच्या चेहऱ्याभवतालच्या आणि चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या वेगवेगळ्या बटांवर वेगवेगळे संदेश जीवनदायी देवतेचे होते. तो आता जास्त सावध होऊन एकटक त्या स्त्रीचा चेहरा पाहू लागला. तिचे केस, कपाळ, कान, गाल, ओठ हनुवटी अगदी गळासुद्धा टिम्ब टिम्ब अक्षरांनी भरून गेलेला दिसला. अक्षरे इतकी बारीक होती की वाचणाऱ्याला नीट डोळसपणे वाचायला हवीत. त्यांत काही त्याने पुढे सरकून वाचण्यास सुरुवात केली. विखुरलेल्या बटांवरील लांबलचक ओळी, “We are the bees of the invisible. We wildly gather the honey of the visible in order to store it in the great golden hive of the Invisible.”
“Space tells matter how to move and matter tells space how to curve.”
"सत्कार्यासाठी आयुष्य घालवणे म्हणजे आयुष्य जगणे!"
“जाल तिथे प्रेम विखरून टाका, जो तुमच्यापासून दूर जाईल, तो फक्त तुमच्याकडून आनंदच घेऊन जाईल.”
“अंधाऱ्या जगात आपण प्रकाशाचा वेध घ्यायला शिकले पाहिजे.”
“जीवन खरेतर सोपे असते, आपण ते गुंतागुंतीचे करून टाकतो.”
“क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा.”
“आयुष्यात कितीही पराभव मिळाले तरी, स्वतःला कधी अपयशी समजू नका.”
“लक्षांत ठेवा की आपल्यासारखे फक्त आपणच असतो.”
“No one is perfect that is why pencils have erasers.”
“जो स्वतःच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतो, तेथे भविष्य विसावते.”
अशा बऱ्याच ओळी प्रत्यक्ष बटांऐवजी काळी अक्षरे उभ्याने ओवली होती. त्यामुळे सहज वाचता येऊ लागली.
तिच्या भुवयांवर “प्रामाणिकता आणि एकनिष्ठता,” तिच्या कपाळावर “चांगले विचार आणि नम्रता.” तिच्या सुंदर डोळ्यांखाली काजळाची रेख हळूवार रेखाटावी, तशी अक्षरे, “सत्य हेच सौंदर्य.” आणि “सौंदर्य हेच सत्य.”
नाकावर – “परतत्त्वाच्या चिरंतनाची जाणीव देणाऱ्या जगाचे आभार.”
वरचा ओठ – “परदुःख दूर करणारे शब्द वापर.”
खालचा ओठ – “दुःखाला वाट देणारे शब्द नसतील तर, शरीर अवयवातून पाझरून ते व्यक्त करते."
गळा – “दुसऱ्यांसाठी जगाल तर, आयुष्य जगलात.”
“प्रत्येक दिवस म्हणजे दुसरी संधी असते.”
“जगातील सर्वांत सुंदर गोष्ट, जी स्पर्शीली जात नाही वा दृष्यही नसते, ती हृदयाला जाणवावी लागते.”

त्या कोलाजचा अर्थ त्याला उमगू लागला आणि तो अधिक उत्सुकतेने ते चित्र न्याहाळू लागला. त्या दरम्यान दोन चित्र विकली गेली आणि तिने त्यावर sold चा स्टिकर लावला हे त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिले होते. बहुतेक ती सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तटस्थपणे पाहत होती. कारण तो त्या चित्रासमोर अर्धा तास उभा होता आणि त्या दरम्यान त्यांच्या नजरा मिळाल्या होत्या आणि ती हसली होती. खरे तर त्याला त्या म्हणींचा अर्थ सुधाकरला तीला विचारावयाचा होता, पण कोणी न कोणी सतत मध्येच येत होते आणि तिच्याशी बोलत होते.

जेव्हा ती मोकळी झाली, तो तत्परतेने हसत पुढे गेला. त्याच्या मनातील उत्कट विचार तिला वाचता येईनात आणि अभावितपणे ती प्रसन्नतेने हसली. आणि तिच्या हसण्याचा अर्थ त्याला समजून आला. ती, तिचे चित्र आणि त्याने मनात उकललेले चित्राचे रहस्य! तिच्या दृष्टीने तो खरा रसिक होता की कलावंताच्या अंतरंगात शिरून गूढता शोधून काढली होती. इतकेच नव्हे तर ती गूढता त्याच्या चेहऱ्यावरील भावावरून तिला जाणवली. तो तिला पाहून म्हणाला, “तुम्ही खरोखर महान कलाकार आहात.” ती कसेनुसे हसली आणि म्हणाली, “एखाद्या कलाकाराला दाद देणाऱ्याला कलाकाराचेच हृदय असते.”

प्रदर्शनाची वेळ संपत आली होती आणि त्या चित्राखालील किंमत कदाचित प्रेक्षकांना जास्त वाटली असावी. कारण “Essence of life" चित्र लोकांना आवडूनही विकले गेले नाही. ती त्याच्याशी बोलत आपले सामान आवरू लागली. “दोन पेंटिंग्ज पहिल्याच दिवशी विकली गेली होती आणि हे मात्र नाही विकले गेले नाही, पण तुम्हाला हे फार आवडले असे वाटते." ती हसत म्हणाली. “तुम्ही या चित्रासमोर अर्धा तास उभे होतात हे मी पाहिले सुद्धा." तिच्या चेहऱ्यावर मोकळे हसू सावलीत आलेल्या उन्हासारखे एकदम पसरले.
“तुमच्या चेहऱ्याकडे पाहून हे चित्र विकले गेले नाही त्याबद्दल तुम्हांला फार दुःख वगैरे झालेले असे काही वाटत नाही." सुधाकर म्हणाला आणि ती खो खो हसत मनमोकळेपणाने मान मागे वळवून फार जोराने हसली.

“आय एम सुधाकर. जरा वेळ असेल तर चला आपण मस्तपैकी कॉफी घेऊ या.” तिने एकदम विचार करत असल्यासाखे करत सिरियस चेहरा केला आणि सुधाकर थोडा गोंधळला. जर तिला नाही म्हणायचे असेल ती नाही म्हणेल असाही विचार मनात आला. तिने पेंटिंग काळजीपूर्वक गुंडाळले आणि एकदम हसत तिने आपला हात पुढे केला. "आय आम आरती भाटे." गुड टू मीट यु टू." सुधाकरने हात पुढे करून शेकहॅण्ड केला. “चलो, लेट्स हॅव कॉफी."

दोघे तिच्या चित्रकलेच्या सामानाची धोकटी, न विकले गेलेला कॅनव्हास, तिची भली मोठी खांद्यावर लटकती शबनम, असे लटांबर घेऊन नजीकच्या हॉटेलमध्ये शिरले. केक्स, कॉफी येईपर्यन्त तिने त्याला विचारले, “मुंबईत कोठे राहता?”
“मी मुंबईत इंटरव्ह्यू साठी आलो."
त्याला मधेच थांबवून तिने विचारले, "मग मिळाली का नोकरी?" सुधाकरला हसू आले. “मी IIT तून Astrophysics मध्ये M.Sc. करणार आहे आणि इंटरव्ह्यू चांगला झाला."
ते ऐकताच तिच्या भुवया वर झाल्या, “अरे वा, तुम्ही खूप हुशार असाल या बद्दल शंकाच नाही. माझ्या मनांत पुष्कळ ऍस्ट्रोफिजिकल प्रश्न आहेत ज्याला काही उत्तरे मिळाली नव्हती."

सुधाकर हसत म्हणाला, “मी तुमच्या प्रश्नाला जमेल तशी उत्तर देऊ शकतो पण प्रथम तुम्ही मला सांगा या कवितेचा अर्थ “We are the bees of the invisible. We wildly gather the honey of the visible in order to store it in the great golden hive of the Invisible."? मला विचार करूनही पूर्ण अर्थ उमगला नाही."
“ओके, आय विल एक्सप्लेन : सर्वप्रथम, ही कविता विसाव्या शतकाच्या सुरूवातीस जर्मन भाषेचे कवी रेनर मारिया रिल्के यांनी एक मित्राला पत्रात लिहिली होती. आयडिया थोडी कॉम्प्लेक्स आहे पण थोडा विचार केल्यावर तू उमजू शकतोस अर्थ. रिलके यांनी आपल्या कवितांनद्वारे आध्यात्मिक आणि नैसर्गिक जगाच्या अभ्यासानुसार त्यांनी ऐहिकता, मानवी अस्तित्व आणि जीवन आणि मृत्यू यांच्यातील संबंधांचे प्रश्न हाताळले. १९२५ मध्ये आपल्या पोलिश भाषांतरकर्त्याला लिहिलेल्या पत्रात इंग्रजीत असे लिहिले आहे की: “It is our task to imprint this temporary, perishable earth into ourselves so deeply, so painfully and passionately, that its essence can rise again “invisibly,” inside us. We are the bees of the invisible. We wildly collect the honey of the visible, to store it in the great golden hive of the invisible.”
आरतीने सांगितलेले शब्द आणि त्यातून उमगलेला अर्थ थोडा स्पष्ट झाला आणि सुधाकर लहान प्रवचन द्यायला तयार झाला.
“रिल्के या म्हणीत जे म्हणतात त्याला एक सायकोलॉजिकल अर्थ आहे आणि तो हा की, आपण मधमाशींसारखे, समूहात किंवा समाजात राहतो आणि आपल्या सामूहिक संवादातून निर्माण झालेले अनुभव, ज्याला रिल्के ‘हनी’ म्हणतो ते अनुभव आपण आपल्या मेंदूत, आठ्वणींद्वारे साठवून ठेवतो ज्याला रिल्के golden hive म्हणतो आणि ते invisible यासाठी आहेत कारण आपल्या सर्व आठवणी फक्त आपणच अनुभव करू शकतो पण त्या आठवणी ज्या भाषेत लिहिल्या आहेत ती भाषा फक्त आपल्या मेंदूला समजते आणि एका अर्थाने आठवणी व्यतिरिक्त काही जीवनात उरत नाही."
“अरे वा, किती सुंदर शब्दात तू समजावले आणि अगदी सायकॉलॉजिस्टसारखा." आरती म्हणाली, "तू मला भौतिकशास्त्राच्या संबधी सांग, जर आपण आणि सर्व विश्व हे अणू आणि अणूंच्या समूहांनी बनले आहे, तर एक्साक्टली काय होते आहे आणि त्यात माणूस सतत, क्षणोक्षणी, इकडून तिकडे जात आहे आणि जे हे अणूंनी बनलेले विश्व आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणजे हे एक अदृष्य असे विश्व आहे."
सुधाकरला तिचा प्रश्न बरोबर समजला आणि तिला समजावयाला तो म्हणाला, “हो, हे शाश्वत जग जसे दिसते तसे नाहीय, कारण हे अणू मूलतः परमाणूनी बनले आहेत आणि हे परमाणू सतत कंपन करत असतात आणि त्या कंपनांद्वारे व्हर्चुवल परमाणू एका लहान क्षणासाठी प्रगट होतात आणि अदृश्य होतात."

त्या नंतर दोघे फार वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांसारखे विश्वाची उत्पत्ती कशी आणि का झाली आणि विश्व निर्माण झाले, त्या पूर्वी काय होते या बद्दल चर्चा करत राहिले. पुन्हा एक कॉफी आली आणि केक मागविला गेला आणि वेळ इतका लवकर संपला की साडे आठ वाजले. सुधाकर स्वप्नात असल्यासारखा बोलत गेला. “मी पेंटींग्ज पाहण्यासाठी इथल्या काही आर्ट गॅलऱ्या, जहांगीर आर्ट गॅलरी, मिरचंदानी द लॉफ्ट, कुलाबा एटीएट...पण इथे फार यावेसे वाटले तुमच्या चित्रांमुळे आणि इथेच रेंगाळलो. तसा मी परभणीचा! वास्तविक मी हेच क्षेत्र निवडणार होतो, पण घरची परिस्थितीस धरून केवळ याच कलेवर नाही जगता येणार किंवा आईवडिलांना सुखी करता येणार,” तो थांबला. त्याला वाटले आपण पटकन बोलून गेलो.
“आरती, तुमचे कोलाज भावले जास्त. काय अफाट कल्पनाशक्ती दिसलीय सांगू! अगदी डेलिकेट पोएटीक, उत्कट आणि सर्वांच्या पलीकडचा अर्थ शोधणारे....”
“अगबाई, इतकं का आहे त्यात? जसं स्फुरलं, ते करत गेले आणि आर्टवर्क तयार झाले.” ती जास्त भावूक होऊन बोलली. मग का कोण जाणे तिचा आवाज थोडा उदास वाटला त्याला. “पण ह्या चित्राला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे खरे, तरी पण हे चित्र मी माझ्या अंतरंगातून काढले होते.”

“तुम्हांला थोडे वाईट वाटलेले मला दिसलेच, पण मला हे फार आवडले पाहताक्षणीच, मी विद्यार्थी आहे अन् याची पूर्ण किंमतही देऊ शकत नाही.” तिने त्याचा हात आपल्या हातात धरून म्हटले, “काही हरकत नाही. तुला हे इतके आवडले असेल तर, मी तुला हे बक्षीस दिले म्हणून समज. घेशील ना? एक आर्टिस्ट रसिक म्हणून?”

ती हसली. तिचे हसणे निर्मळ, मोकळे वाटले. दोघांचे डोळे डबडबले. वाचा मुकी झाली, स्पर्श अधिक बोलके झाले होते. क्षणभरच! तिने आपले हात झटकन सोडवून घेतले. “माझे वडील साधे गिरणी कामगार होते. परळच्या चाळीत राहणारे. पण त्यांच्या कष्टाने मी कमर्शिअल आर्टचा डिप्लोमा केला. डिझायनर म्हणून काम करते आणि पेंटींग्जची प्रदर्शने कधी कधी. आज ते माझे यश पाहायला नाहीत खरे. पण तू केलेले कौतुक लाख मोलाचे आहे आणि मला प्रोत्साहन देणारे आहे. यापुढे आपण भेटू वा न भेटू, पण तुझी आर्टबद्दलची आसक्ती कधीच विसरणार नाही. उलट ही आठवण मला जन्मभर संजीवन देईल, माझे क्षितिज विस्तारण्यासाठी. आणि मी तुला भेटू शकले, हे माझे नशीब."

सुधाकर मूक झाला आणि त्याने तिच्या दोन्ही हात धरून निरोप घेतला.
तिने पॅक केलेले ‘कोलाज’ त्याच्या हातात ठेवले आणि क्षणार्धात एका टॅक्सीतून ती निघूनही गेली. तो तिच्या जाण्याच्या दिशेकडे चकित होऊन केवळ पाहतच राहिला. डोळे भरून.
पुन्हा दिसेल न दिसेल या व्याकुळतेने!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान लिहिलंय!
कविता व कोलाजचं वर्णन आणि एकंदर मांडणी खूपच छान यापुढे बारीक सारीक चुका क्षम्यच..