अनमोल भेट!

Submitted by अक्षय समेळ on 29 October, 2021 - 02:21

उत्साह अमृततुल्य आज नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. चहाचे कप इथून तिथे नाचत होते, पोहे आणि उप्पित चा वास परिसरात घमघमट होता.

अनिरुद्ध आपल्या चहाचा आस्वाद घेत असताना त्याचे लक्ष एका चिमुरडी कडे गेले. ती सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात होती; कोणीतरी आपल्याला काही मदत करेल असा आर्विभाव तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. कर्दमलेले केस, मळकट चेहरा, व फाटलेले कपडे पाहून अनिरुद्धला तिची दया आली. शेवटी अनिरुद्ध ने तिला जवळ बोलावले.

"तुला भूक लागली आहे का? काही खायला हवे का?" अनिरुद्ध ने त्या चिमुरडीला विचारले. त्यावर तिने नुसतीच होकारार्थी मान हलवली.

"राजू, एक पोहे दे!" अनिरुद्ध ने राजुला पोह्यांची ऑर्डर दिली. पोहे नेहमीप्रमाणेच तयार असल्याने राजुने लगेच गरम पोह्यांची प्लेट अनिरुद्ध ला आणून दिली. अनिरुद्ध ने ती लगेच त्या चिमुरडीला दिली आणि तो आपल्या मोबाईल मध्ये खेळ खेळण्यात गुंग झाला.

"दादा, मला थोडा चहा मिळेल का?" चिमुरडीच्या आवाजाने अनिरुद्ध ची तंद्री भंग पावली.

"अरे राजू, हिला जरा एक कटिंग दे!" अनिरुद्ध ने पुन्हा राजुला ऑर्डर दिली आणि ऑफिस ची वेळ झाल्यामुळे त्याने काउंटरवर बिल भरले आणि तिथून निघणार इतक्यात त्याला काय झाले काय माहित त्याने त्या चिमुरडी च्या हातात एक ₹१० नोट दिली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा अनिरुद्ध ला ती चिमुरडी भेटली. पुन्हा तोच नित्यक्रम. असे तीन दिवस सतत घडले. चौथ्या दिवशी मात्र ती अनिरुद्धला अजिबात दिसली नाही आणि असेच चार पाच दिवस गेले. अनिरुद्ध ने ही त्याचा फार विचार केला नाही. पण एकेदिवशी ती मुलगी त्याला पुन्हा दिसली. आज ती त्याला थोडी वेगळी वाटली कारण आज चक्क तिने आपल्या केसांची व्यवस्थित वेणी फणी केलेली शिवाय थोडे चांगले कपडे घातलेले. ती आज जरा चांगली दिसत होती. तिचा हा बद्दल अनिरुद्धला अपेक्षित नसल्याने त्याला खूप आश्चर्य वाटले.

अनिरुद्धला बघताच ती त्याच्याजवळ आली आणि मंद स्मित करत तिने आपल्या पिशवीतून एक कागद बाहेर काढला आणि अनिरुद्धला दिला. त्यावर अनिरुद्ध चे एक खूप सुंदर चित्र काढले होते आणि त्या खाली अक्षता हे नावं लिहले होते व त्या खाली कालची तारीख लिहली होती. अनिरुद्ध काहीच बोलत नाही आहे हे पाहून चिमुरडी ने बोलायला सुरुवात केली.

"दादा, हे चित्र माझ्याकडुन तुला छोटीशी भेट. हे मी स्व:ता काढले आहे. तू त्या दिवशी मदत नसती केलीस तर ते शक्यच झाले नसते. तू दिलेल्या पैशांनी मी काही कॅस्टेल च्या पेन्सिल्स आणि काही आयव्हरीचे कागद घेतले आणि जवळच असलेल्या त्या शंकराच्या मंदिराच्या बाहेर लोकांना चित्र काढून देऊ लागले. लोक आपल्या मर्जीने पैसे देत होते त्यामुळे थोडी कमाई होऊ लागली त्यातून मी अजून थोडे मला लागणारे चित्रकलेचे साहित्य विकत घेतले. आता मला पुन्हा कुणाकडे हात पसरायला लागणार नाहीत. पण तू त्यावेळी मला जी मदत केलीस ती मी कधीच विसरणार नाही. तू माझ्यासाठी देवमाणूस आहेस. मी आता मुबईला जाणार आहे तिथे खूप कमाई होईल."

एवढे बोलून तू जाऊ लागली आणि अनिरुद्ध फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शांतपणे बघतच राहिला.

- अक्षय समेळ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users