हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये राजश्री प्रॉडक्शनची स्वतंत्र ओळख आहे. नेहमीच्या मारधाडपटांहून आगळे चित्रपट निर्माण करणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबरीने सुश्राव्य संगीतमय चित्रपट अशीही त्यांची ओळख आहे. आरती या त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून हा संगीतमय चित्रपटांचा सिलसिला सुरू आहे. दोस्ती पासून त्यांना साथ मिळाली ती लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांची. एल-पींना पहिला हीट चित्रपट हा दोस्तीच्या स्वरूपात राजश्रीकडूनच मिळाला. १९७२ च्या पिया का घर पर्यंत एल-पी राजश्रीच्या चित्रपटांना संगीत देत होते.
१९७३ मध्ये राजश्रीने अजून एका नविन संगितकाराला संधी देण्याचा निर्णय घेतला. हा संगितकार पुढे बरीच वर्षे राजश्रीबरोबर राहिला आणि त्याने बर्याच हीट चित्रपटांना संगीत दिले. हा चित्रपट होता सौदागर आणि संगितकार होते रविंद्र जैन. जन्मतः अंध असणार्या रविंद्र जैन यांची प्रतिभा त्यांच्या पालकांनी ओळखली होती. लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. असे रविंद्र राजश्रीकडे दाखल झाले आणि सौदागर मध्ये त्यांनी नूतन करता एक से एक गाणी दिली. सजना है मुझे, तेरा मेरा साथ रहे अशी गाणी गाजली. एका वेगळ्याच विषयावर असलेला हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे लोकांच्या लक्षात राहिला.
त्यापुढे रविंद्र आणि राजश्रीने गीत गाता चल आणला. सचिन - सारीका असे ताजे चेहरे आणि रविंद्र जैन यांचे संगीत या बळावर हा चित्रपट चांगला चालला. गीत गाता चल, श्याम तेरी बन्सी ही गाणी प्रसिद्ध झाली. या चित्रपटात रविंद्र जैन यांनी संगिताबरोबर गाणी लिहीण्याचीही जबाबदारी पार पाडली. पुढे १९७६ मध्ये चितचोर आला. यातली चारही गाणी प्रसिद्ध झाली. गोरी तेरा गांव बडा प्यारा हे गाणे तर अजूनही लोकांच्या मनावर भूरळ पाडून आहे. येसुदास हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध या चित्रपटामुळे झाला. त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. राजश्रीला अजून एक हीट चित्रपट मिळाला. रविंद्र आणि राजश्री यांचे असे हीट नाते सुरू राहीले ते पुढील अखियोंके झरोंखोंसे मध्ये. पुन्हा एकदा सचिन असलेल्या चित्रपटात १९७८ मधले नंबर वन असलेले गाणे अखियोंके झरोंखोंसे होते.
थोड्या खंडानंतर रविंद्र आणि राजश्री पुन्हा एकत्र आले ते नदिया के पार मध्ये. सचिनचा हा चित्रपट १९८२ मध्ये सुपर हीट होता जो सुरज बडजात्याने हम आपके है कौन म्हणून परत आणला. यातले कौन दिसा में लेके चला रे बटोहिया, गुंजा रे चंदन ही गाणी प्रसिद्ध झाली आणि अजुनही जनतेच्या मनात घर करून आहेत. माधुरीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले ते राजश्रीच्याच अबोध चित्रपटामधून आणि १९८४ च्या या चित्रपटाला रविंद्र जैन यांनीच संगीत दिले होते.
त्यानंतर राजश्री आणि रविंद्र वेगळ्या वाटांनी गेले. राजश्री ने सुरजबरोबरचे काही हीट चित्रपट राम-लक्ष्मण यांच्याबरोबर केले. रविंद्र जैन यांनी रामायण मालिकेला संगीत दिले आणि ते भक्तीगीतांमध्ये रमले. त्याचबरोबर त्यांनी राज कपूरच्या राम तेरी गंगा मैली, हीना अशा चित्रपटांनाही संगीत दिले.
मैं प्रेम की दीवानी हूं नंतर सुरजला जरा राजश्रीच्या धाटणीचा चित्रपट काढायचा होता तेव्हा त्याने परत रविंद्र जैनांना बोलावले आणि २००६ मध्ये विवाहचे संगीत रविंद्र जैनांनी दिले. काही अपयशानंतर राजश्रीला विवाहच्या रूपाने एक हीट चित्रपट मिळाला. मिलन अभी आधा अधुरा, मुझे हक है, दो अनजाने अजनबी सारखी गाणी प्रसिद्ध झाली. अमृता राव आणि शाहिद कपूरच्या करीयरला एक उठाव मिळाला.
राजश्रीच्या कौटुंबिक चित्रपटांकरता रविंद्र जैन यांचे संगीत एकदम चपखल होते त्यामुळे त्या दोघांनी एक सफल सफर केली आणि प्रेक्षकांना सुश्राव्य गाण्यांची मेजवानी दिली.
एकत्र चित्रपट -
सौदागर १९७३
गीत गाता चल १९७५
चितचोर १९७६
अखियोंके झरोकोंसे १९७८
नादिया के पार १९८२
अबोध १९८४
विवाह २००६
Mbhure मस्त माहिती.
Mbhure मस्त माहिती.
Pages