नवदुर्गेचे स्मरण करु

Submitted by कविन on 10 October, 2021 - 05:54

चल चल सखये पूजन करु
नवदुर्गेचे स्मरण करु

त्रिशूळधारीणी रुप जिचे
त्या, शैलपुत्रीचे स्मरण करु
हिमालयाच्या पुत्रीला या
प्रथमेला चल नमन करु
चल चल सखये पूजन करु

तपस्विनी हे रूप जिचे
ब्रह्मचारिणी नाव तिचे
सखे रुप हे द्वितियेचे
त्या रुपाचे स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

माथ्यावरती चंद्र जिच्या
त्या, दशभूजेचे स्मरण करु
चंद्रघंटा नाव असे तीज
तृतियेला चल नमन करु
चल चल सखये पूजन करु

कूष्मांडा रुप सृजनाचे
तिच्यात सारे विश्व वसे
चतुर्थीला या रुपाचे
स्मरण करुनी नमन करु
चल चल सखये पूजन करु

कमळासनी जी विराजमान
पंचमीला या तिचाच मान
स्कंदमाता नाव जिचे
शुभ्रवर्णी हे रूप तिचे
या रुपाचे स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

चतुर्भूजा रूप षष्ठीचे
कात्यायनी हे नाव तीचे
अर्थ काम नि धर्म मोक्ष हे
प्राप्त होतसे तिच्या कृपे
या रुपाचे स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

चतुर्भूजा त्रिनेत्री देवी
रूप असे हे कालीचे
महासप्तमी स्मरण करावे
असुरविनाशी मातेचे
या रुपाचे स्मरण करू
चल चल सखये पूजन करु

करुणामयी ही मुर्त लाघवी
रूप अष्टमी गौरीचे
शिवसखयेचे स्मरण करावे
होते क्षालन पापाचे
महाअष्टमी मातेच्या या
रुपाचे चल स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

सिद्धीदात्री तू, सरस्वती तू
रूप तुझे हे नवमीचे
अष्टौसिद्धी प्राप्त होतसे
फलीत तुझ्या हे पुजेचे
अधिष्टात्री ही, या देवीचे
चल नवमीला स्मरण करु
चल चल सखये पूजन करु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर....