भाद्रपदाचे कवतिक

Submitted by पुरंदरे शशांक on 3 October, 2021 - 22:24

भाद्रपदाचे कवतिक

रंगपिसारा उघडून देई
श्रावण वेडा अवखळ भारी
हाती येता रंग ढगांचे
भाद्रपदाची खुलते स्वारी

मधेच ओली उन्हे तळपती
सर सर थिरके थेंबघुंगरु
क्षणात लपते उन सोनेरी
पानाकाठी जरा झुरमुरु

कडेकपारी रंग उमलले
माळरान झोकात सळसळे
भिरभिरती रंगांचे अवघे
थवे चमकती रेशिमकवळे

उन्हे तापूनी जरा विसावी
गर्द तरुच्या तळात थोडी
मेघ अडविती किरणांना त्या
डोंगरातुनी येत गडबडी

सरता पाऊस बघे मागुता
पापणकाठी हळवे पाणी
पुन्हा उचलूनी टाके पाऊल
पायवाटीची झुळझुळ गाणी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम वर्णन आणि शब्दांचा योग्य वापराने काव्य अतिशय समर्पक झालंय... खूप छान लिहिता! लिहित रहा!