माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - भरत - भरत.

Submitted by भरत. on 26 September, 2021 - 15:22

या विषयावर मी लिहीन असं मला वाटलं नव्हतं. पण मनीमोहोर यांचा लेख वाचला आणि काही गोष्टी आठवल्या, म्हणून लिहितोय. या रूढार्थाने बकेट लिस्ट नसतील कदाचित. काही गोष्टी तर अशा आहेत, की अशी उद्दिष्टे ठेवायची असतात हे माहीतही नव्हतं.

तर पहिलं. मी नोकरी करत असताना फायनान्शल प्लानिंग, रिटायरमेंट प्लानिंग इ. शब्द आतासारखे सहज आणि वरचेवर कानावर पडत नसत ; अगदी वित्तसंस्थेत काम करीत असूनही . एकदा एका सहकार्‍याचं पाहून १००% बेसिक पे पी एफ मध्ये टाकायला सुरुवात केली. तेव्हा आमचा पी एफ आमचीच संस्था मॅनेज करीत असे आणि १४ % व्याज मिळत असे. हे पुढल्या पे रिव्हिजनपर्यंत करता आले. पुढे व्याज दर थोडे कमी झाले तरी पॉवर ऑफ कंपाउंडिंग काम करीत होतीच. या शिवाय टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS आणि येणार्‍या प्रत्येक इक्विटी योजनेत थोडेफार पैसे टाकायचे असं सुरूच होतं. २००३ मध्ये आमच्याकडे VRS आली. कर्मचार्‍यांचं सरासरी वय चाळिशीच्या आत असल्याने त्याला VSS - Voluntary separation scheme असं नाव दिलं होतं. मी पहिल्याच दिवशी फॉर्म भरून टाकला. जितकं सेपरेशन पॅकेज मिळणार होतं तितकाच पैसा पी एफ मध्येही जमा झाला होता. अशा प्रकारे कुठलाही विचार न करता आणि मुद्दाम न ठरवून माझा रिटायरमेंट फंड जमला होता.

स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काही काळ स्वतःला जगापासून तोडून घेतलं होतं. काम करायची संधी असूनही ती घ्यावीशी वाटली नव्हती. मग जवळपास दहा वर्षांनी आपल्याला आवडणारं काही तरी काम करायचं ; पैशासाठी नाही, असा विचार आला. volunteer service बद्दल शोधलं असता
NGOs साठी एकत्रित प्लाटफॉर्म अशा एका संकेतस्थळावर वर आमच्या भागातल्या एका संस्थेची underprivileged मुलांसाठी मराठी आणि हिंदी शिकवणारी व्यक्ती Tutor पाहिजे अशी नोंद दिसली. त्यांना इमेल पाठवून दिलं. मग " हे उगाच केलं . आपल्याला झेपायचं नाही. ही जुनी नोंद आहे. त्यांना आतापर्यंत शिक्षक मिळाले असतील. उत्तर नकोच यायला." असे मनाचे खेळ सुरू झाले. पण ईमेलला उत्तर आलं. मी जाऊन भेटून आलो. आमच्या जवळच्याच कॉन्हेंट शाळेशी संलग्न ऑर्फनेजमधल्या मुलांसाठी त्यांना ट्युटर हवे होते. तिथे जाऊ लागलो ; आठवड्यातले पाचही दिवस दोनदोन तास. दहावीच्या मुलांच्या व्हेकेशन क्लासनेच सुरुवात झाली. आधी फक्त मराठी मग नववीचं गणितही शिकवायला लागलो. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं असलं तरी इंग्रजीतून गणित शिकवायला काही अडचण आली नाही. फक्त जॉमेट्री बॉक्समधल्या काही वस्तूंची नावं मुलांनाच विचारायला लागायची. मी दिलेल्या परीक्षांचे निकाल पाहताना झाली नाही अशी धाकधूक दर वर्षी मुलांचे एसेसीचे निकाल पाहताना व्हायची. हायलाइट्स - माझ्या दुसर्‍या वर्षात नववीच्या मुलांना दुसरी टर्म अर्धी संपल्यावर गणितही शिकवायला घेतलं. सामान्य गणित जे शाळेत अजिबात शिकवलं जायचं नाही, बीजगणित- भूमिती घेतलेल्या मुलांची शिकवणी आणि ज्यांचे बेसिक्स पक्के नाहीत त्यांना तेही असं शिकवत त्या वर्षी नववीतून दहावीला १२ मुलं गेली. नेहमी ५-७ मुलंच असत.
बोर्डाच्या कृपेने का होईना, त्या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागला नाही तरी बोर्डिंगचा मात्र कायम १००% असे. पण एक खंत म्हणजे बहुतेक मुलांना मराठीत सगळ्यांत कमी गुण असत. बहुतेकांच्या बेस्ट ऑफ फाइव्ह मध्ये मराठीचे गुण नसत.

माझ्या लक्षात आलं की अनेक मुलांची अक्षर ओळखही नववीपर्यंत पक्की नसते. वजाबाक्या, भागाकार करता येत नाहीत. माझ्या तिथल्या सातव्या वर्षी मी सहावीचा वर्ग घेऊन एक टर्म फक्त अक्षर ओळख , बाराखडी पक्की करणं, वाचता आणि ऐकून लिहिता येणं आणि पाचवीपर्यंतचं अंकगणित करून घेतलं.
मग सेव्हन इयर इच प्रत्यक्षात आली आणि माझं तिथे जाणं थांबलं.
आधी ही मुलं पुढे काय करतील अशी मला त्यांची काळजी वाटे. पण आता ती काय काम करतात हे कळतं तेव्हा आनंद होतो, अभिमानही वाटतो. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या सुरुवातीच्या महिन्यांत माझ्या पहिल्या बॅचच्या एका मुलाने मला दुबईहून फोन केला. NCHMCT मधून अ‍ॅडमिशन मिळवून नामांकित संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आज तो तिथे पोचला होता. कोणाकडून तरी माझा फोन नंबर त्याने मिळवला. दहावीत असताना त्याने माझ्याशी व इतरही शिक्षकांशी वाद घातले होते. (आमच्या वेळी याला उलट उत्तर देणं म्हणत.) "सर, तुम्ही (अनेकवचन) आमच्यासाठी किती काय केलं. आज आम्ही जे काय आहोत , ते तुमच्यामुळे!" असं सिनेमानाटकपुस्तकातलं वाक्य मला प्रत्यक्षात ऐकायला मिळालं.

समाजाचं काही देणं अंशतः तरी उतराई होण्याची इच्छा अशा प्रकारे पुरी करता आली.

आता मनिमोहर यांच्या लेखामुळे ज्याबद्दल मला लिहावंसं वाटलं ती इच्छा. मुलांना मराठी शिकवता शिकवता आपणही मराठीचा पुढचा अभ्यास करायला हवा असं वाटू लागलं. पण त्याबद्दल जरा नंतर.

व्यवस्थित नोकरी लागल्यानंतर पुढे शिकायची आणि त्याहून परीक्षा द्यायची गरज आणि इच्छा बहुतेकांसाठी तरी संपलेल्या असतात. ( आता कदाचित हे वाक्य भूतकाळातच लिहावं लागेल.)
तर मी नोकरी मिळेपर्यंत काय करायचं म्हणून icwa चा कोर्स करत होतो. इंटर झालं होतं. त्या जोरावर इथे अनेकांचा डोळा असलेला अकाउंट्स सेक्शन मिळाला ( आणि शेवटपर्यंत मानगुटीवर बसला) पण इंटर केलंय तर फायनल ही करायचंच होतं. इंटरचे विषय बी कॉमपेक्षा फार वेगळे नव्हते. पण फायनलला कॉस्ट ऑडिट हा एक पेपर होता. त्यात त्या वेळी त्यांच्या टेक्स्टबुक मधले प्रश्न कमी आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठीच्या ऑडिटवरच प्रश्न अधिक होते. या पेपरात मला दहा गुण मिळाल्याचं आठवतंय. आयुष्यातला सगळ्यात कमी स्कोर. यासाठी त्यांनी वेगवेगळी बुकलेट्स काढली होती असं कळलं. शिवाय या परीक्षेत एकेक पेपर सुटला असं होत नाही. एका ग्रुपमधले सगळे पेपर एकत्र पास व्हावं लागत असे. प्रत्येक विषयात किमान ३५ पण सगळे मिळून किमान ५०% असं पासिंग होतं. पण आणखी एकच प्रयत्न लागला.

पुढे आमचं सेक्शन वर्ल्ड ट्रेड सेंटरला हलवलं गेलं. IIB (आता IIBF) चं ऑफिस शेजारीच आर्केड मध्ये होतं. त्यामुळे मेंबरशिप घ्यावी असं वाटलं. परीक्षेचा फॉर्म भरला. सुट्टी घेतली आणि लोळून घालवली. फक्त दोनच पेपर दिले . त्यात अकाउंट्सच्या अभ्यासाची मला फार गरज नव्हती. फक्त तेवढाच सुटला. कॉमर्स शिवाय इतर शाखांचे लोक इथेच अडकून राहयचे.
इथेही पासिंगचे ५०% गुण. पण एकेक विषय सोडवायची सोय होती. मग मेकर टॉवरमधल्या त्यांच्या लायब्ररीतून इतर विषयांच्या नोट्स विकत घेतल्या. त्या सायक्लोस्टाइल केलेल्या असत. पण त्यामुळे ऑफिसला जातायेता ट्रेनमध्ये उभ्याउभ्याही वाचता येत. असा अभ्यास करून सुटीच्या भानगडीत न पडता दोनदोनच पेपर देत पार्ट १ पार पडला.

मग पार्ट २. बँकांतल्या लोकांना असलेल्या विषयापेक्षा वेगळे विषय आम्हा म्युचुअल फंडवाल्यांसाठी होते. . त्यातले काही मी ICWA च्या वेळी अभ्यासले होते. यातला आमच्या संस्थेच्या कामकाजाबद्दलचा पेपर तेवढा दिला. मग इंदूरला बदली झाली. रिझल्ट तिथेच कळला. तिथे पहिला ग्रुप पास झालेला एक सहकारी होता. माझ्या पास होण्याचा त्यालाही आनंद झाला कारण त्याला आता सोबत होती. तिथे दुसरं कोणी ही परीक्षा द्यायला तयार नव्हतं.
इथेही जसे जमतील तसे पेपर देत चार प्रयत्नांत गंगेत घोडं न्हालं. पण चक्क आमच्या पहिल्या - UTI & Mutual Funds या पेपरला एकदा गटांगळी खाल्ली. शेवटच्या वेळी निकाल ivrs वरून ऐकल्याचा आठवतोय.
परीक्षेला वर्गात आम्ही दोघेच असू. आणि अर्थात पर्यवेक्षक. माझे सगळे पेपर सुटले पण सहकार्‍याचे दोन पेपर राहिले होते. ते देताना तर तो एकटाच होता. पर्यवेक्षकाने त्याला चहा दिला म्हणे!
आय आय बीचं स्थानिक पातळीवर काम चालवायला एक कमिटी होती. त्यात वेगवेगळ्या बँकांचे लोक असत. मी कोर्स करतोय म्हटल्यावर माझी तीत वर्णी लागली. कोरम भरण्यापलीकडे काही करायचं नव्हतं.

अरे हो! या तीनही परीक्षांची मला एकेक इन्क्रिमेंट मिळाली आणि त्याने सेपरेशन पॅकेजमध्ये फरक पडला.

२००० नंतर अ‍ॅम्फीने डिस्ट्रिब्युटर्ससाठी परीक्षेचा नियम काढला. एम्प्लॉयीज् सुद्धा ही परीक्षा देऊ लागले.. NCFM ची ही MCQ based परीक्षा ऑनलाइन आणि त्यात निगेटिव्ह मार्किंग पासिंग ६०. पेपर सबमिट करताच निकाल कळत असे. आमचा ब्रँच मॅनेजर आधीच मुंबईला जाऊन परीक्षा देऊन आला. एके रविवारी इंदूरमध्ये परीक्षा होणार असं ठरलं. एक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिस्ट्र्यूट त्यासाठी बुक झाली होती. इतर मॉड्युलची परीक्षा देणारेही होते. आमच्या ऑफिसमधले दोघे सकाळी परीक्षेला गेले . त्यांचा निकाल ऐकून आम्हा इतरांना टेन्शन आलं. त्यात कनेक्टिव्हिटी मुळे आमची वेळ पुढे ढकलली जात होती. ऑफिसमध्येच टाइमपास चालला होता. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायची सवय असल्याने मी मात्र सगळ्या गदारोळात पुस्तकात डोके खुपसून होतो. शेवटी संध्याकाळी सगळ्यांचे नंबर एकदमच लागले. माझ पेपर सोडवून झाल्यावर मी एकदा तपासून पाहिला आणि सबमिट् करायला म्हणून तिथल्या पर्यवेक्षकाला बोलावलं. तोवर त्या बॅचमध्ये कुणीच पेपर सबमिट केला नव्हता. सबमिट करताच काही क्षणांतच निकाल आणि मार्क कळले. आणि कसं कोण जाणे मी पेपर सबमिट केलाय हे सगळ्या रूमला , विशेषतः माझ्या कलीग्जना कळलं. आमचा मॅनेजर , जो सगळ्यात जास्त टेन्स होता, त्याने एक सिगरेट ब्रेक घेतला होता ; खोलीच्या दुसर्‍या टोकापासून माझ्यापर्यंत पोचला. माझा निकाल कळल्यावर इतरांचीही भीड चेपली व त्यांनीही पेपर सबमिट् केले. सकाळी बसलेले दोघे सोडले तर सगळे पास झाले होते. एजंट लोकही परीक्षेला असल्याने आणखी कोणी फेल झालं असतं तर ते लाजिरवाणं वाटलं असतं.
काही दिवसांनी NCFM च्याच Capital market module लाही बसलो. पण इथे थोडक्यात हुकलं.

आता जरा भरकन पुढे म्हणजे शिकवता शिकवता मला मराठी शिकायची हुक्की आली त्याबद्दल. लगेच मुंबई विद्यापीठाच्या IDOL ला बी ए प्रवेश घेतला. तीन विषय घ्यावे लागतात म्हणून मराठीच्या जोडीला इकॉनॉमिक्स आणि एज्युकेशन घेतले.
आता परीक्षा देताना वेगळ्याच समस्या. आतापर्यंत लिहायची , ट्रेन प्रवासाची सवय सुटली होती. काही काही कॉलेजांतल्या लहानशा बाकांवर बसून पाठ अवघडायची. तोवर चाळिशी लागली होती. मी बायफोकल काँटॅक्ट लेन्स वापरायचो. तर लिहिताना पेपर डोळ्यांच्या जास्तच जवळ असे. पहिलं वर्षं झालं. दुसर्‍या वर्षी तीन विषयांचे प्रत्येकी दोन पेपर अधिक फाउंडेशन कोर्स आणि एक अ‍ॅन्सिलरी सब्जेक्ट म्हणून अ‍ॅडव्हर्टायझिंग. पण या दोहोंचे पेपर इतर पेपर असलेल्याच दिवशी सकाळी होते. एका दिवशी दोन पेपर देणं शक्य नाही, म्हणून त्यांना दांडी मारली आणि मार्कशीटवर पहिल्यांदा केटी पाहिली. ( प्रोफेशनल एक्झाम्सना किती अटेंप्ट उरलेत असं छापून यायचं. ) ते ऑक्टोबर मध्ये सुटले.

टी वायला मुख्य विषय कोणता किंवा कोणते दोन घ्यायचे हे ठरवायचं होतं.
मराठीसाठी मी गाइड वगैरे न वाचता, अभ्यासक्रमाला लावलेलं मूळ पुस्तक = साहित्यकृती वाचायचो. त्यासंबंधी काही पुस्तकं मिळाली तर ती. इथे मुंमग्रंसंचा उपयोग झाला. मी दोन्ही वर्षांच्या उत्तर पत्रिकांच्या फोटोकॉपीज मागून घेतल्या होत्या. त्यावरून आणि मार्कांवरून परीक्षकांना काय अपेक्षित आहे ते मला कळलेलं नाही, इतकं समजलं होतं. एका पेपरमध्ये परीक्षकाकडून मी नापास झालो होतो. मॉडरेटरने दयाबुद्धी दाखवून वर ढकललं होतं.
मग टी वायला इकॉनॉमिक्सचेच सहा पेपर द्यायचे असं ठरलं. बी कॉम , ICWA , IIB तिन्हीतही इकॉनॉमिक्स होतं. पण ते इथे सेकंड
इयरपर्यंतच पुरलं. IDOL चं स्टडि मटेरियल वाचताना मला त्यातला चुकाच खुपत राहात. मग त्यात दिलेली काही रेफरन्स बुक्स विकत घेतली. परदेशी लेखकांनी लिहिलेली टेक्स्टबुक्सही किती सुंदर असतात ते बी कॉम करतानाही मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सायकॉलॉजीच्या वेळी पाहिलं होतं.
इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सची पुस्तकंही हॅरी पॉटर सिरीजसारखीच रंजक वाटली.

नोकरी करत नसलो, तरी नेहमीच्या व्यापांतून अभ्यासाला वेळ काढणं सोपं नव्हतं. पण इथे चीटिंगची चांगली सोय होती. पेपर पॅटर्न असा होता की तुम्ही निम्मेच किंवा कोणतेही पाच चॅप्टर्स, सेक्शन्स केले तरी चालणार होतं. मग सेक्शनमध्ये कमी पानं आणि समजायला सोपे कन्सेप्ट्स या निकषांवर निवड केली. सेकंड इयरपर्यंत खूप नवा अभ्यास नव्हता, त्यामुळे नोट्स काढल्या नाहीत. ग्राफ्स इ. सराव न करताच परीक्षेत
काढता आले याबद्दल आपल्याच स्मरणशक्तीचं कौतुक वाटलं. पण आता अभ्यास IDOL च्या स्टडी मटेरियलवरून नव्हता . त्यामुळे लाँग बुक्स विकत घेऊन नोट्स काढल्या. किती वर्षानी शाईची पेनं वापरली.
परीक्षा झाली. यथावकाश निकाल लागला. फर्स्टक्लास थोडक्यात हुकला होता. मन थोडं खट्टू झालं. IDOL सगळ्या परीक्षार्थींचा निकाल नंतर एकत्र पी डी एफ मध्ये पब्लिश करतं. त्यात पाहून कळलं की पाचसहा जणांनाच माझ्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते.
या वयातही कॉम्पिटिटीव्ह स्पिरिट उफाळून आलं. बेटरमेंट ऑफ ग्रेड्स साठी पुन्हा परीक्षा दिली. माझ्या मते पेपर मागच्या वेळपेक्षा चांगले गेले होते. पण निकाल लागला तेव्हा इन व्हॅलिड असा काही रिमार्क होता. मग डिटेल्ड निकाल आल्यावर कळलं की मागच्या वेळपेक्षा एकूण मार्क कमी मिळाल्याने इनव्हॅलिड. ज्यात गणिती प्रॉब्लेम होते त्याच स्कोरिंग पेपरला आता गुण कमी झाले होते.
दहावी नंतर सायन्स करायचं नाही म्हणून कॉमर्सला गेलो. तेव्हा अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट असले काही प्रकार नव्हते. कॉमर्सला गेलो म्हणूनच बोलणी खाल्ली होती. त्यामुळे आर्ट्सचा विचारही शक्य नव्हता. पण आता एका आवडत्या विषयाचा अभ्यास करता आला. घेतलेली सगळी टेक्स्टबुक्स अजून आहेत. ऑप्शनला टाकलेले चॅप्टर्स वाचायचे आहेत.
आता इतिहासाचा असाच अभ्यास करायचा आहे . संस्कृत शिकायचं आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजून घ्यायचं आहे.

सध्या परिस्थितीच रोज परीक्षा घेते आहे आणि इथे कोणताही प्रश्न ऑप्शनला टाकायची सोय नाही , त्यामुळे हे सगळं पुढे कधीतरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जबरीच ! वॉलंटीयरींग आणि शिक्षण दोन्हीचे अनुभव प्रेरणादायी आहेत !

( रच्याकने, मी आजच विचार करत होतो की गणेशोत्सवात तुम्ही आजिबात दिसला नाहीत. सगळं ठिक आहे ना म्हणून.. त्यामुळे हा लेख दिसल्यावर लगेच वाचून काढला. )

छान लिहिलंय भरत. मुलांना शिकवणे आणि स्वतः शिकणे दोन्ही भारी!
माझ्याही मनात परवाच आलेलं भरत गणेशोत्सवात नेहेमी सगळीकडे असतात, यावेळी सुरुवातीला दिसले आणि मग गायब झाले. हा लेख बघून छान वाटलं.

भरत, फारच सॉलिड लिस्ट आहे.मला आदराने एकदम सुन्न व्हायला झालं.स्पेशली ज्या सर्व इकॉनॉमिक्स आणि फायनान्शियल गोष्टी मला कळत नाहीत त्यात अश्या परीक्षा बिरीक्षा पास केल्याचं वाचून.
शेवटचं वाक्य वाचून काळजी वाटली.जी काही अडचण असेल ती लवकर दूर होवो ही सदिच्छा.

वा, छान. आता पुढे हे शिकायचं आहे/ते शिकायचं आहे म्हणणार्‍यांविषयी मला आदर, कौतुक, असुया वगैरे वाटते.

प्रेरक प्रवास आहे, हॅट्स ऑफ!
परिस्थितीची परिक्षा देखील फ्लाइंग कलर्सनी उत्तीर्ण होणारच तुम्ही ही शुभेच्छा आणि खात्री आहे.

_/\_ अगदी कौतुकास्पद आहे! फक्त शिक्का हवा म्हणून शिकणारे अनेक असतात. बेटरमेंट ऑफ ग्रेड साठी प्रयास करणे खरंच कौतुकास्पद आहे.

इतके वेगवेगळे विषय अभ्यासता वाचून आनंद झाला.
आणि आणखी उद्दिष्टे ठेवली आहेत वाचून आणखी आनंद झाला.

माझ्या लक्षात आलं की अनेक मुलांची अक्षर ओळखही नववीपर्यंत पक्की नसते. वजाबाक्या, भागाकार करता येत नाहीत. माझ्या तिथल्या सातव्या वर्षी मी सहावीचा वर्ग घेऊन एक टर्म फक्त अक्षर ओळख , बाराखडी पक्की करणं, वाचता आणि ऐकून लिहिता येणं आणि पाचवीपर्यंतचं अंकगणित करून घेतलं.

मग शाळेत मुलांचं काय चालतं?? -तर हात धुणे, खिचडी खाणे.
आणि शिक्षकांचं काय चालतं? - खिचडी शिजवणे आणि सतत मरगळलेले इंटरनेट वापरून फॉर्मस पाठवत राहिणे.

((शाळांसाठी काहीही समांतर अभ्यास काढूच नये हे माझे मत.))
--------
------
Idol - ची पुस्तके, चुका आणि लेखन. सहमत.
२०१९ पासून मान्यता काढून घेतली आहे. वेबसाईट तिथेच थिजली आहे.
पुस्तकांची पाने निघत राहतात.
--------
Ignou - जोरात आहे.
-----------

तुमचे विविध प्रकारचे प्रतिसाद वाचल्यावर प्रश्न पडायचा की हे काय करतात. ते आता समजले.
-------
लिहिते राहा. आवडलं. तुम्ही कोणत्या कंपूत शिरत नाही हे आवडतं.

अतिशय प्रांजळपणे लिहिलं आहे.
काॅलेज लाईफ मधून बाहेर पडल्यावर नोकरीच्या काळात एवढ्या परीक्षा देणं सोपं नाही.
तुमच्या चिकाटीचं कौतुक..

खरंच कौतुकास्पद आहे.
इतिहासाचा असाच अभ्यास करायचा आहे . संस्कृत शिकायचं आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजून घ्यायचं आहे.>>>>> _/\_

शेवटच्या वाक्यांसाठी मी अनुशी सहमत.

भरत , मी तर एकच दिली caiib ची पण नोकरी संभाळून आणि नंतर ही किती परीक्षा दिल्यात तुम्ही ? कमाल आहे. ग्रेट च आहात.

ते शिकवण्याचं ही खूप आवडलं. बहुतेक जण काही तरी करीन म्हणतात पण कोणी करत मात्र नाही. तुम्ही करून दाखवलंत.

सध्याच्या तुमच्या कसोटीच्या काळात ही तुम्ही यशस्वीपणे पास व्हाल ही शुभेच्छा. आणि वेळात वेळ काढून हे लिहिलत म्हणून थॅंक्यु.

Btw तुम्ही uti मध्ये होतात का , तस असेल तर जास्त जवळीक कारण ती rbi चीच बेबी

मस्त लिहीलय. तुम्ही नेमकं रिटायर कधी आणि का झालात ते माहीत नव्हतं. अशी न ठरवता अचानक रिटायरमेंट म्हणजे जबरदस्त धाडस. मी किती विचार, जमवाजमव, नी काय काय केलं होतं वर्षभर.
मस्त भारी इच्छा तुमच्या आणि पूर्ण करायची जिद्द पण. असं काही शिकायचं, परिक्षा द्यायची वगैरे प्रकार करणारे मला लय भारी लोक वाटतात.

स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरचा फारच प्रेरणादायक प्रवास आहे तुमचा. आदर्श व्यक्तिमत्वात आणखी एकाची भर पडली.

वरच्या सगळ्या प्रतिसादांना मम. तुम्ही किती सहजपणे हे सगळं सांगताय. खुप कठीण आहे अशा परीक्षा विद्यार्थीदशेतून बाहेर पडल्यावर देणं. तुम्हाला मानलं खरंच. _/\_
तुमच्या बकेटलिस्ट मधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.

कौतुक वाटले.
यापुढे कधी नव्या आयडीची गरज भासली तर जिद्दी हा आयडी घ्यावा ही एक आगाऊ सुचवणी ! Happy Light 1

वरच्या सगळ्या प्रतिसादांना मम. तुम्ही किती सहजपणे हे सगळं सांगताय. खुप कठीण आहे अशा परीक्षा विद्यार्थीदशेतून बाहेर पडल्यावर देणं. तुम्हाला मानलं खरंच. _/२२१११११

छान लेख..!
एका ठराविक काळानंतर अभ्यास करायचा कंटाळा येतो...
तुम्ही जिद्दीने हा प्रवास पूर्ण केलात त्यासाठी अभिनंदन..!
खूप प्रेरणादायी आहे हा प्रवास..
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुम्हांला..!!

खूप छान भरत.
तुमची बकेट लिस्ट वाचून मलाही माझा शैक्षणिक प्रवास लिहायचा मोह होतोय.

Pages