साधारण २००७-०८ च्या सुमारास पुण्यात आशय सांस्कृतिक तर्फे निलायम टॉकीजजवळ पाथफाईंडर नावाचं पुस्तकांचं दुकान होतं, तिथे ‘बदलत्या काळात दिवाळी अंकाचं भविष्य’ अशा स्वरूपाच्या विषयावर चर्चसत्र झालं होतं. डॉ. अनिल अवचट आणि अजून बरीच मंडळी बोलणार होती. डॉ.अवचट माझे अगदी आवडते लेखक. म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले होते. तिथे मायबोलीतर्फे बोलायला कोणीतरी आलं होतं. त्यांनी ‘मायबोलीचा डिजिटल दिवाळी अंक निघतो. जगभरातले लोक तो वाचतात. दिवाळी अंकांचं हे भविष्यातलं रूप असेल’ असं मत मांडलं.
घरी येऊन तातडीने हे ‘मायबोली’ प्रकरण आहे तरी काय? ते शोधलं आणि मला अक्षरशः खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. तेव्हा अर्थातच जुनी मायबोली होती. आत्ताच्या मायबोलीपेक्षा बरीच वेगळी रचना होती. रोज वापरून त्याचा सराव झाला आणि मला मायबोलीचं व्यसन लागलं. वाचायची आवड तर होतीच. प्रस्थापित नसलेल्या लेखकांचं उस्फुर्त लिखाण वाचण्यात मी रमायला लागले. हळूहळू आपल्याला ज्यांचं लेखन आवडतं अशा मंडळींची नावं लक्षात राहायला लागली आणि त्यांचं काही नवीन लिखाण आलं असेल तर आवर्जून वाचलं जाऊ लागलं.
मी तेव्हा माझं स्वतःचं आर्किटेक्टचं ऑफिस चालवत होते. साईट, क्लाएंट, परवानग्या, कॉन्ट्रॅक्टर, लेबर एक ना दोन सतरा भानगडी असायच्या. घरच्या अजून वेगळ्याच. त्या सगळ्या धांदलीत मायबोली म्हणजे विसावा वाटायचा. ते दिवस घरच्या आणि बाहेरच्या आघाडीवर इतके धावपळीचे होते की नवीन मैत्र जोडून त्या मैत्रीला जे खतपाणी घालावं लागतं, वेळ द्यावा लागतो, तो देणं अशक्य होतं. मायबोली त्या दृष्टीनेही सोयीस्कर होती. वेळ असेल तेव्हा वाचावं, नाही तेव्हा सोडून द्यावं. बहुतेक म्हणूनच मी कुठल्याच ‘गावच्या गप्पांवर’ रमले नाही. पुणेरी पुणेकर किंवा कोल्हापूरच्या वाहत्या पानावरच्या पोस्ट वाचायचे पण लांबून. तेच बरं वाटायचं. मी आयुष्यात कधी काही लेखन करेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं. त्यामुळे मी कितीतरी दिवस वाचनमात्र किंवा मायबोलीच्या भाषेत सांगायचं तर ‘रोमात’ असायचे. त्यामुळे लिखाण आवडलं तर त्याची लिंक कोणाकोणाला पाठवायचे पण प्रतिक्रिया देत नसे. कारणं दोन. एकतर मराठी टाईप करता येत नव्हतं आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या मंडळींची एकमेकांशी ओळख असणार, आपण कुठे त्यात घुसायचं? असं काहीतरी वाटत असे.
मग २०११ च्या आसपास रैना, शैलजा आणि त्यांच्या मैत्रिणी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकला जाउन आल्या आणि रैनाने त्याचं फार सुंदर वर्णन लिहिलं. त्यात ती मुलीला घरी ठेवून ट्रेकला गेल्यामुळे तिला कसा ‘अँटी हिरकणी सिंड्रोम’ झाला होता, असं लिहिलं होतं. त्याच दरम्यान मी मुलाला घरी ठेवून महिन्याभराची कैलास-मानसची यात्रा करून आले होते. तेव्हा जे काही वाटलं होतं त्याला इतकं चपखल नाव रैनाने दिलं होतं, की त्याला दाद देण्यासाठी मी मायबोलीचं सदस्यत्व घेतलं. माझं खरं नाव ‘अपर्णा’ टाईप करता आलं नाही म्हणून ‘अनया’ नाव घेतलं. असं नाव असतं की नाही, ह्याचीही कल्पना नव्हती. सध्या अनया नावाच्या बऱ्याच लहान मुली दिसतात, तेव्हा गंमत वाटते.
कैलास-मानसच्या यात्रेनंतर माझा मोठा भाऊ वर्णन लिहिण्यासाठी खूप आग्रह करत होता. त्याच्या एका भेटीत त्याने मराठी टायपिंग कसं करायचं ते शिकवलं. त्याची भुणभुण थांबवण्यासाठी मी दोन-तीन पानं लिहिली. त्याला, अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवली. हे माझे लिखाणाचे प्रयोग इथेच थांबणार, ह्याची खात्री होती. पण त्यांना सगळ्यांना आवडलं (असं ते म्हणाले तरी!!) म्हणून घाबरत-बिचकत मायबोलीवर पहिला भाग आणला. अपलोड करण्याची मारामारी कशीबशी संपवली आणि धावतपळत साईटवर गेले. तिथून निघताना भावाचा मोबाईलवर फोन आला. ‘तुझ्या लिखाणावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. लवकर घरी जा आणि बघ’. मला तो क्षण अजून लक्षात आहे. तेव्हापासून लिखाणाचा जो चस्का लागला की अजून लिहितेच आहे. कल्याणच्या खाडीवर पोहताना केलेली गंमत तरंगायचे दिवस, पिंढारी ट्रेक, अमेरिकेतली रोड ट्रीप. खूप कायकाय. सगळ्या लिखाणाचं मायबोलीच्या मंडळींनी खूप कौतुक केलं. चिनुक्स, ललिता-प्रीती ह्यांच्या प्रोत्साहनाने दिवाळी अंकात लेख आले. इथल्या एका लेखनस्पर्धेत लिहिलेल्या लेखाला चक्क बक्षीसही मिळालं. माझे कैलास-मानसचे लेख वाचून तीन मायबोलीकर कैलास-मानस यात्रेला जाऊन आले, हे पण माझ्या दृष्टीने मोठं बक्षीस मिळाल्यासारखंच आहे.
मी मायबोलीवर आले ते वयाने साधारण चाळिशीची असताना. तोवर माझी वाद-विवाद घालणे, आपलं मत दुसऱ्याला पटवून देणे ही सगळी खुमखुमी जिरलेली होती. त्या सगळ्यापासून मी कटाक्षाने लांबच राहिले.
मायबोलीवर तेव्हा ‘ध्यासपंथी पाऊले’ टाकणारी बरीच मंडळी होती. निरनिराळ्या शाळांना, संस्थांना मदतीचा हात देण्यात मायबोलीकर पुढे असायचे. ‘बुधवार पेठेतल्या एका शाळेत स्पोकन इंग्लिश शिकवायला स्वयंसेवक हवेत’ असं आवाहन आलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिथला शिक्षक वर्ग ती शाळा चालवत होता. तितक्याच खडतर परिस्थितीतील मुलं तिथे शिकत होती. मी तिथे एक वर्ष जात होते. मुलं माझ्याकडून काही शिकली की नाही, कोणास ठाऊक. पण मी मात्र खूप काही शिकले. एक अत्यंत हृद्य असा अनुभव माझ्या पोतडीत जमा झाला. तोपर्यंत मी मायबोलीवरच्या फार कोणाला प्रत्यक्ष भेटले नव्हते. तिथे अकु, साजिरा, मुग्धमानसी, शैलजा अशा मंडळींशी ओळख झाली.
पंचवीस वर्षे मायबोली हे संस्थळ चालवणे, त्याचं व्यवस्थापन सांभाळणे, त्यात कालसुसंगत बदल करणे हे शिवधनुष्य पेलणाऱ्या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन आणि आभार
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
बदल तर बरेच झाले. मुख्य पानांची रचना बदलली. लिहिणारे, प्रतिक्रिया देणारे बदलले. काही जण नाराज होऊन, काही रागावून गेले. काही का गेले ते कळलं नाही, पण त्यांच्या लिखाणाची कमतरता जाणवते. लेखनस्पर्धा, दिवाळी अंक थांबले. संयुक्ता बंद झाल्याचं फार वाईट वाटलं होतं. संयुक्ता बखरही आता बघता येत नाही.
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
इथे लिखाण करायला जो मोकळेपणा आहे, तो फार आवडतो. आपल्याला हव्या त्या विषयावर, आपल्या पद्धतीने लिखाण करायची मुभा आहे. माझ्यासारख्या अनेक हौशी लेखन करणाऱ्यांना ही सोय फार महत्वाची आहे. आपलं लेखन कोणाला तरी दाखवायचं, मग त्यांना आवडलं तर ते स्वीकारणार. हा सगळा लांबचा रस्ता टाळून आपलं लिखाण वाचकांसमोर आणता येतं.
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
असं काही लक्षात येत नाहीये.
- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
मायबोलीने मला खूप काही दिलं. नवीन-नवीन वाचायला मिळालं. इथे लिहिलेल्या रेसिपीज वाचून मी नवे पदार्थ शिकले. खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या. आपल्याला लिहिता येतं हा शोध मायबोलीमुळे लागला. लिखाणामुळे नवीन ओळख तर मिळालीच, शिवाय विचाराच्या कक्षा रुंदावल्या, असं म्हणता येईल.
- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
मी मायबोलीला फार काही दिलं असं वाटत नाही. काहीशा संकोची स्वभावामुळे गणेशोत्सव किंवा दिवाळी अंकासाठी स्वयंसेवक म्हणूनही काम केलं गेलं नाही, ह्याची काहीशी खंत वाटते.
- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
माझं पहिलंच लिखाण म्हणजे कैलास-मानस यात्रेचं वर्णन, कल्याणच्या खाडीवर पोहण्याचे अनुभव ‘तरंगायचे दिवस’ गाजलं. मी खूप उशिरा पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्या लेखालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
माझं लिखाण सरळ-साधं असतं. शक्यतो ते कोणाला टोचू नये, असा प्रयत्न मी करते. त्यामुळे मी कुठल्याच लेखांनी मायबोलीकरांना गांजलं नसावं!!
मस्त आढावा घेतला आहेस. तुझ्या
मस्त आढावा घेतला आहेस. तुझ्या दुसऱ्या डावातल शिक्षण ह्या लेखाने फारच प्रभावित झाले होते मी.
संयुक्ता बखर काय आहे? मी -
संयुक्ता बखर काय आहे? मी - https://www.maayboli.com/user/28443 - संयोजक_संयुक्ता , येथे जाउन जुने लेख वाचत असते.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
तुझं नाव वाचलं की 'तरंगायचे दिवस' आठवुन ताबडतोब क्लिक करुन काही तरी छान वाचायला मिळेल असं कायम वाटतं. सगळे व्याप सांभाळुन घेतलेल्या शिक्षणाचा लेखही आठवतो. कैलाय यात्रा ही आवडलेला. पण तरंगायचे दिवस मी अॅक्टिव्ह झाल्याच्या वेळीच आला म्हणुन असेल, कल्याणचा म्हणुन असेल, किंवा खरंच चांगला असेल.. फार्फार आवडलेला.
खूप छान लिहीले आहे. 'अँटाय
खूप छान लिहीले आहे. 'अँटाय हिरकणी सिंड्रोम' बद्दल वाचलेले नव्हते. त्याचा उल्लेख केल्याने आत्ता तो शब्द कळून मौज वाटली.
>>>>>पंचवीस वर्षे मायबोली हे संस्थळ चालवणे, त्याचं व्यवस्थापन सांभाळणे, त्यात कालसुसंगत बदल करणे हे शिवधनुष्य पेलणाऱ्या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन आणि आभार
+१००१
खूप मस्त लिहिलंय! तुमचे
खूप मस्त लिहिलंय! तुमचे 'तरंगायचे दिवस' वाचून 'आहाहा' झालं होतं! तुम्ही बऱ्याच वर्षांनी परत शिक्षण घेतलंत त्याबद्दलही मस्त लिहिलं होतंत. अलीकडे शेतीबद्दलपण लिहिलंय ना?
सुरुवातीला लिहिलं आहे ते
ह्या सगळ्या मंडळींची एकमेकांशी ओळख असणार, आपण कुठे त्यात घुसायचं? असं काहीतरी वाटत असे. >>> मलापण असंच वाटायचं.
अनया, छान आढावा घेतलास.
अनया, छान आढावा घेतलास. बहुतेक सगळे लेख वाचलेत .... आवडलेत!
सगळ्यात कौतुक वाटतं ते एवढ्या ग्याप नंतर घेतलेलं शिक्षण पण त्याहीपेक्षा शेतीच्या प्रयोगाचं!
मस्त लिहिलंय अनया. मी विचारच
मस्त लिहिलंय अनया. मी विचारच करत होतो की तुझा लेख कसा आला नाही ते.
माझी कैलास मानसची यात्रा तुझे लेख वाचूनच झाली .
तुझे बाकीचे लेख, प्रवासवर्णनही खूप आवडतात. लिहीत राहा.
छान लिहिले आहे. मी तर कैलास
छान लिहिले आहे. मी तर कैलास मानसरोवर कित्येकदा वाचलयं. शिवाय पिंढारी ट्रेक, आंबे विकण्याचा लेख , सेकंड इनिंग सगळेच वाचलेयं. मला तुझी शैली फार आवडते, सरळ आणि प्रसन्न वाटते.
छानच लिहिलंय. मायबोलीबद्दल
छानच लिहिलंय. मायबोलीबद्दल कसं कळलं याची तुझी स्टोरी आवडली; इतरांहून जरा वेगळी आहे.
मी 'तरंगायचे दिवस' आधी वाचलं; खूप आवडलं होतं. अनेकांना त्याच्या लिंक्स पाठवल्या होत्या. कैलास-मानसरोवर नंतर वाचलं.
सध्याचं तुझं शेतीविषयक लिखाणही मला आवडतं.
छान लिहीलयस
छान लिहीलयस
तरंगायचे दिवस आणि कैलास मानसरोवर आवडल होतं
तुमच्या इतर लिखणासारख च हे
तुमच्या इतर लिखणासारख च हे मनोगत पण अतिशय भावल...तुमचे सगळेच लेख आवडतात...प्रत्येक लेखातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं...
अनया, तुझें(तू म्हणतेय कारण
अनया, तुझें(तू म्हणतेय कारण लिखाणातून तू खूप जवळची वाटतेस.आपण लता, सचिन तेंडुलकर म्हणतो तसं.) पोहायचे, मानस सरोवर चे आणि शेतीचे लेख वाचते.शेतीच्या लेखांनी माझ्या मनातल्या बरयाच शहरी मिथ ब्रेक केल्या.
एम एस इ बी कनेक्शन चा किस्सा पण खरोखर सा.न.घालण्या सारखा आहे.
अजून खूप जास्त लिहित राहा.
ते पाथफाईंडर दुकान आठवलं.मस्त होतं.आता काय आहे तेथे?आम्ही 2008 पर्यंत बिबवेवाडीत राहायचो.तेव्हा हे दुकान, ते सारंग सोसायटी चे राउंड अप करून वडापाव ची संख्या बदलून देणारे श्रीकृष्ण वडापाव काका,डॉ सुमन बोरकर मॅडम,रिलॅक्स पावभाजी, तो एक नित्यानंद की काहीतरी नाव वाला नेट कॅफे वाला वगैरे बऱ्याच फेऱ्या व्हायच्या.
अनया, तुझे तरंगायचे दिवस मला
अनया, तुझे तरंगायचे दिवस मला फार आवडलेलं लेखन आहे. मुख्य म्हणजे तो भाग माहित असल्याने खूप रिलेट झाले होते. सुरेख लिहिलं आहेस.
हो पाथफाईंडर एकदमच पॉश,
हो पाथफाईंडर एकदमच पॉश, चकचकीत दुकान होतं. (स्वदेसमधे तेच आहे ना?)
तिथे पुलोत्सवाची तिकिटं आणायला मी गेले होते एकदा. 'आशय' च संयोजक असतात ना त्याचेपण. २००६ साली असणार. आणि एकदोनदा पुस्तक प्रदर्शन वगैरे होतं तेव्हा.
नेहेमीसारखेच छान लिहिलंयस.
नेहेमीसारखेच छान लिहिलंयस.
इतरांपेक्षा किती हटके कळलं तुला मायबोलीबद्दल!
तुझे तरंगायचे दिवस असो की कैलास मानसरोवर लेखाचा समारोप करताना जे लिहितेस ते एकदम खासम खास असतं.
आणि आपले शेतावर जायचे राहिलंय अजून
अनया खूप सुंदर स्वगत. मायबोली
अनया खूप सुंदर स्वगत. मायबोली शोध ते मायबोलीचे आभार छान लिहिले आहेत तुमच्या ओघवत्या लेखनशैलीत. कल्याणकर असल्यामुळे तुमचा तरंगायचे दिवस लेख खूप वेळा वाचला आहे आणि ईतरांनाही वाचायला दिला आहे. मस्त अनुभव कथन. प्रश्न-उत्तरे सुद्धा वाचनीय. खंत बाळगू नका. आवड आहेच तर सवड मिळेल तेव्हा स्वयंसेवक म्हणून जरूर भाग घ्या. काही जास्त व्याप नसतो. मुख्य संयोजकांना फक्त जमेल तशी मदत करायची. मुख्य संयोजक खूपच प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. मजा येते काम करायला.
अनया खूप आवडलेलं आहे तुझं
अनया खूप आवडलेलं आहे तुझं सगळच लिखाण. हे पण मस्त.
या उपक्रमांतर्गत तुझे मनोगत
या उपक्रमांतर्गत तुझे मनोगत वाचण्याची माझी फार इच्छा होती. मायबोलीवरच्या ज्या लेखकांचे लिखाण मी आवर्जून वाचते, त्यापैकी तू एक आहेस. कैलास-मानस यात्रेचं वर्णन तर फार्फार आवडलेलं.
तुझ्या ह्या लेखमालेवरून प्रेरणा घेऊन, मागच्याच महिन्यात मी आणि माझा नवरा दोघेच, RV घेऊन १० दिवस मस्त निवांत फिरलो. मुलंही त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांत व्यस्त होती आणि आमच्या कामांतून एव्हढाच वेळ काढू शकत होतो, पण जाम धमाल केली. अगदी कॉलेजमधील दिवस आठवले.
तुझा ब्लॉगही बुकमार्क करून ठेवलाय.
>>>माझं लिखाण सरळ-साधं असतं.>>> म्हणूनच ते प्रचंड भावतं. तुझ्या सर्व उपक्रमांना, भटकंतीस शुभेच्छा आणि लिहित रहा !
अनया फार छान लिहिलंस.
अनया फार छान लिहिलंस. तरंगायचे दिवस मला फार आवडलेली मालिका. कल्याण जवळ असल्याने आणि तू लिहिलेला परिसर लांबून का होईना माहिती असल्याने फार भावलेले सर्व.
अनया, तुझे "तरंगायचे दिवस" ३
अनया, तुझे "तरंगायचे दिवस" ३-४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचले तेव्हाच अतिशय आवडलेले.
आता पुन्हा तुझे लिखाण वाचून काढायची आठवण करून दिली या लेखाने.