माझं दुसऱ्या डावातील शिक्षण...

Submitted by अनया on 3 April, 2017 - 20:48

काही तीन-चार वर्षांपूर्वी मी आणि माझी एक मैत्रीण वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरलेलं एक चित्रप्रदर्शन बघायला जात होतो. दादर स्टेशनपासून वरळीला जाणारी बस प्रभादेवी भागातून जाते. तिथल्याच आर्किटेक्चर कॉलेजात मी माझं पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं होतं. त्या गोष्टीला साधारण वीस वर्षे उलटून गेली होती. त्या एकेकाळी सुपरिचित असलेल्या रस्त्याकडेच्या बैठ्या चाळींच्या जागी आता उंचच उंच इमारती आल्या होत्या आणि माझ्या डोक्यावरच्या दाट, काळ्या केसांच्या जागी विरळ, पांढरे केस!. सगळा परिसर किती बदलून गेला होता. कितीतरी नवे फ्लायओव्हर, नवी दुकानं, सगळा रागरंगच नवीन होता. तरी त्या भागातून जाताना जुन्या आठवणी उफाळून आल्या. त्या फुटपाथ वरून मी पाठीला सॅक आणि हातात ड्रॉइंग्जच भेंडोळं, मॉडेल्स, छत्री असा सरंजाम सावरत भराभर चालतेय, हे दृश्य डोळ्यासमोर आलं.

बरोबरची मैत्रीण पुणेकर. तिच्यापुढे मी माझं एकेकाळी मुंबईकर असणं मिरवत होते. 'हा रानडे रोड, ही शारदाश्रम शाळा. इथे तेंडुलकर शिकला. आता आमचं कॉलेज येईल' असं माझं धावत समालोचन चालू होतं. आमच्या कॉलेजचा स्टॉप आला. मी खिडकीतून बाहेर बघू लागले, तर तिथल्या टपरीवर चक्क माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असलेला मित्र चहा पिताना दिसला. मला वाटलं, आपल्याला भास होतोय की काय? डोळे चोळून पाहिलं तरी मित्र होता तिथे. म्हणजे भास नव्हता. कंडक्टरदादांनी डबल बेल मारायच्या आत मी त्या मित्राला जोरजोरात हाका मारल्या. त्याच लक्ष जाऊन त्याने हात करेपर्यंत बस सुरू झाली. पर्समधून मोबाईल काढून लग्गेच त्याला फोन लावला. 'अरे, तू काय करतो आहेस कॉलेजमध्ये?' ' अग, मी शिकतोय आपल्या कॉलेजमध्ये परत. पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय' मित्रानी धक्कादायक उत्तर दिलं!

हा मित्र आणि मी एकाच गावात राहायचो. पाच वर्षे एकत्र शिकलो. हा इतक्या उशिरा पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय करतोय? भारी! एव्हाना आम्हाला सगळ्यांना शिक्षण संपवून पुष्कळ वर्षे झाली होती. आपापल्या व्यवसाय किंवा नोकरीत सगळेच स्थिरावले होते. लग्न-कार्य होऊन मुलाबाळांच्या संसारात रमले होते. इतक्या वर्षानंतर हे काय सुचलं ह्याला? परत अभ्यास, सबमिशन्स, रात्र-रात्र जागरणं. ते पण काम-धंदा, घर-संसार सांभाळून! हिंमत आहे बाबा. पुण्यात गेल्यावर आमच्या बरोबर असलेल्या अजून एका मैत्रिणीशी पुन्हा ह्याच विषयावर गप्पा मारल्या. त्या गप्पांचंही सार 'आपल्याला नाही रे बाबा शक्य. एक डिग्री मिळाली खूप झालं. वगैरे वगैरे' हेच होतं.

गंमत म्हणजे ह्या प्रसंगानंतर एकाच वर्षात मी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला! मित्र शिकत होता, त्याच अभ्यासक्रमाला! डॉक्टरलोक म्हणतात, की रोगजंतू शरीरात शिरल्यावर इनक्युबेशन पिरियड नंतरच रोगाची प्रत्यक्ष लक्षण दिसायला लागतात. माझ्या बाबतीत हा इनक्युबेशन पिरियड एक वर्षाचा होता. रोगजंतू नक्की केव्हा शरीरात शिरले, ते कोणाला सांगता येत नसेल. मी मात्र ह्या वेडेपणाचे जंतू डोक्यात कधी शिरले, ह्याची तारीख, वार, वेळ, जागा सगळं सांगू शकते.

नुकतंच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तब्बल बावीस वर्षानंतर मी पुन्हा पाटीपुस्तक हातात घेतलं. त्याचीच ही गोष्ट:
खरं तर माझंही वरवर पाहता सगळं चांगलं चाललंच होत की. स्वतःच घर, स्वतंत्र व्यवसाय, बऱ्यापैकी हातावेगळा झालेला मुलगा. नवीन व्यवसाय सुरू केला, तेव्हा कामं मिळवण्यासाठी, मिळाली की ती धडपणे होण्यासाठी आणि पूर्ण झाली की पैशांची वसुली व्हावी, म्हणून खूप धावपळ करावी लागायची, सतत ताण असायचा. सगळी ओळ नीट लागेपर्यंत प्राण अक्षरशः कंठाशी यायचे. आता तेवढा त्रास व्हायचा नाही. अर्थात, प्रत्येक काम हा नवीन, वेगळाच अनुभव असतो. प्रत्येक ठिकाणी गरजा वेगळ्या असतात, नवनवे प्रश्नही उभे राहतात. पण ह्या सगळ्या प्रकाराची सवय झाली होती, काय अडचणी येऊ शकतात ह्याचा अंदाज आला होता म्हणा किंवा मी निगरगट्ट झाले होते म्हणा! कारण काहीही असलं, तरी कामं बहुतेकवेळा गुण्यागोविंदाने हातावेगळी व्हायची.

असं असताना मला हळूहळू ह्या सगळ्याचा कंटाळाच यायला लागला. रोज उठून त्याच साईट, तेच ठेकेदार, त्याच अडचणी. आपण डिझाइन करताना पाट्या टाकायला लागलोय अशी जाणीव व्हायला लागली. आपल्या डोळ्यासमोर असलेलं डिझाइन, प्रत्यक्षात येताना पाहणे, लोकांसाठी त्यांना आपली वाटतील अशी डिझाइन करणे, हा आमच्या कामातला सर्वात आकर्षक, सर्जनशील भाग. पण तोही आता सरावाचा झाल्यासारखा वाटत होता.

एक प्रकारचे औदासीन्य मनावर साठले होते. एकच दिवस आपण पुन्हापुन्हा जगतोय, असं काहीतरी वाटत राहायचं. ही सगळी मरगळ संपवावी, पुन्हा ताजतवान होऊन नितळ मनाने आयुष्याला भिडावं, ह्यासाठी काहीतरी अगदी वेगळं, अंतर्बाह्य हालवून टाकणारं करावं असं फार वाटत होतं.
तशी मी काही जन्मतः आर्किटेक्ट नाही. त्या क्षेत्राशी माझा प्रेमविवाह झालेला नाहीये. ते ठरवून झालेलं लग्न म्हणता येईल! पण सहवासाने प्रेम मात्र नक्की निर्माण झालं आहे. ज्या इमारती बांधल्या जातात, त्यात आर्किटेक्टची भूमिका फार कळीची असते. बांधकामाच्या भूमीपूजनापासून ते उद्घाटनापर्यंत त्याचा सहभाग असतो. असलेल्या मर्यादांमध्ये सर्व घटकांना समाधानकारक डिझाइन करणे, ते बांधकाम मजबूत, नियमानुसार व्हावं, ह्याची काळजी आर्किटेक्टनेघेणे अपेक्षित असते.

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक इमारती बांधणे आणि त्यासंदर्भातील चर्चा ऐकू येऊ लागल्या होत्या. मित्रानेही त्याच विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. जे डिझाइन आपण करतो, ते बांधत असताना आणि नंतर वापरत असताना पर्यावरणाची कमीतकमी हानी कशी होईल ह्याचा विचार करणे. वीज-पाणी-कचरा ह्या संदर्भात ही बांधकामे स्वयंपूर्ण होतील, ह्याची काळजी डिझाइन कागदावर असल्यापासून घेणे आणि त्यासंदर्भात सरकारी परवानग्या मिळवणे, ह्या आणि अश्या अनेक गोष्टी ह्या अभ्यासक्रमात येतात.

मारावी की काय उडी? असे विचार मनात घोळायला लागले. निर्णय मोठा होता.

अडचणी डोंगराएवढ्या होत्या. घरी नव्वदीच्या पुढचे सासरे, बारावीला असलेला मुलगा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा आणि त्यामुळे वारंवार प्रवास करणारा जोडीदार. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मी जे करणार होते, त्याची आवश्यकता स्वतःला पटणे! बसलेली घडी मोडावी की नाही हे ठरवणं फार कठीण होतं.

शिकत असताना कॉलेजला जाणे, अभ्यास करणे ह्यामुळे माझ्या कामासाठी कमी तास मिळणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे अमदानीही कमी होणार हेदेखील दिसत होतं. रोज अभ्यास करावा लागणार, सबमिशन्स असणार. बरोबर शिकणारे सगळे वयाने माझ्यापेक्षा खूपच लहान असणार. लहान म्हणजे किती, तर माझ्या लेकापेक्षा फक्त पाच-सहा वर्षांनी मोठे! पुन्हा माझा पदवीच्या शिक्षणाच्या आठवणी फारशा आनंददायक नव्हत्या.

तेव्हा मी कल्याणला म्हणजे अस्सल मुंबईकरांच्या दृष्टीने खेड्यात राहायचे. रोज कल्याण ते दादर प्रवास. त्यातच मी मेटाकुटीला यायचे. कॉलेजात सगळे इंग्लिशमध्ये बोलणारे. मी मराठी शाळेतली. मराठी वाचणारी, बोलणारी, मराठीतच विचार करणारी. कॉलेजमधल्या बाकी लोकांची भाषा, राहणी, विचार सगळंच वेगळं. मी तोपर्यंत सुरक्षित कोशात वाढले होते. सगळे मित्र-मैत्रिणी माझ्या घराजवळ राहणारे, बालवर्गापासून सोबत असलेले होते. इथे आल्यावर सगळंच हातातून सुटल्यासारखं झालं. एकदम नव्या वातावरणात मी पार बावचळून गेले. त्यातून अभ्यासही अगदी वेगळा. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, भाषा ह्यातलं काहीच नाही.

माझ्या जवळच्या कुटुंबात कोणीही अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलं नव्हत. ड्रॉइंग बोर्ड, टी स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर हे अवयव मला नवीन होते. आडव्या रेघांसाठी टी स्क्वेअर वापरतात आणि उभ्या किंवा तिरप्या रेघांसाठी सेट स्क्वेअर, हे कळायलाच मला बरेच दिवस लागले. 'तुझं ड्राफ्टींग फार वाईट आहे' असं माझे सगळे गुरुवर्य मला सदैव सांगायचे. पण चांगलं ड्राफ्टींग म्हणजे काय, हे कोणीच सांगितलं नाही. दुसऱ्या वर्षाला असताना आम्हाला 'बुटीक' डिझाइन करायला सांगितलं होतं. मला बुटीक म्हणजे काय? हेच माहिती नव्हत, तर मी ते डिझाइन काय करणार कपाळ? बरं, असं तोंड उघडून सांगायचा आत्मविश्वास मला अठराव्या वर्षी नव्हता. त्यामुळे कायमच मागे पडत गेले.

कदाचित बरेच जण माझ्यासारख्या परिस्थितीतून जात असतील. पण बारावीपर्यंत मी हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणली जायचे. शाळेत मी काही शिष्यवृत्ती, बक्षीस मिळवली होती, राज्य पातळीच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पण त्या सगळ्याला इथे काडीचीही किंमत नव्हती. म्हणून मला ह्या सगळ्याच जास्त वाईट वाटलं असेल. माझ्या बहुतेक सर्व शिक्षकांना मी नापास होणार ह्याची खात्री होती. तसं त्यांनी वारंवार माझ्या तोंडावर बोलूनही दाखवलं होत.

प्रत्यक्षात तसं काही झाल नाही. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि चिवट, कष्टाळू असण्याच्या गुणांच्या बळावर मी आर्किटेक्ट झाले. पण आपल्याला डिझाइन येत नाही, आपण कमी प्रतीचे आर्किटेक्ट आहोत, हा गंड जायला मात्र फार वर्षे लागली. माझे शिक्षक वाईट किंवा दुष्ट होते, असं मला म्हणायचं नाही. पण समोर येणारा प्रत्येक जण सारख्याच आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून येत नाही, हे त्यांना जाणवलं नसावं. नव्या वातावरणाला, नव्या आव्हानांना सामोरी जायला मीही कमी पडले असेन.

हे सगळं मी मनाच्या खोल खोल कोपऱ्यात लपवून, दडवून ठेवलं होतं. आता परत शिकायला सुरू करावं की काय? ह्या विचाराबरोबर ही सगळी भुतं माझ्या मनात नाचायला लागली. तेव्हा निदान वय तरी माझ्या बाजूने होतं. आता ह्या सगळ्या तरुण, आधुनिक मंडळींमध्ये आपलं परत हस होईल. आपल्याला 'नाही जमणार' असे नकारात्मक विचार पिंगा घालायला लागले.

त्या लहान वयातही 'आपली परिस्थिती बदलायची असेल, पुढे जायचं असेल, तर हे व्यावसायिक शिक्षण घ्यायला'चं' हवं,' हे कळत होतं. त्यामुळे कॉलेजात काहीही झालं, तरी ते मागे टाकण्याशिवाय तेव्हा पर्याय नव्हता. आपल्याला हे शिक्षण घेता यावं, म्हणून आई वडील किती कष्ट घेत आहेत, ही जाणीव तर होतीच होती.

आता सगळंच बदललेलं. नाही शिकले, तरी काही अडणार नव्हतं. माझं काम तर चालूच होतं. बरं, माझ्याच पैशाने शिकणार होते, त्यामुळे सोडून द्यावंस वाटलं, तरी कोणाला काही फरक पडणार नव्हता! वेळ माझा, पैसे माझे. मी कोणाला उत्तर द्यायचं कारणच नव्हतं. पण त्यामुळे शिक्षण सुरू करून मध्येच सोडून द्यायचा मोह झाला तर? मी समजा हे शिक्षण अर्धवट सोडलं, तर मुलाला 'शिक्षण म्हणजे काही गंभीरपणे करायची गोष्ट नाही. सुरु करून मध्येच सोडलं, तरी चालत. फार काही बिघडत नाही' असं वाटेल की काय? ह्या भीतीने त्याला एकदा गप्पा मारता मारता ही शंका विचारली. पण चिरंजीवांनी 'आई, मला असं काही वाटणार नाही. तू आधीच किती गडबडीत असतेस, ते मी रोज बघतोय ना. नाही जमलं तुला, तर सोड बिनधास.' असं म्हणून माझी तिकडूनही सुटका केली!

काम करताना, कामासाठी पुष्कळ गोष्टी शिकाव्या लागतातच. बांधकामाची तंत्र बदलतात. वेगवेगळ्या गावी बांधकामा संदर्भातले नियम वेगळे असतात. त्यांचा अभ्यास करावा लागतो. सुरवातीला आम्ही हाताने ड्रॉइंग्ज करायचो. नंतर संगणकावरच्या निरनिराळ्या सॉफ्टवेअरची मदत घ्यायला लागलो. सरकारी परवानग्या मिळवण्याची कला तर कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. ते अंगवळणी पडलं. ह्या बदलांचा कंटाळा नाही आला कधी. पण काम करण्यासाठी, काम करता करता शिकणं वेगळं आणि हे शिकण्यासाठी शिक्षण वेगळं !

शिकण्याच्या विचाराशी इतका पिंगा घातल्यावर 'निदान चौकशी तरी करूया', इथपर्यंत प्रगती केली. ऑनलाईन कोर्स किंवा दूरशिक्षण आपल्याला जमणार नाही, ह्याची मला खात्री होती. मी त्यासाठीची पुस्तकं आणि इतर सामान जमवलं असत. शेल्फवर छान लावून ठेवलं असत. पहिले थोडे दिवस शहाण्यासारखा अभ्यास केला असता, मग आता ह्या कामाची गडबड आहे, ते डिझाइन द्यायचाय, अमकी साईट बघायला जायचंय, घरी पाहुणे आहेत, बाहेरगावी जायचंय अशी १०१ हमखास यशस्वी कारणे देत त्या पुस्तकांकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं असत. थोडं वाईट वाटून झाल्यावर काही दिवसांनी ती पुस्तकं रद्दीत घातली असती!

त्यामुळे आपल्याला रीतसर कॉलेजला जायला पाहिजे, मानेवर जू आवश्यक आहे, ह्याबद्दल मला खात्री होती. कुठेकुठे शिकता येईल, ह्याचा अभ्यास करण्यासाठी आधी माझ्या कॉलेज-मित्राशी प्रदीर्घ चर्चा केली. मुंबईतल्या माझ्या कॉलेजमध्ये 'फक्त शनिवार-रविवार कॉलेज' असा कोर्स होता. ही कल्पना आवडली. पाच दिवस आपलं काम चालू ठेवता येईल, दोन दिवस मुंबईत जायचं. सोपा हिशोब होता. कल्याणला राहायची सोय होतीच. माहेरच्या गावी राहायची संधी मिळाली असती. नात्यातली-ओळखीची इतकी मंडळी कल्याण आणि परिसरात आहेत, की दोन वर्षे निरनिराळ्या घरांमध्ये जेवा-खायची सोय आरामात झाली असती!

दुसरा पर्याय होता पुण्यातल्या कॉलेजमध्ये जायचा. इथे रोज सकाळी ९ ते २ अशी वेळ होती. शनिवार, रविवार सुट्टी. म्हणजे ऑफिस, साईट, कार्पोरेशन वगैरे गोष्टी कॉलेज नंतरच्या उरलेल्या अर्ध्या दिवसात कोंबाव्या लागल्या असत्या.

ह्यावरही भरपूर विचार केला. पण मुंबईत लोकल ट्रेनच्या प्रवासाची एकेकाळी असलेली सवय सुटून बरीच वर्षे झाली होती. कल्याणला असलेलं घर, हा एक मुद्दा सोडला, तर काहीच जमेच्या बाजूला दिसेना. नवऱ्याला देशी-परदेशी प्रवास बऱ्याचदा करावे लागतात. त्यामुळे तो घरी नसण्याची शक्यता नेहमीच गृहीत धरावी लागते. त्याचबरोबर मदतनीस बायकांच्या अनुपस्थितीची शक्यताही! अशा परिस्थितीत घराची, सासऱ्यांची संपूर्ण जबाबदारी अठरा वर्षांच्या मुलावर आली असती. पुण्यातल्या कॉलेजमधून कुठल्याही क्षणी घर गाठणं सोपं होतं. 'घर आणि कॉलेजमधलं सहज पार करण्याजोगं भौगोलिक अंतर' ह्या फॅक्टरचा विजय झाला आणि मी पुण्यात शिकायचं नक्की केलं!

बारीक-सारीक गोष्टींची जाहिरात करायची सवय असल्याने ह्या निर्णयाचीही जाहिरात सुरू केली. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, कामासंदर्भातले लोक; सगळ्यांना सांगितलं. त्यांच्या नजरेत कौतुकापासून 'मॅडमच डोकं फिरलं आहे बहुतेक' असे सगळे भाव दिसायचे. अर्थात मी कोणाच्या मताप्रमाणे माझा निर्णय बदलणार नव्हते. त्यामुळे मला मजाच यायची.

उशिरा शिकण्याची परंपरा माहेरी, सासरी दोन्हीकडे होती. माझ्या वडिलांनी कल्याण-मुंबई रोजचा प्रवास, नोकरी, संसार सांभाळून एम.कॉम. पर्यंतच शिक्षण घेतलं होतं. सासूबाईंनी चार मुलं सांभाळून डी.एड. केलं आणि नंतर शाळेत नोकरीही. त्या दोघांच्या मानाने मला बऱ्याच सोयीसुविधा हातात होत्या. स्वतःच वाहन, स्वतःचा व्यवसाय, थोडे दिवस पैसे कमी मिळवले किंवा नाही मिळवले तरी भागेल अशी आर्थिक परिस्थिती वगैरे. घरची जबाबदारी होती. पण अवलंबून राहता येईल अशी मदतही हाताशी होती. मुलगा पुरेसा मोठा होता. त्याचा अभ्यास घ्यावा लागेल, त्याला मित्रांकडे खेळायला घेऊन जावं लागेल अशी परिस्थिती नव्हती.

बावीस वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा शिकण्याची कल्पना एकाच वेळी आकर्षकही वाटायची आणि भितीदायकसुद्धा! नापास झालेच तर कोणी हसेल अशी परिस्थिती नव्हती आणि कोणाला काय वाटेल, ह्याची काळजी करण्याचा स्वभावही. काय होईल ते होईल असं एकदा वाटायचं आणि काय उपयोग होणार आहे हे शिकून? असंही वाटायचं. उपयोग रुपया-पैशात व्हावा अशी अपेक्षा नव्हती. आपण करत असलेल्या कामाबद्दलच्या ज्ञानात भर पडावी अशी अपेक्षा होती. संगणकाची सवय झाल्यामुळे हाताने लिहिणेही जवळपास विसरायला झालं होतं. एकेकाळी करायचो तशी ड्रॉइंग बोर्डावर ड्रॉइंग करायची, हाताने मॉडेल्स बनवायची सवय मोडून वर्षानुवर्षे लोटली होती. तसं काही करावं लागणार नाही, ह्याची खात्री करून घेतली.

अश्या सगळ्या विचारांच्या झोक्यावर वरखाली केल्यावर निदान कागदपत्रे तरी जमवूया ह्या विचारापर्यंत येऊन पोचले. जन्म प्रमाणपत्रापासून ते मुंबई विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ असा बदल करण्यासाठी लागणाऱ्या मायग्रेशन प्रमाणपत्रापर्यंत कागद जमवले. एव्हाना चिरंजीवांचा बारावीचा निकाल लागून त्याच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशाचीही धावपळ सुरू होती. त्याच्या आणि माझ्या प्रवेशासाठी लागणारी निरनिराळी कागदपत्रे जमवणे, त्यांच्या प्रती काढणे आणि त्या साक्षांकित करून आणणे हे काम कितीवेळा केलं असेल, ह्याची काही गणती नाही.

मुलाची आणि माझी अॅडमीशन एका वेळेला असणे गमतीचेच होते! कॉलेज मधल्या मंडळींना मी माझ्या स्वतःच्या प्रवेशाच्या चौकशीसाठी आले आहे, मुलीच्या नाही अस प्रत्येकवेळी बजावावं लागत होत... माझ्या कोर्ससाठी प्रयत्न करणाऱ्या बाकीच्या मुली अगदी तरुण, स्मार्ट, तरतरीत होत्या. त्यांचे मार्कही माझ्यापेक्षा खूप चांगले होते. ते पाहून आपल्याला कदाचित प्रवेशच मिळणार नाही, अशी शक्यता वाटायला लागली. ही कल्पना मला फार पसंत पडली. तसं झालं असत, तर मजाच मजा. अजिबात अपराधी वाटून न घेता माझी शिकण्याच्या कल्पनेतून सुटका झाली असती!

पण तसा काही चमत्कार झाला नाही. मला प्रवेश मिळाला. आपण उघड्या डोळ्यांनी खड्ड्यात उडी मारायला जातोय, ह्याची स्पष्ट जाणीव होती. ग्रॅज्युएशनला प्रवेश घ्यायच्या वेळी माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे असलेल्या मैत्रिणीने 'फार कष्ट करावे लागतात. बघ, आत्ताच विचार कर' असा सल्ला देऊन सावध केलं होतं. पण तरुण वय होतं. काहीतरी विशेष शिकायला मिळणार ह्या आनंदात मी 'कष्ट तर काय, सगळीकडेच असतातच. मी करीन वाटेल तेवढे कष्ट.' असं आदर्शवादी उत्तर दिलं होतं!

नंतरच्या पाच वर्षात मला ती नक्की काय सांगत होती, ते अगदी नीटपणे कळलं होतं! तेव्हा माहिती नव्हती, म्हणून अंधारात उडी मारली होती. आता तर पुढे काय वाढून ठेवलंय ते नक्की माहिती होतं. 'अग, नको मारू उडी, पुढे खड्डा आहे,' असं स्वतःच स्वतःला सांगतही होते. पण सांगितलेलं ऐकलं, तर नाव बदलावं लागलं असतं ना! त्यामुळे 'आता मला कळलंय खड्डा कसा असतो ते. कदाचित नाही दुखणार इतकं. बघूदे तरी उडी मारून. सवय झाली आहे आता पाय दुखण्याची' असं म्हणत मी शेवटी ती उडी मारलीच शेवटी! तेव्हा अंधारात, डोळे बंद करून उडी मारली होती. आता लख्ख उजेडात, डोळे उघडे ठेवून उडी मारली होती, इतकाच काय तो फरक!!

प्रवेश मिळाला. फी भरून झाली. एव्हाना चिरंजीवांच्या प्रवेशाच घोडही गंगेत न्यायल होतं. त्यामुळे आम्ही माय-लेक जोडीने अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासाच्या मानसिक आणि शारीरिक तयारीला लागलो.

चिरंजीवांची तयारी आणि माझी तयारी पार दोन वेगळ्या टोकांची होती. त्याची तयारी म्हणजे चित्रविचित्र छाप आणि रंग असलेले टी-शर्ट, जीन्स, बूट, सॅक ह्यांची खरेदी करणे. केस-दाढी-मिशी कशाप्रकारे ठेवल्यास किंवा न ठेवल्यास आपण गर्दीत उठून दिसू, ह्याचा अभ्यास करणे, त्याच कॉलेजमध्ये एक-दोन वर्षे पुढे असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी-गुरुजनांबद्दलच्या विशेष मनोरंजक गोष्टी जाणून घेणे इत्यादी, इत्यादी!

त्याची अशी रंगीबेरंगी, तरुण तयारी चालू असताना माझी मात्र संसार, व्यवहार आणि व्यवसाय ह्या आघाड्यांवरची तयारी चालू होती. कॉलेजसाठी नव्या कपड्यांची खरेदी करावी, असं डोक्यातही आलं नाही!

जेमतेम एकच वर्षापूर्वी, माझ्या सासूबाईंचं आठेक वर्षांच्या प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं होतं. घरी सासरे नव्वदीच्या पुढचे. त्यांची प्रकृती वयाच्या मानाने चांगली होती, तरी त्यांना सतत, २४ तास सोबतीची गरज होती. गेली कितीतरी वर्षे आमच्या दोन मदतनीस बायका, ह्या आमच्या रोजच्या जगण्याचा अत्यावश्यक भाग झालेल्या होत्या. ज्यासाठी घराबाहेर पडावं लागेल, अशा आमच्या सर्व वेळांसाठी आम्ही ह्या मदतनिसांवर अवलंबून होतो. हे अवलंबून असणे आनंददायक नसलं, तरी अपरिहार्य मात्र होतं. बाहेर जाण्याच्या वेळांची तारेवरची कसरत असायची. ते सगळं वेळापत्रक जुळणं अत्यंत गरजेच असायचं. एक व्यक्ती नसली, तरी पळापळ व्हायची.

इतके दिवस मी माझी बाहेरची काम, सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेपाचच्या आत बेतत होते. आता माझं कॉलेज रोज साडे आठ ते दोन अशा वेळात असणार, म्हणजे आमच्या दिनक्रमात मोठाच बदल होणार होता. त्यामुळे मदतनिसांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हतं. त्यांना पटवणे, वाढीव पगाराची लालूच दाखवणे; असे 'साम-दाम-दंड-भेद' असे उपाय केले. शेवटी कशीबशी एकीची वेळ थोडी लांबवून आणि दुसरीला थोडं आधी येण्यासाठी तयार करून तो प्रश्न तात्पुरता तरी सोडवला.

कामासंदर्भातले प्रश्न पोटापाण्याचे म्हणून जिव्हाळ्याचे होते. मी शिकते आहे, म्हणून साईटवरचं काम खोळंबलं किंवा चुकीचं झालं ही परिस्थिती मला कधीही येऊ द्यायची नव्हती. ती काम नीटपणे व्हायलाच हवी. तिथे तडजोड नाही. सगळ्या साईट व्हिजिट्स, मीटिंग वगैरे दुपारनंतर ठरवायच्या, असं गेले बरेच दिवस सगळ्यांना बजावत होते आणि त्याबरोबरच घरासाठी किंवा कामासाठी अधूनमधून कॉलेजला सुट्ट्या घ्याव्या लागल्या, तरी त्याचा मानसिक त्रास करून घ्यायचा नाही, असं स्वतःला बजावत होते!

हे सगळे विषय असे होते, की कितीही शक्यता गृहीत धरल्या, कितीही अडाखे केले, तरी ऐन वेळेला त्यांच्या पलीकडचेच प्रश्न येणार, हे नक्की होतं. ह्या बेरजा करताना हातचे कसेही धरले, तरी उत्तर चुकतच! त्या सगळ्या प्रश्नांची काळजी परमेश्वरावर सोडून दिली. घर चालवणे, शिक्षण घेणे किंवा व्यवसाय करणे ह्यापैकी एक किंवा दोन अॅक्टीव्हीटी करताना सुद्धा तारांबळ होते. इथे मी तीन गोष्टी चोवीस तासांच्या दिवसात कोंबायला बघत होते. कुठेतरी काहीतरी गडबड होणारच होती. जसे प्रश्न येतील, तसे सोडवायला लागणारच होते. त्याला पर्याय नव्हताच.

कॉलेजच पहिलं सत्र ऑगस्टच्या पहिल्या सोमवारी सुरू होणार होतं. 'हो - नाही' ह्या विचारांच इतकं दळण दळून झालं, तरी अजून ते चक्र डोक्यात फिरत होतच. आपण विनाकारणच सुखाचा जीव दुःखात घालतोय का? अशा प्रकारचे असंख्य विचार करून डोकं शिणलं होतं. महाराष्ट्रातील स्त्रियांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना स्वतःचं आयुष्य मानाने, आनंदाने, स्वतःच्या मनाप्रमाणे जगता यावं म्हणून आयुष्यभर राबलेल्या एका महात्म्याच्या शिक्षणसंस्थेत मी शिकणार होते. ह्या गोष्टीचा फार आनंद होत होता आणि होत राहीलही. अशा महान लोकांनी, अत्यंत विपरीत परिस्थितीत जे स्वप्न बघितलं, त्यामुळे आज माझ्यासारख्या कितीतरी जणी निर्भरपणे आयुष्य जगू बघताहेत.

मी हे शिक्षणाच पाऊल टाकलं. कधी ठेचकाळत, कधी धडपडत तर कधी हसत हसत ही दोन वर्षे पारही पडली. काही दिवस लक्षात राहिले तर काही विस्मृतीत गेले. पण पहिला दिवस मात्र अगदी कोरल्यासारखा आठवणीत पक्का साठवला गेला आहे. मी कुठल्या रस्त्याने गेले, कुठले कपडे घातले होते, अगदी सगळच्या सगळं!

कॉलेजच्या रस्त्यावर एक शंकराच मंदिर आहे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने बाहेर बेल-फुलं विकणाऱ्यांची दुकान लागलेली होती. हे दृश्य माझ्या डोक्यात घट्ट बसलं होतं. नंतर प्रत्येक सोमवारी तिथून जाताना ती दुकानं दिसली, की 'चला, अजून एक आठवडा संपला!' असं मनात यायचंच.

त्या दिवशी कॉलेजला जाताना आपल्या निरस होत चाललेल्या आयुष्यात आता काहीतरी नवीन, चमकदार घडणार आहे. रोज आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. तरुण मंडळींबरोबर राहून आपल्यालाही तरुण, ताजतवान वाटेल. मनात साठलेली सगळी जळमट स्वच्छ होऊन उरलेल्या आयुष्याला भिडायला नवीन जोम येईल, असे विचार मनात येत होते. त्याबरोबरच आपण ही फार मोठी रिस्क घेतो आहोत. नाही जमलं, तर आहेत ती कामही हातची जातील आणि नवीन मिळायची बोंब होईल. बरोबरच्या 'तरुण, स्टायलिश, चलाख' मुलींच्या गटात आपण अगदीच 'आंटी टाईप' दिसणार, असेही विचार येत होते.

अश्या सगळ्या विचारांचं ओझं घेऊन मी कॉलेजात हजर झाले. सुरवातीला प्रथेप्रमाणे मला पालकांसाठी राखून ठेवलेल्या रांगांमध्ये पाठवलं. मग मी योग्य रांगेत तरुण मुलींबरोबर येऊन बसले.

हा प्रश्न आतापर्यंत असंख्यवेळा आला होता. अगदी प्रवेश घेतानाच्या अर्जावर आई-वडिलांच्या संपर्कासाठीचे रकाने होते. आता माझ्या आई-बाबांना तुमची मुलगी अभ्यास करत नाही, अस फोन करून सांगून काही उपयोग होता का? पण नियम म्हणजे नियम! मी त्यांचे नंबर दिले. आई-वडील पुण्यात राहात नाहीत म्हटल्यावर संगणक महाराजांनी स्थानिक पालकांच नाव-पत्ता-संपर्क मागितला. आता काय करावं? मी माझा आणि नवऱ्याचे मोबाईल नंबर नुकतेच अशा संपर्कासाठी मुलाच्या कॉलेजमध्ये दिले होते. आता मी कोणाचे देणार? बरं, हे सगळं संगणकावर असल्याने आवश्यक माहिती भरल्याशिवाय प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईना. माझे पालक म्हणजे माझे आई-बाबा. नवऱ्याचा नंबर 'पालक' म्हणून द्यायला माझं मन तयार होईना. तिथल्या माणसाने ' मॅडम, काही अडचणीची परिस्थिती आली, तर पुण्यातल्या कोणाचातरी नंबर पाहिजे ना रेकॉर्डला' असं सांगितल्यावर मला मुद्दा पटला. तिथे मग मी नवऱ्याचा आणि मुलाचा नंबर दिला!

बरोबरच्या मुलींना ते लोकं पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी आई-वडिलांना यायला सांगा, असं सांगत होते. मलाही लाजत लाजत त्यांनी ' मॅडम, तुमच्या आई-वडिलांना जमत असेल, तर त्यांना यायला सांगा' असं सांगितल्यावर मला हसू आवरेना. माझ्या शाळेत काही पालक-शिक्षक सभा होत नसत. लहान गावात वाढल्यामुळे पालक-शिक्षक भेटी ह्या भाजी बाजारापासून रेल्वे स्टेशन पर्यंत कुठेही आणि कधीही व्हायच्या! आई-बाबांना फोन करून हे सगळंसांगितलं आणि 'पालक-शिक्षक सभेची हौस राहिली असेल, तर या पुण्याला' असं आमंत्रणही दिल. पण हौशी पालक नसल्यामुळे त्यांनी ते आमंत्रण अगदी सपशेल नाकारलं....

सुरवातीला प्रिन्सिपल सरांचं भाषण, संस्थेबद्दलच प्रेझेंटेशन झालं. पुढे काय शिकायचं आहे, त्याची रूपरेषा कळली. त्या संस्थेत तीन शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायची सोय असल्यामुळे जमलेल्या मुलींमधल्या आपल्या वर्गमैत्रिणी कोण? ह्याचा पत्ता लागत नव्हता. मी आत्तापर्यंत ज्या शाळा, कॉलेजमध्ये शिकले, ती सर्व मुला-मुलींची म्हणजे को-एड प्रकारची होती. ही फक्त महिलांसाठीची संस्था असल्याने जिकडे तिकडे मुलीच मुली दिसत होत्या! नंतर ह्या कल्पनेची सवय झाली, तरी सुरवातीला मात्र गंमत वाटत होती.

बरोबरच्या मुली कशा असतील? वयाने त्यांच्या काकू-मावशी एवढ्या मोठ्या असलेल्या मला आपल्यात सामावून घेतील की नाही? ह्या कोर्समध्ये खूप वेळा ग्रुप प्रोजेक्ट्स करायची असतात. तेव्हा ह्या मुली आपल्याला बाजूला तर नाही ना टाकणार? त्यांच्या वय, वेळ आणि एनर्जीशी बरोबरी तर शक्यच नव्हती. इतकी वर्षे केलेल्या कामाच्या अनुभव माझ्याकडे होता. त्याच्या मदतीने आपण तरून जाऊ का? मला माझ्या साधारण बरोबरीची एक जरी मैत्रीण मिळाली असती, तर हा प्रवास आनंददायक झाला असता. पण चाळिशीनंतर शिकण्याचा वेडेपणा करणार अजून कोणी असेल का?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला कार्यक्रमाच्या मध्यांतरात मिळालं! माझ्या बरोबरच्या म्हणता येतील, अशा एक सोडून दोन-दोन मैत्रिणी मला मिळाल्या! दोघी माझ्या घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या. घर-संसार-मूलबाळ-सणवार-सासूसासरे-व्यवसाय अशी न संपणारी जबाबदाऱ्यांची यादी असतानाही पुढे शिकण्याची स्वप्न बघणाऱ्या....

'मित्र-मैत्रिणी मिळणे' ह्या एका बाबतीत मी फार नशीबवान आहे. मला आत्तापर्यंत फार चांगले मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत. फार कमी वेळा अवतींभोवती मनासारख्या मैत्रिणी नाहीत असं झालंय. लहानपणापासून भांडण, हेवे-दावे करत आता प्रौढ, समजूतदार झालेल्या मैत्रिणी. एकट्याने जायची हिंमत केलेल्या प्रवासात - ट्रेकमध्ये न ठरवता अचानक गवसलेल्या मैत्रिणी. वैयक्तिक आयुष्यात कितीही मोठ्या स्तरावर असले, तरी जुन्या मैत्रीच्या नात्याला तेवढंच महत्त्व देणारे मित्र-मैत्रिणी. मित्र-मैत्रिणी मिळवून देण्याच्या बाबतीत काम करणारं एखादं डिपार्टमेंट जर कुठे असेल, तर तिथली मंडळी माझ्यावर खूश आहेत, असच म्हणावं लागेल!

चला! मनासारख्या मैत्रिणी मिळाल्यामुळे सुरवात तर चांगली झाली. हळूहळू नियमित वर्ग सुरू झाले. सगळ्यांशी ओळखी व्हायला लागल्या. संस्था जरी फक्त मुलींची असली, तरी पदव्युत्तर वर्गांसाठी मुलांनाही प्रवेश मिळतो. त्यामुळे आमच्या गटात अजून दोघे 'कामकाजी' आर्किटेक्ट जमा झाले. आमच्या ह्या पाच जणांच्या ग्रुपच नामकरण 'प्रौढ साक्षरता वर्ग उर्फ सीनियर सिटिझन्स क्लब' असं आम्हीच केलं! ते शेवटापर्यंत कायम राहिलं.

निरनिराळे विषय, त्यांचे शिक्षक ह्याच्या ओळखी होऊ लागल्या. बहुतेक सगळे शिक्षक माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होते. आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्यांकडून शिकताना वयाच्या अंतराचा अडसर होईल की काय?, अशी भीती मला वाटत होती. म्हणजे 'प्रत्यक्ष जागेवर काय होतं, ते ही लोकं मला काय शिकवणार?' टाईप. पण तसं काही झालं नाही. शिकत होते, ते माझ्या रोजच्या कामापेक्षा खूप वेगळं होतं. त्यामुळे शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल नेहमीच आदर, कौतुक वाटलं आणि वाटत राहीलही.

बाकी जनतेपैकी काही मुली पुण्यात राहणाऱ्या तर काही हॉस्टेलला राहणाऱ्या होत्या. काही ह्याच कॉलेजमधून नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या होत्या. त्यांना प्रिन्सिपलपासून सगळा स्टाफ ओळखत होता. त्या सगळ्या तरुण मुलींमध्ये जरा बुजल्यासारखं होत होतं. त्यांचे गप्पांचे विषय, नटणं-मुरडणं, प्रायोरिटी बघून आपण ही स्टेशन्स सोडल्याला फार वर्षे झाली, ह्याची जाणीव होत होती. त्याचबरोबर सध्याच्या तरुण जगात डोकावून बघायची संधीही मिळत होती. एक दिवस कॉलेज आय.डी कार्ड साठी फोटो काढायला ऑफिसमध्ये या, असा निरोप मिळाला. तेव्हाही ' काल सांगितलं असत, तर जरा तयार तरी होऊन आलो असतो' अशी तीव्र हळहळ व्यक्त केली गेली.. आम्ही कंप्लीट हतबुद्ध! ते आय-डी केवढं? त्यातला फोटो अजूनच बारका. त्यासाठी तयार काय व्हायचं!!

पण ह्या मुली अजून लहान होत्या. घराच्या, संसाराच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर यायच्या होत्या. त्यांचं मोकळं, निर्भर जग बघून छान वाटायचं, क्वचित हेवाही!. मी सकाळी उठून सगळ्यांचे डबे, नाश्ता, मदतनीस मावशींकडून करून घ्यायची कामे, जाताजाता आणि येतायेता करायची कामे ह्या सगळ्याची रांग लावून कॉलेजला येईपर्यंतच थकून जायचे. माझ्या दोघी मैत्रिणींची तर शाळेत जाणारी मुलं होती. त्यामुळे त्यांच्या कामांच्या यादीला शाळेचा अभ्यास, परीक्षा, शाळेची बस, गणवेश अशी एक न संपणारी पुरवणी होती. आमचं बाळ मोठं होऊन ह्या सगळ्या पलीकडे गेल्यामुळे माझ्याकडे ती पुरवणी नव्हती!

वर्गातल्या तरुण मैत्रिणींपैकी सगळ्यात लहान मैत्रिणीची आई वयाने माझ्याएवढी होती! ह्या मैत्रिणीचा जन्म झाला, तेव्हा मी माझ्या पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या डिझाइन प्रोजेक्टसाठी रात्री जागवत होते. अजून एकीची आजी आणि माझी आई नाशिकच्या शाळेतल्या वर्गमैत्रिणी होत्या! एकूण गंमत होती सगळी. वयातल्या ह्या फरकामुळे, दोन वर्षात मला 'म्हणजे मॅडम, तुम्ही आर्किटेक्ट झालात, तेव्हा मी *** वर्षांची / **** इयत्तेत होते.' हे वाक्य असंख्य वेळा ऐकायला मिळालं. असं वाक्य टाकावास वाटेल, इतका फरक होता हे मला मान्य होतच. पण सारखं सारखं ऐकून कंटाळा आला.

रोजच्या लेक्चर्समधून काहीतरी नवीन नवीन मिळायला लागलं, तशी शिकायला मजा येऊ लागली. रोज रात्री आजच्या दिवसात आपण कायकाय केलं? असा विचार मनात येतोच. एरवी माझ्याकडे फार काही आकर्षक उत्तर नसायचं. कुठल्यातरी कामाचे अडकलेले पैसे मिळाले, कार्पोरेशनमध्ये फाइल एखादा टेबल पुढे सरकली किंवा असच काहीतरी कंटाळवाणं. आता काहीतरी छान नवीन घडतंय, आपल्या ज्ञानात किंचित का असेना भर पडतेय असे छान विचार यायचे. त्याचबरोबर लेक्चरला झालेल्या गमतीजमती, मैत्रिणींबरोबरच्या गप्पा आठवून मजा वाटायची.

पण शिकायला, कॉलेजला जायला जरी मजा येत होती, तरी अभ्यास करायला मात्र अजिबात मजा येत नव्हती.

इतके दिवस दिवसभराची घरची आणि ऑफिसची कामं उरकली, रात्रीचं जेवण झालं की मिळणारा वेळ हा माझा हक्काचा असायचा. आवडीची गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे ह्यासाठीचा राखीव वेळ. आता त्या वेळेवर अभ्यासाचं ओझं आलं. सकाळी उठून कॉलेजला जायची सवय लागली पण अभ्यासाची सवय लागेना. डोळ्यासमोर क्लाऐंट, बजेट नसताना (आणि पैसे मिळायची सुतरामही शक्यता नसताना!) डिझाइन करायला जमेना. कामासाठी कितीतरी वेळा प्रेझेंटेशन तयार केली होती, मीटिंग्जमध्ये ती प्रेझेंट करून कामही मिळवली होती. पण कॉलेजच्या प्रेझेंटेशनबाबत अपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांच्याशी सूर जुळेनात. रात्री जागून मी कितीतरी वेळा काहीही न करता, स्क्रीनकडे नुसती टक लावून बघत बसायचे. हा अभ्यास करण्यापेक्षा त्या वेळेत घरकाम, साईट साठीचे नकाशे तयार करणे / तपासणे, नेटवर टाईमपास करणे हे सगळे पर्याय अत्यंत आकर्षक वाटायचे!

पहिल्या टर्ममध्ये ह्याचा फार म्हणजे फार त्रास झाला. सबमिशन्सच्या तारखा उलटून गेल्या, तरी माझं काम मागे पडलेलं असायचं. कॉलेजमध्ये गेल्यावर माझी आणि मैत्रिणींची 'तू काय केलं? मी काय केलं?' टाईपची चर्चा रोज व्हायची. पण बहुतेक वेळा कोणीच काही केलेलं नसायचं. आपल्यासारखी मंडळी आहेत बरोबर, असा दिलासा मिळाला, तरी प्रश्न 'जैसे थे' राहतं होते. मागे पडलेल्या सबमिशन्सचा डोंगर वाढत गेला, तसा माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला.

सुरवातीपासून ज्या गोष्टीची भीती होती, त्या शिक्षण सोडून द्यायच्या कल्पनेच्या जवळ मी पहिल्या सत्रात असंख्य वेळा पोचले. काही वेळा तर अगदी त्या रेषेवर उभीही राहिले. कितीतरी वेळा रडले, स्वतःवर प्रचंड वैतागले. त्याच कॉलेजमध्ये माझा एकेकाळचा सहकारी शिकवत होता. त्याने मला 'एवढी टर्म पार झाली की मग काय ते ठरव. पहिली टर्म सगळ्यांनाच कठीण जाते. थोडा दम धर' असा धीर वारंवार दिला. घरचेही तेच सांगत होते. ह्या सगळ्यांमुळे मी ती टर्म कशीबशी पार पाडली.

पुढच्या टर्ममध्ये मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून सावध राहिलो. सबमिशन्सचा ढीग साठू नये, ह्याची काळजी घ्यायला लागलो. रोज घरी जाताना आजच्या दिवसाचा काय टास्क, हे ठरवायला लागलो. ह्याचा खूप फायदा झाला. रोज, अगदी रोज अभ्यास करायची सवय लावून घेतली. बाकी तरुण मुलींनाही हा फरक जाणवायला लागला. टर्म संपताना धावपळ, जागरणं, कम्प्युटरवरून महत्त्वाच्या फाइल्स गायब होणे, चुकीच्या प्रिंट्स सबमिशनला आणणे असे खास विद्यार्थी-खेळ आम्हीही केले. पण पहिल्या टर्मइतक्या पुढच्या टर्मना त्रास झाला नाही, हेही खरं.

नंतर ह्या संध्याकाळपासून झोपेपर्यंत अभ्यासाच्या रूटीनची इतकी सवय झाली, की त्यात आपण काही वेगळं करतोय, असं वाटेना. त्या वेळेत कोणाचा फोन आला की 'काय करते आहेस?' ह्या प्रश्नाला '(अर्थातच) अभ्यास' असं उत्तर द्यायचे. ऐकणाऱ्यांना हे बहुधा गमतीशीर वाटायचं! पण मला अभ्यास करणे आवश्यक आणि सहज वाटायचं.

आपण शिकत असलो, तरी आपलं वैयक्तिक आयुष्य काही थांबत नाही. काळाचा प्रवाह चालूच राहतो. रोजचा नवा दिवस नवे आनंद आणि नव्या अडचणी घेऊन उजाडतो. माझंही काही वेगळं झालं नाही. ह्या दोन वर्षात जवळच्या कुटुंबात मोठी आजारपणं, मृत्यू झाले. बराचसा काळ नवरा घराबाहेर असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागली. ध्यानीमनी नसताना परदेशी चकरा झाल्या. ह्या व्यतिरिक्तही खूप काही झालं. एरवी मी ह्या सगळ्याची डोकं फुटेपर्यंत काळजी केली असती. पण आता काळज्या करणारं मेंदूतील डिपार्टमेंट वेगळ्या कामात गुंतलेलं होतं! सबमिशन्स, प्रेझेंटेशन्स, टर्म संपताना होणारी पळापळ, लेखी पेपरचे तयारी, रिझल्ट; एक ना दोन. त्यामुळे बाकीच्या गोष्टी सोप्या वाटल्या. प्रश्न सोपे करायचे असतील, तर अजून अवघड प्रश्न पाडून घ्यायचे, हे तंत्र ह्या दोन वर्षात मी नीटच शिकले.

तरुण मुलींच्या तुलनेत वेळ आणि एनर्जी ह्या आघाड्यांवर मी नेहमीच कमी पडायचे. कंप्युटर स्किल्सही त्यांच्याकडे चांगली होती. कॉलेजमध्ये डिझाइन्स करताना कल्पनाशक्ती स्वैर सोडली तरी चालते. किंबहुना तुम्ही ती स्वैर सोडावी अशी अपेक्षा असते. ते बरोबरही आहे. पुढे नियम, बजेट, ज्याच्यासाठी काम करतोय त्याच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करावं लागत. प्रत्येक वेळा आपल्या डोक्यात असेल तसच्या तसं डिझाइन करायचा मोकळेपणा मिळतोच, असं नाही. तो मोकळेपणा विद्यार्थीदशेत मिळायलाच हवा.

पण मला मात्र अशी डिझाइन्स करताच यायची नाहीत! प्रत्येक वेळा रुपये-पैसे, साईटवर काम करताना काय अडचणी येतील ह्याची यादी डोक्यात तयार व्हायची. एक लहान फायदा मिळवण्यासाठी दुसरा मोठा तोटा तर होत नाही ना? हा तोल सांभाळायची इतकी सवय झाली होती, की त्यापलीकडे जाता येईना. आपली कागदावरची डिझाइन्स जागेवर बांधताना अडचणी येऊ नयेत म्हणून जी काळजी घावी लागते, ते ज्ञान मी खूप कष्ट करून, धक्के खाऊन मिळवलं होतं. आता पुन्हा मागे जाणं मला जमण्यासारखं नव्हतं. ह्या दोन वर्षात जी काही डिझाइन प्रोजेक्ट्स, रिसर्च प्रोजेक्ट्स केली, ती करताना मला हे सगळं प्रत्यक्षात आणता येईल का? हा विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटायचा. ती प्रोजेक्ट्स कदाचित कधीच प्रत्यक्ष वापरली जाणार नाहीत. पण ती तशी आणता येतील, हे नक्की. खेड्यातील कचरा व्यवस्थापन किंवा रेल्वे स्टेशन्स पर्यावरणपूरक बनवण्यासाठी केलेला अभ्यास ही त्यातील काही उदाहरणे.

शिकण्याच्या आधी, शिकताना आणि नंतरही 'इतक्या उशीरा का?' हा प्रश्न मला कॉलेजमध्ये, घरी आणि इतर असंख्य ठिकाणी विचारला गेला. पण गंमत ही होती, की मला मात्र मी उशीर केला आहे, असं अजिबात वाटलं नाही आणि वाटतही नाही. माझ्या मताप्रमाणे ह्यापेक्षा योग्य वेळ दुसरी नव्हतीच. माझ्या करियरच्या एक भागात मी मनापासून कष्ट केले होते. आता काहीतरी बदल हवा, असं मनापासून वाटत होतं. आता मला आधीच्या कामापेक्षा वेगळं, माझ्या आवडीचं काम करायचं होतं. हे शिक्षण मी समजून-उमजून घेत होते. एक जास्तीची पदवी मिळावी, एवढीच अपेक्षा नव्हती.

सांसारिक जबाबदाऱ्यांमधून मोकळं व्हायचा टप्पा जवळ येत होता. खाण्यापिण्याची सोय केली, की मुलाचे बरेचसे प्रश्न संपत होते! पुन्हा मी माझ्या कामात, अभ्यासात बुडून गेल्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला मला कमी वेळ मिळणार, त्याला त्याची स्पेस जास्तीची मिळणार, हे त्याच्या दृष्टीने फार चांगलं होत.

ह्या वयाची मुलं आणि आई-बाबा ह्यांच्यात कॉमन विषय कमीकमी होत जातात. आम्ही दोघ एका वेळेला शिकत असल्याने आम्हाला बोलायला असंख्य नवीन विषय मिळाले. दोन्ही वर्षे आम्ही मायलेक मिळून आपापली कॉलेजे, सबमिशन्स, शिक्षक, इंजिनीरिंग विरुद्ध आर्किटेक्चर, पुणे विद्यापीठ, शिक्षणपद्धती अश्या अनेक विषयांवर यथेच्छ गॉसिप करायचो. तुझं-माझं ही खूप करायचो. म्हणजे मी त्याला नेहमी 'इंजिनीरिंग किती सोपं आहे आर्किटेक्चर पेक्षा. सारखा उनाडत असतोस तू. आम्हाला केवढा अभ्यास असतो' असं म्हणायचे. तो लगेच मला,' तुझं बरय आई. नापास झालीस तरी तुला काही फरक नाही पडणार. मला लोड आहे स्कोअर करायचं!' असं ऐकवून मोकळा व्हायचा.

करियरच्या सुरवातीच्या टप्प्यावर माझ्यासकट अनेक जणांना, मी स्वतःच्या हिमतीवर कामे मिळवू शकेन, करू शकेन आणि पैशाची वसुली करू शकेन असं वाटलं नव्हतं. हे सगळं मी करू शकते हे सिद्ध करून दाखवलं होतं. आता कोणाला काही सिद्ध करून दाखवण्यातला फोलपणा नीट कळला होता. ज्याचा त्याचा रस्ता, वेग, प्रवास आणि ध्येय वेगळं. आपल्याच तालात, आपल्याच मस्तीत चालायची मजा, मला आता जरा उशीराने, थोडीथोडी का असेना, पण कळायला लागली होती. प्रत्यक्ष काम करायचा अनुभव घेतल्यामुळे निरनिराळ्या पातळीच्या लोकांबरोबर जमवून घेऊन काम करायला येत होतं. इथे मी जे काही शिकणार होते, त्याचा कुठे आणि कसा उपयोग होऊ शकेल ह्याची दृष्टी मला काम करून मिळाली होती.

ही कारणं तर होतीच. पण त्याशिवायही काही कारणं असतील का? माझ्या झपाट्याने ओसरणाऱ्या तारुण्याला थोपवण्याची ही माझी केविलवाणी धडपड होती का? शिंग मोडून मी वासरांमध्ये शिरू पाहात होते का? माझ्या बरोबरच्या तरुण मुली तारुण्याने रसरसलेल्या होत्या. पुढच्या आयुष्याची, जोडीदाराची, संसाराची स्वप्न बघत होत्या. मी ते सगळे टप्पे ओलांडून केव्हाच पुढे आले होते. जगण्याच्या अर्ध्या टप्प्यावर पोचले होते. टक्केटोणपे खाऊन निबर झाले होते. हरवलेली तारुण्याची झळाळी परत मिळवण्याचा हा प्रयत्न होता का?

मी पदवीच्या शिक्षणात बाकी विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडले होते. बरोबरच्या विद्यार्थ्यांनी टाकलेले दयेचे - कुचेष्टेचे कटाक्ष, शिक्षकांनी केलेले जाहीर अपमान मी प्रयत्न करूनही विसरू शकले नव्हते. तो न्यूनगंड घालवायचा हा एक प्रयत्न? तेव्हाच्या शिक्षक-सहविद्यार्थ्यांना वाटायचं, त्यापेक्षा आपण वरचढ होतो, हे स्वतःला पटवून देण्यासाठीची थेरपी?

एवढं करून मी हाताला लागण्यासारखं काही शिकले का? हो नक्कीच शिकले. इतकी वर्षे करत असलेल्या कामासंदर्भात एक वेगळी दिशा, वेगळी दृष्टी मिळाली. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कसे वापरता येतील, पाण्याचा-कचऱ्याचा पुनर्वापर, बांधकामाची पर्यावरणपूरक तंत्रे शिकायला मिळाली. पर्यावरणासंदर्भातले कायदे, नियम माहिती झाले. माझ्या कामाच्या दुसऱ्या डावात ह्याचा खूप उपयोग होईल. इमारती उभ्या करण्याव्यतिरिक्त बांधकाम क्षेत्रात काय काम करता येईल, हे डोळ्यासमोर स्पष्टपणे आलं.

विद्यापीठाने नेमून दिलेला अभ्यासक्रम तर सगळ्यांनाच शिकावा लागतो. मीही शिकले. त्या पलीकडेही बरंच काही शिकले. पदवी प्रमाणपत्रापलीकडे खूप काही मिळवलं. माझ्या सगळ्या कुटुंबीयांना मी शिकते आहे, ह्याचं खूप कौतुक, अभिमान वाटत होतं. आई - वडिलांना वाटणारा तो अभिमान माझ्यासाठी अमूल्य आहे. माझ्या आईला अतिशय लहान वयात आलेल्या सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे फार शिकता आलं नाही. सध्याच्या नियमांप्रमाणे माझ्या आताच्या प्रमाणपत्रावर आईच नाव येईल. तिचं नाव कुठल्याही पदवी प्रमाणपत्रावर छापलं जायची ही पहिलीच वेळ. माझ्या आणि माझ्या भावाच्या पदवी शिक्षणाच्या वेळी हा नियम नव्हता.

मनात असलेली तीव्र इच्छा, जरी ती रूढ कल्पनांच्या साच्यात न बसणारी असली तरीसुद्धा जिद्दीने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आता कुठलीही अवघड गोष्ट करताना 'आपण बावीस वर्षानंतर घर-व्यवसाय सांभाळून शिकू शकतो, तर हे काय सोपंच आहे की' असा विचार बळ वाढवतो. घर, संसार, मुलगा ही माझी प्रेमाची कर्तव्ये आहेतच. पण त्याच्या पलीकडे एक 'मी' नावाची व्यक्ती आहे. तिच्या आपल्या आकांक्षा आहेत. आपली स्वप्ने आहेत. ती बाकीच्यांना वेडेपणाची वाटू शकतात किंवा उदात्त. पण त्या 'मी' ला बाकीच्यांच्या वाटण्याची विशेष पर्वा वाटत नाही. कोणी वाहवा करावी म्हणून मी ही धडपड केली नाही. ही दोन वर्षे माझी स्वतःची, स्वतःसाठीची होती. त्यात मी हसले, रडले, धडपडले. पण एकूण हिशेब जमेचा झाला. पुढच्या आयुष्यभर पुरेल, इतकी पुंजी आता माझ्या झोळीत साठली आहे.

कॉलेज संदर्भातल्या काही कामासाठी मी माझ्या भावाच्या मित्राला भेटायला गेले होते. कामाबद्दल बोलणं, माहितीची - संपर्कांची देवाणघेवाण झाली. नंतर गप्पा मारताना तो मला म्हणाला,' शिकते आहेस, ते चांगलंच करते आहेस. पण मी तू आलीस तेव्हापासून विचार करतोय, इतक्या वर्षानंतर तुला का ही इच्छा झाली असेल?' मी त्याला हसून म्हटलं,' तू माझ्या भावाला खूप वर्षे ओळखतोस. इतक्या वर्षात तुला हे लक्षात आलंच असेल. आमच्या जीन्समध्ये एक वेडेपणाचा जीन्स आहेच. तो अचानक डोकं वर काढतो बाबा. त्याच्यापासून सुटका नाही!!' भावाचा जुना मित्र असल्यामुळे त्याला हे लॉजिक मनापासून पटलं.

आपल्या स्वभावातल्या काही छटा आपल्या आवडत्या असतात, तर काही नावडत्या. माझ्याही अशा दोन याद्या आहेत. पण ज्याचं कौतुक वाटतं त्यात ही माझी वेडेपणाची जीन्स आहेत. त्यांच्या मदतीमुळे मी कितीतरी वेळा माझ्यातल्या 'शहाण्या, सिन्सियर, सरळमार्गी' पणावर मात केली आहे. त्या वेड्या जीन्सचा प्रभाव अजून संपला नसेल, अशी आशा आहे......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान लिहीले आहेस!!
हा पॅरा खूप आवडला!!

मनात असलेली तीव्र इच्छा, जरी ती रूढ कल्पनांच्या साच्यात न बसणारी असली तरीसुद्धा जिद्दीने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आता कुठलीही अवघड गोष्ट करताना 'आपण बावीस वर्षानंतर घर-व्यवसाय सांभाळून शिकू शकतो, तर हे काय सोपंच आहे की' असा विचार बळ वाढवतो. घर, संसार, मुलगा ही माझी प्रेमाची कर्तव्ये आहेतच. पण त्याच्या पलीकडे एक 'मी' नावाची व्यक्ती आहे. तिच्या आपल्या आकांक्षा आहेत. आपली स्वप्ने आहेत. ती बाकीच्यांना वेडेपणाची वाटू शकतात किंवा उदात्त. पण त्या 'मी' ला बाकीच्यांच्या वाटण्याची विशेष पर्वा वाटत नाही. कोणी वाहवा करावी म्हणून मी ही धडपड केली नाही. ही दोन वर्षे माझी स्वतःची, स्वतःसाठीची होती. त्यात मी हसले, रडले, धडपडले. पण एकूण हिशेब जमेचा झाला. पुढच्या आयुष्यभर पुरेल, इतकी पुंजी आता माझ्या झोळीत साठली आहे.

व्वाह!!!! अधाशासारखं वाचून काढलं सगळं... खूप प्रेरणादायी आहे तुमचा हा अनुभव Happy
अजूनही वेळ गेली नाहीये हे स्वतःला बजावता येईल हे वाचून Happy धन्स इथे शेअर केल्याबद्दल...

मस्त! खूप आवडलं.
डॉक्टर म्हणून बावीस - पंचवीस वर्षं प्रॅक्टीस करून निवृत्त झाल्यावर माझ्या आईला चित्रकला शिकावीशी वाटली. चित्रकलेत एम ए ला प्रवेश घेण्यासाठी आम्ही मेडिकल कॉलेजला "ट्रान्सफर सर्टिफिकेट" आणायला गेलो होतो, मग नव्या कॉलेजच्या प्रवेशासाठी. तिचा तो सगळा प्रवास आठवला.

खूप छान लेख. तुमचे हार्दिक अभिनंदन. आता मस्त वाटत असेल. नेट फ्लिक्स वर आणि इतर नेट वर ही ब्यार्क इंगल्स नावाच्या आर्किटेक्ट ची माहिती आहे. नेट फ्लिक्स वर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट नावाच्या कार्यक्रमात एक तासाचा भाग आहे जरूर बघा. त्याचे विचार जबरी आहेत. व कामही.

अनया,
लेख अतिशय आवडला.
खूप छान , मोकळं आणि प्रांजळ लिहिलं आहेस.
तुझ्यातला वेडेपणाचा जीन्स मुलात नैसर्गिकरीत्या गेला असेलच पण तुझी धडपड पाहून हा जीन कसा जोपासावा याचा अनुभवही त्याला मिळाला असेल.
तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचेही अभिनंदन!

नेहेमीप्रमाणेच आवडले लिखाण.
(हावरटपणा म्हण हवं तर) पण नेहेमीप्रमाणे सवीस्तर, प्रत्येक सेमेस्टर्साठी एकेक आणि एक सुरुवातीचा आणि शेवटचा असे अनेक भाग हवे होते.

मला माझे एम्बीए चे दिवस आठवले. मी तर नोकरी सोडून 'फुल्ल टाईम' केले होते. त्याचा प्रत्यक्ष फायदा असा काही दिसत नसला तरी अप्रत्यक्ष फायदा खूप झाला / होतोय.
वेडेपणा हवाच अंगात त्याशिवाय काही मजा नाही. Proud

काय मस्त लिहिले आहेस अनया! अगदी प्रामाणिक... मनातल्या असुरक्षित भावना अशा ओपनली पब्लिक फोरमवर मांडणं सोपं नसतं, पण तू हातचं काहीही राखून न ठेवता लिहिलं आहेस त्यामुळे लेख परिपूर्ण झाला आहे! बेस्टॉफलक! Happy

छान लिहिले आहे. मी पाच वर्षे नोकरी केल्यानंतर पी.एच.डी. चालू केले तेव्हा मनात काय काय आले होते ते एकदम आठवून गेले. अर्थात माझ्यामागे तुमच्या इतक्या जबाबदार्‍या मुळीच नव्हत्या त्यामुळे तीन-साडेतीन वर्षाची विद्यार्थीदशा मला खूप एंजॉय करता आली. आता पी.एच.डी. संपूर्ण करून दोन वर्षे होऊन गेली. जबाबदार्‍यापण वाढल्या आहेत. तरी पुन्हा काहीतरी शिकावेसे वाटते. तुमचा लेख वाचल्याने नक्कीच नविन आत्मविश्वास मिळाला आहे!!

खूप सुरेख लिहिलंय!

काही ठिकाणी तर इतकं पटत होतं तरी का कोण जाणे, डोळे उगीचच भरून येत होते!

खूप छान लिहिलय. अशा प्रकारचा ध्यासप्रवास करताना एक मस्त धुन्दी येते. आणि तो यशस्वी पणे पार पडला की मग त्या प्रवासातल्या छोट्या छोट्या आठवणी पुढचा प्रवास धुन्द करून टाकतात.
समर्पक वर्णन आणि एकदम मस्त शैली!

भारी लिहिलय अनया ! सगळे अनुभव सहीच !

आमच्या जीन्समध्ये एक वेडेपणाचा जीन्स आहेच. तो अचानक डोकं वर काढतो बाबा. त्याच्यापासून सुटका नाही! >>>>> Proud आमच्या घरी ह्या वेडेपणाला 'फॅड' म्हणतात. त्यामुळे कोणाचा काही नवीन 'उपक्रम' सुरू झाला की "आता काय नवीन फ्यॅड" असं एकमेकांना विचारायची पद्धत आहे. Proud

अभिनंदन. स्वतःच स्वतःची घडी जरा विस्कटावी म्हणजे नव्याने घडी घालता येते. वपुंच्या कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते-- काही माणसांना अस्वस्थता, हुरहुर, बेचैनी हवी असते. रुटीनला अशी माणसे कंटाळतात. काहीतरी नवे घडावेसे वाटते आणि ते घडवुनही आपणच आणावे असे काहीतरी Happy

खूप छान लेख आहे. आवडला. अगदी प्रामाणिक म्हणतात तसा वाटला आणि बहुतेक त्यामुळेच लेख फार इंटरेस्टिंग झाला आहे. शिक्षण - नोकरी - पुन्हा शिक्षण या चक्रातून मी स्वतःसुद्धा गेल्यामुळे खूप रिलेट करू शकले.

खूप सुंदर लिहिलं आहेस अनया . मानलं ग बाई तुला अगदी कोपरापासून. हे वाचता वाचता दमछाक झाली . मी नसत केलं .
आमच्या जीन्समध्ये एक वेडेपणाचा जीन्स आहेच. तो अचानक डोकं वर काढतो बाबा. त्याच्यापासून सुटका नाही!!' >> हे मात्र एकदम पटलं . माझ्या आईने लग्नानंतर बी ए केलं आणि मग बऱ्याच उशिराने सगळे व्याप ताप नोकरी आणि मुलींना सांभाळून एम . ए. केल होत. सकाळच्या पोळ्या / भाजी करता करता तिच पाठांतर चालायच . (संस्कृत घेतलं होत ) तेव्हाही सगळे जण असच म्हणत होते . किती उशिरा ? पण मुंबई युनिव्हर्सिटीत त्या वर्षी ती दुसरी आली आणि सगळ्यांची तोंड बंद झाली
इतका मस्त अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

प्रत्येक मुद्दा न मुद्दा आवडला/पटल. खास करून प्रवेश घेइप्रयंतचा कारण तो अनुभवेत्य मी.
आश्च्र्य म्हणजे, मी ह्या गाडीत शिरायचा विचार केलाय...( म्हणून इथे याय्ला तसा कमी वेळ मिळतोय ;)) प्रवेश घ्यायचाय.. अजून तशीच भिती डोकं काढतेय जशी तुम्ही लिहिलीय... बघुया काय होते ते...
मुद्दे तेच आहेत थोड्या फार फरकाने, घर, संसार, मुलं, घरी असलेले वृद्धांची काळजी, सगळ्यांची सोय, हातातले काम... वगैरे वगैरे....

खूपच मनाला भिडला.

Pages