दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं : भाग पहिला कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!

Submitted by अनया on 14 January, 2021 - 17:26
भाग पहिला : कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!

भाग पहिला : कल्पना, संशोधन, तयारी आणि खूप काही!

तीन तास सलग गाडी धावत होती. गाडीच्या टाकीतले आणि आमच्या पोटातले कावळे अन्न-पाणी मागून मागून निपचीत पडायला आले होते. आसपास नजर जाईल तिथपर्यंत फक्त शेतं दिसत होती. थांबून पाय मोकळे करता येतील, पेट्रोल भरता येईल, आपलंही जेवण उरकता येईल, अशी जागा काही दिसत नव्हती. पुढे येणारं गाव मोठं, जरा सोयी असलेलं असेल असं वाटायचं. पण नकाश्यावर मोठं दिसणारं गाव प्रत्यक्षात मात्र चिमुकलं, मूठभर घरं असलेलं निघायचं.

आता काय करायचं, अशी संकट-चर्चा करताना अचानक ‘आमचे येथे पेट्रोल-कार्ड पाकिटं -चहा कॉफी-गरम नाश्ता- कोल्ड्रिंक -किरकोळ किराणा योग्य दरात उपलब्ध आहे’ अशा पद्धतीची पाटी दिसली. त्वरित त्या दिशेला गाडी वळवली. गाडीच्या आणि आमच्या सगळ्या हाकांना ‘ओ’ दिल्यावर निवांत झालो. जेवण झाल्यावर कॉफी पीत आरामात बसलो होतो. अगदीच आडवाटेची जागा होती. त्यामुळे दुकानात आम्ही आणि मालकीणबाई सोडून कोणीच नव्हतं. हातातलं काम संपवून मालकीणबाईं गप्पा मारायला आल्या.

सुरवातीचे नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्या म्हणाल्या ‘ह्या भागातले दिसत नाही तुम्ही लोकं. इकडे कसे काय आलात आणि निघालात कुठे?’ मग संभाषणाची गाडी बरेच दिवस प्रवास करतो आहे, आजचा मुक्काम कुठे आहे, थंडी किती आहे, पाऊस किती झाला नाही? इकडे वळली. बोलता बोलता अचानक त्या म्हणाल्या ‘oh, so you guys are trying to hit all fifty states, are you not?’ आम्हाला दोघांना आपली गंमत ह्यांना कळली ह्याचा फार आनंद झाला! मालकीणबाई आमच्या कल्पनेवर फारच खूश झाल्या. त्यांनी आम्हाला पुढच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आमचं आणि गाडीचं पोट भरलं होतं आणि गप्पा मारून मन हलकं झालं होतं. त्या छान मन:स्थितीत त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रस्त्याला लागलो.

हा किस्सा आहे अमेरिकेतल्या साऊथ डाकोटा राज्यातला. त्या दिवशी आम्ही आमच्या लांबलचक रोडट्रीपच्या कीस्टोन, साऊथ डाकोटा ते बिस्मार्क, नॉर्थ डाकोटा ह्या टप्प्यात होतो. घर सोडून पाच दिवस झाले होते आणि घरी परतायला साधारण वीस दिवस होते. गेली पाचेक वर्षे अमेरिकेत होतो. इथे आलो तेव्हापासूनच महेशच्या डोक्यात ‘अमेरिकेच्या सगळ्या राज्यात जायचं’, अशी कल्पना होती. भारताच्या जवळपास तिप्पट क्षेत्रफळ असलेला हा अवाढव्य देश. इतकं मोठं अंतर रस्त्याने फिरायचं? मला ही कल्पना जरा धाडसी, जरा वेगळी, जरा भितीदायक वाटत होती. इतक्या दिवसांचा प्रवास एकसुरी होईल का? आपल्याला कंटाळा येईल का? अशी भीतीही मनाच्या कोपऱ्यात वाटत होती. पण तेव्हा नुसत्या गप्पा मारायचा विषय होता. त्यामुळे फार मनाला लावून घेण्याची गरजही नव्हती.

जसे आमचे मायभूमीत परतायचे विचार पक्के होऊ लागले, ऑफिसच्या रजेचा प्रश्न येणार नाही असे दिसले, तसा ह्या कल्पनेला जोर आला.मला फिरायची आवड असली, तरी मी घरप्रेमीही आहे. घर सोडून कुठेही जायचं म्हटलं की विचारांचा झोका ‘मजा येईल, नवीन भाग बघायला मिळेल. नवनवे अनुभव येतील’ ह्यापासून ‘कशाला उगीच सुखाचा जीव दुःखात घालायचा? गाडी बिघडली, आजारपण आलं तर किती अडचण येईल. शिवाय इथल्या हवेचा काही भरवसा नाही. कुठे वादळात, बर्फात अडकलो तर? ’ इथपर्यंत विचारांचा झोका चालू होतो. पण ‘नको जाऊया’ असं म्हणावंसंही वाटत नाही. मग सोपा मार्ग म्हणून मी सबबी शोधायला लागते. उत्तम अशी सबब मिळून प्रवास परस्पर रद्द झाला तर बरं! असा काहीसा वेडपट विचार त्यामागे असतो.

मी पुण्यात चारचाकी चालवते पण अमेरिकेत नाही. त्यामुळे ड्रायव्हिंगची बाजू अर्धांगाला सांभाळावी लागणार होती. त्याला ड्रायव्हिंगची आवड, सवय किंवा व्यसन आहे. तो कितीही लांब अंतर न कंटाळता, न दमता गाडी चालवू शकतो. त्यामुळे ही भीती दाखवायचे प्रयत्न वाया गेले. मुलाची सबब सांगायला तो काही लहान नव्हता. चांगला मोठा. कधी एकदा पंख पसरून मोकळ्या आकाशात भरारी मारतोय ह्या घाईत असलेला. त्याला सांगितल्यावर त्याने ‘आई, काय हा घरकोंबडेपणा! जा की. मस्त फिरून या.’ असं म्हणून तोही फुगा फोडला! एव्हाना मलाही ह्या आयडियाची कल्पना आकर्षक वाटायला लागली होती. त्यामुळे सबबींचा अभ्यास थांबवला आणि रोडट्रीपचा अभ्यास सुरू केला.

अमेरिकेत एकूण पन्नास राज्ये आहेत. त्यापैकी मुख्य भूमीवर अठ्ठेचाळीस आणि अलास्का, हवाई ही बाजूला. आधीच्या ट्रीपमध्ये आम्ही काही राज्यांमध्ये गेलो होतो. उरलेल्या राज्यांमध्ये जाणे, हा ह्या ट्रीपचा उद्देश होता. ही राज्ये बघितली, असं म्हणणार नाही, कारण प्रत्येक राज्यातच काय पण प्रत्येक गावातही बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही असतं. प्रत्येक राज्याला कमीतकमी एक आठवडा दिला, तरी पन्नास राज्ये बघायला साधारण एक वर्ष लागेल. तेवढं तर अशक्य होतं. मग महत्त्वाच्या जागा, शहरं थांबून बघायची आणि बाकी चालत्या गाडीतून असा पॅटर्न ठरवला होता.

पूर्ण ट्रीपचा नकाशा
road trip map.png

ह्या ट्रीपची आमची तयारी म्हणजे एकदम ‘काय सांगू महाराजा!’ प्रकारची होती. पंचवीस ते तीस दिवस घराबाहेर राहायचं होतं. त्यामुळे कसं जायचं, कुठे राहायचं, काय बघायचं सगळंच ठरवायला आणि चर्चा करायला भरपूर संधी होती. मग काही ब्लॉग्स वाचले, यू ट्यूबवरचे व्हिडिओ बघितले, तिघांनी संयमित (आणि असंयमित)चर्चा केल्या आणि शेवटी ‘ऐकावे जनांचे आणि करावे मनाचे,’ असं म्हणत साधारण कसं जायचं त्याचा रस्ता नक्की केला. इतक्या मोठ्या प्रवासात ऐनवेळी बदल करावे लागतील, ह्याची कल्पना आणि तयारी होती. अगदी फारच विचित्र अडचणी आल्या तर शांतपणे घरी परत येऊ, अशीही तयारी होती.

आम्ही राहतो ते व्हर्जिनिया राज्य. तिथून वॉशिंग्टन राज्यातील सिऍटल हा पहिला टप्पा, तिथून ऍरिझोना राज्यातील फिनिक्स हा दुसरा टप्पा , तिथून लुईझियाना राज्यातील न्यू ओर्लियान्स आणि तिथून घरच्या दिशेने हा शेवटचा टप्पा असं ढोबळ प्लॅनिंग झालं. त्या त्या टप्प्यात काय काय बघायचं आणि कुठे राहायचं हे ठरवलं. एकूण मिळून ८००० मैलाच्या वर अंतर होत होतं. भारताच्या संदर्भात सांगायचं तर कन्याकुमारी ते लेह हे अंतर साधारण १८०० मैल आहे. त्यावरून अंदाज करता येईल.

पहिला टप्पा: व्हर्जिनिया ते वॉशिंग्टन राज्य
map phase 1-1.pngदुसरा टप्पा : वॉशिंग्टन राज्य ते ऍरिझोना
map phase 2.pngतिसरा टप्पा : ऍरिझोना ते लुईझियाना
map phase 3.pngतिसरा टप्पा : ऍरिझोना ते लुईझियाना
map phase 4.png

जास्तीत जास्त आठ तास ड्रायव्हिंग करावं लागेल, ह्या बेताने रोजचं अंतर ठरवलं होतं. गाडी चालवताना साधारण दोन-अडीच तासांनी आम्ही नेहमीच थांबतो. सलग बरेच तास गाडी चालवणं त्रासदायक आणि धोक्याचं वाटतं. थांबून जरा तरतरी आली की बरं असतं. त्याप्रमाणे दिवसभरात दोन- तीन वेळा थांबणं व्हायचंच. हा वेळ गृहीत धरूनही सकाळी निघून दुपारी उशीरा शक्यतो काळोख होण्याच्या आत पोचता येईल असा हिशेब केला होता. ज्या दिवशी थांबून काही बघायचं असेल, त्या दिवशी कमी अंतर. अर्थात हे प्रत्येक वेळी शक्य झालंच असं नाही. कधी अगदी कमी म्हणजे पाच तास तर कधी जास्त म्हणजे दहा तास ड्रायव्हिंग झालं. पण सरासरी सात ते आठ तास ड्रायव्हिंग होत होतं. मुख्य उद्देश रोडट्रीप असल्याने प्रेक्षणीय स्थळांना काही वेळा कात्री लावावी लागली.

बाकीच्या गोष्टींबरोबर हवामानखात्याच्या सहकार्याची फार आवश्यकता होती. इतक्या मोठ्या मार्गात पाऊस, ऊन आणि थंडी ह्या सगळ्याचा सामना करावा लागेल, हे स्पष्ट होतं. अमेरिकेत अधिकृतरीत्या हिवाळा जरी २२ डिसेम्बरला चालू होत असला, तरी थंडी त्याच्या आधीच हातपाय पसरायला लागते. नोव्हेंबरापासून पुढे तीन-चार महिने बर्फाची वादळे होऊन रस्ते बंद होण्याची शक्यता असते. डोंगराळ भागात खात्रीच. ह्या अडचणी टाळण्यासाठी आम्ही २२ सप्टेंबरला म्हणजे इथल्या हेमंत ऋतूच्या म्हणजेच फॉलच्या पहिल्या दिवशी घर सोडायचं असं निश्चित केलं. हिवाळा तीन महिने लांब आहे, त्यामुळे आपण योग्य वेळी निघतोय, असं वाटलं होतं. ते बऱ्याच प्रमाणात खरं झालं पण मनापासून बघायचे होते ते काही भाग बर्फवृष्टीमुळे बघता आले नाही. त्याचं वर्णन पुढे येईलच.

सुरवातीच्या चार-पाच दिवसांच्या हॉटेल्सचं बुकिंग केलं. जसं जसं पुढच्या टप्प्याला पोचू, तशीतशी पुढची बुकिंग करायची असं ठरवलं होतं. म्हणजे काही कारणाने रस्ता बदलावा लागला, तरी बुकिंग रद्द करायची कटकट वाचली असती. शक्यतो मायक्रोवेव्ह, फ्रीज, व्या-फाय इंटरनेट आणि कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट असेल, अशी हॉटेल ठरवली होती.

इतक्या मोठ्या प्रवासात ‘जेवण’ हा एक कळीचा प्रश्न असतोच. सकाळी नाश्ता करायची सोय हॉटेलमध्ये होती. दुपारचं जेवण रस्त्यात. पण इतके दिवस रोज रात्रीही बाहेर जेवणं ही कल्पना जरा त्रासदायक होती. देशात काय किंवा परदेशात इतके दिवस बाहेरचं खाणं काही खरं नाही. हॉटप्लेट घेऊन जायची एक कल्पना होती. पण एकतर ती चांगलीच जड असते, शिवाय जोडीला स्वैपाकाची भांडी न्यावी लागली असती. म्हणजे सामानात अजून भर. आधीच्या प्रवासांमध्ये मायक्रोवेव्ह-वापर-योग्य, असा राईस कुकर वापरला होता. त्यातला भात आणि रेडी टू कुक भाज्या असं बऱ्याच वेळा जेवलो होतो. त्यापेक्षा अजून काही चांगला पर्याय मिळतोय का? ह्यावर खल झाला.

अखेरीस ‘इन्स्टंट पॉट’ नामक जादूच्या भांड्याची खरेदी झाली. हा इन्स्टंट पॉट आणि एक प्रेशरकुकरमधला सेपरेटर इतक्या फौजफाट्याच्या बळावर आम्ही रोज रात्री घरचं जेवण जेवलो! ही कल्पना प्रत्यक्षात आणायची तर बरोबर भरपूर शिधा घेणं अपरिहार्य झालं. मला तसंही प्रवासाला जाताना घडू शकतील अशा सगळ्याच्या सगळ्या शक्यता गृहीत धरून खूप सामान घ्यायची इच्छा असते. पण आपण जेव्हा सार्वजनिक वाहनाने जातो, तेव्हा ह्या इच्छेला मुरड घालावी लागते. आता काय घरच्या गाडीनेच जायचं होतं. त्यातून मोठ्या गाडीत आम्ही दोघंच असणार होतो. म्हणजे पूर्ण बूट स्पेस आणि मागच्या सगळ्या सीट भरायला वाव होता. म्हणजे थोडक्यात ‘मौकाभी है और दस्तूरभी’ अशी संधी होती. मी त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असं ठरवून सामान जमवायला लागले.

कमीतकमी वेळात आणि सामानात करता येतील अशा पदार्थांचा विचार केला.

उपमा करण्यासाठी रवा फोडणीत कोरडा भाजून घेतला. बेसनही असंच फोडणीत भाजून घेतलं. मूग-मसूर डाळ मिक्स आणि तुरीची डाळ धुऊन वाळवून परतून घेतली. ह्या सगळ्याचे एका वेळेला दोघांना लागतील एवढे पोर्शन्स झिपलॉकमध्ये तयार केले. जिरं-खोबऱ्याची लसूण घालून चटणी केली. फोडणीसाठी तेल नेलं, तर सांडायची शक्यता म्हणून तूप घेतलं. मीठ, साखर, हळद घेतली . कांदे बटाटे टिकायचा प्रश्न नसतो त्यामुळे ते जास्ती घेतले. हे सगळं टिकाऊ सामान एका बॅगेत भरलं. त्याच बॅगेत कागदाच्या प्लेट, चमचे, हात पुसायला नॅपकीन आणि सुरी घेतली. कूल बॉक्समध्ये दूध, कॉफी, एका डब्यात कोथिंबीर,कढीलिंब, मिरच्या असा सरंजाम घेतला. दूध किंवा टोमॅटो, पालक, काकडी, गाजर, कोथिंबीर अशी नाशवंत सामग्री लागेल तशी घेत गेलो.

वाचायला हे सगळं ‘आवरा’ प्रकारचं वाटू शकेल. मलाही घेताना आपण जरा अतीच करतोय, असं वाटत होतं. पण आठ-आठ तास ड्रायव्हिंग, पायी फिरणे करून अनोळखी गावात हॉटेलमध्ये पोचल्यावर जेवणासाठी पुन्हा बाहेर पडावंसं वाटायचं नाही. त्यातून खूप थंडी किंवा उन्हाळा असेल तर अजूनच नको व्हायचं. इतकं दमून आल्यावर ज्या चवीची वर्षानुवर्षे सवय आहे, असं गरमागरम जेवताना इतकं बरं वाटायचं की त्यापुढे हा सगळा पसारा नेणं काही कठीण वाटलं नाही. ज्या दिवशी मुक्कामाला लवकर पोचलो अशा गावी किंवा जेवणाचे चांगले पर्याय उपलब्ध होते अशा गावी मात्र ही खटपट न करता बाहेर जेवलो.

प्रवासात प्यायच्या पाण्यासाठी आम्ही यूज अँड थ्रो बाटल्या न वापरता चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरतो. इथे बऱ्याच ठिकाणी बाटल्या भरून घेता येतील अशी सोय असते. त्यामुळे प्रत्येक वेळी गाडीतून उतरताना रिकाम्या झालेल्या दोन-तीन बाटल्या बरोबर घेणे हा धडक कार्यक्रम पूर्ण प्रवासभर राबवला. तरीही पाण्याचे दोन-तीन कॅन घेऊन ठेवले होते. शिवाय गाडीत खायला थोडा कोरडा खाऊही बरोबर ठेवला होता. थोडक्यात म्हणजे परस्पर दक्षिण-उत्तर ध्रुवावर जायची वेळ आलीच, तरीही काहीही अडचण येऊ नये, अशा प्रकारची तयारी केली. तरीही ऐनवेळी काय अडचण येईल, प्रवास नीटपणे पार पडेल ना? अशी काळजी होतीच.

२०१९ मध्ये केलेल्या ह्या प्रवासाचं वर्णन आता बरेच दिवस उलटल्यावर लिहिते आहे. ह्या प्रवासात आम्हाला बघायला खूप मिळालं पण माणसं फारशी भेटली नाहीत. जेवायला गेल्यावर, हॉटेलमध्ये चेक-इन करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी रोज तीच वाक्य बोलली जायची. वैयक्तिक आमच्याशी कोणी गप्पा मारल्या, मैत्री केली असं काही झालं नाही. हा प्रवास आमचा, आमच्याबरोबरच झाला. त्यामुळे हे आमच्या प्रवासाचं वर्णन वाटण्यापेक्षा प्रवासातल्या आमचं वर्णन वाटू शकतं. पण त्याला काही इलाज नाही.

नमनाला हे एवढं घडाभर तेल जाळल्यावर आता प्रत्यक्ष प्रवासाला किती पेट्रोल जाळलं असेल ह्याचा अंदाज आला असेल!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow मस्त सुरुवात. नक्कीच आवडेल ही पूर्ण सिरीज वाचायला. यूएसमध्ये रोड ट्रिपला खरंच मजा येते . आता करोनामुळे कुठे जाता येत नाही.
तुमचा आयडी फॉलो लिस्टमध्ये टाकलाय म्हणजे पुढचे भाग मिस होणार नाहीत.
जेवणाची तयारी वाचून 'अबब' झालं. त्याबद्दल नक्कीच पुढे वाचायला आवडेल की रोज कसा स्वयंपाक केला.

नक्कीच आवडेल ही पूर्ण सिरीज वाचायला. सर्वात महत्वाचे रस्ता आणि सोबत चांगली असेल तर जास्त मजा येते अशा प्रवासात.

मस्त सुरूवात! पुढे वाचायची उत्सुकता आहे. लिहा लौकर

हा उद्योग कधीतरी करायचा आहे. वरती प्रत्येक राज्यात एक आठवडा वगैरे वाचल्यावर कधीतरी एक वर्ष ब्रेक घेउन हेच करावे असे पहिले डोक्यात आले Happy

मस्त सुरुवात!
पुढचे भाग वाचायची उत्सुकता आहे!!

वॉव... मस्त सुरूवात... अनुभव वाचायला आवडेल..!!

पहिल्यांदा वाटले की दोन माणसे (मोदी आणि शहा), चार चाकं (म्हणजे महत्वाचे इतर भाजपेय) आणि पंचवीस भारतातील राज्य यावर काही राजकीय प्रवास असा लेख आला आहे. पण खरोखरच प्रवासावर आलाय.

मस्तच, असा प्रवास करायला खुप मजा येते. लिहले पण खुप छान आहे.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

मस्त सुरुवात. पुढचे भाग वाचायला आवडतील.

मलापण अशीच रोड ट्रिप करायची आहे पण ती रुट ६६ वर, शिकागो ते एल. ए. बघुया कधी मुहुर्त मिळतोय ते.