शशक पूर्ण करा - रात्र काळी - अवल

Submitted by अवल on 16 September, 2021 - 14:25

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

हातातले साखळदंड अपसुक तुटून पडले. सगळे दारवान काळझोप लागावी तसे झोपलेले. शेजेखालच्या टोपलीत त्याला ठेवले अन बाहेर पडलो.

पावसाचा जोर वाढत चाललेला. कसाबसा तोल सांभाळत तीरावर आलो. नदी आज उफाणावर होती. तसाच आत घुसलो. डोक्यावर टोपली ठेवून मध्यापर्यंत आलो पाण्याचा जोर वाढलेला. वाटलं संपलं सगळं. पण नाही, त्याच्या पायाला पाण्याने स्पर्श केला अन पाणी उतरू लागले.

समोरच्या उंबऱ्यावर टोपली ठेवली अन परतलो.

दरवाजा बंद झाला. मनात अनामिक हुरहूर! पावसाचा आवाज कानात घुमतोय. सगळीकडे अंधारच अंधार. काही सुचत नाहीये...

Group content visibility: 
Use group defaults

कृष्णजन्म _/\_
अचूक शब्दात योग्य वातावरण निर्मिती . जमलीये