शशक पूर्ण करा - फुफाटा - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2021 - 07:57

फुफाटा

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि बाळाप्पाची तंद्री भंगली.
कोणीतरी तिला केसांना धरून फरफटत आणत होतं. लक्ष्मी ? तो शहारला. आरडतओरडत त्या आडदांडाला ती प्रतिकार करीत होती. ते बाळाप्पासमोर पोहोचले. अशक्त झालेला तो उठू लागला.. भेलकांडला..

आडदांडानं तिला सामोरं केलं. पदर सुटलेल्या तिनं नवऱ्यासमोर लाजेनं मान खाली घातली.

"भेन्चो* ! पैशे आण न् ह्या रां*ला ने. पिंट्या जा, सोड याला.

पिंट्या पुढे झाला.

"मालक, मालक..." दीनवाणी हवेत विरली. पिंट्यानं त्याला बाहेर काढलं होतं.

रस्त्यावरील फुफाट्यानं डोळे डबडबले. पाणीच पाणी...नुसतं पाणी ! फुफाटा...पाणी ? फुफाटा......फुफाटा........................

_हाडळीचा आशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा... Sad

शीर्षक नीट दिलेले नाही.

अर्र्र्र!!! काय ही विटंबना. नवर्‍याने फुकट प्याली म्हणुन गुत्त्याच्या मालकाने बायको ओलीस धरली Sad

सामो, गुत्त्यावाला नाहीये तो आणि बाळाप्पा प्यायलेलाही नाहीये. कथाविषय वेगळा आहे. कुणीतरी ओळखेल म्हणून थांबलो आहे. Happy
अस्मितै, मृतै धन्यवाद.

पुरा मुळे?
पीक बुडाले.

नाही.

लॉकडाऊन>>> नाही.
साधनाताई तुम्ही जवळपास पोहोचताय.

हममम
कठीण.. फुफाटा शांत करायला पाणी?? आग विझुन गेलीय, फुफाटा ऊरलाय... आग का लागली किंवा लावली...

कर्ज थकले म्हणून बायकोला ताब्यात घेतली.कुठे जाणार आणि पैसे मिळणार्?याहीपेक्षा त्यामुळे झालेलीबायकोची विटंबना आणि काही न करण्याची खंत.

कूपनलिका !
साधारणपणे अठरा साडेअठरा फूट लांबीचा ड्रिलचा एक पाईप असतो. पाच ते सात मिनिटांत तो खाली जातो. खालून हवेचा दाब दिला की खालची माती वर येते. खाली पाणी वा ओल नसेल तर नुसती कोरडी माती न् धूळ उधळते (तोच फुफाटा). पाणी सापडण्याच्या आशेने पाईपावर पाईप वाढत जातात. प्रत्येक पाईपागणिक खर्चाचा आकडा वाढत असतो आणि खाली न सापडणारं पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यांतून वाहू लागतं. भरपूर खोल जाऊनही पाणी लागतच नाही आणि कूपनलिकेसाठी खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा दरानं कर्ज घेतलेलं असतं.. मग ते फेडायचं कसं ?

आता कथा
बाळाप्पाला सावकारानं आधीच उचलून आणून अंधाऱ्या जागी डांबलेलं आहे. संयोजकांनी दिलेल्या वाक्यांतील पाणी, अनामिक हुरहूर हे बाळाप्पाला होणारे भास आहेत. दरवाजा उघडला गेल्यावर त्याची तंद्री भंग पावते. त्यानंतरचं वर्णन त्या कुटूंबाची सध्याची परिस्थिती विशद करतं.
बाळाप्पाला बाहेर घालवल्यानंतर तो दिशाहीन रस्त्यानं जात असताना रस्त्यावरील धूळ डोळ्यांत जाऊन डोळे वाहू लागतात आणि पुन्हा पाण्याचे भास होऊ बघतात. खरंतर तो भास आभासाच्या सिमेवर आहे म्हणून पाणी -फुफाटा, पाणी-फुफाटा.
कूपनलिका खोदतेवेळी फुफाटा आलाच नसता तर आज परिस्थिती खूप वेगळी असती म्हणून तो मनोमन आपल्या कुटुंबाच्या सद्यस्थितीसाठी फुफाट्याला जबाबदार धरत असतो.

Sad बाप रे!!!
>>>>पुन्हा पाण्याचे भास होऊ बघतात. खरंतर तो भास आभासाच्या सिमेवर आहे म्हणून पाणी -फुफाटा, पाणी-फुफाटा.
कूपनलिका खोदतेवेळी फुफाटा आलाच नसता तर आज परिस्थिती खूप वेगळी असती म्हणून तो मनोमन आपल्या कुटुंबाच्या सद्यस्थितीसाठी फुफाट्याला जबाबदार धरत असतो.

१०० शब्दात फार ताकदीचे वर्णन आहे.

ओहह.. Sad

मला कधीही हा अंदाज बांधता आला नसता कारण मी जिथे राहते तिथे पाणीच पाणी आहे. बिन पाण्याचा फुफाटा ऐकुनही माहित नाही.

शंभर शब्दांत मी वाचकांपर्यंत योग्य तऱ्हेनं विषय पोहोचवायला कमी पडलो असं वाटतंय. Happy
बरेच जणांनी छान प्रयत्न केला.
साधनाताई, सामो, अस्मीतै, मृतै, वीरु, मानवकाका, ऋन्मेष, देवकी, मी अश्विनी, sonalisl सर्वांना मनापासून धन्यवाद.

Pages