BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 August, 2021 - 22:27

BYJU'S वा तत्सम ऑनलाईन शिक्षण कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे का?

मुलगा पावणेचार वर्षांचा आहे आणि मुलगी दुसरीत आहे. दोन मुलांचे तीन वर्षांचे मिळून एक लाख रुपये सांगितले आहेत. जे बारा महिन्यांच्या ईन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे आहेत. ज्यात ते दोन्ही मुलांना पर्सनल टॅब देणार. त्यांच्या वर्कशीट असणार. ऑनलाईन तर असणारच, पण लिहायची प्रॅक्टीस व्हायला पेनने लिहायच्या वर्कशीट देखील देणार ज्यात पेनने वर्कशीटवर लिहिताच स्कॅन होत समोर स्क्रीनवर दिसणार. तसेच दिवसभरात सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत कधीही ऑनलाईन आलात तर तुम्हाला नेमून दिलेला शिक्षक तुम्हाला त्या वर्कशीट सोडवायला आणि समजून घ्यायला मदत करणार. तुम्ही मराठी आहात तर तुम्हाला मराठी बोलणारा शिक्षक मिळायची सोय आहे. मुले आईसीएसई वा सीबीएसई बोर्डला आहेत त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रम फॉलो होणार. ऑलिम्पियाड वगैरे बाहेरच्या एक्झामचाही सिलॅबस त्यात कव्हर करणार वा त्यात मदत करणार. जे मुले स्क्रीनवर करताहेत ते सारे त्यांच्या नेमून दिलेल्या शिक्षकांनाही दिसणार, त्याचा वीकली रेकॉर्ड ते पालकांना देणार, पालकही मुले काय करत आहेत हे अ‍ॅपमार्फत बघू शकतात, मॉनिटरींग करू शकतात वगैरे वगैरे..

थोडक्यात ऑनलाईन ट्युशन घेतल्यासारखेच आहे हे. मी हिशोब लावला तर दोन्ही मुलांचे तीन वर्षे मिळून ३६ गुणिले २ = ७२ महिन्यांचे लाखभर रुपये म्हणजे १४०० रुपये दर डोई दर महिना झाले.

तुर्तास रजिस्ट्रेशन करून १५ मिनिटांचा ट्रायल पिरीअड घेतला आहे. तो घ्यावाच लागला कारण त्यांच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडमने घरी येऊन चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर नकाराचा पर्यायच माझ्याकडे शिल्लक राहिला नाही.

पण त्याहून महत्वाचे कारण म्हणजे मोठ्या मुलीपेक्षा छोट्या मुलाची चिंता जास्त आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्लेग्रूप नर्सरी वगैरे प्रत्यक्ष शाळा तर त्याच्या नशीबातच नव्हती आणि त्याचे ऑनलाईन क्लास असे कधी सुरूच झाले नाहीत. म्हणजे त्याच्या फी चे सुरुवातीचे ईन्स्टॉलमेंट भरले आहेत पण शाळा सुरू झाल्यापासून गेल्या चार महिन्यात तो फक्त दोनदाच क्लासला बसला आहे. ते सुद्धा काही लक्ष न देता, बसायचे म्हणून बसला. तयारच होत नाही स्क्रीनसमोर बसून शिकायला. बिल्डींगमध्येच ट्यूशन लावून पाहिले पण तिथेही तो थांबला नाही. आमच्याकडूनही काही शिकून घेत नाही. त्यामुळे शाळेचे पुढचे इन्स्टॉलमेंट न भरता, जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत, आधीच्या ईन्स्टॉलमेंटचे जे पैसे गेले ते अक्कलखाती समजून, त्याची शाळाच बंद करावी या निष्कर्शापर्यंत मी आलो होतो. हे झाले पैश्यांचे, पण मुलाला काहीतरी शिकवायला हवेच ना. तर आता बायकोने हा पर्याय आणलाय.

१५ दिवसांच्या ट्रायल पिरीअडमध्ये बघूया आता ते BYJU'S वाले काय किती इम्प्रेस करताहेत. त्यावरून पुढे ठरवले जाईलच. पण ईथे कोणाला अश्या ऑनलाईन ट्युशन क्लासेसचा अनुभव असल्यास तो शेअर केल्यास माहितीचा फायदा सर्वांनाच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायजुज किंवा तत्सम क्लास पेक्षा बिल्डिंगमध्ये ओळखीच्या मॅडम कडे ट्युशन लावता आल्यास बरे.ओळखीच्या लोकांना आपली मुलं जास्त सवयीची, हाताळण्यायोग्य असतात.(हे वागण्याच्या कंटेक्स्ट मध्ये) मुलगा एकुणात बसण्याची सवय नसलेला असेल तर इतक्या लहान वयात बायजु ला पण दाद देणार नाही.

हे सर्व पॉलिशड क्लासेस मुलं आपल्याला कळण्या इतकी मोठी झाली, स्वतः बसून अभ्यास करायला लागली आणि याउप्पर जादा मोटिव्हेशन म्हणून आवडत असेल तर लावायला बरे.

त्यांचा एजंट(मला इथे प्रतिनिधी म्हणायचं आहे, आणि इंग्लिश शब्द घाईत लिहायला मोठा आहे) कायम मूल कसं कमी स्मार्ट आहे आणि बायजु ने कसं लख्ख होणार आहे हेच नीट सिद्ध करणार.असेसमेंट बनताना तश्याच बनतात.
(माझ्या पुतणी कडे बायजु चे सबस्क्रिप्शन आहे.आता 10वी मध्ये आहे.)

इतक्यात बायजु? नको नको, त्या पेक्षा बिल्डिंग मधील टिचर बेस्ट. बायजु ८ नंतर चालेल. खेळु दे जरा मुलांना.

सेम माझी हिच परिस्थिती झाला आहे छोट्या मुलीच्या शाळेबाबत. कोरोनाच्या आधी पैसे भरून एडमिशन घेतले होते तिच्या साठी. पैसे गेले.तीनेही कधी च ऑनलाइन सेशन अटेन्ड केले नाही.शाळाच माहिती नाही तर ऑनलाइन शाळा काय कळणार ना या लहान मुलांना.
मोठ्या मुलासाठी मागच्या वर्षी आम्ही पण बायजुसचे ट्रायल सेशन्स अटेन्ड केले होते ते असंच इम्प्रेस करतात पालकांना पाल्यांचे कौतुक करून. आम्ही कंटिन्यु नाही केले.
यावर्षी सुरू आहे मुलाचे चौथीचे ऑनलाइन क्लासेस,होमवर्क पण भरपूर आहे. एक्स्ट्रा क्लासेस ची गरज वाटत नाही.
पण मुलीसाठी काय करावे समजेना, ऑनलाइन पुस्तके मागवलीत,पेन्सिल होल्डींग प्रैक्टीस बुक, कैपिटल लेटर,स्मॉल लेटर,नंबर्स.पण इफेक्टीव्ह होत नाही घरात शिकवणं.

बायजुज बरोबर डिल करताना सांभाळुन. अनएथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस साठी ते कुप्रसिद्ध आहेत.
प्रविण पुनिया (Praveen Poonia) नावाच्या माणसाने बायजु आणि व्हाईटहॅट ज्युनिअर विरुद्ध केलेल्या लिखाणामुळे या कंपन्यांनी त्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकलेला तो हल्लीच मागे घेतला. युट्युब वर Praveen Poonia किंवा Byju's Scam सर्च केलंत की खुप माहिती मिळेल.

https://restofworld.org/2021/inside-india-edtech-byjus/

हो.
खूप मोठा लॉ सूट टाकला होता त्याच्यावर.
प्रत्यक्ष बायजूज बद्दल माझं काही म्हणणं नाही.ज्यांना पैसे खर्च करायचे आहेत, ज्यांना खरोखर फायदा होणार असं वाटतंय ते पैसे खर्च करतील.(फायदा होणं न होणं विद्यार्थ्याच्या पुढच्या एकाग्रतेवर अवलंबून.व्हाईट हॅट मध्ये त्यांनी स्टेक घ्यायला नको होता.पण तोही ज्याचा त्याचा प्रश्न.)

ती जादूची कांडी नाही हे घेणाऱ्याने लक्षात ठेवावं इतकंच.

ज्यांची मुलं प्रीप्रायमरीत आहेत आणि शाळेच्या ऑनलाइन क्लासना बसत नाहीत त्यांनी घरीच/ ओळखीचं कुणी शिकवत असेल तर जमेल तसं शिकवावं. अक्षरं ओळखता आली, रंग, आकडे, आकारबिकार ओळखता आले तरी बास झालं. जेव्हा शाळा खरोखरच सुरू होईल तेव्हा शाळेत शिकवतीलच की. नाही तरी तोच तोच पोर्शन परत परत असतोच पहिली दुसरी तिसरीत. बेरीज वजाबाकी वगैरे. काही नवीन असतो अर्थात. पण करतील मुलं नंतर.

मुलगा एकुणात बसण्याची सवय नसलेला असेल तर इतक्या लहान वयात बायजु ला पण दाद देणार नाही. >> बरोबर.

शाहरुख खान करतो ना BYJU's ची जाहीरात? म्हणजे मस्तच असेल.
बा मानवा आपण तर "महावस्त्रउभयतां " दिलात.

दिवसभरात सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत कधीही ऑनलाईन आलात तर तुम्हाला नेमून दिलेला शिक्षक तुम्हाला त्या वर्कशीट सोडवायला आणि समजून घ्यायला मदत करणार. तुम्ही मराठी आहात तर तुम्हाला मराठी बोलणारा शिक्षक मिळायची सोय आहे.>>>
या भुलथापा आहेत. बहिणी च्या मुली साठी घेऊन ते पस्तावले आहेत, कुणीच शिक्षक अवेलेबल नसतात. फिजिकल ट्युशन लावा. भाची साठी शेवटी तेच केले. ३५ हजार अक्कलखाती गेले.

शाहरुख खान करतो ना BYJU's ची जाहीरात? म्हणजे मस्तच असेल.>>> एरवी ॠ ची टिंगल ठीक आहे हो, पण आता प्रश्न त्याच्या दोन्ही मुलांचा आहे.. माहीत नसेल तर तसे सांगा.

दोन्ही मुलांची वयं बघता, ऑनलाईन ट्युशन फार सोयीची होणार नाही - शक्यतोवर घरातल्या कुणीतरी रोजच्या रोज मुलांबरोबर वेळ काढला तर मुलांना अतिशय फायदा होतो असा माझा अनुभव आहे

यामध्ये साधारण सातवी-आठवीत जाईपर्यंत तरी मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाशी बांधून ठेवण्याची फारशी गरज नाही, शास्त्र गणित इतिहास भूगोल यामध्ये साधारण काय चालू आहे त्याप्रमाणे आई/बाबा बरोबर अभ्यास करण्याचा, खूप छान उपयोग होतो...

या साठी काय अभ्यास घ्यायचा/त्यासाठी लागणार मटेरियल/वर्कशीट शोधायच्या किंवा तयार करायच्या यात मेहनत बरीच लागते, पण त्यात आपल्या पाल्याला काय गरज आहे त्याप्रमाणे कस्टमाइज्ड अभ्यास घेता येतो - माझी लेक साधारण आठवीत जाईपर्यंत असाच अभ्यास आम्ही दोघी करत असू... नववी दहावी मध्ये हळूहळू परीक्षेसाठी अभ्यास करण्याची सवय तिला लावली
साधारण सातवी आठवी पर्यंत, अभ्यासाचा स्वरूप हे मुलांना शिकण्याची आवड लावणं, रोज काहीतरी अभ्यास केला पाहिजे याची सवय लावणं आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची कुवत मुलांच्यात निर्माण करणे एवढच असायला हवं - या वयापर्यंत शाळेत मिळणारे मार्क तुलनेने कमी महत्त्वाचे असतात

घरी जर असा अभ्यास घेणं काही कारणांमुळे शक्य नसेल, तर घरगुती किंवा प्रोफेशनल सेटिंग मध्ये मात्र प्रत्यक्ष घेतल्या जाणाऱ्या ट्युशन्स काही प्रमाणात उपयोगी येऊ शकतील - ऑनलाईन ट्युशन चा पूर्ण फायदा उठवण्यासाठी मुलांची वयं कमी आहेत

स्नेहमयी, वावे, मी अनु, इ. सर्वांशी सहमत. माझे वैयक्तिक मत इतक्या लहान मुलांना ट्युशन देखील लावू नये असे आहे. माझ्या मुलाला तो नववीत गेल्यावर ट्युशन लावली. तोवर माझा नवरा त्याचा अभ्यास बघत असे, आम्ही तोवर फक्त लक्ष ठेवणे आणि मार्गदर्शन करणे एव्हढेच केले. याच काळात तुम्ही त्यांना अटेन्शन, क्वालिटी टाईम, देऊ शकता आणि कुठल्याही कठीण काळात तुम्ही कायम त्यांना गाईड कराल हा विश्वास देऊ शकता. मला वाटतं की हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे.
त्यावेळी आमच्या संपर्कात बैजुचा एजंट आला होता. त्याने आमचा मुलगा कसा ग्रेट आहे आणि बैजु कसा त्याला एकमेवाद्वितीय बनवून सोडेल अशी करून पर्सनल टॅब वर येऊन थांबला. आमचे उभयतांचे चेहरे बघून आणि प्रश्न ऐकून आम्ही एकमेवाद्वितीयला भीक घालत नाही असे त्याच्या लक्षात आले. तिथे त्याने टॅबवर भर द्यायला सुरुवात केली. आम्ही त्याला नम्रपणे सांगितले की मुद्दा टॅबचा नाही, शिक्षणाचा आहे. आम्हाला टॅबचा मुळीच मोह नाही. आम्ही विचार करून सांगू, मग त्याने लिमिटेड सीट आहेत वगैरे सांगायला चालू केले. आम्ही अर्थातच दाद दिली नाही.आणि मुलगासुद्धा आमच्याशी पूर्ण सहमत होता.
थोडक्यात, हे फक्त मार्केटिंग आहे, त्यात बैजुचा फायदा आहे, तुमचा नाही.
ही गोष्ट साधारण 5 वर्षांपूर्वीची आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आता कदाचित अजून बदलले असतील.

त्याने आमचा मुलगा कसा ग्रेट आहे आणि बैजु कसा त्याला एकमेवाद्वितीय बनवून सोडेल अशी करून पर्सनल टॅब वर येऊन थांबला. >>>>>>>>
नाही बदललं..आताही सेम असंच सुरू आहे.

माझे मत आहे शाळा पुरेशी आहे. क्लासेस(ऑनलाईन आणि ऑफलाईन) हे पालकांना लुटण्यासाठी आणि शिक्षकांना ऐषोआरामात जगता यावं यासाठी डिझाईन केलेले स्ट्रक्चर आहेत. आमच्या काळी क्लासेस होते पण तेव्हा या स्ट्रक्चरचं रूप आता आहे तितकं भयंकर न्हवतं. जास्तीत जास्त एखाद दुसऱ्या विषयाची तासभर ट्युशन असायची आम्ही त्याला शिकवणी बोलायचो.महिना शंभर रुपये फी असायची. आमचे फिजिक्सचे सर तर कुणाकडे पैसेही नाही मागायचे. त्यांच्या घरचा दरवाजा सताड उघड असायचा कोणालाही काही अडलं तर त्याने कधीही तास दोन तास तिथे जाऊन बसावं आणि शंका दूर करून घ्याव्यात. सगळ्यात आधी विद्यार्थी, नंतर कुटुंब आणि नंतर वेळ उरलाच तर तो आपल्यासाठी हे त्यांचा ब्रीदवाक्य होतं. आता सगळा मांडलेला बाजार बघितला कि अस्वस्थ व्हायला होतं.

माझा मुलगा आता दुसरीत आहे. पहिली आणि दुसरी आँनलाइन झाली. बाकी सगळं येतं. गणित, पाढे, मराठी अक्षर ओळख वै. पण वाचता येत नाही. अगदी दोन तीन अक्षरी शब्द वाचतो. बॅट बॅग मॅट वैवै. पण वेगळं काही वाचता येत नाही. मी तर फ्रस्ट्रेड झाली आहे. ट्युशन लावलं तर बाई रोज स्पेलिंग पाठ करवते. पाठ केलेली स्पेलिंग धड्यात वाक्यात आली तर वाचायला वेळ लागतो/ वाचता येत नाही. Sad
मी वेदांतु सुपर रिडरचा फ्री डेमो करवला. फोनेटिकली वाचायला शिकवतात. पण मला काही ते शिकवणं अपील झालं नाही. शिवाय पैसे पण जास्त. परत शाळआ (ळ+आ लिहिता येत नाही) आँनलाइन (हे पण) करुन हा पण क्लास बसेल ह्याची गॅरंटी नाही म्हणून वेदांतु घेतला नाही. वाचना चं काय करावं काय कळत नाहीये.
ऋ, आय होप हे ईथे लिहीलंय तर तुला काही प्रॉब्लेम नसेल कारण तसंही फार अवांतर नाही हे.

मुलगा पावणेचार वर्ष म्हणजे खूपच लहान आहे. त्याच्याकडून सलग एका जागी बसून शिकेल अशी अपेक्षा नको. ऑनलाईनही नको आणि ट्यूशन म्हणूनही नको. घरुन पूर्णवेळ ऑफिसचे काम करत जोडीला मुलांचे शिक्षण हे आव्हान आहे याची पूर्ण कल्पना आहे. पण आत्ता त्याचे वय शिकायची गोडी लागणे, भाषेची-गणिताची गंमत अनुभवायचे आहे.
अ‍ॅमॅझॉनवरुन रंगित चित्र असलेली अभ्यासाची पुस्तके, चित्रं रंगवायला पुस्तके मागवता येतील. मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषेतील पुस्तके मिळतील. त्याशिवाय गोष्टीची पुस्तके मागवता येतील. पालकांसोबत रोज १० मिनिटे एका जागी बसून पुस्तकातली चित्रं बघणे, गोष्ट ऐकणे, कागदाचे साधे विमान/ होडी/भिरभिरे वगैरे करणे, अक्षराशी निगडीत आवाज (sound) आणि त्या आवाजाने सुरु होणारे शब्द - वस्तू दाखवणे असे बरेच काही घरी करता येइल. दिवसभरात असे १०-१० मिनिटाच्या तुकड्यात सुरुवातीला अर्धातास शिकणे झाले तरी पुरेसे आहे, यात सातत्य महत्वाचे. हळू हळू एका जागी जास्त वेळ बसणे आणि शिकणे जमू लागेल. दर आठवड्याला एक अक्षर - आवाज , एक रंग असे केले की त्यातून बर्‍याच अ‍ॅक्टिविटी होतात. अक्षर आणि आवाज याचे नाते पक्के झाले की वाचन, स्पेलिंग्ज-शुद्धलेखन हे सगळेच सोपे होते. असेच घरातल्याच वस्तू वापरुन १- १० अंक मोजणे , आकार, वगैरे शिकवावे. कागदाचे विमान किती उंच्/लांब उडाले, कुणाची भिंगरी जास्त वेळ फिरली, कोण किती उंच आहे , भाज्या/फळे मोजणे असे करत शिकवायचे.
सुरुवातीला अक्षरे/अंक ओळखणे एवढेच ठेवा. लेखनावर भर नको. त्याऐवजी ब्लंट कात्रीने कागद कापणे, क्रेयॉन्स वापरुन चित्र रंगवणे, कागदाला घड्या घालून होडी वगैरे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, लहान ताटल्या/वाट्या पुसणे वगैरे , घरगुती प्ले डो , लेगो ब्लॉक्स वापरुन खेळणे यातून Fine motor skills सुधारण्यावर भर द्या. तसे झाले की पुढे लेखन सोपे होईल.

>>>]
वाचना चं काय करावं काय कळत नाहीये.
>>>>>
इंग्लिश वाचण्यासाठी फोनिक्स पद्धतीचे शिकवणं मुलांना सोपं जातं असा माझा अनुभव आहे
स्पेलिंग पाठ करून मुलांना, नंतर तेच शब्द वाक्यात आले तर वाचता येत नाही असं मी पाहिलं आहे
मुलांनी वाचावं असं वाटत असेल, तर त्यांच्या आवडीची पुस्तक हाताला सहजगत्या लागतील अशी समोर ठेवण्याची काळजी घ्यावी, शिवाय आई बाबा स्वतःसाठी सुद्धा वाचत असतील तर मुलांना वाचन ही काहीतरी एन्जॉयमेंट म्हणून करायची गोष्ट आहे, शिक्षा किंवा वैतागवाणा अभ्यास नाही हा धडा मिळतो - घरात मुलांसमोर कोणी काही वाचतच नसेल तर मुलांना त्याची आवड कुठून लागणार?

लेकीला वाचायला शिकवताना मी केलेल्या काही गमती म्हणजे
१- मूल ज्या लेव्हलला आहे त्या लेव्हलची आणि एक लेव्हल वर असलेली पुस्तक घरात सहजगत्या मिळतील अशी ठेवायची - अशी पुस्तक ऑनलाइन ॲमेझॉन वर सहजगत्या मिळतात

२- वाचायला शिकवताना स्पेलिंग कडे मी सपशेल दुर्लक्ष केलं होतं- अर्थ कळला आहेना चल पुढे असंच धोरण ठेवत असे, किंबहुना शब्दांचा एक्झॅक्ट अर्थ, उच्चार यावरही मी फार भर दिला नाही. आपलं बोलणं ऐकून ऐकून मुलं बरोबर उच्चार शिकतात. शब्दाच्या अर्थाबद्दल ही तेच, साधारण अर्थ कळला तरी ठीक आहे वाचताना लय न सुटता गोष्टीची गोडी कळणं सगळ्यात महत्त्वाचं

३-अगदी लहान असल्यापासून सुरभिचा स्वतःचा लायब्ररी अकाउंट होता - स्वतः हाताळून निवडून पुस्तक आणणे यात तिला खूप गंमत वाटत असे- शिवाय स्वतः निवडलेली पुस्तकं असतील तर वाचायचा उत्साह जास्ती असतो

४-मिकी माऊस सिरीजची लहान मुलांची पुस्तकं मिळतात अगदी झीरो लेव्हल रीडर पासून अवेलेबल आहेत - ती पुस्तक आणि त्याच गोष्टीची सीडी अशा दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्या, कधी आधी व्हिडीओ नंतर गोष्ट तर कधी नंतर व आधी गोष्ट मग व्हिडीओ- मात्र एकच गोष्ट दोन्ही माध्यमातून अनुभवायला लेकीला अतिशय आवडत असे - अशाच गोष्टी आणि व्हिडिओ इतर सिरीज मध्ये सुद्धा मिळतात कार्स डायनासोर वगैरे- मुलाच्या इंटरेस्ट नुसार गोष्टी निवडणं सगळ्यात महत्वाचं

५- घरामध्ये मी आणि नवरा रोज आज काय वाचलं अशा गप्पा मारत असू, यात रोजच्या वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्या/ अवांतर वाचत असलेल्या कादंबऱ्या/कामानिमित्त वाचली जाणारी पुस्तकं असं काहीही असे - गप्पांचा भर मात्र हे वाचताना आम्हाला कशी मजा आली यावर ठेवत असू

६- फोनिक्स मेथडने एकेका स्वराचा उच्चार /तो स्वर कसा लिहायचा वाचायचा हे शिकत असताना, तो स्वर वापरून सुरभिने एक शब्द लिहायचा आणि मी वाचायचा त्यानंतर उलट असा खेळ दोघींनाही आवडत असे

>>>>
स्वाती सुंदर माहिती.
>>]
+123456
मुलं वाढवणे या विषयावरच्या स्वातीच्या पोस्ट आवर्जून वाचून लक्षात ठेवाव्या अशा असतात....

चुक. बैजू मालकाला असे लिहा..>>>मी इथे बैजु बद्दल बोलत नसून सगळ्याच क्लासेसबद्दल बोलत आहे. फक्त एखाद्या शिक्षकाकडे क्लासेस नाही लावले म्हणून शाळेतल्या परीक्षेत कमी मार्क्स दिल्या गेल्याच्या घटना दर सहा महिन्यांनी ऐकत असतो.

सस्मित,
स्पेलिंग्ज पाठ करुन मग वाचणे नको. वाचनासाठी अक्षर आणि आवाज हे महत्वाचे. जोडीला ही अक्षरे एकत्र आल्यावर तयार होणारा आवाज आणि त्यातून तयार होणार्‍या वर्ड फॅमिलीज. उदा. a चा आवाज अ‍ॅ कधी होणार आणि ए कधी होणार? त्यापुढे जावून हाच a इतर अक्षरांसोबत येतो त्यातून जी वर्ड फॅमिली तयार होते ती. उदा . ab - अ‍ॅब. यात cab , dab, lab असेच ad - bad, had, dad, mad . या वर्ड फॅमिलीज बघून त्यांचा आवाज डोक्यात पक्का करायचा. असेच rhyming words चे. सोबत syllable division rules शिकवायचे. वाचताना मोठा शब्द डिविजन रुल नुसार तुकडा पाडत वाचायचा तर तो तुकडा कसा पडायला हवा हे माहित हवे आणि त्या तुकड्याचा आवाज डोक्यात हवा. रोज मोठ्यांसोबत बसून असे एकत्र वाचन होवू दे. शब्दांचे तुकडे, त्या तुकड्यात एकत्र असलेली अक्षरे आणि आवाज हे डोक्यात पक्के होत जाईल.

<<< कारण त्यांच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडमने घरी येऊन चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर नकाराचा पर्यायच माझ्याकडे शिल्लक राहिला नाही >>
असा अनुभव बऱ्याच ठिकाणी येतो ! पॉलिश्ड मार्केटिंग !
आणि मग काही फायदा झाला नाही की स्वतःलाच दोष लावत बसणे आले !
अबॅकसची पण अशीच लाट आली होती, लोक ईम्प्रेस व्हायचे पण नक्की काय फायदा झाला कोणास ठाऊक !

अबॅकस बरेच जण शिकतात.क्लासेस वय 3 पासून पुढे आहेत.
पण मुलं थोडी मोठी झाल्यावर शिकवणे बरे पडते.नाहीतर ते वर्गातली गणितं अबॅकस ने सोडवू पाहतात आणि वर्गातली शिकवण्याची पद्धत वेगळी असते.

थोडं मोठं मूल झाल्यावर(सातवी आठवी), कोग्निटिव्ह स्किल्स वाढल्यावर मुलेच्छेने (मी बनवला शब्द) हे क्लासेस लावले तर फायदा नक्की होईल.

त्यांच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडमने घरी येऊन चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर नकाराचा पर्यायच माझ्याकडे शिल्लक राहिला नाही. > एवढ्या गप्पा? नक्की कोणाला इम्प्रेस केले? Proud

स्वाती2, धन्यवाद. ह्याकरताच वेदांतु सुरु करायचं होतं.
मला हे शिकवता येत नाहीये. काही पेरेंट्स मैत्रिणी म्हणतात की कशाला टेंशन घेतेस आपोआप शिकेल वाचायला. Sad

चारपाच तास आमच्याशी गप्पा मारून, मुलीची चाचणी घेऊन, तिचे प्लसमायनस सांगून आम्हाला ईम्प्रेस केल्यानंतर>>> तिला बोलायचं तुम्ही की आमच्या लहानपणी बैजू आणि वेदांतू असते तर आज मी इसरो नाहीतर नासात वैज्ञानिक असतो. आणि मंगळवार पाऊल ठेवणारा पहिला भारतीय बनलो असतो.

छे छे तुमच्याही लहानपणी बैजू होता... तुम्ही त्याला 'बावरा' म्हणत इथं तिथं 'तू गंगा की मौज मै जमुना का धारा' केलं त्याला कोण काय करणार.... Wink

(ऋन्मेषा तुझ्या धाग्यांवर जरा अवांतर चालतं म्हणून हा क्षीण विनोदाचा शिडकावा. बाकी चिरंजीवांची फार काळजी करू नये. मुले शिकतात बरोबर. करोनापूर्वीचे मानदंड लावून करोनानंतरचा काळ नाही जगता येत. त्या पिढीचे "नॉर्म्स" घडेपर्यंत पेशंस हवा.)

तुम्ही त्याला 'बावरा' म्हणत इथं तिथं 'तु गंगा की मौज मै जमुना का धारा' केलं त्याला कोण काय करणार.... Wink>>>>> Lol

सस्मित,
माझा मुलगा २०-२१ वर्षांपूर्वी सॅक्सन फोनिक्स वापरुन शिकला. माझ्या मुलाला केजीचे पूर्ण वर्ष सॅक्सन फोनिक्स होते. रोज एक वर्कशीट असे. त्यातल्या शब्दांना कोडिंग चार्टनुसार खुणा करायच्या आणि उच्चार करायचे एवढेच असे. परंतू ते प्रकरण आता आउट ऑफ प्रिंट झाले आहे. मात्र जालावर अवशेष आहेत. त्यातल्या कोडिंग चार्टची लिंक खाली देत आहे. सगळे होमस्कूलवाले आणि प्रायवेट शाळावाले हा चार्ट वापरत. याचा खूप उपयोग होतो.
https://sca.district70.org/ourpages/auto/2018/2/5/38786235/saxon_phonics...
तुम्हाला नक्की जमेल मुलाला वाचायला शिकवणे. जे काही जमत नाहीये त्याबद्दल नि:संकोच विचारा. मी माझ्या बाजूने शक्य ती मदत करेन.

Pages