मेथीचा घोळाना - झटपट मराठवाडी तोंडीलावणे

Submitted by किल्ली on 4 August, 2021 - 02:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :
१.ताजी कोवळी निवडून धुतलेली व बारीक चिरलेली मेथीची पाने,
२.बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे,
३.लाल तिखट चवीनुसार,
४.मीठ चवीनुसार,
५.दाण्याचा कूट 3-4 टे स्पून (म्हणजे आपला फराळाचा चमचा )
६.फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे
७. तळलेला किंवा भाजलेला पापड

क्रमवार पाककृती: 

काल संध्याकाळी गावाहून साबु आमच्या शेतातली मेथी घेऊन आले. घरची किंवा ताजी कोवळी मेथी असली की हमखास घोळाना केल्या जातोच. चटपटीत आणि चटकन होणारा पदार्थ आहे.
कृती :
१.एका मोठ्या टोपात मेथी, कांदा, तिखट, मीठ, दाण्याचा कूट, पापड हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्या.
२.हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिसळून घ्या.
३.फोडणी साठी 1-2टे स्पून तेल गरम करा. तेल तापले की मोहरी घाला. ती तडतडली की जिरं घाला. जिरं छान लालसर झालं की फोडणीचा गॅस बंद करून ती टोपातल्या मेथीच्या मिश्रणावर ओता.
४.सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या. मेथीच्या पानांना सगळा मसाला एकसारखा लागला पाहिजे.
५.गरम गरम कडक भाकरी/पोळी सोबत सर्व्ह करा.

प्रकाशचित्रे :
फोडणी घालण्यापूर्वी
IMG-20210804-WA0004.jpg

फोडणी घालून झाल्यावरचे final मिक्स
>IMG-20210804-WA0005.jpg

वाढणी/प्रमाण: 
३जण
अधिक टिपा: 

सोबत एखादी रस्साभाजी किंवा फोडणीचं वरण/आमटी असावी. मजा येते खायला.
दाकू घालण्यात कंजुसपणा करू नये, सढळ हाताने घालावा.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान. हा तर खानदेशी खुडाच फक्त आम्ही त्यात पापड/कांदा घालत नाहीत.
यात एक व्हेरीएशन करता येतं. लसुणाच्या पाकळ्या बारीक चिरुन तेलात क्रिस्पी (रंग सोनेरी थोडा तपकिरी वळणावर) होईपर्यंत तळायच्या नी त्या या खुड्यात टाकायच्या. मधे मधे तो तुकडा दाताखाली आला की फ्लेवर काय भारी लागतो. (अर्थात लसुण आवडत असेल तरच).

किंचित कडसर नाही का लागत पण हे ?
ते थोड कडु लागायलाच हवं. त्यात मिसळलेले इतर घटक बाकीच्यांना चवीत सप्रेस करत नाहीत

मस्त ! मागे इथेच माबो वर वाचले होते मेथी चा खुडा या नावाने
यात वेगवेगळॆ आहेत व्हेरिएशन
मेतकूट दाण्याचं कुठं
बिन कांदा/विथ कांदा बिन पापड असले ,

मला मेथीचं मिळत नाही Sad
मिळाली तरी त्याचे पराठे भाजी करावेसे वाटते
किंचित कडसर नाही का लागत पण हे ?

मेथीची भाजी कच्ची कधीच नाही खाल्ली. कायम लसूण फोडणीला , कांदा आणि भरपूर खोबरं अशीच आवडत आली आहे. पहिल्यांदा कृती वाचल्यावर खरच आच्छर्य वाटले. पण सगळ्याचे रिप्लाय वाचुन कळले कि अजून हा प्रकार माझ्याच कधी पहाण्यात न्हवता आला. बारामती, सातारा या भागातलया कलिग्स च्या डब्यात न कापलेली लांबच लांब मेथी ची भाजी पाहून पण नवल वाटलेले.
कधी ताजी मेथी मिळाली तर नक्की करून बघेन .

फक्त ही कच्ची खायची असल्यामुळे जर विकतची मेथी असेल तर चांगलीच स्वच्छ धुवायला पाहिजे. (शिजवताना निर्जंतुक होतंच) विशेषतः पावसाळ्यात. घरची असेल तर काही प्रश्न नाही.

वसई पालघरच्या बाजूची मेथी किंचित पातळ पानांची आणि हाताला मऊ लागते. सह्याद्रीपलीकडची नासिक वगैरे ठिकाणची मेथी जरा जाड पानांची असते आणि तितकीशी तलम नसते. देशावराच्या मेथीची पाने जरा लांबट असतात तर पनवेल - वसई - ठाणे - पालघरपट्ट्यातली पाने ही टोकाला गोलसर असतात. मुख्य म्हणजे ही मेथी तितकीशी कडू नसते.

आम्ही पण पचडी म्हणतो. विदर्भात घोळाणा मुख्यत: थंडीत केला जातो त्यात हिवाळी भाज्या पानकोबी, फुलकोबी,गाजर,पातीचा कांदा,मेथी टोमॅटो मीठ हि.मी चिरून साखर नाही घालत पण मी घालते चवीला. थंडीत करायचं कारण थंडीत मुळातच भाज्यांना चव असते व कमी फवारणी झालेली असते ...

पचडी, मी कोबीच्या कोशिंबिरीलाच म्हणते. >>> मीही. काकडीची पण कधी कधी कोबीच्या पचेडीसारखी कोशिंबीर करते मग त्यालाही काकडीची पचेडी म्हणते.

मला वाटते ह्याचे दही घालूनदेखील एक व्हेरिएशन असावे >>> मी घालते दही किंवा ताक, मेतकुट घालून करताना.

किंचित कडसर नाही का लागत पण हे ? >>> लागलं तरी टेस्टी लागतं, थोडी साखर घालायची हवी असेल तर.

अनेक भाज्यांच्या कोवळ्या पानांच्या पच्चड्या करता येतात. कॉली फ्लॉवर, मुळा आणि नवलकोलच्या अगदी आतल्या अशा कोवळ्या पानांची पच्चडी होते. जरा जून पाने असतील तर मुख्य शिरा (व्हेन्स) काढून टाकून उरलेली पात घ्यायची. बारीक चिरणे मस्ट. त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, दाण्याचे कूट, मीठ एकत्र करून, लिंबू पिळून वरून आवडेल ती फोडणी ओतता येते .( लसूण आणि कढीलिंब मात्र नाही चांगला लागत.) घटक वेगवेगळे चिरून ठेवावेत. आयत्या वेळी मिसळावे. चवीला हवे तर आणखीही काही मिसळावे. लोणच्याचा खारही घेता येईल पण मग टोमॅटो बाद करावा. कुरकुरीत राहिले पाहिजे मिश्रण.

D227DFB8-05AA-4F7E-8FB6-04BBB557E5FA.jpeg
भाजी करुन झाल्यावर फ्रिजमधे थोड़ीच मेथी शिल्लक होती पण इतक temptation झाल होत की केलाच खुडा. मेथिपेक्षा पापड थोडा जास्त झालाय.
मी एक छोटि फोड लिन्बु रस पण टाकला त्याने चव अजुनच खुलली.

मस्त फोटो प्राजक्ता, काल खरंतर मेथी आणलीये पण म्हणावी तेवढी कोवळी नाही. आणि माझा लेक मला मेथीच्या थेपल्यांशिवाय बाकी काही करुच देत नाही. :वैताग: तरी मी थोडी मेथी वगळली आहे. आणि करणारच आहे. पापड चूरून घालण्यात मला जास्त इंटरेस्ट. Proud

किल्ली, घोळाणा उर्फ खुडा उर्फ पचडी लय म्हणजे लयच झकास झाली गं . एकदम कोवळी मेथी होती. फक्त जीरे नाही टाकले फोडणीत आणी पापड नाही घातला तरी बाकी चव एकदम मस्त. थेंक्यु ! Happy

IMG-20240205-WA0006.jpg
काही दिवसापूर्वी अस्मिता ने खाऊगल्ली वर आठवण केली घोळान्याची. कधी पासून करायचा होता.. ह्या season मध्ये झालाच नव्हता. शेवटी आज मुहूर्त लागला.
मेथी १०₹ जुडी मिळतेय आणि छान आहे सध्या.
होऊन जाऊ द्यात

Pages