क्ष मानलेला तो, वाळवंट, पूल आणि इतर

Submitted by मुग्धमानसी on 3 August, 2021 - 12:54

ती नगरी मोठी विलक्षण होती. म्हणजे सुंदर वगैरे आणि वैभवसंपन्न वगैरे.
तिथले रहिवासी होते फार फार सुखी आणि समाधानी. उत्कृष्ठ दिनक्रमाच्या पौष्टीक दाण्यांनी ओतप्रोत भरलेल्या तजेलदार कणसांसारखे. उत्साही, आनंदी, सदाप्रफुल्लित, हसतमुख, जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणारे... वगैरे.
आणि असे आहे म्हणजे असेही असणारच की त्यांचा राजा होता फारच सज्जन. चांगला. कनवाळू. निष्ठावंत. प्रजाहितदक्ष. हुशार. नितीमंत. वगैरे. वगैरे. वगैरे.
आणि त्याचा प्रधान. आणि एक साधू. एक सेनापती. आणि इतर.
वगैरे.

आणि मग शिवाय होता.... तो! तर ही त्याची (आणि त्याच्या ओघाने इतरांची) गोष्ट.

कोरड्या वाळवंटात अस्ताव्यस्त झुडुपासारखा वाढलेला तो त्याच्या लक्ष देठांच्या मुळाशी काही समुद्र बाळगून होता याची शंकाही आली नसली कुणाला. त्या कोरडेपणाशी घट्ट रुतलेलं त्याचं नातं एकवेळ खोडता आलं असतं... पण त्या वाळवंटाचं त्याच्यातल्या ओल्याशार गहिर्या समुद्रांशी असलेलं नातं भलतंच खोल आणि विलक्षणच घट्ट होतं. त्याला स्वत:लाही आजवर नव्हतं जाता आलं इतक्या खोल! आणि स्वत:ला जरा सैलही सोडता येत नव्हतं.... शिवाय त्याचंही काहीतरी विचित्र नातं होतंच त्या समुद्रांशी. नाहीतर कशाला निवांत विश्वासानं पहूडले असते ते त्याच्या कुडीभर देहात?

तसा तो काही फार जुना नव्हता. फारतर काहीशे सहस्त्र वर्षं. त्याच्या भोवतालचं वाळवंट आधी जन्माला आलं आणि त्या वर्तुळाकार शुष्काचा जेंव्हा भोवरा बनला तेंव्हा त्यात उडून आलेल्या निर्वात पोकळीनं याला कुठूनसं बीजरूपानं वाहून आणलं आणि इथं रुजवलं अशी एक थिअरी आहे. किंवा अदर स्कूल ऑफ थॉट असेही आहे की हाच बीजरूपानं अंतराळात तरंगत होता तेंव्हा अवकाशाच्या गाभ्यानं याला त्याच्या गुरुत्वाकर्षणानं स्वत:त रुजवून घेतलं आणि त्याच्या निषेधाच्या अनाहूत धडपडीतून उत्सर्जित झालेल्या उर्जेनं त्याच्याभोवती हे वाळवंट रेखलं गेलं. बाकी अगदी सर्वसामान्य पातळीवर विचार केला तर आशावाद्यांना तो वाळवंटाचे सौंदर्यस्थळ वाटतो आणि निराशावाद्यांना तो म्हणजे वाळवंटाचे कोरडेपण अधोरेखित करणारा एक अशुभ संकेत. काही त्याहूनही अतिसामान्य इतरेजनांना असंही वाटतं की मुळात त्याचा एवढा विचार तरी का व्हावा? विश्वात विचार करण्याजोग्या इतर गोष्टी नाहीत काय?

तर... या सार्यांपैकी कुणालाही कल्पना नव्हती त्याच्या देठांमध्ये कित्येक शतके साठून राहिलेल्या त्या समुद्रांची! ते एक गुपित होतं. त्याचं, वाळवंटाचं आणि समुद्राचं.

म्हणूनच तो त्या दिवशी इतकं भयंकर गदगदून हसला! इतका की त्याच्यातले ते बोलघेवडे समुद्र लगेच लागले डुचमळून हिंदकळायला. वाळवंटावर कोरड्या खेदाच्या कित्येक लाटा गहिवरून गेल्या तरी याचं हसणं विश्वात्मकाला झालेल्या गुदगुल्यांसारखं हुळहुळतच राहीलं. अखेर आदिशक्तीनं विश्वेश्वराला न राहवून विचारलंच - "स्वामी... हा य:कश्चित जीव पृथ्वीतलावर अचानक इतकी का बरे हुल्लड माजवीत आहे? यालाही स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटते आहे की काय?" विश्वेश्वराचे एकवेळ राहूद्यात पण आदिशक्तीचा हा इतका अवघड सवाल ऐकून तो स्वत:ही क्षणभर स्तिमित झाला! आपल्यावर साक्षात ब्रह्मलोकी असे गंभीर आरोप व्हावे याने तोही शास्त्रमार्गे व्यथित झाला. त्याचे हसू त्याने तत्काळ आवरून घडी करून त्याच्या समुद्रांच्या तळाशी निपचित पुन्हा लपवून ठेवले आणि त्याला न्यायला आलेल्या राजाच्या सैनिकांसमवेत तो निमूट चालू लागला! किंवा असे म्हणता येईल... काही जगड्व्याळ उत्तरांना त्यांच्या मूलदेवतेचे दर्शन घडवण्यासाठी तो धीरोदात्तपणे निघाला आणि निघताना त्याने त्या निमित्त्यमात्र सैनिकांनाही सोबत घेतलं.

तसा तो फारच सहिष्णू होता. वाळवंटात एखाद्या य:कश्चित झुडुपानं असावं त्याहून जरा जास्तच.
_____________________________________

विविधतेनं नटलेल्या आपल्या समृद्ध सुजलाम सुफलाम राज्याचा विचार करत राजा आपल्या चिंचोंळ्या चिंतनकक्षात अस्वस्थ येरझार्या घालत होता. एवढ्या भल्याथोरल्या महालात ही इतकूशी लांबोळकी खोली त्यानं मुद्दाम राखून ठेवली होती. इथं त्याचे विचार इथं-तिथं भटकायला फारसा वाव नव्हता. राजाला इथं निक्षून माया मोहापासून दूर असायचे असायचे. उगाच लक्ष विचलित होऊ नये. म्हणून या खोलीच्या भिंती नीरस आणि रंगहीन होत्या. खांब नव्हते. छपराला लोंबकळून त्याच्या दोन्ही बाजूंनी फसफसून भिंतींचे आंबूस ओघळ जमिनीवर सांडत होते. जमिन बुळबुळीत चिकट करून टाकत होते. मखलमी पडदे नसल्यामुळे वाटिकेचे मनोहारी दृष्य दाखवू शकणार्या खिडक्या देखिल त्या कक्षाला राखता आल्या नव्हत्या. शिवाय एखादा गहन प्रश्न मनात ठेवून राजा एकदा या खोलीत शिरला की तो बाहेर पडेस्तोवर इतर कुणालाही तिथे प्रवेश मागण्याची वा करण्याची बंदी होती. कधी कमी कधी जास्त वेळाने खुद्द राजाच प्रश्नांची उत्तरे घेउन बाहेर पडत असे आणि बाहेर खोळंबलेल्या मंत्रीवर्गापैकी काही चुकार मंत्र्यांच्या छातीत धस्स होत असे. कारण बरेचदा म्हणजे बहूतेकचदा राजाला काही शे येरझार्यांनंतर सापडलेली उत्तरे ही विचारांतून येण्याऐवजी (जे एरवीही जरा अवघडच होते) थकव्यातून आणि कंटाळ्यातून निपजलेली असत. त्यामुळे ती उत्तरे मूळ प्रश्नापेक्षाही चमत्कारीक असत. पण राजाला हे सांगणार कोण? कधीकधी तर असंही होई की राजा उत्तर घेऊन आत जाई आणि अनेक चित्तचक्षूचमत्कारीक प्रश्न घेऊन बाहेर पडे. शिवाय राजा बुद्धिमान देखिल होता असे ठरलेले. त्यामुळे असोच.

तसा राजा फार फार निरागस होता. त्याच्या डोळ्यांत हजार मेंढरांचं कारुण्य होतं आणि छातीत शेकडो हत्तींचं धैर्य (.....वगैरे वगैरे. अर्थात कार्यालयीन मापदंडांतून स्वीकृत अशी आकडेवारी उपलब्ध आहे. पण तेवढ्या तपशीलांत जायला नको)! राज्याच्या, जनतेच्या, प्रजेच्या चिंतेने त्याचे काळीज नित्यनेमानं पोखरलेले असायचे आणि ते जनतेला नीटच जाणवत राहील याचीही तो व्यवस्थित दक्षता घेत असे. त्यामुळेच त्याच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा आपल्या काळजीने अहोरात्र पिळवटून असणार्या आपल्या राजावर बेहद्द खूश होती आणि (काही चुकार विचारवंतांच्या मते) ही प्रजाच त्या राजाची भयंकर प्रमाणात काळजी घेत होती (अशी शंका आहे). आपली प्रजा अत्यंत सुखात आणि समाधानात आहे. आपल्या राज्यात सर्वत्र हिरवळ आहे... दाट जंगले आहेत... पशुपक्षी मानवप्राणी सर्वत्र सुखेनैव निवास आणि संचार करत आहेत.... धनधान्य, आनंद, हास्य आणि समृद्धि यांनी सर्व राज्य गजबजून गेलेले आहे... इथे कशाचीच म्हणजे कशाचीच कमतरता नाही यावर राजाचा आत्यंतिक प्रचंड प्रमाणात दृढ विश्वास होता. आणि त्याच्या खूप सार्या प्रजेचाही. अर्थातच. इतक्या गंभिर विश्वासाचा मग अभिमान गर्व वगैरेही व्हायचा. आणि मग निष्ठा स्वाभिमान, देशप्रेम वगैरे क्रमाने. एकूण सगळ्या चविष्ट काल्यात गुंगून सगळे राज्य फार फार आदर्श बनले होते. परिसीमाच जणू. आणि टोकाला राजा.

पण मग पूल का पडला? आणि पडला तो पडला... एका य:कश्चित वेडसर अनावश्यक निर्हेतूक ’धरतीपे बोझ’ प्रकारच्या पामर ईसमाने पाडला म्हणे तो! का? कशासाठी? कुणासाठी? (आणि मुख्य म्हणजे कसा?) हा राजद्रोह! इतक्या सर्वसंपन्न राज्यात हे द्वेषमूलक कृत्य! का?

राजा व्यथित झाला होता. असे व्यथित होणे साहजिकच होते एवढेच नव्हे तर त्याला ते भागही होतेच. त्याने तत्काळ त्या वेड्याच्या शोधार्थ पाठवलेले त्याचे सैनिक कार्य तत्परतेने पार पाडून आता कधीही दरबारात येतच असतील! राजाला जाणवले की तों किंचित धास्तावलाही आहे.
राजाने तत्काळ स्वत:च्या छोट्या आतड्यातल्या तीस हजार आठशे सत्तावन्न सशांना बिळात धाडले आणि स्वत: नव्या जोशाने चिंतनखोलीत अशक्य येरझार्या घालू लागला.

राजा अत्यंत हुशार होता हे आलेच. राज्य आणि प्रजा उत्तम प्रकारे गुंगवण्यासाठी लागणारा उत्तम दर्जाचा भाबडेपणा त्याने अंगिकारलेला होता आणि त्या पांघरूणाखाली त्याची प्रजा त्याने पोटच्या लेकराच्या मायेने निजवून ठेवलेली होती. चिंतनकक्षातून बाहेर येऊन महालाच्या अतिभव्य सज्जात उभे राहून एकवार राजाने आपल्या प्रगाढ निद्रेत असलेल्या प्रजेवर भरल्या तृप्त डोळ्यांनी आणि गहिवरल्या बापाच्या काळजाने, मायेने नजर फिरवली. त्याच्या डोळ्यांतरी हजार मेंढरे एकत्र आर्जवली. आणि तेवढ्यात त्याला महालाच्या प्रवेशद्वारातून त्याचे सैनिक एका फाटक्या नि:ष्प्रभ माणसाला घेऊन आत येत असताना दिसले. त्याचे हातही बांधले नव्हते! केवढा हा निष्काळजीपणा....

वाळवंटातल्या एकाकी भकास कोरड्या झुडूपासारखा तो थेट रोखून राजाच्या दिशेनं येत होता. त्याच्या आणि राजाच्या मध्ये एक अफाट समुद्र मध्येच हिंदकळून गेला. कुणाला काही कळले नाही. राजा पुन्हा धास्तावला. त्या फाटक्या माणसाच्या पाठोपाठ त्याच्या भोवती त्याचा अवयव असल्यासारखे महालात प्रवेश कर्ते झालेले त्याचे भकास वाळवंट राजाला दिसले. जाणवले. हिरवळीच्या असंख्य स्वप्नांत गुंगलेल्या त्याच्या राज्यात चक्क एक जिवंत वाळवंट साक्षात त्याच्यासमोर उभं ठाकत होतं! धास्तावलेला राजा पुन्हा धास्तावला.

त्याला असंख्य येरझार्यांनंतरही काही विशेष उत्तर सापडलेले नव्हते. त्याने हे कुणालाही न सांगण्याचे ठरवले.
_________________________________________

ते म्हणजे खरोखरच विचित्र विलक्षणच होतं.

गोष्टीतल्या विदेशी राजकन्येच्या मोठ्ठ्या झोकदार घेरदार नक्षीदार झग्यासारखं त्याचं सप्तरंगी काळं-करडं वाळवंट त्याच्या भोवती झिरमिळत लोळत फरफटत येत होतं. तो त्याच्या मेंदूत काहीतरी चाचपडत आठवत होता. तसा तो असा सहसा कुठे येत जात नसे. एकतर तो आणि त्याचं वाळवंट - त्यांची मुळं सामाईक होती आणि थेट सप्तपाताळात रुतलेली होती. त्यामुळे ते दोघे नुस्ते हलले तरी थेट भुईला खोलवर इजा व्हायची. कधी भुकंपही व्हायचे. त्यातून तो स्वत: केंद्रबिंदूसारखा इल्लूसा असला आणि तेवढाच मर्यादित असला तरी वाळवंटाच्या परिघाचे असे काही ठरलेले नेमके नव्हते. ते अनंत वाढायचे. समुद्राच्या पांढर्याधप्प मिशांसारखे. कधी एकदम आटून मध्यान्हीच्या सावलीसारखे त्याच्यापुरतेच उरायचे. या असल्या प्रकारामुळे असे इथून तिथे जाणे त्याला तसे गैरसोयीचेच. पण आता इलाज नव्हता. कुठल्यातरी महान कार्यासाठी अमहान स्त्रोताकडून अक्षूद्र तर्हेने अनर्थहीन दिशेहून बोलावणे आले होते. पहिल्यांदा त्याने घनघोर हासून निषेध नोंदवला होता खरा... पण नंतर साक्षात सप्तपाताळातून परवानगीवजा विनंती आल्यावर त्याच्यापाशी इलाज राहीला नव्हता.

शिवाय हे बोलावणे कधीतरी यायचेच होते. आणि अनंतकाळ सृजन भोगलेल्या भुईलाही थोडी ईजा होणे आवश्यक होते. म्हणून मग तो निघाला.

अजून एक फायदा म्हणजे वाळवंटावर साचलेले थोडे गुर्मीचे थरही झटकून टाकता आले असते. "त्या गुर्मीचे अंश जिथे सांडतील तिथल्या देवालयांना भाजलेल्या मांसाचा लुसलुशीत वास येईल आणि तिथल्या भुईवर सचेतनाची डौलदार घरं कधीही उगवणार नाहीत. (उगवली तरी त्यांचा पाया फुलांच्या मध्यात दडलेल्या परागकणांइतका उथळ आणि भित्रा असेल. मात्र नपुंसक असेल.)" - त्याच्या एका गडगडाटी जांभईनं कानठळ्या बसल्यावर दचकून उठलेल्या एका रांगड्या शीघ्रकोपी चांदणीनं त्याला एकदा हा शाप दिला होता. आणि तो शाप असल्याची खात्री त्याला अजूनही पटली नव्हती. मात्र आता तेही तपासून पाहता येईल.

आपल्या आदिपुरुषाकडे पहावं तशी त्या वाटिकेतली रंगांच्या भारानं वाकलेली, गंधांच्या श्वासानं भारलेली आणि कौतुकाच्या लाडाकोडाच्या अतिसेवनानं कुपोषित झालेली झाडं, झुडपं आणि रोपटी सैनिकांच्या पुढं चालणार्या त्याच्याकडे पाहात माना लववित होती. त्यांचे त्याच्याशी काहीतरी नाते होते खरे.... त्यासाठी त्यांच्या अनेक वंशांचा धांडोळा घ्यावा लागला असता. शिवाय तेवढी त्यांच्या बुद्धिची पोचही नव्हती. म्हणून मग त्यांनी सरळ त्याला ’क्ष’ मानून टाकले. आता ’क्ष’ ला देव मानले की सगळेच समिकरण सोप्प्यात सुटणार होते. त्यांच्यापुरते. (यावरून लक्षात आलं... या कथेपुरते आपणही त्याला ’क्ष’च मानू. म्हणजे सोय. उगाच. तसेही तो इतर कुणी किंवा काही असू शकत नाही. हो पण देव वगैरे नको. ते फारच होईल. तसेही आपल्याला बुद्धि आहे... हा फरक आहेच! म्हणजे गृहीत धरू की आहे.)

’क्ष’ मानलेला तो आणि धास्तावलेला निरागस राजा एकमेकांसमोर उभे ठाकले तेंव्हा धास्तावलेल्या निरागस राजाच्या छातीतले सारे हत्ती त्याच्याच काळजातल्या थंडगार रक्ताचे फवारे स्वत:वर उडवित शांत होत होते आणि ’क्ष’ बनलेल्या त्याच्या देठात डबडबणारे सगळे समुद्र उत्सुकतेनं ओहोटल्यासारखे झाले होते. धास्तावलेल्या निरागस राजाने प्रधानाशी कुजबूज केली.

तर - हा राजाचा प्रधान - होता काहीसा नेमस्त. जीवाला घोर अज्जिबात लावून घ्यायचा नाही. त्याच्याकडच्या बुद्धि नामक तीक्ष्ण अस्त्राचा वापर अगदी पर्याय नसेल आणि अगदीच भागत नसेल तेंव्हा तो नाईलाजाने करायचा. तसा त्याने तो एक-दोनदा केलाही होता. पण ते काही आठवण्यासारखे विशेष नव्हतं. त्यालाही. तो काही सहीष्णू वगैरे नव्हता. आळशी होता इतकंच. (अजून एक गमतीशीर सांगायचं म्हणजे त्याला स्वत:च्याच हनुवटीला चिमटे काढायची विचित्र सवय होती. त्याची हनुवटी कधी कधी एखाद्या दिवशी अगदी दरबारातल्या रेशमी गालिचाइतकी लालबुंद झालेली दिसे. बाकी काही सांगण्यासारखं नाही... पण त्यातल्या त्यात इतकंच की त्या ’एखाद्या’ दिवशी राजा त्याच्याशी बोलणं कटाक्षानं टाळत असे.) राजाला तो इतकंच म्हणाला - ’जी महाराज.’
’क्ष’ मानलेल्या त्याला बेड्या ठोकण्याचे आदेश देण्यात आले! ’क्ष’ ला घेउन आलेल्या सैनिकांना त्यांच्या हातातल्या नुस्त्याच बेड्या अचानक जाणवल्या आणि खजिल होऊन त्यांनी ’क्ष’ ला बेड्या ठोकल्या. हातात नवे खळखळणारे दागिने पहात ’क्ष’ भेसूर खिंकाळला. तो मजेतच होता.

धास्तावलेला निरागस राजा त्याला हसताना बघत क्षणभर मंत्रावल्यागत लुळा झाला. उदास झाला. मग एकदम संतापला.

"प्रधानजी! ते राहूदेत. मुद्दा तो नाही!"
"हो. राहूदेत. महाराज!" नेमस्त प्रधान उगाचच खांदे पाडून कुजबुजला.
"प्रधानजी... मुद्दा पुलाचा आहे! पूल! आपल्या राज्यात प्रजाजनांच्या सोयीसाठी माझ्या स्वत:च्या आदेशांनुसार बांधण्यात आलेला पूल तुटलाय प्रधानजी! हा गंभीर प्रकार आहे! कोणी तोडला पूल? त्याला शिक्षा झालीच पाहीजे." धास्तावलेला निरागस उदास चिडलेला राजा भानावर आल्यागत मुद्द्यावर आला, चिडला आणि त्याला अचानक धाप निवल्यागत हुश्श्श वाटले. ’क्ष’ मानलेल्या त्याच्याकडे पाहण्याचे टाळून आणि तसे आपण टाळलेले कळून तो कळवळून संतापला!

हनुवटीला हलके चिमटे काढत बसलेला नेमस्त प्रधान लवून उभा राहिला. त्यानं त्याच्या काखेतल्या रेशमी लालभडक ’दोषपत्रा’ची गुंडाळी नेमस्तपणे सावकाश उलगडली. आणि मग तो खाकरला. वाचू लागला. (राजाला क्षणभर प्रधानाचं धुंद कौतुक वाटलं. हा मनुष्य कधी धास्तावत नसेल का? ते जाउदेत... याला प्रचंड झोप किंवा कंटाळा येत असेल तेंव्हा हा जांभई देत असेल का? किंवा.... किमानपक्षी याच्या पोटात कधीतरी मुरड पडत असेल.... रात्री झोपेतून हा दचकून उठत असेल.... किंवा......)

’क्ष’ मानलेल्या त्याच्यावरती मग बरेच आरोप ठेवण्यात आले. उदाहरणार्थ -
१. समाजास अहितकारी अश्या वागणूकीचा अंगिकार करणे
२. समाजाच्या शांततापूर्ण व सुख-समाधानकारी दिनक्रमाला बाधा पोहोचेल अशी कृत्ये करणे
३. समाजात अस्वस्थता आणि भीती पसरवणारे वातावरण निर्माण करणे
४. अस्वच्छता, कुरूपता, भेसूरता आणि हिडीसपणा याचा मुर्तिमंत अवलंब करून सामाजिक सौंदर्यास बाधा पोहोचवणे
५. इत्यादी.
६. देशद्रोह. राजद्रोह. इत्यादी.

"पूल पाडल्याचा आरोप प्रथमत: - खरंतर अंतिमत: सुद्धा - ज्याच्यावर आहे त्याला या सभेत आपल्यासमोर आज हजर केलेले आहे महाराज! यानेच पूल तोडला असे सांगणारे हजारो साक्षीदार आपल्याच प्रजेतून पुढे आलेले आहेत! याच्या अनेको वर्षांच्या नखाने पूल पोखरण्याच्या सातत्यपूर्ण कृतीने हाच त्या पूलाच्या कोसळण्याला कारणीभूत ठरला आहे. सर्व साक्षीदारांच्या साक्षी याप्रकरणी रितसर नोंदवून घेण्यात आलेल्या आहेत. प्रजेच्या सोयीसाठी, राजदरबाराच्या खर्चाने बांधलेला राज्याचा मालकीचा पूल जमिनदोस्त करून सरकारी मालमत्तेचे हकनाक नुकसान केल्याच्या आरोपाखाली कलम ८५९६३ अंतर्गत या वेड्याला...."

"वेड्याला??????"
अचानक दरबारात एक महाप्रचंड जडशीळ आवाज घुमला आणि धगधगत्या उत्साहानं लाटांच्या टोकांवर विसावला. निखार्याचे शिंतोडे उडाल्यागत सगळा दरबार सैरभैर होऊन मग भयानक शांत झाला.
धास्तावलेल्या निरागस राजाच्या सात्त्विक नाजूक कानांना एवढा तारस्वर ऐकायची सवय नव्हती... त्याला भोवळ येऊ लागली.

समुद्राच्या तळाशी घडी करून नीट लपवून ठेवलेलं त्याचं ते पुरातन आदिम हसू पुन्हा उचंबळून लाटांवर तरंगू लागलं. थोपटवून त्याला शांतवताना एक आगाऊ खट्याळ लकेर विषुववृत्तासारखी ’क्ष’ मानलेल्या त्याच्या भुगोलावर तरळून गेली.
क्ष हसला. म्हणजे संपूर्ण दोषपत्र वाचून होत असताना तो हातातल्या खळखळत्या बेड्यांकडे पहात हसतच होता.... पण आता त्याचे हसणे थोडे अधिक विशेष झाले.
वाळवंटाच्या घेरदार झग्याला ’क्ष’ ने एक लहानशी लहर दिली आणि सारी सभा अकस्मात उष्ण शहारून गेली. दरबाराच्या अंतरिक्षात काही अभद्र कण तरंगले. काही क्षणांनी स्थिरावले. पण ते काही क्षण मात्र मग अनंत काळ अंतराळात हिंदोळतच राहणार होते. दुसरं काय करावं ते न कळून.

सरतेशेवटी अखेर सार्या सभेचे लक्ष साक्षात त्याच्याकडे गेले होते! अगदी काही क्षणच. पण हे महानच!
_______________________

तर. नगरीच्या मधूनच टाचांना पडलेल्या काळ्याभोर भेगेसारखी दिसणारी एक नदी वहायची.
नदी वगैरे नाही... फारतर ओढा म्हणता येईल. कुणी एखादी सुरी जर निर्ढावल्या निर्दय अलिप्ततेने त्वचेच्या आत खोलवर टोचली तर वाहणारा गहिरा दाटसर रक्ताचा ओघळ जेवढा रम्य दिसेल तेव्हढाच रम्य होता तो ओढा. त्याच्यावर कसलेसे निळसर हिरवे चमचमते तेलकट रसायनांचे थर तरंगत असायचे आजकाल. साकळलेल्या रक्ताच्या गाठींसारखे. किंवा कुणीतरी दिलेल्या मुक्या मारासारखे... त्वचेखाली ठसठसणारे. स्पर्शाने विव्हळणारे. काळे निळे.
नदी म्हणा की ओढा.... किंवा गटारही म्हणा हवंतर... तो वहायचा मात्र नाहीच जणू. म्हणजे खूपदा ओढून ताणून निरखून पाहीलं तरी कधीच काही प्रवाहीत दिसायचं नाही तिथं. ओढा आपला तिथंच आणि तसाच! अनंतकाळ तिथे तसाच थांबून गोठून राहिलेला एक ओघळ आणि कडक उन्हाळ्याच्या काही भयंकर कोरड्या दिवसांत तर फक्त एक कोरडा कुरूप ओरखडा! शतकामागून शतके युगामागून युगे अशी उलटतच राहणार बहूतेक. इथं पहूडल्या पहूडल्या मृत्यूपंथाला लागल्यागत दिसणारा हा निर्जीव ओढा वाहूनही जाणार नाही. मरूनही जाणार नाही. जिवंतही होणार नाही..... याचे काहीच होणार नाही!

इथं कधीतरी फार सुंदर नदी वगैरे होती... तिच्या काठांवर उद्याने वगैरे होती.... वर निळेशार आभाळ वगैरे होते.... नदीत मासे आणि हंस वगैरे होते.... ही आठवण खुद्द नदीच्या स्मृतीतून पुसट झाल्यावर आणि ते सारे आठवणारी त्या राज्यातल्या मनुष्यांची एक बुद्धिमान पिढी सगळीच्या सगळी मरून गेल्यावर त्या स्वयंभू नदीचा केविलवाणा बिचारा ओढा झाला असेल. नदीच्या काठानं प्रगती आणि विकासाचे काळेशार लोट आकाशात ओकणारे प्रगतीचे देवदूत उभे राहीले तेंव्हापासूनच हळूहळू राज्य समृद्ध होत गेले असेल... आणि नदी निवृत्त होत गेली असेल. राजाचे स्वप्नवत राज्य साकार होत असताना असे काही क्षुल्लक निराकार बळी जाणारच होते. गेलेच होते.
..........आणि तेंव्हाच कधीतरी हा ओढा अभद्र, अस्वच्छ, ओंगळ, दुर्गंधीयुक्त आणि अनारोग्यकारक वाटून ’प्रजाहितार्थ’ चक्क त्याला टाळून निघून जाता यावे म्हणून ही पुलाची कल्पना जन्माला आली असावी! ती योग्यच. कारण आता नदीला स्पर्श न करताच पार जाता येणार होतं. नदीत पेरलेल्या अनाम असंख्य प्रेतांचे अभद्र शापित पुण्य राज्यातील प्रजेच्या मंगलमयी तेज:पुंज दुर्भाग्याला गालबोट लावणार नव्हते. सारे काही आपापल्या जागी स्वेच्छेने आनंदात सुखेनैव परतंत्र नांदणार होते!
नदी आपली गढूळलेल्या नशेत तरर्र होऊन शुद्ध हरपून रस्त्याच्या काठी धडपडलेल्या आणि गाढ झोपलेल्या गलिच्छ घाणेरड्या फाटक्या बेवड्यासारखी निस्तेज पालथी पहूडलेली असायची. तेवढीच नालायक. तेवढीच दुर्लक्षित. तेवढीच ओंगळ. आणि तेवढीच आत्ममग्न!
तिच्या बरबटलेल्या अंगाभोवती माश्याही तश्याच घोंगावत असायच्या.
नदीला कुणी विचारले नाही. कुणी विचारणारही नाही. पण तीही राज्याचाच भाग... तेंव्हा तीही सुखनैव नांदणे - हे आलेच.

आणि तेंव्हापासूनच कधीतरी... ’क्ष’ ला त्याची अशी एक विलक्षण गोष्ट आठवते. ही एक गोष्टीतली गोष्ट. खरंतर अनाठायी. धुसर होत जाणार्या आकाशातल्या अवकाशाइतकी पुरातन गोष्ट. त्याची, त्याच्या आईची, नदीची आणि पुलाची गोष्ट.
सांगायला हवी असं काही नाही... पण सांगावीच.

दगड-माती-खडी-वाळूच्या भरड तप्त ढिगार्यावर अस्ताव्यस्त नग्न खेळताना दुरूनच - डोक्यावर कसले कसले भार वाहून पुलाच्या बांधकामाकडे नेताना दिसलेली त्याची आई ’क्ष’ला कधीकधी पुसट आठवे. तीच. तशीच. शेवटची. तिचे त्याहून दुसरे निराळे कुठलेच चित्र नव्हते त्याच्या आठवणींत. तेंव्हाचे त्याचे वयही त्याच्या लक्षात येत नाही! मधूनच ती आठ्यांनी भरलेल्या घामेजून गेलेल्या सावळ्याशार कपाळावर उजव्या हाताची पालथी ओंजळ ठेवून मान उंचावून लांब त्याच्याकडे पाही. नेमके तेंव्हा तोही तिच्याकडे पाही. आणि मग तो हसे. ती पुन्हा कामाला निघून जाई. ती हसायची नाही. त्याने खूप खूप आठवून घेतले होते. पण नाहीच. ती त्याही दिवशी हसली नव्हतीच. नक्कीच. नाहीतर तो असा काही सहज विसरला नसताच.

आणि मग एक दिवस बांधकामावर मोठा आवाज झाला. धुरळा उडाला. गलका झाला.

पुढे काहीतरी झाले असावे. काहीतरी गोष्टीतल्या राक्षसासारखे. त्याला तेंव्हा निटसे कळले देखिल नाही. त्या राक्षसाने फुटाण्यासारखी त्याच्या आईला गिळून टाकली असावी. किंवा चुरमुर्यासारखी तिला अंतराळात उडवून दिली असावी. किंवा खरंतर विश्वाचं बियाणं समजून तिला खोल पाताळात पेरण्यात आलं असावं. म्हणजे मग ती उगवून येणारच! इथेच. याच ठिकाणी. याच नदीकाठच्या सुस्त वाळवंटात ती गुपचूप उगवून येणार. सहस्त्र वर्षे एकच लख्ख आठ्यांनी भरलेले मोकळे सावळे घामेजले कपाळ आणि त्यावर धरलेली धुळी-मातीनं बरबटलेली ओंजळ आठवत वाळवंट खात पोसलेल्या ’क्ष’च्या हातात ती लाडू ठेवावा तसं संपूर्ण विश्वाचं लालगुलाबी गोडसर तुरट पण किंचित किडकं फळ ठेविल. आणि तो ते अख्खे फळ नीट चावून चावून खाऊन टाकील. फळाचा त्याच्या सगळ्या बियांसकट चावून चावून चोथा करील. आणि तो चोथा पुलाच्या खांबांवर थुंकून नदीच्या तेलकट पाण्यानं खळाखळा चूळ भरील. हो... ही मुकाट बेचव वंशावळ कुणीतरी कुठेतरी थांबवायलाच हवी ना! नाहीतर काही खरं नाही. पुन्हा अशी एक प्रजा तयार होईल. आणि कुणी राजा म्हणेल की मी आजपासून तुमचा राजा. हे खरे नाही. नाहीच.

घामेजल्या कपाळाची किलकिल्या लालबुंद डोळ्यांची थरथरत्या तळव्याची ती सावळीशार बाई त्याला तेंव्हापासून सारखी नुसती भासांत दिसायची. आणि तेंव्हाही हसायची नाही. त्या विशेष दिवशी त्याला एक गोष्ट ठार कळून चुकली - ती स्त्री त्याची आईच होती एवढेच नव्हे तर ती त्याच्या स्वत:व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात असलेली एकमेव मनुष्यप्राणी सुद्धा होती! कारण त्या दिवसानंतर त्याला कुणीही मनुष्य दिसला नाही. बाकी सारे असे इथं वावरणारे, काम-धंदे वगैरे करणारे, श्वासोच्छवास वगैरे करणारे, इथून तिथं तिथून इथं चालणारे, धावणारे, हसणारे, घर बांधणारे, मुले जन्माला घालणारे वगैरे वगैरे वगैरे हजार लक्ष भानगडी करणारे सारे खरंतर नुसते नदीकाठच्या वाळवंटातले दगड माती वाळू आणि धोंडे आहेत. या सार्याचा आयुष्यभर डोक्यावर भार वाहीलेली आपली आई खरी... आणि तिला फक्त आणि फक्त दिसणारे एकमेव दृष्य... म्हणून आपण खरे! बाकी सारे म्हणजे नुसते वाळवंट! त्यातूनही उरलेले बाकी सारे म्हणजे... निव्वळ झूट! अंतराळात दूरवर भिरकावून द्यावे इतके झूट!

त्या क्षणानंतरच्या प्रत्येक क्षणात तो वाळवंटाच्या केंद्रबिंदूसारखा एकाग्र शुष्क नुस्ताच वाढत राहीला. निराधार झालेल्या नदीशी निराकार चर्चा करत राहीला. आपापले मनोरम एकाकी जगणे ते दोघेही एकमेकांना कधी सांगायचे नाहीत. पण एकमेकांचे एकलपण ते न बोलता सहज पेलायचे. दोघेही वहायचे नाहीत. दोघेही मरायचे नाहीत. दोघेही जगायचे नाहीत.
मग एकदा वाढत वाढत तो एकदम प्रचंड अवाढव्य झाला. त्याचा ’क्ष’ झाला. नदीनं एकदा त्याला झुळमुळत्या हलव्या लाटांनी गोंजारत तिच्याकडचे तिच्या काळजात लक्षावधी वर्षे कोंडलेले समुद्र देऊन टाकले. आता तिला काही त्या समुद्रांना गाठायचे नव्हते. तिला आता कुठेच जायचे नव्हते. तसे तर त्यालाही...! नदीसकट तोही मग त्या समुद्रांना स्वत:च्या तळाशी खेळवत राहीला. त्यांची डुचमळ ऐकून त्याला आईचे डोळे आठवायचे... किंवा याच्या उलटही असेल.
तो त्या पुलापाशीच निराकार रेंगाळत असायचा. त्या वाळवंटात रहायचा. न वाहणार्या नदीच्या काठानं तोही कुठेच वाहत जायचा नाही.

एक गंमत मात्र तो अविरत करत रहायचा. त्या दगडा मातीच्या पोकळ बांधकामातल्या चिरांमधले मातीचे बंध त्याच्या राठ टोकदार नखांनी तो सतत टोकरत रहायचा. दिवस रात्र! कित्येक वर्ष! कित्येक दशकं! कित्येक सहस्त्रकं! कित्येक युगं!

आणि एक दिवस... मोठा आवाज झाला. धुरळा उडाला. गलका झाला.

पुढे काहीतरी झालं. पण यावेळेस त्याला ते नीटच कळलं. त्याच्या अवयवाइतक्या अजोड वाळवंटातून एक हिंस्त्र हसू तरळून गेलं आणि समुद्रात काही दिव्य भव्य विशाल तळातून थेट लाटांवर तरंगून गेलं.

नदी मात्र तेंव्हाही हसली नाही.
______________________________________

"वेड्याला??????"

त्रिकालज्ञानी तेजस्वी महान विश्वासू साधू महाराज भर सभेत गडगंज ताठ उभं राहून अतिप्रचंड संतापाने थरथरत होते. त्यांच्या उघड्या छाती आणि पाठीवरून धावणारे घामाचे ओघळसुद्धा त्यांच्या संतापाच्या विलक्षण तापानं वाफ बनून उडून जात होते म्हणे!

त्यांनी अशी भयंकर गर्जना का बरे केली हे काही क्षण कुणालाच उमगले नाही. बर्याच वेळाने भोवळीतून सावरलेल्या धास्तावलेल्या निरागस राजाने साधूला नम्रपणे ’काही चुकले का?’ - असे विचारले. ते बरेच झाले. कुणीतरी काहीतरी विचारले की उत्तरादाखल बोलावे हे लागतेच. शांतता भयंकरच. वाईट. शिवाय साधू म्हणजे फारच हुशार. त्यांनी काहीही बोलणे म्हणजे - विशेष!

"राजन्, राज्याचा महत्त्वपूर्ण भाग असलेला एक संपूर्ण पूल या माणसाने कित्येक वर्षांच्या सातत्यपूर्ण षडयंत्राने काही क्षणांत जमिनदोस्त केला आहे. ही व्यक्ती ’वेडी’ अर्थात मनोरुग्ण कशी असू शकेल? हे कृत्य काही निर्हेतूक निश्चितच नव्हे! याचा तपास व्हावा. यामागे देशद्रोहाचे विध्वंसक धागे सापडू शकतात. आपल्या सुखशांतीने परिपूर्ण अश्या या पुण्याभूमीतून हे असले विजोड विचार मुळांसकट उपटून टाकायचे असतील तर आधी मुळांपर्यंत पोहोचायला हवे. याची उलटतपासणी व्हावी. याचे साथीदार शोधले जावेत."

हं. बरोबरच! साधू महाराज हुशार! खरा बुद्धिमान! राजाला लख्ख कळलं. त्याने धन्य धन्य होऊन हात जोडले.
तो म्हणाला - "प्रधानजी!"

नेमस्त प्रधान पुन्हा एकदा लवून उभा राहीला. "महाराजांच्या आदेशाप्रमाणे या गुन्हेगारास अंधारकोठडीत नेऊन याची उपटतपासणी करण्यात येईल आणि जोपर्यंत गुन्ह्याची सारी पाळेमुळे सापडत नाहीत तोवर या मनुष्यास सरकारी बंदोबस्तात कालकोठडीतच ठेवले जाईल असे..."

एक खदखदून हसणारी तीक्ष्ण नजर सार्या सभेवर चरचरून गेली आणि वाळवंटाला एक मजेशीर हिसका देऊन ’क्ष’ किंचितच हलला. अत्रुप्तीचे आणखी काही अभद्र कण सभेवर भस्म होऊन सांडले. कुणाचेच लक्ष नव्हते. कुणालाही कळले नाही. अर्थातच. त्याचे वाळवंट परीघ विस्तारून त्याच्या भोवती कडक तटबंदीसारखे उभे राहीले.

सैनिक पुढे सरसावले. पन ते ’क्ष’ पर्यंत पोचू शकेनात. ’क्ष’ भोवती गरागरा फिरून ते गच्च भरल्या बरणीचे झाकण खोलावे तसे त्याचे वाळवंट त्याच्यापासून मोकळे करू लागले. पण बरणी जणू काठोकाठ तेलाने भरलेली असावी तसे ते सारे निसरडे घसरू लागले. त्यांच्या त्यांच्यातच अडकून पडू धडपडू लागले. काही गडबडले, काही चडफडले. काही चक्क जणू बरणीच्या आत कोसळून काळ्याभोर उष्ण तेजस्वी अंधारात मुरत पडले. फजितिच फजिती झाली! दरबार हसू लागला. घसरल्या सार्या सैनिकांचा मदतीसाठीचा काकूळता किंकाळता हास्यास्पद भेसूर टाहो सार्या दरबारात घुमला तेंव्हा धास्तावलेला निरागस राजा भयंकरच गोंधळला. काहीसा नेमस्त प्रधान भरपूर नेमस्त ओशाळला. आणि दरबार प्रचंडच हसला आणि मग हळहळला.
’क्ष’ मानलेल्या त्याच्या लांबरुंद अपार नाकाखाली घनदाट मिशांच्या पांढर्याशुभ्र रानासारखी काही समुद्री वादळे क्षणभर खिंकाळत गजबजून गेली इतकंच.

’राजन्!’
राजाचा अवमान होत असलेला पाहून (तेवढ्यासाठीच तिथं खोळंबलेले) गुरुवर्य साधू असलेले स्वामीजी कर्तव्यशूर तत्परतेने उठून उभे राहीले. स्वामिजी त्रिकालज्ञानी होते! समुच्चित राजघराण्याचा, राज्याचा आणि प्रजेचाही इतिहास आणि भविष्यही त्यांना त्यांच्या काखेतल्या केसांइतके पाठ होते! त्याहूनही थोर हे की ते राजाचे विश्वासू सल्लागार होते. हे थोर म्हणजे महानच! निद्रेत असताना त्यांचे घोरणेही वेदाभ्यासाच्या चालीवर असायचे म्हणे! हे तर निव्वळ महान. तेंव्हा आता या अश्या अवघड प्रसंगी त्यांनी सुत्रे आपल्या हाती घ्यावीत हे साहजिकच.

"हे राजन्... हे शक्य नाही. किमान अश्या रितीने नाही. अर्थातच मी याचाही अभ्यास करून ठेवलेला आहेच." साधू म्हणाले. त्यांचा गंभीर आवाज समुद्राच्या एका लाटेत तरंगत कुठल्याश्या अर्थरहीत खडकावर जाऊन आदळला. त्यांच्या भाळावरचे आडवे गंध आठ्यांच्या जाळ्यात सुरकुतून आकुंचन पावले होते. त्यांच्या हातात लाल कापडात गुंडाळलेली एक मध्यम जाड चोपडी होती त्यात बहूदा त्यांना झालेल्या सर्व साक्षात्कारांचे सार लिहून ठेवलेले असावे. कुणी सांगावे? साधू म्हणजे तेजस्वीच! त्यांचे द्न्यान अगाध वगैरे. त्यांना कोण विचारेल की त्यात काय लिहिलेय?
धास्तावलेल्या निरागस राजाने विनम्र वगैरे होत हात जोडले.

"आणि शक्यही आहे खरंतर.... पण बघ बुवा कसे ते. त्यासाठी तुला ब्रह्मपर्वतावर साडेतीन कोटी वर्षे एकटे राहून सप्ताहातून फक्त एकदा अबीज फलाहार करून कठीण तपश्चर्या करावी लागेल. त्यानंतर त्या तपश्चर्य़ेतून प्राप्त झालेल्या एकूण पुण्याईचा तीन चतुर्थांश भाग भस्म करून ते भस्म या वाळवंटावर शिंपडावे लागेल. तेंव्हा हे वाळवंट नष्ट होईल. अन्य उपाय दिसत नाही."
स्वामीजी अल्लाद बोलून गेले आणि पुन्हा जागेवर बसले. (नंतर ते अल्लाद जे बोलून गेले त्यावर स्वत:च कितीतरी वेळ विचार करत होते. पण ते आत्ता नको.)

धास्तावलेला निरागस राजा एकदम गोंधळला. आणि ते लक्षात आल्यावर पुन्हा खजिलही झाला. त्याला एकदम सारे काही भयंकर असह्य झाले!
अश्यावेळी मग तो दरबारातल्या महाप्रचंड झुंबराकडे बघत विचारमग्न स्थिती पांघरायचा. (त्या झुंबरातल्या कितीतरी शेकडो लोलकांत प्रत्येकी एक याप्रमाणे दिवा रोजच पेटलेला असायचा. हा उद्योग कोण करून जायचं कोण जाणे! सगळे दिवे लावायचे तर तोवर पहाट होत असणार... मग.... चौकशी करायला हवी!) अचानक आठवल्यासारखा धास्तावलेला निरागस राजा एकाएकी भयंकर चिडला. आतल्या आत उदास झाला.
राजा ओरडला - "प्रधानजी! मुद्दा तो नाही! या उद्दाम घाणेरड्या माणसाला तत्काळ आहे त्या स्थितीत कालकोठडीत बंदिस्त करण्यात यावे! याची जबानी घेण्यात यावी. याची उलटतपासणी घ्या! याची विद्रूप अस्वच्छ कातडी सोलून काढा. याचे विक्राळ टोकदार भयावह दात उपटून काढा. याचे जटाजंजाळ केस भादरून टाका. याचे वाळवंट फोडून किटून नष्ट करून टाका. यानं पुन्हा कधी हसता कामा नये! मला माझ्या राज्यात काहीही विद्रूप नकोय. याला भयंकर शिक्षा करा. आपल्या राज्यातल्या पुढीन सहस्त्र पिढ्यांच्या अंगावर शहारे यावेत असा दंड करा या माणसाला! किंवा नको! आत्ता या क्षणापासून याचा अंशही अंतराळात किंवा कुणाच्या स्मरणातही उरू नये असे काहीही करा प्रधानजी! या माणसाला माझ्या नजरेसमोरून तत्काळ घेऊन जा. घेऊन जा!" शेवटी शेवटी राजा काकूळतीला आला. हजार मेंढरांचं कारुण्य त्याच्या नजरेत डबडबू लागलं. सशाच्या भित्र्या काळजानं चोरट्या डोळ्यांनी त्यानं हळूच ’क्ष’ मानलेल्या त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या विकट हसण्यात आणि कोरड्याभप्प बारीकश्या डोळ्यांत त्याला त्याच्या राजा वगैरे असण्याचे फुटकळ बारीक सारीक तपशील दिसले. तो क्षणभर हरला. आणि मग तातडीनं उठून हत्तींच्या ताकदीनं जड झालेली छाती पुढे काढून त्याच्या ’चिंतनकक्षा’कडे चालू लागला.

दरबार बरखास्त झाला!
___________________________________

मी कोण? मला कोण सामिल? माझा काय हेतू?

सांगितले असतेही. पण तुमचा काय संबंध? तुमची काय बुद्धि? तुमची काय औकात? मी तुमच्याशी काय म्हणून बोलू? आणि समजा बोलायचे ठरले.... तरी कुठली भाषा वापरू?
माझ्या आईची पालथ्या ओंजळीखालच्या किलकिल्या तांबूस डोळ्यांची भाषा मला येते. त्याच भाषेत मी नदीशी बोलतो. मी वाळवंटाशी बोलतो.
मी माझ्यातल्या समुद्रांशी चर्चा करतो.
मी पुलाशीही बोलतच होतो. त्याला खूप प्रश्न विचारायचो. त्याला उत्तरं आली नाहीत की त्याला नदीच्या जळजळीत पाण्यानं डागायचो. त्याला या माझ्या अक्राळ विक्राळ नखांनी कुरतडायचो. मी त्याच्याहून विक्राळ होऊन त्याला अनेकदा कडकडून चावायचो. मी इतका छळ केला त्याचा की त्यानं परवानगी दिली मला! परवानगी? त्यानं खरंतर हतबल होऊन करूण भाकली माझी की मला नष्ट कर. मला नष्ट कर.

हे ईश्वरा! मला नष्ट कर! कृपा करून मला नष्ट कर!! - असं तो पूल मला कळवळून म्हणाला. मग मी त्याला मोक्ष दिला.

ही भाषा. ही माझी भाषा. विश्वात्मकाची ही भाषा! तुम्हाला कळावी जराश्या काळापुरती - अशी काही सोय करू शकाल का? छे! ती तुम्हाला समजावी इतके काही तुम्ही सुखी नाही! तुमच्या सुखांनी अजून व्यथांच्या, वासनांच्या आणि वेदनांच्या अगदी प्रार्थमिक परिक्षाही दिलेल्या नाहीत. तुमच्या असण्याचा भरभक्कम पाया असलेली तुमची साधी सुधी नाजूकशी सुखं माझ्या दातांच्या फटीतून रोज अडकलेली असतात उष्ट्या कणरूपात. आणि रोज मी त्यांना काडीनं टोकरून थुंकून टाकतो तुमच्याच समृद्ध राज्याच्या प्रसन्न वगैरे अवशेषांवर. तुम्हाला जाणवतही नाही.
तुम्हाला जाणवतं ते एवढंच की पूल पडला. पूल पडला.

जा तुमच्या राजाला सांगा. मी फक्त पूलच पाडलेला नाही. मी आजवर बरेच काही पाडले आहे! मी एक संपूर्ण संस्कृती नष्ट केलेली आहे. मी एक राज्य माझ्या नखांनी टोकरून पोकळ केलेले आहे. हे सारे सारे कोसळणार आहे!
एखादी साक्षात वस्तू क्षणार्धात नष्ट करणं! एक अफाट अंतहीन गोष्ट अचानक एकाच क्षणात तातडीनं संपवून टाकणं! एक महान सुरेल गीत एखाद्या समेवर आणून एकच भयंकर आलाप घेउन मध्यातच सोडून देणं! हे मोक्ष आहेत! ते अधिकार तुला नाहीत. तू फक्त राजाच आहेस. राजाच उरलास. राजाच उरशील. जे काही पडले तुटले झडले फाटले उध्वस्त झाले... ते माझे होते! माझेच आहे! अन् माझेच राहील!

जा तुमच्या राजाला सांगा. माझी मजूरी दे मला. गेल्या सहत्र युगांची राहीलेली. मस्तकावर वाहीलेल्या दगड धोंड्यांची. या अजस्त्र वाळवंटाला स्वत:सोबत वागवल्याची.
तुझ्या समृद्धिच्या भ्रमाच्या पुलाखाली खोल पुरलेल्या सावळ्या घामेजल्या ’आई’ नावाच्या बाईची. व्याजासह. तंतोतंत.
तीला एकदा हसताना पाहीलं की क्षमा करेन मी तुला! - असं सांगा त्याला. जा!

गदागदा प्रचंड हासत ’क्ष’ मानलेल्या त्यानं स्वत:भोवती एक भरदार गिरकी घेतली! अजून एक. अजून एक. अजून एक. अन् तो कोसळला. वाळवंटाचे तप्त कण सार्या साम्राज्यभर तुकड्या तुकड्यांनी विखरून पडले.
______________________

कोरड्या वाळवंटात अस्ताव्यस्त झुडुपासारखा वाढलेला तो त्याच्या लक्ष देठांच्या मुळाशी काही समुद्र बाळगून होता हे अखेरपर्यंत समजलं नाहीच कुणाला. तो होता तेही. तो नाही तेही.
पूल पडला ती घटना मात्र तिथं नदीच्या काठावर वाळवंटाच्या अधोमध एक प्रचंड स्मारक बांधून कोरली गेली. पुलाच्या स्मरणार्थ कवने रचली गेली. शिलालेख कोरले गेले. स्मारकावर संगमरवरी दगडात कोरलेल्या पुलाच्या प्रतिमेखाली लहानश्या कोपर्यात एका लहानशा काळ्याभोर कातळावर एक अस्ताव्यस्त, लांब घाणेरड्या नखांचा, फाटक्या अंगाचा अक्राळ-विक्राळ क्रूर माणूस दगडामातीच्या ढिगार्यावर पाय देऊन हिडीस हसताना कोरलेला होता. (त्या राज्यातली लोकांची एक विचित्र श्रद्धा आहे. मनात इच्छा धरून नेम धरून त्या मनुष्याच्या काळ्या प्रतिमेला दगड मारला... आणि नेम अचूक बसला... तर इच्छा खात्रीशीर पणे पूर्ण होते म्हणे!)

बाकी सारे नीट व्यवस्थित सुरू आहे! राज्यात सर्वत्र हिरवळ आहे... दाट जंगले आहेत... पशुपक्षी मानवप्राणी सर्वत्र सुखेनैव निवास आणि संचार करत आहेत.... धनधान्य, आनंद, हास्य आणि समृद्धि यांनी सर्व राज्य गजबजून गेलेले आहे... इथे कशाचीच म्हणजे कशाचीच कमतरता नाही यावर सर्वांचाच अजूनही आत्यंतिक प्रचंड प्रमाणात दृढ विश्वास आहे!

पण आजकाल तिथल्या देवालयांना भाजलेल्या मांसाचा लुसलुशीत वास येतो आणि तिथल्या भुईवर उगवलेल्या घरांना सजीव घरपण काही केल्या लाभत नाही. त्यांच्या गर्भातून काही नवे आनंदमयी जन्मत नाही.
हल्ली राजाच्या दरबारात दाखल होणार्या तक्रारी वाढल्या आहेत आणि प्रधानाची हनुवटी कायमच लालबुंद असते.

अजूनही कुणाला काहीच कळलेले नाही!
______________________________

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

......

माफ करा पण
दोनदा वाचली तरी मला ही गुढकथा नाही कळाली.

माबुदो Sad

तुमचे पेशन्स अफाट आहेत
मी वाचून वाचून दमलो आणि विचार केला ही टप्याटप्याने वाचणे आवश्यक।आहे
दोनदा वगैरे तर विचार पण नाही करू शकत

काहीतरी भन्नाट लिहिलंय हे नक्की. तसंच झोन मधे जाउन निवांत वाचायला हवं. प्रचंड मोठ्ठ्या कॅन्व्हासवर काढलेलं अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग बघावं आणि प्रत्येकाने आपल्या आकलनानुसार त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करावा असं वाटलं. माझ्या मते ही एक रुपक कथा आहे.

तसा राजा फार फार निरागस होता. त्याच्या डोळ्यांत हजार मेंढरांचं कारुण्य होतं (भर सभेत तो हुकमी रडायचा देखिल) आणि छातीत शेकडो हत्तींचं धैर्य (छप्पन इंची छाती होती त्याची) (.....वगैरे वगैरे. अर्थात कार्यालयीन मापदंडांतून स्वीकृत अशी आकडेवारी उपलब्ध आहे. पण तेवढ्या तपशीलांत जायला नको)! (कोणी एक मंत्री म्हणालेला don’t get into those maths. Those maths never helped Einstein discover gravity.) राज्याच्या, जनतेच्या, प्रजेच्या चिंतेने त्याचे काळीज नित्यनेमानं पोखरलेले असायचे (दिवसातुन फक्त चारच तास झोपायचा तो) आणि ते जनतेला नीटच जाणवत राहील याचीही तो व्यवस्थित दक्षता घेत असे. (जाहिरातींवर आणि आयटी सेलवर खर्चलेले काही हजार कोटी) त्यामुळेच त्याच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा आपल्या काळजीने अहोरात्र पिळवटून असणार्या आपल्या राजावर बेहद्द खूश होती (भक्त मंडळी) आणि (काही चुकार विचारवंतांच्या मते) (विचारवंत कसले विचारजंतच ते) ही प्रजाच त्या राजाची भयंकर प्रमाणात काळजी घेत होती (अशी शंका आहे). आपली प्रजा अत्यंत सुखात आणि समाधानात आहे. आपल्या राज्यात सर्वत्र हिरवळ आहे... दाट जंगले आहेत... पशुपक्षी मानवप्राणी सर्वत्र सुखेनैव निवास आणि संचार करत आहेत.... धनधान्य, आनंद, हास्य आणि समृद्धि यांनी सर्व राज्य गजबजून गेलेले आहे... इथे कशाचीच म्हणजे कशाचीच कमतरता नाही यावर राजाचा आत्यंतिक प्रचंड प्रमाणात दृढ विश्वास होता. (सब चंगा सी) आणि त्याच्या खूप सार्या प्रजेचाही. (रामराज्य आणि अच्छे दिन आलेतच) अर्थातच. इतक्या गंभिर विश्वासाचा मग अभिमान गर्व वगैरेही व्हायचा. (गर्वसे कहो...) आणि मग निष्ठा स्वाभिमान, देशप्रेम वगैरे क्रमाने. (अगदी अगदी) एकूण सगळ्या चविष्ट काल्यात गुंगून सगळे राज्य फार फार आदर्श बनले होते. परिसीमाच जणू. आणि टोकाला राजा. (There is no alternative to the king)

आवडली कथा,मस्त!

"इथे कशाचीच म्हणजे कशाचीच कमतरता नाही यावर सर्वांचाच अजूनही आत्यंतिक प्रचंड प्रमाणात दृढ विश्वास आहे!"
-
अगदी बरोबर.

हाय मुग्धमानसी, मी इथं नवीन आहे. म्हणजे काही वरषांपूर्वी कधीकधी वाचायला यायचे.
आता अकाऊंट काढलं. हळूहळू वाचतेय.
मला फार फार आवडली आहे ही गोष्ट. जबरदस्त विज्युअल्स, रूपकं, भाषा सगळंच. इतकं तीक्ष्ण, इतकं जळजळीत, इतकं धार्धार आणि तरीही विषयाची एक किनार सतत धरून ठेवणारं लिखाण बर्‍याच दिवसांनी वाचलं.
काहीच कळत नाहीय बाबा या लोकांची भाषा म्हणत आपण कधी सिनेमात गुंतत जातो आणि कधी ती भाषा आपल्याला बरोबर त्यातल्या हुंकारांसकट समजायला लागते ते कळत पण नाही तसं झालं तुमच्या गोष्टीचं.
तुम्ही लिहीत असालच अजून बरंच. शोधून वाचते. Happy