एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 August, 2021 - 21:05

एका माणूसघाण्याची पिकनिक

शाळा सुटली, पाटी फुटली.
पण शाळेतली मैत्रीही तुटली असे कधी होईल तेव्हा वाटले नव्हते.
त्या काळी शाळेतील मस्तीखोर आणि किडे करणार्‍या मुलांची यादी काढली असती तर पहिल्या तीनात माझे नाव असते. हेच कॉलेजबाबतही म्हणता येईल. अगदी माझ्या पहिल्या जॉबच्या सुरुवातीच्या दोन वर्षांबाबतही हेच म्हणता येईल.
मग जग बदलले. मित्र बदलले. नव्हे आयुष्यातून गेलेच. उरले ते कलीग. ऑफिसवेळेत एकमेकांशी स्पर्धा करणारे. कुरघोडी करणारे. मनात सुप्त असूया इर्ष्या ठेवून मैत्री निभावणारे कलीग.
मला हे कधी शत्रूंबाबतही जमले नाही. मग तुटत गेलो जगापासून. अंतर राखूनच वागू लागलो. तसाही माझा मूळ स्वभाव तोच होता. पटकन कोणामध्ये मी मिसळत नाही. स्वताहून फारसे बोलत नाही. एखाद्याशी ट्यूनिंग जमली तर त्याच्यासाठी कायपण, मैत्रीला नो लिमिट. पण नाही ट्युनिंग जमली तर मी भला आणि माझा एकांत भला. आणि मग अश्याने एकटाच जास्त पडू लागलो. कारण शाळेतील ती निकोप मैत्री पुढे पुन्हा कधी अनुभवताच आली नाही.

मग ऑनलाईन प्रेम प्रकरण जुळले. माझ्याशी ट्युनिंग जमणारी, मला झेलू शकणारी व्यक्ती भेटली. जिच्याशी काहीही बोलू शकतो, कसेही वागू शकतो. मग तिच्याशीच लग्न केले. मग दोन मुले झाली. ती माझाच अंश होती, माझ्यासारखीच किडेकर निघाली. त्यांच्याशी ट्युनिंग जुळणारच होती. राहिली आई तर ती माझी लहानपणापासूनची बेस्ट मैत्रीण होती. बघता बघता मी माझ्या छोट्याश्या कुटुंबालाच माझे विश्व बनवून जगू लागलो.

दुसरीकडे व्हॉटसपवर शाळेचा ग्रूप बनला होता. त्यांचे गेट टूगेदर पिकनिक चालू झाले होते. पण मला मात्र आता ईतक्या वर्षांनी माझ्या सेट झालेल्या विश्वातून बाहेर पडायचे नव्हते, कारण जगासाठी माणूसघाणा, स्वकेंद्रीत, आत्ममग्न वगैरे वगैरे असलो तरी मी माझ्या आयुष्यात खुश होतो, समाधानी होतो, त्यांच्यासोबत आहे तोच वेळ मला पुरत नव्हता. त्यामुळे आणखी चार मित्र, चार नाती जोडण्याची, वाढवण्याची गरज नव्हती आणि ते मला सहज जमतही नाही. त्यापेक्षा मी आपला सोशलसाईटवरच प्रत्यक्ष भेटायची बोलायची गरज न पडणार्‍या आयडींमध्ये छान रमत होतो.

त्यामुळे गेले कित्येक वर्षे मी त्यांच्या पिकनिकला त्यांना हे न सांगता, त्यांच्या भावना न दुखावता व्यवस्थित टांग देत होतो. पण ते देखील न चुकता दर वेळी आग्राह करत होते. यावेळी मात्र त्यांना शंभर टक्के खात्रीच होती की मी टांग देणार. आणि मग का माहीत नाही, मलाच वाटले की एकदा जाऊन बघावे. किती दिवस ते सोशलसाईटवरचे मित्र असल्यासारखे त्यांच्याशी ग्रूपवर चॅट करणार. बायकोला हे बोलून दाखवताच ती माझ्यापेक्षा जास्त उत्सुक दिसली. कदाचित जे मला दिसत नव्हते ते तिला दिसत होते. माझ्या परीपुर्ण(!) आयुष्यात तिला दोनचार मित्रांची कमी जाणवत असावी. मी विषय काढताच तिने मला फेरविचार करायची संधी न देता थेट माझे पैसेच भरून टाकले. मी येतोय हे कळताच मित्रांनी आनंदाने मला केकची ऑर्डर देऊन टाकली. बायकोही केक करायला तयार झाली. माझे जवळपास परतीचे सारे दोर कापले गेलेले तरी मी अजूनही जावे की न जावे या संभ्रमातच होतो. कारण माझे कोणामध्येही चटकन न मिसळणे या स्वभावाची मला कल्पना होती. आणि तसे झाल्यास शाळेतले मित्र पुन्हा जोडले जाण्याऐवजी दुरावले जाण्याचीच भिती होती. आणि त्यानंतर कदाचित आम्ही चॅटवर जसे बोलतो तसेही जमले नसते.

..... आणि पिकनिकची सुरुवात तशीच झाली !

सकाळी मला एका मित्राने त्याच्या गाडीत घेतले. सोबत आणखी तीन जण होते. आणि गाडी माळशेज घाटाच्या दिशेने निघाली. प्रवासाच्या तीन चार तासांत माझे कोणाशीही औपचारीकतेच्या पलीकडे बोलणे झाले नाही. अरे नाईक ईतका शांत का बसला आहेत तू? ही वाक्ये कानावर पडायला सुरुवात झाली आणि आता दोन दिवस हेच ऐकायचे आहे याची मी मनाची तयारी करून सरसावून बसलो.

दोस्ती लेकवूड माळशेज घाट, रिसॉर्ट बूक केले होते. पहिल्या जेवणासाठी मात्र सर्व जण पायथ्याशी जमले. तिथे एका मित्राच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये जेवण उरकले. आणि दोस्तीचा डोंगर चढायला सुरुवात केली. कारण गाड्या वर जाणार नाहीत असे समजले. दहा पंधरा मिनिटांचा रस्ता म्हणत सारे जण बॅग पाठीवर घेऊन अर्धा तास डोंगर चढतच होते. पाऊस सोबतीला कोसळतच होता. पण यापेक्षा कहर होता तेथील सुसाट भन्नाट जबराट वगैरे वगैरे शब्द कमी पडावेत असा वारा. ज्याच्यासमोर सार्‍यांनीच हात टेकले होते. हो अ‍ॅक्चुअली, मला तर हातच टेकावे लागत होते. कारण माझ्या हातात केकची पिशवी होती. ज्यात वारा असा काही शिरत होता की त्याचे पॅराशूट तयार होत होते आणि त्यासोबत उडून जातो की काय अशी भिती वाटल्याने खरेच मध्येच आधारासाठी हात टेकावे लागत होते. पिशवी तर नाही उडाली. पण माझा कॉम्प्युटरवर काम करायचा चष्मा उडून गेला. खरे तर तो टीशर्टला लटकवून ठेवायची बिलकुल गरज नव्हती. पण फोटो काढायच्या वेळी तो आपण लाऊ, त्यात आपण स्मार्ट वगैरे दिसतो असे मला उगाचच वाटत असल्याने सोबत होता.

जसे वर चढत होतो तसे समोरील सरोवराचे द्रुश्य आणखी विलोभनीय दिसत होते. हा एकच मोह पाय वरच्या दिशेने खेचत होता. अखेरीस जेव्हा हा रस्ता थेट स्वर्गातच जातो की काय असे वाटले तेव्हा आम्ही स्वर्गासारख्या परीसरात प्रवेश केला. मात्र तरीही वर पोहोचणारा प्रत्येक जण ज्याने हि जागा निवडली त्याला शिव्या घालत होता. कारण नाहक सर्वांची फिटनेस टेस्ट झाली होती. त्यात एक मित्र तर लो बीपी होत चक्कर येऊन आडवा झाला होता. मला मात्र हा अनुभव प्रचंड आवडला होता. आपण बारीक असलो तरीही धापा टाकल्या नाहीत म्हणजे फिट आहोत हे समाधानही सोबतीला होते.

एव्हाना नाईक खूप शांत शांत आहे हि खबर सर्वांमध्ये पसरली होती. त्यानंतर ते सर्वांचे समजावणे, अरे सारी आपलीच पोरे आहेत, कसला विचार करतोयस, खुलून ये, बोल बिनधास्त कसला संकोच आहे, तुला मजा नाही येत आहे का.... वगैरे वगैरे हे सारे प्रकार ईरिटेटींग असतात. आणि अपेक्षाही मग अशी की मी भडभडून बोलायला सुरुवात करावे. अरे भ्रमिष्ट आहे का मी जे क्षणात शांत क्षणात बडबड. आता आहे मी शांत तर आहे शांत. राहू द्या मला थोडावेळ तसे. पण मित्रांमध्ये हेच जमत नाही.

आता हे दोन दिवस कसे जाणार या विचारात मी आलेला चहा घेतला आणि बायकोला फोन लावला. तिच्याशी जरा बोललो. बरे वाटले. ईतक्यात कोणीतरी मला आवाज दिला, केक कापून घेऊया म्हटले. केक तसा विस्कटलेलाच होता. पण हे होणार याची कल्पना येत मी घरीच फोटो काढून घेतले होते. ते ग्रूपवर शेअरही केले होते. सर्वांना तेव्हाच तो आवडला होता. केकची थीम माझीच हे देखील त्यांनी ओळखले होते. पण केकची चव घेतल्यावर मात्र पुढच्या पाचदहा मिनिटातच केकच्या पंधरा ऑर्डर तरी तोंडी का होईना बूक झाल्या. म्हटले चला, बायकोने केक बनवून दिला हे बरेच झाले. निदान आपण बोलत का नसेना आपले काम तरी बोलले.

त्यानंतर मग सारे गप्पा मारायला हॉटेलवरच्या डेकवर जमले. ज्याने एवढा वेळ आमच्या शिव्या खाल्या होत्या की अशी कसली ऊंचावरची जागा निवडलीस तो आता अचानक हिरो झाला होता. कारण समोर दिसणारे अफलातून द्रुश्य सर्वांनाच स्तब्ध करणारे होते. आपण डोंगराच्या कड्यावर, खाली पायथ्याशी हायवे, पलीकडे नजर जाईल तिथवर पसरलेले सरोवर, त्या पलीकडे डोंगररांगा, डावीकडे दरी, पाठीमागे आमच्याच डोंगराचा उभा राहिलेला सुळका, नजरेच्या खाली डावीकडून उजवीकडे वाहणारे धुक्यांचे ढग, मध्येच समोरचे द्रुश्य धुक्यात हरवून जाणे तर अचानक लक्ख दिसणे, खाली दरीतून वर येणारा वारा, सोबत पाऊस.. आणि सोबतील पुन्हा एक चहाचा राऊंड आणि गरमागरम कांदा बटाटा भजी.. निव्वळ अफाट... जेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी बनवली असावी आणि वरतून पाहिले असावे तेव्हा अशीच सुंदर दिसली असावी. ते पाहून एक प्लेट भजीची ऑर्डर त्यानेही दिली असावी Happy

सर्वांचे फोटो सेल्फी काढणे सुरू झाले, आणि मी पहिले घरी लेकीला विडिओकॉल लाऊन सर्व परीसर दाखवून घेतला. कदाचित ते कौतुक असावे, कदाचित होम सिकनेस. कल्पना नाही. एका भन्नाट जागी आल्याचे समाधान होते पण अजूनही मी मित्रांमध्ये मिसळलो नव्हतो. ईतक्यात अजून एक मित्र वर गडावर पोहोचला. समजले की तो फक्त अर्ध्या तासाची धावती भेट द्यायला आला होता. मी शॉकड्! भले त्याचे गाव तिथून जवळ का असेना पण ईतका मोठा डोंगर चढून तो एकटा आलेला ते देखील फक्त अर्ध्या तासाच्या भेटीसाठी. मला १८० अंशात मिळालेला झटका होता तो. एकेकाळचा माझाही खास मित्र होता तो, पण त्याच्याशीही मी औपचारीकरीत्याच हात मिळवला.

चहाभजी आणि धुंद वातावरण, मित्रांच्या गप्पा तिथेच डेकवर सुरू झाल्या. शाळेचे किस्से निघू लागले. शाळेत माझ्याच बाकावर बसणार्‍या पण मधल्या काळात काहीच संपर्क नसलेल्या माझ्या एका सर्वात खास मित्राने माझे किडे सांगायला सुरुवात केली. त्यात त्याने मी तेव्हा केलेली एक विडंबन कविता सांगायला सुरुवात केली. पहिल्या कडव्यातच सारे हसून हसून ठार. तेव्हाच्या वयाला साजेसे अश्लील विडंबन असल्याने ईथे देऊ शकत नाही, पण बघता बघता त्याने तीनचार कडव्यांची पुर्ण कविता म्हटली. हसताहसताही माझ्या डोळ्यातून पाणी आले. ईतक्या वर्षांनी.. ईतके लक्षात ठेवणे.. त्या दिवशी माझ्यासाठी तो पहिला क्षण होता जेव्हा मी त्या सर्वांशी जोडला गेलो. पहिल्यांदा मी एका मित्राला मनापासून मिठी मारली.

सात वाजले, अंधार पसरू लागला तसे आता मद्य पिणार्‍या मित्रांनी मेहफिलीचा ताबा घेतला. रूम्सच्या व्हरांड्यातच टेबलखुर्च्या टाकल्या गेल्या. हळूहळू माहौल बनू लागला. मी मात्र चिकन चिल्ली आणि फिशफ्राय वगैरे स्टार्टरवरच कॉन्सट्रेट केले होते. माईकचीही सोय होती. पोरांनी जमेल तसे गाणे गायला सुरुवात केली. माझ्याही हातात माईक सरकवला गेला. पण मी मात्र मला ते सहज जमले असूनही टाळले. अन्यथा एकेकाळी प्किनिक म्हटले की बसमध्ये गाणार्‍यांमध्ये सर्वात मोठा आवाज माझाच असायचा. पण आता पुढाकार घेणे नाही जमले.

खरे तर मी त्यांच्यासोबत एंजॉय करत होतो. मलाही ते पहिल्यांदाच आलेला मित्र म्हणून एक्स्ट्रा अटेंशनही देत होते. मी कधीच एकटा पडलोय असे मला बिल्कुल जाणवले नाही. ऊलट व्हॉटसप ग्रूपवर सर्वात जास्त डोके खाणारा हा म्हणून प्रत्येकाला माझ्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचे होते. माझ्याकडून त्यांना प्रवचन ऐकायचे होते. मी शाळेत एकेकाला पकडून सांगत असलेले खरेखोटे किस्से ऐकायचे होते. पण मी काही बोलतच नव्हतो.

दहा वाजले. पिण्याचा प्रोग्राम ऊरकला. सॉरी, मध्यांतर झाले. आता सारी पावले थिरकायला डीजे होता तिथे वळली. आधीच तिथे एक दोन फॅमिली ग्रूप्स नाचत होते. आम्ही एक जागा पकडली. आणि मी सर्वात मोठा ईरीटेटींग काळ झेलायला तयार झालो. का ईरीटेटींग?

तर मला नाचाची प्रचंड आवड आहे. म्युजिक सुरू होताच बीट्सनुसार अंग हलू लागते. जवळपास रोजच घरी मुलांसोबत डान्स असतोच. पण बाहेर मात्र जिथे ट्युनिंग असते तिथेच नाचतो. ऑफिसच्या पार्टीला आजवर एकदाही नाचलो नव्हतो. त्यामुळे ऑफिस फंक्शनला जेव्हा स्टेजवर एकट्याने नाचायचे ठरवले तेव्हा सारे अवाक झालेले.
याबद्दल सविस्तर ईथे वाचू शकता - माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) - https://www.maayboli.com/node/72946

आताही हेच होणार होते. मला नाचाचा आग्रह होणार होता. आणि मी नाही नाही बोलून ईरीटेट होणार होतो. मग ते हात धरून खेचणे आणि आपण एक हात वर करून ईथून जाऊन तिथून बाहेर पडणे. आणि मग पुन्हा तेच, पुन्हा तेच. जवळपास वीस पंचवीस पोरे पुन्हा पुन्हा तेच करणार होती. कोणी मला खेचणार होते, तर कोणी ढकलणार होते. या टेंशनमध्ये दबकतच मी डान्सहॉलमध्ये प्रवेश केला. पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हते...

आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली होती. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली होती. आता मी मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील झालो होतो.

जेवण झाल्यावर पुन्हा काही जणांनी आपली नाचाची हौस भागवली. रात्रीचे दोन वाजेपर्यंत माळशेज घाट दणाणून उठले होते. मग पुन्हा रूमवर पत्यांचा डाव रंगला. सभ्य पोरं झोपायला गेली. मला कोणी सोडणारच नव्हते. कारण एकतर मी सभ्य नव्हतो. वर्गात जुगार सुरू करणारा तो मीच होतो हे सर्वांना माहीत होते. दुसरे म्हणजे माझा दिवस रात्रीच सुरू होतो याचीही व्हॉटसग्रूपवर माझे रात्रीचे चहा भेळीचे फोटो पाहून त्यांना कल्पना होती.

पण आता मी मागे राहण्यातला नव्हतो. मीच मग पुढाकार घेऊन हॉटेलवाल्याच्या स्वयंपाक्याला उठवून वीसेक कप चहा बनवायला लावली आणि पत्यांचा जोड हातात घेतला. पिसताना पत्ते पत्यांत आणि मी मित्रांत मिसळत होतो. १०-१० रुपये टेबल लाऊन तीन पत्तीला सुरुवात झाली ते पहाटे साडेपाच वाजता मी तब्बल साडेआठशे रुपये जिंकूनच उठलो. माझ्या एकेकाळच्या द ग्रेट गॅम्बलर ईमेजला जागलो. अकरा-बारा जणांनी सुरुवात केलेली ते शेवटपर्यंत खेळणारे आम्ही सहा जणच उरलो होतो. मग पुढचे अर्धा तास उजाडेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. मग पहाटेचे पुन्हा एकदा आदल्या संध्याकाळच्या डेकवर जाऊन तिथून पुन्हा एकदा पहाटेच्या वातावरणात तो परीसर अनुभवला. आणि रात्र जागवलेल्याची आठवण म्हणून काही फोटो काढले.

मग दिड तासांची झोप, ती मात्र वार्‍याने वाजणार्‍या छपरांच्या खडखड आवाजाने गाढ अशी आलीच नाही. रूमसर्विसची तशी बोंबच होती. पण पर्वा नाही. आठसाडेआठच्या सुमारास चहाचा आवाज आला तसे पांघरूण फेकून खाडकन उठलो आणि पुन्हा पोरांच्यात जाऊन मिसळलो. हळूहळू सारेच उठले आणि दहा पर्यंत सर्वांचे चहापाणी झाले. मी मात्र त्यावेळी थोडासा वेळ काढून त्या परीसराचा एक छोटासा विडिओ बनवून घेतला. पुढे मग तिथल्याच डोंगरावरच्या एका धबधब्यात जाऊन भिजणे, तिथे जातानाही शेतातून चिखल तुडवत, पाटाच्या पाण्यात पाय भिजवत जाणे, धबधब्याच्या जवळ येताच वार्‍याने त्याचे पाणी बाणासारखे तोंडावर टोचणे, पुन्हा एकदा ज्याने हा स्पॉट निवडला त्याला शिव्या घालणे पण प्रत्यक्षात मात्र हा थरार भरभरून अनुभवणे चालूच होते.

आता धबधब्यात भिजलोच आहोत तर स्विमिंग पूल का सोडा म्हणून तिथेही चार डुबक्या मारून झाल्या. डोंगरावर असलेला स्विमिंग पूल आणि पाठीमागे दिसणारा लेक म्हणजे त्या दुबईच्या हॉटेलात टेरेसवर असणार्‍या स्विमिंगपूलसारखे झाले, म्हणून तिथेही काही फोटो टिपले. आता मी खुलून आल्याने माझा फोटो काढायचा आणि काढून घ्यायचा उत्साहही वाढला होता.

सरतेशेवटी समारोपाचे म्हणून अर्धा तास चिखलवार्‍यात पाऊसपाण्यात बेछूट फूटबॉल खेळून झाले आणि मग दोन दिवसांचा क्षीण घालवणारी गरम पाण्याची आंघोळ. तेव्हाही वाटले की एखाददुसर्‍या मित्रालाच सोबत घेऊन जावे आंघोळीलाही ईतके आता मी सर्वात रुळलो होतो.

मग यावेळची पिकनिक कशी झाली या गप्पांमध्ये दुपारचे जेवणखाणे उरकेपर्यंत तीन वाजले. आधी जे माझ्या बायकोने बनवलेल्या केकने सुरुवात झालेली ते कौतुक आता माझा नाच आणि माझ्या केसांकडे वळले होते. मला बॉबीचा रिशी कपूर हे नाव पडले होते. या पिकनिकच्या गप्पांसोबत मला त्यांनी जुन्या पिकनिकचे किस्सेही सांगायला सुरुवात केली. आजवर त्यातले कैक व्हॉट्सपग्रूपवर ऐकलेले. पण ते असे मित्रांच्या घोळक्यात ऐकण्याची मजाच वेगळी. शेवटी पाय निघतच नव्हता. शाळेच्या सेंडऑफची आठवण झाली. पुन्हा कधी भेटणार त्याची वाट बघणे आले आता.

पण पुढच्या पिकनिकला अजून बरेच काही करने शिल्लक आहे. कॉलेजनंतर ज्या मित्रांमध्ये द्यायच्या शिव्या माझ्या तोंडून हरवल्या आहेत त्या पुन्हा द्यायच्या आहेत, माझे गाणे गायचे शिल्लक आहे. मुलींसोबत प्रेमप्रकरणाचे खरे खोटे किस्से रंगवून सांगणे बाकी आहे. चारचौघांपेक्षा वेगळे किडे करणारा म्हणून शाळेतली ओळख मला पुन्हा मिळवायची आहे. यावेळी खुलून आलोय, पुढच्यावेळी हलवून सोडायचे आहे. आणि म्हणून घरी आल्याआल्या सर्वात पहिले व्हॉटसपग्रूपवर पोस्ट टाकली.

पुढच्या पिकनिकची लिस्ट
१) ऋन्मेष
२) ........
३) ......
....
..

लोकेशनचा मी काढलेला विडिओ ईथे बघू शकता.
Dosti Lakewood Resort, Malshej Ghat
ऑस्सम प्लेस !

https://youtu.be/Gl08p985q2U

यात शेवटच्या क्लिपमध्ये मी सुद्धा दिसेन. ओळखा Happy

बाकी फोटो जमा करतोय मित्रांकडून
तोपर्यंत केकवर तुटून पडा Happy

IMG_20210804_212751.jpg
.
IMG_20210804_212818.jpg

.

माळशेज घाटाचे इतर फोटो या ईथे क्लिक करून बघू शकता,
माळशेज घाट - महाराष्ट्राचा स्वित्झर्लंड - https://www.maayboli.com/node/79696

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेचं नाव तू सांगितलंयस आधी. >>>> तसे मी माझ्या कॉलेजचे नावही VJTI सांगतो. पण काही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. आता शाळेचे नाव केकवर आले म्हणजे कन्फर्म झाले Happy

वृत्तान्त, पिकनिक स्पॉट, व्हिडिओ, केक सगळंच मस्त. व्हिडिओ घरी दाखवला तर मुलांनी धिंगाणा घातलाय आपण पण जाऊया म्हणून Lol सुपर्ब जागा, वातावरण आहे.

केक मस्त..तो बाहुला पण खायचा आहे का ? >>> हो, फाँडंट आहे, लहान पोरे खातात आवडीने. माझी पोरगी तर तेच पहिला खाते.>>>>> बाहुला पण केलाय? टू गुड , मला वाटलं खेळण्यातला आहे.

व्हिडिओ घरी दाखवला तर मुलांनी धिंगाणा घातलाय आपण पण जाऊया म्हणून Lol सुपर्ब जागा, वातावरण आहे.
>>>>>
हो, आमच्याकडेही सेम. पण पावसाळ्यात गाडी तिथे वर जात नव्हती. आणि एवढ्या वार्‍यात पोरांना घेऊन डोंंगर चढायचा म्हणजे...
माझा चष्मा उडाला त्या वार्‍यात. आज नवीन घेतला. पोरगा उडाला तर नवीन कुठून आणू Happy
तसे ईथून खालीही छान रिसॉर्ट दिसत होते. तिथूनही छान ग्रीनरी आणि लेकचा व्यू आहे जो रस्त्यावरून येताना बघून खुश झालेलो. मात्र आम्ही वरच्या व्यू चा अनुभव घेतल्याने आता ते किंचित फिके वाटू लागले. पण फॅमिलीसोबत जायला ते खालचे रिसॉर्टही खूप छान आहेत. आणि भटकंतीला माळशेज घाट आहेच. जरूर जावे. पुढच्या वर्षी आम्हीही त्या खालच्या रिसॉर्ट्सना जाणेबाबत विचार करू. फक्त तिथली बूकिंग आधी करावी लागेल. फुल्ल असतात.

वर्णिता, धनुडी धन्यवाद... हो बाहुलाही केलाय, खायचा आहे, पण तो बाहुला नसून आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. पांढरे शर्ट, त्यावर शाळेचा बॅच, निळी हाफ पँट, गुडघ्याच्या चार बोटे वर, खाली निळे पांढरे कॅनव्हासचे शूज Happy

सामो, ओके
आमच्याकडे असे जोक चालताना पाहिले आहेत. ईथे कोणाचे संवेदनशील मन दुखवायचे नव्हते Happy

किंग जॉर्ज कशी आहे आता.. एके काळी नंबर वन होती...>>>
आता ऋन्म्या शिकून बाहेर पडलाय, तुम्हीच ठरवा च्रप्स Wink Lol

खुपच छान फोटो अन व्हिडियो देखिल... Happy
माळशेज घाट ... आंम्ही देखिल आलो आहोत जाऊन अगदि पावसाळ्यातच.. जाताना वाटेतील निसर्ग सौंदर्य, छोटे छोटे तयार झालेले धबधबे... आंम्ही थांबुन त्या धबधब्यांचा हि अनुभव घेतला आहे.... अन खरच वाटत राहतं कि इकडे राहणारे लोकं किती लकी असं.

>>>>>त्या दिवशी माझ्यासाठी तो पहिला क्षण होता जेव्हा मी त्या सर्वांशी जोडला गेलो. पहिल्यांदा मी एका मित्राला मनापासून मिठी मारली.
वाह!!! हा अनुभव आहे मलाही. मी विसरले होते पण माझ्या कॉलेज मैत्रिणीने मला आठवण करुन दिलेली. काय नॉस्टॅल्जिक वाटले होते तेव्हा.

खूप सुंदर अनुभव आहे. गॉडस वेअर स्मायलिंग ऑन यु.

किंग जॉर्ज कशी आहे आता.. एके काळी नंबर वन होती... >>>>>> कल्पना नाही. आमच्यातील कोणाचीच मुले आता तिथे नाहीत. अर्थात आता जवळपासही कोणी राहत नाही म्हणा. पण तसेही हल्ली एकूणच एसेसी बोर्डाचे मार्केट डाऊनच आहे.

धन्यवाद देवभुबाबा, भावना, सामो

सामो, हो खरेच. आणि त्या कविता म्हणतानाचा एकाने विडिओ देखील काढला. त्यामुळे त्या आठवणीची आठवणही आता संग्रही झाली Happy

पुन्हा आलाय पिकनिकचा महिना. यावेळी खोपोली ठरलेय. यावेळी उत्साह भरभरून वाहतोय.
या पार्श्वभूमीवर पुन्हा हा धागा पुर्ण वाचून काढला.
प्रतिसादही वाचले. छान वाटले सर्वांचे प्रतिसाद वाचून. माझ्या तेव्हाच्या भावना बहुतेकांना रिलेट करता आल्या वा लोकांनी समजून घेतल्या याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद Happy

या शनिवारी-रविवारी पुन्हा शाळेच्या मित्रांची गेटटूगेदर पिकनिक झाली.
पुन्हा बायकोने केक बनवून दिला.
या मधल्या वर्षभरात मी एकदाही कुठल्याही शाळा कॉलेज ऑफिसच्या मित्राला भेटायला गेलो नाही. (अपवाद- मायबोलीकर मैत्रीणीशी भेट) त्यामुळे बायकोने आनंदाने मला केक देऊन घरातून हाकलून लावले Happy

IMG_20220726_003320.jpg

धन्यवाद
सामो, अनु , देवकी , साधा माणूस, हपा आणि जाई Happy

@ साधा माणूस,
जे वृत्तांत लिहिण्याची मजा पहिल्यावेळी हे घडताना होते ते आता नाही. किंबहुना त्या भावना वेगळ्याच होत्या.
बाकी यावेळी सारे मित्र खुश झाले की मी पुन्हा दुसऱ्यांदाही आलो. आपली पिकनिक सक्सेस झाली असे त्यांना वाटले. अर्थात गेल्यावेळीच मी जे नाच पत्ते स्विमिंग पूल धबधबा वगैरे ठिकाणी जी धमाल केलेली त्याने हे कळलेलेच. फक्त पुन्हा येण्याने शिक्कामोर्तब झाले.

असो, तरी एक हृदयस्पर्शी घटना घडली जी गेल्यावेळी घडली नव्हती. व्हॉटसप स्टेटसला त्याचा फोटो तर लावला आहे. पण त्यावर काही लिहावेसेही वाटत आहे. कामातून फुरसत मिळाली आणि लिहायची उर्मी कायम राहिली तर त्या एका घटनेबद्दल जरूर लिहेन Happy

केक सुपर्ब .
तर त्या एका घटनेबद्दल जरूर लिहेन Happy>> जरूर लिहा.

पिकनिकची चटक लागली का माणुसघाण्याला?
केक भारी आहे. फक्त दाढीवाला काढायचा राहिला.
काय घडलीये घटना? स्टेटस वर समजलं नाही. दारू प्यायलास काय? Lol

Pages