चित्रपट संगीतातील सौंदर्यस्थळे - राग, ताल, म्युझिक पीसेस

Submitted by मामी on 25 July, 2021 - 22:01

हिंदी, मराठी चित्रपट संगीत, भावगीतं, लोकगीतं यांमधील सौंदर्यस्थळांबद्दल चर्चा इथे करू.

..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) या धाग्यावर एका कोड्याचे उत्तर देताना जी अधिकची माहिती मला लिहाविशी वाटली त्यावरून ही कल्पना सुचली.

अनेकदा ही गाणी रागांवर आधारित असतात. ते राग कोणते, ताल कोणता, कोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली आहेत, त्यांची खुबी, गाण्यातील एखादी खूप आवडलेली जागा, गायक/गायिकेच्या आवाजाचा करून घेतलेला योग्य वापर याबद्दलचे विचार, चर्चा, उहापोह, देवाणघेवाण, प्रश्न, रंजक किस्से यासाठी हा धागा काढत आहे.

इथे अनेक संगीत प्रेमी आहेतच, तसेच अनेक संगीत दर्दी देखिल आहेत, त्यांच्याकडून खूप रंजक आणि उदबोधक माहिती मिळेल अशी आशा आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'स्वरगंगेच्या काठावरती' या गाण्यातले बाकी सारे थोड्या वेळापुरते कानाआड करून नुसता तबला आणि पहिल्या कडव्यानंतरची बासरी कितीही वेळा ऐकत राहावे वाटते. विशेषतः रात्रीच्या शांततेत हा तबला आणि बासरी तुमचे बोट धरून तुम्हाला अलगद एका जादुई विश्वात घेऊन जाताहेत असे वाटते.
(या गाण्याची दोन (तरी) व्हर्जनं आहेत. वर लिहिलेले तबला आणि बासरीसाठी 'शुक्रतारा' या संचातले ऐकावे.)

अहो हरचंद पालव, मी काही गाणंबिणं शिकले नाहिये, माझा आपला असाच अंदाज. शिवाय चित्रपट गीत असल्यामुळे अगदी रागाला धरूनच सगळी चाल नसूच शकते..
जिवलगा.. साठी किल्लीला अनुमोदन.
मोगरा फुलला हे गोरख कल्याण रागातलं आहे हे माझ्या गाणार्या मैत्रिणीने सांगितलं.

सारंगी या वाद्याबद्दल वाचले आहे. त्याचा चांगला उपयोग असलेले एखादे लोकप्रिय गाणे कोणते आहे?

काय पो छे मधल्या "मांजा" गाण्यात मधे अगदी सुरूवातीला आणि नंतर एका कडव्या आधी साधारण इथे एका वाद्याचा मोठा पीस सुंदर वाजवलेला आहे. ते वाद्य कोणते? ती सारंगीच आहे का? जबरी आवडते गाणे आहे हे.

>>सारंगी या वाद्याबद्दल वाचले आहे. त्याचा चांगला उपयोग असलेले...<<
लगेच आठवलेलं हे "अदालत" मधलं गाणं - उनको ये शिकायत है... काय गायलंय लताबाईंनी! बहुतेक मालगुंजी रागात आहे...

थॅंक्स राज. बहुधा तुम्ही त्या कडव्यांमधले पीस म्हणत आहात. ती सारंगी असेल तर मग वरचे मांजा मधले वाद्य वेगळे असावे.

बाकी लता आणि मदनमोहन हे फार उच्च कॉम्बो आहे यात वाद नाही.

गजानन - दिल चीज क्या है पुन्हा ऐकून पाहतो. आधी जेव्हा ऐकले तेव्हा जाणवले नव्हते. पण मला बहुतांश वाद्ये ओळखता येत नसल्याने असेल.

चुरा के दिल मेरा गाण्यातील सौंदर्यस्थळे:

नाही, नाही, मी नवीन रिमेक बद्दल बोलत नाहीये, जुन्या ओरिजिनल गाण्याबद्दल. आमच्या सुकडू सुतारच्या मते 'चुरा के दिल मेरा'त सौंदर्यस्थळ येकच आसता - शिल्पा शेट्टी. ते असो. मी इथे श्रवणीय आनंदाबद्दल बोलत आहे.

मोह मोह के धागे हे गाणं (संगीत) अन्नू मलिकचं आहे हे कळल्यावर मी त्याची जुनी गाणी काढून पुन्हा ऐकू लागलो. उचला-उचली का केली असेना, त्यात काहीतरी नजाकत आहे हे काही वेळा लक्षात येऊ लागलं. हे गाणं हे त्याचंच एक उदाहरण. ह्या गाण्याचा राग कुठला म्हणाल तर मला नीट सांगत येणार नाही. ग आणि नी कोमल असल्यामुळे उसको काफी थाट कहना काफी होगा. ह्या गाण्यात सगळ्यात जास्त गम्मत आहे ती त्याच्या तालात किंवा लयीत. ८ मात्रांचा ताल आहे. सुरुवात जरी ड्रम्सपासून होत असली, तरी त्यात बर्‍याचदा तबला-डग्गा वाजवला आहे. आता मी नुसता तबला लिहू शकलो अस्तो, ज्यात डग्गा अध्याहृत आहे. पण गाणं नीट ऐकून बघा, अनेकदा तबला आणि डग्गा वेगवेगळा वाजलेला ऐकू येईल. आता त्यात काय मजा केलीये, की ८ पैकी पहिल्या ४ मात्रांचा खंड हा दीड मात्रांनी विभागला आहे. म्हणजे, डग्गा (हो, केवळ डग्गा) हा पहिल्या, अडिचाव्या आणि चौथ्या मात्रेवर ऐकू येतो. पुढच्या चार मात्रा मात्र शहाण्या मुलासारख्या १/१ किंवा २/२ चं अंतर ठेऊन आहेत, ज्यात तिसर्‍या मात्रेवर तबल्याचा 'ता' ऐकू येतो. ही अशी मात्रा-विभागणी त्यातल्या शब्दांशी अगदी चपखल जुळते. बहुधा आधी चाल देऊन मगच ते शब्द लिहिले असावेत. उलटे असल्यास अन्नू हा फारच महान म्हणावा लागेल.

आता गाण्याकडे वळूया. गाण्याची सुरुवात समेवर नाही. मधूनच चौथ्या मात्रेवर चुराकेमधला 'चु' येतो आणि पुढे एकेक मात्रेवर रा-के-(दिल्)-मे अशी व्यवस्था लाऊन मग 'रा' वरती सम उगवते. समेवर बर्‍यापैकी वेळ, म्हणजे अगदी एक आख्खं आवर्तन आणि पुढच्या आवर्तनातल्या पहिल्या तीन मात्रा, रेंगाळून मग पुढे गोरिया चालत येते. दुसर्‍या ओळीची चाल तीच आहे. ह्या ओळींत मधले ठळक पॉझेस सोडले, तर अक्षरं ही साधारण एकपटीत येऊन पडतात. ह्या ओळींत अन्नू मधाला स्पर्शही करत नाही (म आणि ध स्वर अजिबात लावत नाही).

आता पुढची मजा बघा. 'पागल हुआ दिवाना हुआ' ह्या ओळीला अचानक कॉर्डपरिवर्तन होते. म-ध-सा अशी कॉर्ड घेऊन ती ओळ त्या स्वरांच्या आधाराने पुढे-मागे नक्षीकाम करते. ह्या ओळीची सुरुवात समेपासून होतेच, शिवाय लय एकपट सोडून (१ छेद १.५) पट वेग घेते (किंवा मंदावते असं म्हणणं सयुक्तिक ठरेल). त्यामुळे पा-(गल)-हु ही अक्षरं डग्ग्याच्या १-२.५-४ ठेक्यावर अगदी म्याच होतात. एवढं करून झाल्यावर 'कैसी ये दिल की लगी' वर १/१.५ लय कायम ठेऊन कॉर्डसंक्रमण होते आणि ओळीच्या शेवटी जे टीणीटीणीटीणीटीणी (नीपनीपनीपनीप) वाजतं, त्याने पहिल्या मधविरहित कॉर्डची नांदी होते.

कडव्यापूर्वी येणार्‍या संगीतात सॅक्सोफोन आणि व्हायोलिन वाजवून टिपिकल शृंगार आणला आहे. त्यापुढे लयीची दुसरी मजा सुरु होते. 'अभी तो लगे है चाहतों के मेले' ही ओळ बर्‍यापैकी संथ लयीत आहे, म्हणजे अगदी निमपट वाटावी इतपत. त्यात अर्ध्या-अर्ध्या ओळीत स्वर खालून वरती आणि पुन्हा खाली - असे संथ झोके घेतले आहेत. एका ओळीत २ झोके बसलेत म्हणजे किती संथ असेल लय विचार करा. कडव्याच्या शेवटपर्यंत अशी ही संथ लय कायम राखत मग पुन्हा 'मंजिल मेरी' ओळ येते जी १/१.५ पटीत, म्हणजे इंटरमिजिएट लय आहे आणि ती एकपटीत असलेल्या 'चुराके'ला जोडण्यास मदत करते.

आता पुन्हा जाऊन ते गाणं ऐका आणि सांगा मला ते गाणं आवडलं का ते. सावर रे सावर रे गाण्यात केलेल्या लयींच्या करामतीचं आणि पर्यायाने हृदयनाथ मंगेशकरांचं कौतुक सगळेच करतात, पण बिचार्‍या अन्नूच्या नशीबी तो योग नसावा Wink
जाता जाता, चुराके दिल मेराच्या गीतकार राणी मलिक आहेत. त्या अन्नूच्या कुणी लागतात का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

राणी मलिक अनु मलिकची कुणी नाही , त्याच्या बायकोचे नाव अंजु मलिक आहे , हेही लव्ह जिहाद आहे की काय ! अनुचे मूळ नाव अन्वर

अंतराच्या ओळी लगागा लगागा लगागा लगागा अशा भुजंग प्रयात मध्ये आहेत

बाकी ओळीत वेगळे वृत्त आहे

अंतराच्या ओळी लगागा लगागा लगागा लगागा अशा भुजंग प्रयात मध्ये आहेत >> खरंच की! मनाच्या श्लोकांच्या चालीत म्हणून पाहिल्या लगेच.

ता. क.
अभी तो लगे हैं चाहतों के मेले - लगागा लगागा गालगा लगागा - थोडं वेगळं आहे. किताबें बहोत सी पढी होगी तुमने हे भुजंगप्रयात आहे.

हरचंद पालव __/\__

तरीही 'अभी तो लगे हैं चाहतों के मेले...' पासून पुढच्या चार ओळी मला नाहीच आवडत. सुसाट चाललेली एस.टी. घाटात रडतखडत वर जाते तसं वाटतं त्या ओळी ऐकताना. Proud

मस्तं विश्लेषण..
जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा एक mysterious mood होतो , certainly not a normal romantic song,
कुठली मर्डर मिस्टरी situation आहे आणि हे दोघं distract करण्यासाठी हे गाण म्हणतायत असं.
फारच इंग्लिश + मराठी असा धेडगुजरी प्रतिसाद दिलाय मी ,सॉरी :))

मामी. छान आहे लिंक
संजीवनी भेलांडेचा चॅनेल सुद्धा छान आहे.

चुरा के दिल मेरा..बद्दल इतका अभ्यास...वाचून मन भरून आलं अगदी...!!!
मी ते गाणं अगदी तद्दन फिल्मी म्हणून काना आड करत होते....:-)

चुराके दिल मेरा गाणे अन्नु मलिकने इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याआधी अनेकांना ऐकवले होते. त्यातूनच कुणीतरी उचलेगिरी करत राग देवेंद्र मधे मधुबन मे राधिका नाची थी बनवलं असे म्हणतात.

https://www.youtube.com/watch?v=xODpqB8cuzo

गेले काही दिवस लताची अनेक गाणी पुन्हा ऐकली जात आहेत. सोनी वरच्या एका शो मधे हे गाणे एका मुलीने गायले. त्यावर अजय-अतुल यांनी या मूळच्या गाण्याच्या संगीताबद्दल बरीच इंटरेस्टिंग माहिती दिली. यात म्हणे पियानो वापरला आहे. तेथील वाद्यवृंदाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे पीसेस वाजवून दाखवले. आणि मग त्यावर ते टाळीसारखे ठेक्याचे आवाज वगैरे. बरीच इंटरेस्टिंग माहिती दिली. आता पुन्हा ऐकताना जाणवते की ठेक्याचे इतके वेगवेगळे आवाज आहेत या गाण्यात.

सोनी वरच्या एका शो मधे हे गाणे एका मुलीने गायले>> ह्याची लिंक देता येईल का?खूप उत्सुकता आहे काय चर्चा झाली त्याबद्दल..धन्यवाद Happy

काल मधुबन में राधिका गाणं बघत होतो आणि आश्चर्य म्हणजे त्यात शेवटी दिलिप कुमार जेव्हा सतार वाजवायला घेतो ना, ती खरोखर बिनचूक वाजवली आहे. कॅमेरा फक्त वाद्य आणि हातावर ठेऊन वेगळ्याच कुणी वाजवली असेल तर तसंही नाही. दिकुच आहे. केवळ स्वरच नाही, तर उजव्या हाताने स्ट्रोक्सपण इतके पर्फेक्ट वाजवले आहेत की मूळ गाण्यात त्यानेच वाजवली असावी असं वाटेल. नसली तर हा माणूस भरपूर सतार शिकलेला होता हे नक्की. हे काही खाण्याचं काम नाही.

("The perfectionist that he was when it came to his craft, Dilip Kumar trained under sitarist Ustad Halim Jaffar Khan for six months to get the right look for the song Madhuban Mein Radhika Nache Re from Kohinoor (1960) in which he was required to play the sitar on screen." >> इति टाईम्सॉफिंडीया)

ह्या धाग्याचा विषय नाही हा, पण कुठे लिहावं कळेना. एका वाहत्या पानावर टाकलं होतं आधी.

चांगला आहे की आवाज दिकुचा! स्टाईल फक्त जास्त ओल्ड स्कूल आहे - सैगल वगैरेसारखी. त्यामुळे रफीच्या जमान्यात हा आवाज चालला नसता. पण स्वतंत्र गायक म्हणवून घ्यावा इतका चांगला आवाज आहे - तेही ऑटोट्यूनर नसताना.

Pages