चित्रपट संगीतातील सौंदर्यस्थळे - राग, ताल, म्युझिक पीसेस

Submitted by मामी on 25 July, 2021 - 22:01

हिंदी, मराठी चित्रपट संगीत, भावगीतं, लोकगीतं यांमधील सौंदर्यस्थळांबद्दल चर्चा इथे करू.

..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) या धाग्यावर एका कोड्याचे उत्तर देताना जी अधिकची माहिती मला लिहाविशी वाटली त्यावरून ही कल्पना सुचली.

अनेकदा ही गाणी रागांवर आधारित असतात. ते राग कोणते, ताल कोणता, कोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली आहेत, त्यांची खुबी, गाण्यातील एखादी खूप आवडलेली जागा, गायक/गायिकेच्या आवाजाचा करून घेतलेला योग्य वापर याबद्दलचे विचार, चर्चा, उहापोह, देवाणघेवाण, प्रश्न, रंजक किस्से यासाठी हा धागा काढत आहे.

इथे अनेक संगीत प्रेमी आहेतच, तसेच अनेक संगीत दर्दी देखिल आहेत, त्यांच्याकडून खूप रंजक आणि उदबोधक माहिती मिळेल अशी आशा आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तकदीर का फसाना, जाकर किसे सुनाएं

इथे हे सुरेख गाणं ऐकता येईल.
लता : https://www.youtube.com/watch?v=Q3h0cS1IYFE
रफी : https://www.youtube.com/watch?v=_mfJ7YK0d1c - गाण्याच्या या व्हर्जनमधे सुरवातीचा शहनाईचा पीस काय सुंदर आहे. देस राग आहे आणि ताल दादरा आहे जो फार सुरेख ऐकू येतो शहनाईचा पीस संपून गाणं सुरु होण्याआधी. ही शहनाई ऐकताना एका पॉइंटला अचानक 'भातुकलीच्या खेळामधली' ची आठवण येते. खरंतर 'भातुकलीच्या खेळामधली' गाण्याचा राग वेगळा आहे - वृंदावनी सारंग. दोघांचे थाटही वेगवेगळे आहेत. देस राग - खमाज थाट आणि वृंदावनी सारंग - काफी थाट.
दादरा तालाचा असाच सुंदर ठेका 'ठाडे रहियो' गाण्याच्या सुरवातीला तबला सुरु होतो तेव्हा ऐकू येतो.

ता.क. : हरचंद पालव यांनी सांगितल्याप्रमाणे 'भातुकलीच्या खेळामधली' या गाण्याचा राग मधमाद सारंग आहे. थाट काफी.

हो त्या गाण्यातली शहनाई मला आवडते. एकूणच गाण्यांमधली सनई/शहनाई जर चपखल असेल तर आवडते. मराठीत "शालू हिरवा, पाचू नि मरवा" मधे आहे तशी. हिंदीत 'ये जो देस है तेरा' मधे येते, "चन्ना मेरेया" मधेही.

पण हिंदीत पटवापटवीच्या गाण्यात सहसा तिसर्‍या कडव्यात लग्नापर्यंत पोहोचतात (चूडी मजा न देगी गाण्यात तर ती मुलाबाळांपर्यंत पोहोचते), अशा गाण्यांत कधीकधी त्याआधी ती शहनाई वाजते. ती बळंच वाटते. एसडी बर्मन ची गाणी आवडत असूनही शर्मिली च्या शीर्षक गीतात अशी शहनाई आहे तिसर्‍या कडव्याआधी. ती आवडत नाही. इतरही आठवतील.

वा! फारेण्ड मस्त लिहिलंयस.

शहनाई का कोण जाणे उदास वाटते. एक प्रकारची हूरहूर वाटते ऐकताना. पण तरीही मंगलप्रसंगी ती ऐकण्याची सवय झालीये. आमच्या घरी गणपती येत असे पूर्वी तेव्हा सकाळी शहनाईची कॅसेट लावत असू.

शर्मिलीच्या टायटल साँग मध्ये शहनाई नाहीये ना? आज मदहोश हुवाच्या तिसर्‍या कडव्याआधी आहे. आधीच्या कडव्यानंतर एक किसिंग सीन आणि मग ओघानं हिरॉईन प्रेग्नंट होते अशा मंगलप्रसंगी शहनाई वाजते. तो पीस खरा छान आहे पण त्या गाण्यात समहाऊ मिसफिट आहे.

माझ्या आवडीचा विषय! आठवेल तसं इथे लिहित जाईन. 'ओ सजना'बद्दल पूर्वी अनेकांनी लिहून झालंय आणि माबोवरही बरंच आलं असेल, पण तरी त्यावर एक स्वतंत्र लेख लिहायची इच्छा आहे. बघू या. वेळ मिळेल तसं लिहीन.

फारएण्ड, चित्रपटात वाजवली जाणारी वाद्ये (पडद्यावर) - ह्यावर तुम्ही काही लिहिलं आहे का? भन्नाट विषय आहे हा. म्हणजे शाहरुखने तोडलेला पियानो किंवा सलमानने वायरविना वाजवलेली इलेक्ट्रिक गिटार ह्यांच्यापलिकडेही शेकडो मजेशीर उदाहरणं सापडतील.

आवडता विषय
इथे बागडायला मजा येईल
छान धागा
राग आणि आधारित गाणी असा धागा आधीच आहे का?
मला देजा वू होतंय?

मस्त धागा मामी. जरा आठवावं लागेल.
पण काहीच विचार नकरता आठवलेला ‘पीस’ म्हणजे ‘ये क्या जगह है दोस्तों‘ मधे शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतर (बुला रहा है कोई) वाजवलेला ३-४ सेकंदाचा (बहुतेक) व्हायलीनचा पीस. नेहमी काळजावर ओरखडा उठतो ते ऐकून. व त्यानंतर आशा ती ओळ पुर्ण म्हणते. तेव्हातर उरलेली कसर भरून काढायला डोळ्यातुन पाणी येतं.
एकंदर वैयक्तिक बोलायचे झाले तर करूण रसातले स्वर मनाला जास्त(च) भिडतात.
उदा. ‘चिठ्ठी आयी है’ मधे शेवटी गायलेले ‘बडे दिनों के बाद‘ , ‘संदेसे आते है‘ मधले सोनुने गायलेले ‘ऐ गुजरने वाली हवां बतां’ ही ओळ व ते कडवे.
ही गाणी एकटी असताना कधीच ऐकत नाही. Happy

मोह मोह के धागे
यमन आणि पुरिया धनश्री ह्या वर आधारित असं कुठेतरी वाचलं
सुंदर गाणं आहे खूपच

पण काहीच विचार नकरता आठवलेला ‘पीस’ म्हणजे ‘ये क्या जगह है दोस्तों‘ मधे शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतर (बुला रहा है कोई) वाजवलेला ३-४ सेकंदाचा (बहुतेक) व्हायलीनचा पीस
+१००, पण तो सारंगी चा असावा.

'मोहे रंग दो लाल' गाण्याची सुरवात अन शेवट मला अतिशय आवडतात - दोन वेगवेगळ्या कारणांनी.

सुरवातीला मोरांचा केकारव ऐकू येतो, पहाडावर बांधलेला महाल, खाली तळं आणि तळ्याच्या मधोमध असलेला बगिचा, त्यातील शामियाना, आता संध्याकाळ सुरू झालेली आहे, सारंगीचे सूर ऐकू येत आहेत, शामियान्यात दिवे उजळले आहेत पण संधिकाल संपून अजून रात्र सुरू झालेली नाही, बाजीराव पेशवे शामियान्यात येतात, मंचकावर विराजमान होतात अन घुंगरांची छुमछुम ऐकू येऊ लागते ..... अन सुरू होतं एक गारुड. तबल्याच्या ठेक्यावर, थुईथुई उडणार्‍या कारंज्यांच्या धारांमधील वाटेवरून मस्तानी येत असते, सख्या नृत्यासाठी माहोल निर्माण करत असतात, आकाशात संध्यारंग रंगलेले असतात .... अचानक सारंगीचे सूर सतारीच्या सूरात बदलतात .... मांड रागात सुरू होऊन ती धून बिहाग रागात येते आणि चटकन पुन्हा राग बदलत पुरिया धनाश्रीत स्थिरावते. अक्षरशः काही सेकंदांचा मामला पण काळजात घुसते. काय अप्रतिम!

असाच शेवट आवडतो तो अगदीच वेगळ्या कारणासाठी. पेशव्यांच्या पुरुषार्थावर भाळलेली मस्तानी नृत्याच्या शेवटी कुंकवानं मांग भरण्याची सूचक अदा करते. त्यावेळी तिच्या डोळ्यातील व्याकुळ भाव आणि पेशव्यांनाही तो संदेश कळल्यामुळे त्यांची झालेली नजरानजर केवळ अफलातून आहे.

शहनाई का कोण जाणे उदास वाटते. एक प्रकारची हूरहूर वाटते ऐकताना. >> सनई च्या आवाजात मांगल्य व कारूण्य याचे मिश्रण असते असे पूर्वी वाचले होते व पटले होते. आता हे चीजी वाटते पण तेव्हा एकदम चपखल वाटले होते Happy

हरचंद पालव - अरे तुम्ही वगैरे काय. तुझ्या आयडीवरून तरी कोकणातील एकेरीपणा असायला हवा :). तर तुम्ही वगैरे नको. जबरी इंटरेस्टिंग विषय आहे तो. पुलंच्याच भाषेत "आपल्याशी या विषयावर एकदा चर्चा" करावी लागेल. पण पियानोबद्दल मी लिहीले होते की पिक्चर मधल्या सीन्स नुसार "फक्त मधल्या दोन तीन कीज वर बोटे फिरवून कोणतीही ट्यून वाजवता येते".

सॉरी चुकीची माहिती लिहिली होती वरती.
‘ये क्या जगह है दोस्तों‘ मधल्या पीसबद्दल लिहिले होते मी, पण नाही, मला खरंतर ‘दिल चीज क्या है‘ च्या शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतरच्या पीसबद्दल लिहायचं होतं (‘कहीये तो’ शब्दांनंतर वाजवलेला) .. अगदी छोटाय पण फार सुंदर आहे.
‘ये क्या जगह है‘ मधलं शेवटचं पुर्ण कडवंच सर्वात जास्त त्रास देतं ते आशाच्या आवाजातल्या वेदनेने. वाद्यामुळे नाही. मामी म्हणते तसं ते पुर्ण गाणंच त्रास देतं.
अचानक ‘कहीये तो‘ गुणगुणलं गेलं तेव्हा लक्षात आलं व म्हटलं कोणी शोधायला गेलं तर त्याला सापडणार नाही व गोंधळात पाडु नये म्हणुन दुरुस्त करावं. Proud

छान धागा.

सध्या रविवार म.टा.पुरवणीत महिन्यातून दोनवेळा सुहास किर्लोस्कर 'साथसंगत' नावाचं सदर लिहितात; ते याच धाटणीचं आहे. त्यात एकेका वाद्यावर फोकस असतो. कोणत्या हिंदी/मराठी गाण्यांमध्ये त्या वाद्यांचा कसा उपयोग करून घेतला आहे, त्यचे वादक कोण आहेत, अशी इंटरेस्टिंग माहिती असते. मला ते वाचायला खूप आवडतं.

किल्ली, मोह मोह के धागे खूपच सुंदर आहे. मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की त्याचं संगीत अन्नू मलिकचं आहे त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. कोण होतास तू काय झालास तू चा उलटा इफेक्ट म्हणता येईल!

त्यात यमन आणि 'पूर्वी' राग वाटतो मला पूरीया धनाश्रीपेक्षा. स्वर सारखेच आहेत दोन्ही रागांत, पण बादलोंमें से गुजरे वर जी सुंदर जागा आहे (नी प, सां नी ध् प प .... मा ग मा ग) ती अगदी पूर्वी वाटते. त्यात ती मिंड खूपच छान आहे. पुढे कडव्याची पहिली ओळ - तू होगा जरा पागल - इथे एकेका अक्षरात एकेक स्वर पटापट चढत जाऊन खालच्या सा पासून पागल मधल्या पा वर वरचा सा लागतो आणि तिथे त्या स्वरांच्या बढतीचा वेग मंदावतो. वरच्या सा वर मस्त ठेहराव घेऊन तो हळूहळू पायऱ्या उतरत पुन्हा खाली येतो. ही करामत त्याला अफलातून जमली आहे!

किल्ली, मोह मोह के धागे खूपच सुंदर आहे. मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की त्याचं संगीत अन्नू मलिकचं आहे त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो >> मोह मोह के अनु मलिक चे आहे ? बाप्रे...मला आत्ता च कळतय हे... इतका कसं काय भारी केलंय...की कुणा बिचार्‍या गरीब गरजु संगीतकाराचं गाणं स्वतः च्या नावावर खपवतो आहे.... ?

पुढे कडव्याची पहिली ओळ - तू होगा जरा पागल - इथे एकेका अक्षरात एकेक स्वर पटापट चढत जाऊन खालच्या सा पासून पागल मधल्या पा वर वरचा सा लागतो आणि तिथे त्या स्वरांच्या बढतीचा वेग मंदावतो. वरच्या सा वर मस्त ठेहराव घेऊन तो हळूहळू पायऱ्या उतरत पुन्हा खाली येतो. ही करामत त्याला अफलातून जमली आहे+१०००००१११११
खूपच छान आहे ती जागा
माझं अत्यंत आवडतं गाणं

हरचंद पालव, फार सुरेख लिहिताय तुम्ही. तुम्ही शास्त्रीय संगीताचे जाणकार आहात. मस्त माहिती मिळत आहे तुमच्याकडून.

मला मोह मोह के धागे यमन + पूरिया धनाश्री असावं वाटत आलंय. मला अर्थातच हे ऐकून ऐकून जे समजतं ते आहे. शास्त्रीय शिक्षण नाही, त्यामुळे नक्की माहिती नाही.

निगाहें मिलाने को जी चाहता है - यमन
लागा चुनरी में दाग - भैरवी

हे दोन लगेच आठवले.

धन्यवाद मामी. मला आवड आहे इतकंच. त्यामुळे आणखीही लिहीत जाईन सुचेल तसं.

किल्ली आणि प्रज्ञा, कदाचित मी चुकत असेन. तो पूरीया धनाश्रीच असू शकेल. चित्रपट संगीतात किंवा भावगीतात राग हा बेस म्हणून आला तरी अगदी काटेकोरपणे पाळला जात नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात कुठला जास्त जुळतो ते पाहणं योग्य ठरेल. पूर्वी मध्ये जो थोडासा शुद्ध म लागतो, तो बादलो मे से गुजरे मध्ये सापडला नाही, त्यामुळे पूर्वी ठामपणे म्हणता येणार नाही.

दयाघना का राहिले दूर घर माझे - ह्यात मात्र अगदी व्यवस्थित पूर्वी आहे. वरती सनईबद्दल चर्चा झाली. ह्या गाण्यातही सनई (की सुंदरी नावाचं वाद्य?) आहे, पण ती दुःखद भाव निर्माण करते. हे वाद्य इथे दुःख, हम्मा हम्मा गाण्यात शृंगार, ये जो देस है मेरा मध्ये देशभक्ती - अशी व्हरायटी देऊन जातं. लहानपणापासून लग्नकार्यात सनई ऐकायची सवय झाली असली, तरी दयाघनाच्या सुरुवातीचं संगीत ऐकताना अजिबात लग्नकार्य डोळ्यासमोर उभं राहत नाही. कमाल आहे!

पुरीया धनाशरी वाटत आहे

यमन कल्याणमध्ये रे ,ध कोमल करून एखादी लाईन तशी घेतात

उदा
सलाम ए इष्क मेरी जान
सून लो तुम चिलमन
ब्रेथलेस शंकर महादेवन

ये मोह के धागे
असे शब्द होते म्हणे

अनुने मोह मोह केले की कविकडून करवून घेतले असा काहीतरी किस्सा आहे.
https://youtu.be/z0hu5rV3FC4

जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पुरिया धनश्री चा आणखी एक उत्कृष्ट नमुना
काय आर्तता आहे
शब्द, गायन आणि चाल सर्व आघाड्यावर जमून आलेलं गाणं आहे.

Pages