"नॉस्टॅल्जिया"- भूतकाळाच्या आठवणीत रमणारा!

Submitted by चंद्रमा on 19 July, 2021 - 13:39

"यू तो हर शाम
उम्मीदों में गुजर जाती थी!
पर आज शाम में कुछ बात है;
जो शाम पे रोना आया!!"

.......... एका संध्याकाळी हा शेर आठवला आणि काळजात चर्र.....झालं! भूतकाळात मन सिंहावलोकन करू लागलं! गतकाळाच्या आठवणी एका चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून सरकू लागल्या. आठवलं ते माझं बालपण! जेव्हा मी आईचं बोट पकडून पहिलं पाऊल टाकलं होतं, नंतर दुडूदुडू धावत आईच्या कुशीत विसावलो होतो! बाबांचं मला अलगद उचलून उंच आकाशात झेपावताना माझ्या कोमल गालावरचा आनंद ओसंडून वाहायचा! ते खळाळतं निरागस हास्य आजही मी अनुभवतो. शाळेला जाण्याचा पहिला दिवस आणि शाळेच्या भयाने पोटात दाटून आलेला भीतीचा गोळा आजही अंगावर शहारे आणतो. शाळेमध्ये दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेला तो 'टिफिन बॉक्स' आजही मी जपून ठेवलेला आहे. बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर भुशीसोबत घेतलेला पहिला सिगरेटचा झुरका आणि बारावीच्या फेअरवेल पार्टी मध्ये घशात घेतलेला पहिला घोट बिअरचा! सगळं काही अंगावर रोमांच आणणारं होतं!

....... मनामध्ये प्रेमाची स्फुल्लिंगं फुटल्यानंतर थरथरत्या हातांनी तिला दिलेले पहिले प्रेमपत्र, इंजिनिअरिंगला असताना फ्लुईड मेकॅनिक्सच्या 'वायवा' च्या वेळेस झालेली फजिती आणि मुलाखतीच्या वेळेस उडालेला माझा गोंधळ! हे सर्व काही आठवलं की खुदकन हसू येतं होठांवर! खरंच सोनेरी होत्या त्या आठवणी आणि सोनेरी होते ते क्षण पण आता उरली आहे त्या क्षणांची फक्त आठवण! किती झपाट्यानं घटनांची विविधरंगी फुलं काळाच्या अखंड धाग्यात गुंफीत नियती जीवनाची पुष्पमाला तयार करीत असते.
..... खरंच भूतकाळात जाण्यासाठी काळाचं एखादं रीवाईंडचं बटन असतं तर मला त्या आठवणींमध्ये जगायला खूप आवडलं असतं! खरच घडेल का असं प्रत्यक्षात! समजा असं घडलं तर मला आवर्जून काही घटनांमध्ये बदल करावासा वाटतो. 1960 मध्ये 'रोम' येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये धावक "मिल्खा सिंग" चौथ्या क्रमांकावर आले होते. केवळ एका सेकंदाच्या फरकाने त्यांचं कास्यपदक पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. तो 'एक सेकंद' मला भरून काढायचा आहे त्यांच्यासाठी! कारण 400 मीटर रनिंग मध्ये ते भारताचं पहिलंवहिलं 'ऑलिम्पिक मेडल' असेल.
दुसरी घटना 2002 च्या झालेल्या अॅकेडमी अवॉर्ड्समध्ये आमीर खानच्या लगानला 'ऑस्कर' मिळवून द्यायचा माझा प्रयत्न आहे कारण आजतागायत कोणत्याही भारतीय पठडीच्या चित्रपटाला ऑस्कर मिळालेला नाही. आमिरचा 'लगान' बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये पोहोचला होता पण फिल्मच्या लेंग्थमुळे त्यांना पुरस्कार मिळाला नाही तर ज्यूरींच्या निर्णयांमध्ये बदल करून लगानला ऑस्कर विनर म्हणून विजयी घोषित करायचे आहे.
आणि तिसरी आणि माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची घटना! 2019 च्या 'क्रिकेट वर्ल्ड कप' मध्ये 'न्युझीलँड' कडून सेमी फायनल मध्ये झालेला भारताचा पराभव पुसून टाकायचा आहे. फर्गुसन लोकीच्या बॉलवर दुसरी धाव घेताना मार्टीन गुप्टीलच्या थ्रोवर धावबाद झालेल्या धोनीला सुखरुप स्ट्राईकवर पोहोचवायचे आहे. हा बदल झाला तर वर्ल्डकपची हॅट्रीक करण्याची संधी आपल्याजवळ असेल. खरंच असं घडलं तर आपण ऐतिहासिक घटनांचे मानकरी होऊ! या मनाच्या अंतरंगामध्ये किती अद्भुत आणि अशक्यप्राय कल्पना रुप घेत असतात. हाच तो नॉस्टॅल्जिया कधीकधी डोकावत असतो माझ्या सुप्तमनात!
........ बुद्ध सांगतात वर्तमानात जगा!
भुतकाळाची आणि भविष्याची चिंता करू नका. प्रतिथयश लेखिका 'ऱ्होंडा बर्न' आपल्या "द सिक्रेट" या पुस्तकात म्हणते आपण जसे विचार कराल तसे आपण बनाल! विचार आपलं जग बदलू शकते! तर "जोसेफ मर्फी" आपल्या अचेतन मनाच्या शक्तीत मनाला सुपरपावर बनण्याचे सूत्र सांगतो पण तरीही मन का ह्या नॉस्टॅल्जिया ची धाव घेते?
....... जगाच्या शर्यतीत भाग घेऊन करायचे काय आहे! हेच जर जीवन असेल तर मरण काय आहे? पहिल्या पावसात ट्रेन लेट होण्याची काळजी वाटते. भिजले असतांना चालणे काय विसरले आहे. मालिकांमधील पात्रांची संपूर्ण स्थिती माहित आहे पण आईकडे चौकशी करण्यासाठी कोणाकडे वेळ आहे. आता वाळूवर अनवाणी चालत का नाही, 108 आहे चैनल पण थांग मनाचा लागत का नाही? मोबाईल, ब्राॅड ब्रँड सगळ्यांनी परिपूर्ण आहे पण जवळच्या मित्राला जोडता येईल अशा तारा कुठे आहे? जगाच्या संपर्कात तर आहात परंतु शेजारी कोण राहतो हे देखील माहित नाही! लक्षात आहे कधी उगवता सूर्य बघितला होता? केव्हा जाणवले संध्याकाळचे मावळणे काय आहे? तर मित्रांनो जगाच्या शर्यतीत भर घालून काय करायचे आहे, हेच जर जीवन असेल तर मरण काय आहे?

.......... नॉस्टॅल्जिया हा असाच गतकाळातील स्मृतींचा लपंडाव खेळत असतो. 'गती' आणि 'स्मृती' यांचं काहीतरी गूढ नातं असावं नाहीतर गतिमान वाहनात स्मृतींची एवढी गर्दी का व्हावी? कधी-कधी हा उदास मनाचाही वेध घेतो मग कुठेतरी काळजाला चटका लावून जातो. मनाच्या पटांगणावर आकांक्षाचे सजविलेले रथ घेऊन सहस्त्र वर्षे मानव या स्पर्धेत भाग घेत आलेला आहे पण काळाच्या निष्पक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषित केलेलं नाही........................

(प्रिय मायबोलीकरांनो आपल्याला कोणता नॉस्टॅल्जिया आठवतो आणि भूतकाळात जाऊन आपण काय बदल करू इच्छिता ते जरूर नमूद करावे ही नम्र विनंती)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका संध्याकाळी हा शेर आठवला आणि काळजात चर्र.....झालं! भूतकाळात मन सिंहावलोकन करू लागलं! गतकाळाच्या आठवणी एका चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून सरकू लागल्या. आठवलं ते माझं बालपण! जेव्हा मी आईचं बोट पकडून पहिलं पाऊल टाकलं होतं, नंतर दुडूदुडू धावत आईच्या कुशीत विसावलो होतो! बाबांचं मला अलगद उचलून उंच आकाशात झेपावताना माझ्या कोमल गालावरचा आनंद ओसंडून वाहायचा! ते खळाळतं निरागस हास्य आजही मी अनुभवतो. शाळेला जाण्याचा पहिला दिवस आणि शाळेच्या भयाने पोटात दाटून आलेला भीतीचा गोळा आजही अंगावर शहारे आणतो. शाळेमध्ये दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेला तो 'टिफिन बॉक्स' आजही मी जपून ठेवलेला आहे. बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर भुशीसोबत घेतलेला पहिला सिगरेटचा झुरका आणि बारावीच्या फेअरवेल पार्टी मध्ये घशात घेतलेला पहिला घोट बिअरचा! सगळं काही अंगावर रोमांच आणणारं होतं!

....... मनामध्ये प्रेमाची स्फुल्लिंगं फुटल्यानंतर थरथरत्या हातांनी तिला दिलेले पहिले प्रेमपत्र, इंजिनिअरिंगला असताना फ्लुईड मेकॅनिक्सच्या 'वायवा' च्या वेळेस झालेली फजिती आणि मुलाखतीच्या वेळेस उडालेला माझा गोंधळ! हे सर्व काही आठवलं की खुदकन हसू येतं होठांवर! खरंच सोनेरी होत्या त्या आठवणी आणि सोनेरी होते ते क्षण पण आता उरली आहे त्या क्षणांची फक्त आठवण! किती झपाट्यानं घटनांची विविधरंगी फुलं काळाच्या अखंड धाग्यात गुंफीत नियती जीवनाची पुष्पमाला तयार करीत असते.>> नानू सरंजामे ह्यांचे आत्म चरित्र तंतोतंत

आठवलं ते माझं बालपण! जेव्हा मी आईचं बोट पकडून पहिलं पाऊल टाकलं होतं, >>
Really! इतक्या लहानपणीचं आठवतं तुम्हाला?

चंद्रमा, तुम्ही गुरुवर्य स. त. कुडकेडकरांचे विद्यार्थी ना ?
सिगारेट चे झुरके आणि बियर चे घोट ??
काळाचा महिमा. दुसरं काय ..

हो तिच्या हातात एक चुरमुरा माझ्या हातात दोन चुरमुरा. किती गोड हसायची ती. पन तिच्या भावाची चप्पल लैच जोरात लागली. नर्स चंद्राबाईच्या हसण्यातून चांदणे सांडते.

उमर वाडीचा उमाजी.

थर्मास.....अरें वा अमेरिकन दिसतोय.
रक्त.......तुमचा ऑर्डरली पान खाउन पचापचा थुंकलाय.
आमाला पावर नाय !!!!

जियाला नाष्टा आणायला कसं सांगाल ????????? नाश्टा-ला-जिया

सगळ्यांना मिल्खा सिंग चे हुकलेले पदक आठवते पण आपल्या कराडच्या पै. खाशाबा जाधवांनी मिळवलेले पदक आठवत नाही? ??

या मनाच्या अंतरंगामध्ये किती अद्भुत आणि अशक्यप्राय कल्पना रुप घेत असतात. हाच तो नॉस्टॅल्जिया कधीकधी डोकावत असतो माझ्या सुप्तमनात! >>
इथे थोडी गल्ली चुकलात काका ..

पहिल्या पावसात ट्रेन लेट होण्याची काळजी वाटते. भिजले असतांना चालणे काय विसरले आहे. मालिकांमधील पात्रांची संपूर्ण स्थिती माहित आहे पण आईकडे चौकशी करण्यासाठी कोणाकडे वेळ आहे>> वाह..

अमा आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. नानू सरंजामे हे एक विशेष व्यक्तिचित्रण आहे पण माझी काही पात्रता नाही त्यांची बरोबरी करण्याची!
पण माझ्या लिखाणामुळे ते आपल्याला आठवतात याहून विशेष काय!

वीरु आपलं म्हणणं बरोबर आहे पण आईसोबत केलेल्या संवादातून त्या गोष्टीचा उल्लेख मी अनेकदा ऐकला आहे म्हणूनच ती आठवण तिथे अधोरेखित केली आहे.
आपला प्रतिसाद अचूक असतो‌.धन्यवाद!

चिन्मयजी थोडाफार सुधारणेला वाव आहे.नाॅस्टॅलजिया डोकावत असतो म्हणजे कधी-कधी मन भूतकाळाची ओढ घेतं! ज्या आपण बदलू शकत नाही त्याच त्या अशक्यप्राय घटना! कल्पनेच्या पल्ह्याड!
धन्यवाद आपल्या प्रतिसादासा बद्दल!

आपण पै.श्री खाशाबा जाधवांची आठवण करुन दिली त्याबद्दल धनवन्ती आपले आभार! मी फक्त काही घटनांचे दाखले दिले आहेत‌.आलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्यांचे आपण ऋणी आहोत.

सगळ्यांना मिल्खा सिंग चे हुकलेले पदक आठवते पण आपल्या कराडच्या पै. खाशाबा जाधवांनी मिळवलेले पदक आठवत नाही? ?
>>> मला हे माहीत नव्हते.. गूगल केले आणि समजले.. लवकरात लवकर त्यांच्यावर एखादा चित्रपट बनला पाहिजे...म्हणजे सर्वांना समजेल... सलमान छान करेल हा रोल..

खाशाबा जाधव फोटो पाहिलेले नाहीत.
पण समहाऊ नटरंग मधला पहिला पहिलवान गडी अतुल कुलकर्णी डोळ्यासमोर येतो लुक्स म्हणून.

लेख वाचला.अलंकारिक आहे.