मेथी केळं शेव भाजी - बाय संजीव कपूर

Submitted by स्वप्ना_राज on 19 July, 2021 - 12:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ जुडी मेथी (चिरून, पण अगदी बारीक नाही), २ पिकलेली केळी (गोल चकत्या करून घ्या आणि फोर्कने थोडं मॅश करा), पाव कप शेव (मोरी शेव म्हणतात ते. भेळीत घालतात तसले बारीक नाहीत), २ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हिंग, दीड टीस्पून मोहरी, १ टेबलस्पून जिरे, पाव टीस्पून मेथीदाणे, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून जिरेपूड, १ टीस्पून धणेपूड, १ टेबलस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, मीठ स्वादानुसार

क्रमवार पाककृती: 

'रताळी मिळाली का कविताताई?'
'चांगली नव्हती ताई. म्हणून आणली नाहीत. हिरवी भाजी देऊ का? मेथी घ्या, चांगली आहे बघा' माझा खट्टू झालेला चेहेरा पाहून कविताताई म्हणाल्या.
'नको. नुसती केली तर कडूजार लागते आणि बेसन घालून केली तर ढवळून ढवळून हात दुखतो आणि तरी भांड्याला लागते' मी नाक मुरडलं.

पण २-३ दिवसच झाले आणि मी आपणहून मेथीची भाजी घेऊन गेले कविताताईकडून. कारण फूड फूड चॅनेल वरच्या 'हाऊ टू कुक' शो मध्ये संजीव कपूरने दाखवलेली मेथी केळं शेव भाजी करून पहायची होती. खरं तर मला फार काही आशा नव्हती पण गाजराची पुंगी....

मागच्या रविवारी केली. चांगली झाली होती. नेहमी त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन आपण वैतागतो. त्यात काहीतरी नवीन म्हणून रेसिपी देते आहे.

सगळ्यात आधी नेहेमीप्रमाणे पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी, जिरं, मेथीदाणे, हळद, धणेपूड, जिरेपूड घाला. थोडं पाणी घाला. मिक्स करा.
आलं-हिरवी मिरची पेस्ट घाला. मेथी घालून मिक्स करा. २-३ मिनिटं परता.
पाऊण कप पाणी घाला. मीठ, केळ्याचे काप घाला. मिक्स करा. २-३ मिनिटं शिजवा.
वरून थोडे शेव घाला. मिक्स करा.
जेवायच्या वेळी वाढताना उरलेले शेव घालून मिक्स करून सर्व्ह करा.

फोटू - काढेन काढेन म्हणताना राहून गेलं तेव्हा फोटू इल्ले.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर, फूड फूड चॅनेल, हाऊ टू कुक शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग, काय भयानक कॉम्बिनेशन आहे. हे मोठमोठे शेफस कधी कधी काहीही प्रयोग करतात. मला मेथीची भाजी अतिशय आवडते. सगळे प्रकार ( डाळ घालुन, पिठ लावुन, आलू मेथी, ताकातली पातळ भाजी, मेथी मटार मलई इ इ) मी अत्यन्त आवडीने खाते, पण केळं-मेथी अशक्य.

कधी तरी अनेक वर्षांपूर्वी TV वर एक रेसिपी पहिली होती. कलिंगडाच्या मोठं मोठया फोडी, त्यावर हा मसाला तो मसाला, मग उसाचा रस आणि शेवटी सगळं ग्रील केलं होतं, तेव्हाच ठरवलं आपण फक्त जगण्यापुरतं कुकिंग शिकायचं. शेफच नाव आठवत नाही, नाही तर रेसिपी परत पाहिली असती. नो नो, रेसिपीसाठी नाही, शेफ हँडसम होता.

एकदा बनलेली रेसिपी खाऊन पाहिली पाहिजे.मग कळेल कसं लागतं ते.
मी घरी हल्ली मुलीने बनवलेली वर किसलेले चीज,चॉकलेट आणि मारी बिस्कीट घातलेली काकडी कोशिंबीर पण खाते Happy

अनुची पोस्ट वाचून वाटतंय:
जेवणात काय काय खातो, थोडा वरण भात, भजी, भाजी, चिकन, आमरस, शेवटी थोडा दहीभात.
पुढे हे सगळं मिक्स करून खायचं फॅड येईल का?

सगळं मिक्स करून एक आगळ्या वेगळ्या चवीचा मुटकुळा बनेल Happy
तो चालू फॅशन प्रमाणे आप्पे पात्रात तळून सॉस बरोबर लोकांना वाढायचा.

आणि सोबतीला थंडगार ताकात चमचाभर कॉफी टाकून त्यावर तुपात जिर्‍याची फोडणी घालून ढवळून प्यायचं फॅड पण येईल

>> काय भयानक कॉम्बिनेशन आहे. हे मोठमोठे शेफस कधी कधी काहीही प्रयोग करतात. >> अगदी. मलाही शिर्षक वाचून ‘क्क्क्क्क्क्क्क्कय??’ असं वाटलं. केळं वगळूनही करता येईलच.
संजीच कपूरच्या इथल्या रेस्टॉ. ला एकदा खाल्लं आहे. नाव मोठं लक्षण खोटं प्रकार आहे. फिरनीच्या नावाखाली रव्याचं काहितरी अगम्य प्रकरण समोर आलं होतं.

केळ्याचे प्रकार आवडत नाहीत त्यामुळे माझा पास .
माझी एक कच्छी कलिग आणायची आणि आणखी दोघीजणी आवडीने खायच्या , चांगली लागत असावी.

स्वप्ना रेसिपी टाकत जा , आवड आपली आपली.

मी एकदा पिकल्या केळ्याची कोशिंबीर लिहिली होती

सगळे क्रूरसिंग यक्क यक्क करत होते

मला सापडेना ती लिंक
कुणी शोधेल का ?

https://www.maayboli.com/node/23421?page=1 इथे सापडली नाही. पण तुम्ही कोणत्या आय डीने लिहीली होती त्यावर ते अवलंबुन आहे.

जनरली केळ्याच्या चकत्या करुन त्यात दही, मीठ साखर घातले की झाली कोशिंबीर. त्यात तुम्हाला नावे ठेवण्यासारखे काय होते?

मेथी + केळी हे कॉम्बिनेशन कुठे तरी वाचल्या / ऐकल्यासारखे वाटत होते. असो, स्वप्ना, पाकृ लिहीत रहा. ज्याला आवडेल किंवा रस वाटेल तो नक्कीच करुन बघेल.

मी मेथीच्या थेपल्यामध्ये एक पिकलेले केळे कुस्करून घालते.. कडवटपणा कमी होतो..आणि केळ्याचा छान फ्लेवर येतो..

हं

मी फोडणी करून त्यात पिकल्या केळ्याचे मोठे तुकडे गरम करून घेतले होते , भाजीप्रमाणे

आणि मग नंतर त्यात दही , साखर , तिखट मीठ घातले होते.
मला लिंक शोधून द्या , मला खूप आठवण येत आहे त्याची

'don't yuck someone else's yum'
असं म्हणतात
कदाचित आपली taste वेगळी develop झालेली असते किंवा प्रयोगाला सरावलेली नसते Happy
स्वप्ना तू लिहित राहा पाकृ Happy

धागा जोरात.
बाकी 'केळा रायता' म्हणजे हिरवी मिरची दह्यात घुसळून त्यात केळ्याचे काप टाकणे. अप्रतिम चव असते.

सगळे केळ रायत्याची अन् केळ मेथीची इतकी तारीफ करत आहेत तर एकदा चोरुन माझ्यापुरतं करून बघावं असं वाटू लागलंय.

कॉम्बिनेशन ऐकून जरा कानावर हात ठेवून नहीं किंचाळावं वाटलं.
<<
किंचाळून घ्या. तेवढंच बक्रीदच्या निमित्ताने नमाज पढल्यासारखं पुण्य जमा होईल कुठल्यातरी "आका उंट" ला.

आरारा, काय झालं?
कॉम्बिनेशन कसं लागेल या कल्पनेने किंचाळावं वाटलं.पण त्याचबरोबर हे चांगलं बनतही असेल, रेडिमेड खाऊन पाहिलं पाहिजे इतकंच म्हणतेय.
ईद ला पुण्य जमेल असा कोणताही ड्युप्लिकेट आयडी नाहीये त्यामुळे जोक कळलाच नाही.

Pages