नकोसा पांढरा हत्ती (कथा परिचय : ५)

Submitted by कुमार१ on 14 July, 2021 - 22:56

विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :

१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी

३. कुणास सांगू ? (https://www.maayboli.com/node/79335)
४. ‘भेट’ तिची त्याची (https://www.maayboli.com/node/79468)
...............................................................................

विदेशी कथा परिचयमालेच्या पाचव्या भागात सर्व वाचकांचे स्वागत !

या भागासाठी जे अमेरिकी लेखक निवडले आहेत ते जागतिक कीर्तीचे आहेत. त्यांच्या हयातीत ते लेखक, पत्रकार, खेळाडू, शिकारी आणि योद्धा म्हणून खूप गाजले होते. आता त्यांच्या मृत्यूला ६० वर्ष उलटलीत तरीही त्यांचा अमेरीकी जनमानसावरील पगडा अजून कायम आहे. तिकडे ‘पापा’ या लाडक्या नावाने त्यांचा उत्सवी उल्लेख सतत होत असतो. आता तुमची उत्सुकता अधिक ताणत नाही.......

हे लेखक महोदय म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे !

विसाव्या शतकातील एक थोर साहित्यिक. त्यांनी मुख्यत्वे कादंबरी आणि कथालेखन केलेले आहे. ते साहित्यातील नोबेलविजेतेही आहेत. त्यांच्या लेखनाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षरत्व. त्यांनी स्वतः या गुणाला ‘आईसबर्ग थिअरी’ असे म्हटले होते. त्यांच्या कथांमध्ये व्यक्ती व प्रसंगांचे वर्णन मोजकेच असते. काही गोष्टी सूचक असतात. लेखनाचा गर्भितार्थ काढायचे काम ते वाचकांवर सोपवून देतात. त्यांची एक कथा तर अवघ्या सहा शब्दांची आहे आणि ती हृदयस्पर्शी व बहुचर्चित आहे. समकालीन लेखकांत त्यांनी स्वतःची स्वतंत्र पिळाची लेखनशैली निर्माण केली. अनेक साहित्यप्रेमींनी हेमिन्ग्वेंच्या लेखनाचा अभ्यास केलेला आहे. काहींच्या मते निरागसता हा त्या लेखनाचा आत्मा आहे तर अन्य काहींच्या मते गुंतागुंत हेच त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे.

त्यांची अनेक मार्मिक वाक्ये साहित्यजगतात प्रसिद्ध आहेत. ती आपल्याला स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट रोवून आत्मपरीक्षण करायला लावतात. त्यापैकी एक वाक्य माझे खूप आवडते आहे. स्वतःसंबंधी एका संपादकांना लिहीताना हेमिंग्वे म्हणाले होते,

मला जे काही यश लेखक म्हणून मिळालं, त्याचं कारण म्हणजे मला नीट माहीत असलेल्या विषयांबद्दलच मी लिहिलं”.
हे वाक्य माझ्यासाठी नेहमी मार्गदर्शक ठरले आहे.

एकेकाळी इंग्लिश साहित्यात, “शेक्सपियरच्या मृत्यूनंतरचा सर्वश्रेष्ठ लेखक”, असे कौतुक त्यांच्या वाट्याला आले होते. अशा या अभिजात लेखकाने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हातानेच संपवले. त्यांच्या मृत्यूचा दुखवटा अमेरिका, रशिया आणि व्हॅटिकन सिटी या तिन्ही परस्परविरोधी सत्ताकेंद्रांनी जाहीर केला होता. ही घटना देखील अभूतपूर्व म्हणावी लागेल.
आता त्यांच्या प्रस्तुत कथेबद्दल.
कथेचे नाव आहे ‘Hills Like White Elephants’

कथा घडते स्पेनमधील एका रेल्वे स्थानकात. बार्सिलोनाहून येणारी (व माद्रिदला जाणारी) ट्रेन तिथे 40 मिनिटात यायची अपेक्षा आहे. तिची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये एक अमेरिकी पुरुष व एक स्त्री यांचा समावेश आहे. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारताहेत व एकीकडे बियर पीताहेत. स्थानकाच्या सभोवताली टेकड्या आहेत. त्या सूर्यप्रकाशात लख्ख शुभ्र दिसताहेत. त्यांच्याकडे पहात ती तरुणी त्याला म्हणते,

“त्या टेकड्या अगदी पांढऱ्या हत्तीप्रमाणे दिसत आहेत, नाही का”.
त्यावर तो म्हणतो की त्याने पांढरा हत्ती काही अजून पाहिलेला नाही. त्यावर ती म्हणते,
“बरोबर, तू तो पाहिलेला नसणारच !”

नंतर त्यांच्या काही किरकोळ गप्पा होतात. एकदम तो म्हणतो,
“अगं, ती अगदी साधी सोपी शस्त्रक्रिया असते बघ. खरं तर तिला शस्त्रक्रिया सुद्धा म्हणता येणार नाही. तुला काही त्रास होणार नाही त्याने. त्यात मी तुझ्या सोबत असेनच ना. दहा मिनिटात ते तुला ‘मोकळी’ करतील. त्यावर ती म्हणते,
“पण मग त्यानंतर पुढे आपले काय ?”.
तो म्हणतो, “अगं नंतर आपण एकदम आनंदी असू, अगदी पूर्वीप्रमाणेच !” ह्या कटकटीमुळेच तर आपण त्रस्त आहोत. त्यातून एकदा मोकळे झालो, की सुटलो”.

पण ती मनातून धास्तावलेली आहे त्या शस्त्रक्रियेबाबत ती साशंक आहे. तो तिला खूप पटवतो,
“अनेक जण असे करून घेत असतात. त्यात काय एवढे. पण तरी तुला जर तसे करून घ्यायचं नसेल तर माझा आग्रह नाही बघ. पण करून टाकणे उत्तमच. ठरव तू आता.”

अजून तिची उलघाल चालूच आहे. पुन्हा त्या दोघांचा ‘हो की नको’ यावर काथ्याकूट होतो. एका बिंदूवर ती त्याला त्याची वटवट थांबवायला सांगते. दरम्यान त्यांची बिअर संपल्यावर ते Absinthe नावाचे एक कामोत्तेजक मद्यपेयही चवीने पितात.

तेवढ्यात तिथल्या बियर काउंटरवरची बाई त्यांना येऊन सांगते की त्यांची ट्रेन आता पाच मिनिटात येईल. मग तो त्या दोघांच्या ट्रंका उचलून प्लॅटफॉर्मवर नीट ठेवतो.
पुन्हा तिच्याजवळ येऊन तिला विचारतो, “काय गं, बरं वाटतंय का तुला आता ?”
त्यावर ती प्रफुल्लित चेहऱ्याने व आत्मविश्वासाने म्हणते, “हो अगदी ! मला काहीही झालेलं नाहीये. मी अगदी छान आहे बघ !”
..
बस. कथा इथेच संपते.

कथेतील अनुल्लेखित पण सूचित गोष्टी
१. त्या दोघांमध्ये तो अमेरिकी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे पण ती कुठली याचा उल्लेख नाही; फक्त the girl एवढाच.
२. त्यांच्या संदर्भातली शस्त्रक्रिया नक्की कुठली ? हे थेट लिहायचे टाळले आहे पण ती गर्भपात असणार हे चाणाक्ष वाचक ताडतातच.
३. त्या दोघांचे एकमेकांची नाते काय असावे ? विवाहबाह्य संबंध असावा.
४. कथेच्या शेवटी तिचा नक्की निर्णय काय झाला हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिलेले दिसते.

विवेचन
ही कथा 1927 मधली आहे. तत्कालीन वातावरणानुसार त्यातील घटनांचे विश्लेषण करावे लागेल. इथे मुख्य मुद्दा हा गर्भपात आहे आणि त्या काळी ते कृत्य अनैतिक समजले जाई आणि बऱ्याच देशांत बेकायदेशीर होते. आता विविध अभ्यासकांच्या मतांचा आढावा घेऊ.

१. कथा स्पेनमध्ये घडताना दाखवण्यामागे सूक्ष्म कारण आहे. ‘तो’ त्याच्या देशाबाहेर असल्याने गर्भपातासारखा नाजूक व निषिद्ध विषय इथे बंधमुक्त वातावरणात मोकळेपणाने बोलू शकतो.
२. तिने गर्भ ठेवायचा की पाडायचा याचा नक्की निर्णय काय घेतला असेल ? तिच्या प्रफुल्लित चेहऱ्यामुळे, ठेवायचा निर्णय घेणे तर्कसंगत वाटते. पण याउलटही निर्णय असू शकतो आणि त्यामुळे तिला कदाचित हायसे वाटले असावे.

३. तिचा निर्णय काय व पुढे त्यांचे काय ठरले असावे, याबाबत चार शक्यता संभवतात :

a. ते गर्भपात करवतील आणि एकमेकांचा कायमचा निरोप घेतील.
b. ते गर्भपात करवतील आणि पुढे पहिल्यासारखेच मैत्रीपूर्ण संबंध ठेवतील
c. ती मुलाला जन्म देईल आणि या पुरुषापासून फारकत घेईल.
d. मुलाला जन्म द्यायचा निर्णय ते संयुक्तपणे घेतील आणि एकत्र नांदतील.

म्हणजेच, कथेतील माहिती जाणीवपूर्वक अपुरी ठेवून वाचकांना कल्पना ताणायला भरपूर वाव ठेवलेला आहे.
कथेतील प्रतीके
१. कथेत सुरुवातीस डोंगरांमधील दरीचा उल्लेख आहे. दरीच्या दोन बाजू म्हणजे जीवनशैलीचे दोन भिन्न प्रकार - मस्त बेधुंद आयुष्य आणि जबाबदार गृहस्थाश्रम.

२. आता कामोत्तेजक पेयाबद्दल. वरवर पाहता ‘स्पिरिट’ प्रकारातील हे पेय त्या दोघांच्या मुक्त, बेधुंद आयुष्याचे प्रतीक आहे. तर दुसरा दृष्टिकोण सूक्ष्म आहे. मादक पेय हे सुरुवातीस भुरळ पाडणारे असते पण अंतिमतः ते नुकसानकारकच ठरते. त्यानुसार कथांतानंतर त्यांची मैत्री संपुष्टात आली असावी.

३. आता हत्ती या प्रतीकाबद्दल.
‘the elephant in the room’ हे इंग्लिश भाषेतील एक रूपक आहे. जेव्हा स्त्री-पुरुष संबंध ताणले जातात आणि गंभीर पेचप्रसंग उद्भवतो तेव्हा ते वापरले जाते. मैत्री कायमची तुटणे, घटस्फोट, गर्भपात अशा गुंतागुंतीच्या प्रसंगी त्याचा वापर लेखनात केला जातो.

elephant_in_the_room_by_pepey_dcd1vj9-pre.jpg

४. अजून एक रोचक विचार. कथेतील तिचे गरोदरपण नकोसे असल्याने त्या पुरुषाच्या दृष्टीने त्या अपत्यास जन्म देणे हे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. ती मात्र गोंधळलेली आहे. म्हणून त्याचा हा विचार तो तिच्यावर लादू पाहतोय.

५. “तू पांढरा हत्ती पाहिला नसणारच”, हे तिचे वाक्य बरेच काही बोलते. “त्याला मजा मारता येते, पण संभाव्य अपत्याची जबाबदारी घ्यायची अक्कल कुठे आहे ?” हा त्यातील ध्वनित अर्थ असावा. एकंदरीत त्या दोघातील संबंध हे प्रस्थापित नसून उथळ स्वरूपाचेच असावेत असा त्यातून अर्थ काढता येतो.

कथेचा साहित्य प्रवास
तिच्या लेखनानंतर सुरुवातीस ती बऱ्याच संपादकांनी नाकारली होती. तत्कालीन विचारसरणीनुसार ‘ही कथा नसून निव्वळ एक किस्सा आहे’, असा त्यावर शिक्का बसला होता. या कथेत लेखक पूर्णपणे अलिप्त असून त्याचा ‘आवाज’ कुठेच ऐकू येत नाही हा त्यावरील मुख्य आक्षेप होता. तसेच गर्भपात आणि तत्कालीन पाश्चात्त्य समाजावरील कॅथलिक विचारांचा पगडा हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल.

कालौघात 1990 नंतर मात्र अचानक या कथेचे भाग्य उजळले. तेव्हा प्रकाशित झालेल्या अनेक निवडक कथासंग्रहात तिचा समावेश झाला. आता तिला नव्याने लोकप्रियता लाभली. किंबहुना, वाचकांच्या या नव्या पिढीला त्यातील माहितीचा अपुरेपणाच रंजक वाटला असावा. कथेतील त्या दोघांची वये काय आहेत, ते कोण व कुठले, त्यांचे लग्न ठरले होते काय, इत्यादी पारंपरिक माहिती ( चांभारचौकशा !) दिलेली नसणेच त्यांच्या दृष्टीने रंजक ठरलेले दिसते.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही कथा स्त्रीवादी आहे की स्त्रीवादविरोधी, या वादात अडकली होती. 1990मध्ये ती खऱ्या अर्थाने ‘मोकळी’ झाली असे म्हणता येईल. लेखकाने कथा संपवल्यावर वाचकाच्या मनात पुढील कल्पनांचे इमले रचले जाणे यातच त्या कथेचे यश सामावले आहे. हेमिंग्वे यांच्या अल्पाक्षरी पण प्रभावी लेखनशैलीचा प्रत्यय त्यातून येतो.
…………………………………………..
1. मूळ कथा येथे वाचता येईल : https://faculty.weber.edu/jyoung/English%202500/Readings%20for%20English...
2. लेखातील चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर... कथा elephant in the room बद्धल नाही white elephant बद्धल आहे...
व्हाइट elephant, म्हणजे अशी गोष्ट/गिफ्ट जी हवीहवीशी वाटते पण जिचा सांभाळ करणे अवघड आहे...( ते मूल/गर्भ), आणि हे पुरुष नाही तिला स्वतःला वाटत आहे...त्यामुळे तिला टेकड्यांमधे पांढरा हत्ती दिसतो

Absinthe पिल्यानंतर तिला जाणवते की तिला हेच जीवन हवे आहे म्हणून ती म्हणते- हो अगदी ! मला काहीही झालेलं नाहीये. मी अगदी छान आहे बघ !”
अर्थात ती गर्भपात करेल...

वरील सर्वांचे आभार !

च्रप्स,
बरोबर.
elephant in the room हा त्या कथेचा एक उपभाग आहे एवढेच सांगायचे आहे.
काही अभ्यासकांचे यावरील विश्लेषण वाचले .त्यात या वाक्प्रचाराचा उहापोह केलेला आहे.
मुख्य मुद्दा व्हाइट एलिफंट हाच आहे, हे कबूल.

तुम्ही समजावून सांगितली नसती तर ही कथा बहुधा डोक्यावरून गेली असती. हेमिंग्वे म्हटलं की ओल्ड मॅन अँड दि सी ही कादंबरी आठवते. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना ती मूळ इंग्रजीतून वाचली होती. तेव्हा ती नीटशी समजली नव्हती. नंतर लगेचच पु लं नी केलेला ‘एक कोळीयाने’ हा सुंदर अनुवाद वाचला.
परिचयमाला अतिशय छान सुरू आहे. पुलेशु .

छान परिचय.
मूळ कथाही वाचायला मिळाली.
तो म्हणतो " But I don't want anybody but you. I don't want any one else. And I know it's perfectly simple." यावरून हे गर्भपाताबद्दल आहे हे अधिक दृढ होते.
आणि शेवटा बद्दल च्रप्स यांनी लिहिले तसेच मला वाटले.

लेखाचे शीर्षक अगदी समर्पक आहे व येथील सद्य घडा मोडींच्या पुढे मागे येत असल्याने जाम हसू येत होते.

रिलेशन शिप हवी आहे पण जबाबदारी नको हा खास पुरुषी खाक्या. तिची जबाब्दारी तिनेच घ्यायची आहे हे तिला शेवटी कळल्याने तिचा निर्णय होतो.

एखाद्या छोट्या कथेमुळे हेमिंग्वे ह्यांची थोरवी कमी होत नाही.

एलिफंट इन द रूम आहे पण बोलले तर आपलीच आयडी जायची Wink

>>>एखाद्या छोट्या कथेमुळे हेमिंग्वे ह्यांची थोरवी कमी होत नाही.>>>>>> +९९९

ओल्ड मॅन अँड दि सी, द सन ऑल्सो रायझेस व इतर काही अप्रतिम आहेत.

रिलेशन शिप हवी आहे पण जबाबदारी नको हा खास पुरुषी खाक्या. तिची जबाब्दारी तिनेच घ्यायची आहे हे तिला शेवटी कळल्याने तिचा निर्णय होतो.>>+१.

प्रत्येकाच्या संस्कृतीची तऱ्हा वेगळी! कथा ही दोनच पात्रांभोवती गुंफली आहे.लेखकाला या कखेतून फक्त हे दाखवून द्यायचे होते की आयुष्यात आलेल्या गुंतागुंतीच्या प्रसंगाला जीवनभर जगण्यापेक्षा त्याला काही क्षणांत मोकळे करता येते.अर्थातच याला जबाबदार दोघेही आणि त्यांचे निराकरण दोहोंच्या समजुतीनेच झाले.
आयुष्यात अनेक अटीतटीच्या प्रसंगांसोबत आपला सामना होतो पण त्याचा सामना आपण कशाप्रकारे करतो हे आपल्या मानसिक समन्वयावर अवलंबून असते.द्वंद्वाच्या जास्त खोलात न जाता त्याची उकल आपल्या तार्किक बुद्धिमत्तेने करता येते.

उत्तम कथेचं विश्लेषण आपण केलत त्याबद्दल कुमारजी आपले कौतुक!

सर्व नवीन प्रतिसादकांचे अभिप्राय व उत्साहवर्धनाबद्दल आभार !

चंद्रमा,
प्रत्येकाच्या संस्कृतीची तऱ्हा वेगळी! ... द्वंद्वाच्या जास्त खोलात न जाता त्याची उकल आपल्या तार्किक बुद्धिमत्तेने करता येते.
>>> अ ग दी !
छान प्रतिसाद .

>>>Absinthe नावाचे एक कामोत्तेजक मद्यपेयही
>>>>
काल एक हॉलीवूडचा सिनेमा बघितला त्यात या पेयाचा उल्लेख आहे.