काही अतिलघु कथा

Submitted by पराग र. लोणकर on 12 July, 2021 - 01:54

श्री. कुणाल हजेरी यांनी लिहिलेल्या 'अती सूक्ष्म कथा' या पुस्तकाच्या संकल्पनेवरून मी लेखनाचा केलेला प्रयत्न!
(अश्या प्रकारच्या लेखनाचा माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने कृपया चूक-भूल क्षमस्व!)

भेट

रिंग वाजली.

नंबर unknown!

काही क्षणात ट्रू काॅलरनं नंबर आयडेंटीफाय केला.

वीस एक वर्षांनी तिचा फोन आलेला पाहून तो थरारला. हृदयाचे ठोके वाढले.

'बोल!' तो एवढंच बोलला.

'आज ब्लू डायमंडमध्ये ५ला भेटुया?'

तो पावणे पाचलाच ब्लू डायमंडला पोचला.

टाय घातलेली अनेक मंडळी त्याच्यासारखे मासे गळाला लागावेत यासाठी स्वागताला उभी होती...

**

कारण

तासन् तास दोघे फेसबुक मेसेंजरवर गप्पा मारत बसायचे.

तो सतत पत्नीचं काैतुक सांगायचा आणि नवर्‍याचं कर्तृत्व लिहिताना तिची बोटं दुखायची नाहीत.

पण तरीही आपण हे असे का संपर्कात आहोत हे दोघांनाही कळायचं नाही!

**

समज

तो गप्प गप्प रहायचा. मुलींना तो भाव खाणारा वाटायचा.

एका तरी मुलीने आपल्याशी बोलावे यासाठी तो तेव्हा मनोमन आसुसलेला होता...

**

वडील

'मला नकोय तू खा!' वडील म्हणायचे आणि तो मिटक्या मारत संपवून टाकायचा.

आज आपली आवडती गोष्ट आपल्या मुलाला खायला देताना प्रत्येक वेळी त्याच्या समोर येतो तो चेहरा त्याच्या वडिलांचा असतो...

**

Friend

तिनं अचानक मेसेंजरवरचा संवाद बंद करुन त्याला FBवर unfriend केलं. तो काय समजायचं ते समजून गप्प राहीला.

काही महिने उलटले. त्याच्या मोबाईलवर unknown नंबरवरुन एकच रिंग वाजून फोन बंद झाला. ट्रू काॅलरनं काही सेकंदातच काॅलर आयडेंटिफाय केला.

तो काय समजायचं ते समजून गेला. पण यावेळीही तो गप्पच राहीला...

**

दारु

'दर शनिवारी घ्यायलाच पाहिजे का?' बायकोनं विचारलं तसा तो संतापला. आकांडतांडव करत दररोज पिणार्‍यांची उदाहरणं सांगू लागला. काही दिवसांचा अबोला धरला.

या अबोल्याच्या काळात केलेल्या विचारमंथनात दारुसाठी घरातल्यांवर हात उगारणार्‍या व्यसनी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही हे त्याचे तोच समजला.

आता त्यानं दारु सोडलीये...

**

रद्दी

'पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात!' एका मित्रानं सुविचार पोस्ट केला.

'आणि स्वत: रद्दी होतात!' दुसर्‍या मित्राने अकलेचे तारे तोडले.

माझ्या या दुसर्‍या मित्राला मी काही उत्तम पुस्तकं पाठवून दिली. त्याला रद्दी होण्यापासून वाचवण्यासाठी मी इतकंच करु शकत होतो...

**

सासुरवास

'तू माहेरी जाणं कमी कर! आईला ते आवडत नाही!' तो म्हणाला.

'अहो मी महिना-दोन महिन्यांत दोन दिवस जाऊन येते. नणंदबाई तर उठसूठ दर आठवड्याला इथे येतात. त्याबद्दल...' ती हळूच म्हणाली.

'तिला सासरी सासुरवास आहे.' तो संतापून म्हणाला.

मग आपण भोगतोय ते काय? असा ओठावरचा प्रश्न तिनं गिळून टाकला...

**

भूतदया

परिसरातील भटक्या कुत्र्या-मांजरांसाठी प्रमिलावहिनी आणि त्यांचं सारं कुटूंब जितकं प्रेमानं करत होतं त्यानं पूर्ण परिसरात त्यांचं नाव झालं होतं.

घरातील वृद्ध आई-वडील मात्र मायेच्या एका कटाक्षासाठी आसुसलेले होते...

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भांडखोर बायको, सतत होत असलेले layoffs, घराचे EMI, वाढणारे खर्च, वडिलांची तब्येत.... एक नव्हे हजार चिंता बळजबरीच्या स्मितहास्यामागे दडवून त्याने उत्तर दिलं, मी मजेत आहे! तू सांग ताई कशी आहेस ..

"नेहमी माझीच बरी चूक दिसते तुम्हाला.. ठेवा फोन.. मी बोलणारच नाही आता"

५ मिनिटांनी... कट..

२० मिनिटांनी... कट

१ तासाने कट. आता कसे कॉल करत आहेत.. आले वठणीवर बहुतेक.. पुढचा कॉल उचलून बोलेन आता..

अजून १ तास गेला पण फोन वाजला नाही...

२ तास गेले.. पण फोन वाजला नाही...

आठ तास झालेत.. अजूनही फोन आला नाही... आणि करतेय तर रिसिव्ह हि करत नाहीयेत.. त्यात हे अनोळखी नंबर उगाच त्रास देत आहेत..

२६२८९ तास, ३८ मिनिट गेले.. पण फोन अजूनही आलेला नाही... तिच्या हातात आता लाकडी फोन होता, ती अजूनही वाट पाहत होती.

सर्वच कथा मस्त आहेत.
मानवी स्वभावाचे कंगोरे किती कमी शब्दात पण समर्थपणे रंगविलेत.
वडील व रद्दी - आवडल्याच. सासुरवास, भूतदया आणि अन्यही फार मस्त आहेत.

छान अ.ल.क.

रद्दी चा शेवट जरा असा बदलला तर ....?

माझ्या या दुसर्‍या मित्राला मी काही उत्तम पुस्तकं पाठवून दिली. त्याला रद्दी होण्यापासून वाचवण्यासाठी मी इतकंच करु शकत होतो..

या ऐवजी

माझ्या या दुसर्‍या मित्राला मी काही उत्तम पुस्तकं पाठवून दिली. त्याला व पुस्तकांना रद्दी होण्यापासून वाचवण्यासाठी मी इतकंच करु शकत होतो...

कसा वाटला बदल?

Pages