आपापल्या आठवणी

Submitted by ध्येयवेडा on 3 July, 2021 - 02:05

"काय लहान मुलांसारखं खेळत बसता रे ? बघावं तेव्हा आपला तो कॉम्प्युटर, घरात मित्र गोळा करून बसायचे.. आणि दिवसभर गोंधळ" आई वैतागून ओरडली.
"आई, हे बघ तुला बोर वाटत असेल, पण आम्हाला मात्र एज ऑफ एम्पायर्स खेळायला मजा येते. तुमच्या वेळी काहीतरी वेगळे खेळ असतील.. तुम्ही पण ते खेळत असाल तासंतास.. आठव आठव.." मी आईला उलट प्रश्न केला .

"आमच्या वेळेस नव्हते असले खेळ. आम्ही तर सागरगोट्या खेळायचो. मी, विजाक्का आणि चित्री.. काय मजा यायची.. कधी कधी तर आमची भांडणं काय जुंपायची आमची.. पार एकमेकींच्या झिंज्या उपटायचो. मग पाच मिनटात गळ्यात गळे घालून हिंडायला सुरुवात.
तुझा मामा तर इतक्या गोट्या खेळायचा. दोन्ही खिसे भरून गोट्या असायच्या. मारामाऱ्या काय .. शिव्या काय द्यायचा... इतकी भांडणं आणायचा घरात काही विचारू नकोस.. कुठून कुठून पोरं यायची हाणामाऱ्या करायला.. बाप रे .. "

"मामा आणि मारामाऱ्या? शिव्या? ..विश्वास बसत नाही ! आजोबांना चलायचं का हे?" मी विचारलं.
"छे.. बेदम मार खायचा त्यांचा... एकदा कुठेतरी हातगाडीवर काहीतरी खाऊन आला. आणि नेमकं नानांना कळलं. 'बाहेरचं विकत घेऊन खायला पैसे कुठून आणले?' ह्याचं उत्तरच देत नव्हता.. चप्पल काढून झोडपला त्याला."
"बाप रे.. !" - मी रंगात येऊन ऐकू लागतो.
"एकदा तर आईनं चित्रीला सांडशी फेकून मारली. काय माहीत आई इतकी का चिडली होती... चीत्रीच्या कपाळावर अजूनही खूण आहे त्याची. पण आमची आजी होती तेव्हा. ती लगेच प्रेमानं जवळ घ्यायची आम्हाला.
कधी पाठीला बाम चोळून द्यायची, कधी गाणं गायची... खूप जीव लावला आमच्या आजीनं आमच्यावर" - आई आठवणीत रमून गेली होती.

"आजी आणि आजोबा इतके तापट होते? माझा तर विश्वासच नाही बसत हां आई... बरं जरा आमटी वाढतेस का वाटीत" - मी

"आमटी वरून आठवलं.. अरे तो भालू भाऊ आठवतोय का तुला? भालू मामा .. मुंबईचा.. त्याला एकदा आमच्या आजीनं आमटी वाढली... त्यानं बघितलं आणि म्हणाला अगं आजी ह्यात तर मुंग्या पडल्या आहेत....
आमची आजी म्हणाली, छे रे, ती तर मोहरी आहे मोहरी, फोडणी दिलीये आत्ताच.. चल संपव पटकन.. पानात काही टाकू नकोस." - आई

"बाप रे काय सांगतेस ? आणि मग त्यानं ती आमटी प्यायली? आई, हे जरा अती होतंय बरका.. " मी तिला तोडत म्हणालो.
माझ्या वाटीमध्ये असलेल्या आमटीकडे मी एक नजर टाकली.. त्यावर तरंगणारी मोहरी बघून माझं मन च विटलं.. मोहरीच्या जागी मला मुंग्या दिसू लागल्या !

"बरं आई, मंडईत गेलीस तर हरभरा आण मला". - मी विषय बदलला.
"अरे कालच पहिला एके ठिकाणी, काय महाग झालाय.. दहा रुपयांना एवडीशी पेंडी. ती पण कोवळ्या, पोकळ घाट्यांची...
नानांचे मित्र होते, 'सगरे' म्हणून .. ह्या संक्रांतीच्या दिवसात हा एव्हडा ढीगभर हरभऱ्याच्या पेंड्या आणून द्यायचे घरी. खावा किती खायचं तितकं.. ते झालं की काही दिवसांनी लगेच पोतंभरून भुईमुगाच्या शेंगा... खूप मोठी शेती होती त्यांची..
वारले ते मध्ये, मुलं मुंबईला असतात म्हणे. शेती विकली त्यांनी"
आईच्या कराड मधल्या एकेक जुन्या आठवणी ताज्या होऊन बाहेर पडत होत्या. तिचे हावभाव, आवाजातील व्याकुळता क्षणोक्षणी बदलत होती. मला ते ऐकायला खूप छान वाटत होतं. अश्या आठवणी मिळायला नशिबाची साथ असावी लागते म्हणा. मी स्वत:बद्दल विचार करायला सुरुवात केली.. काही केल्या कायम लक्षात राहतील अश्या गोष्टी काही मला सापडेनात! ह्याची खंत माझ्या मनाला झोंबत होती.

शाळेत असताना सुट्टी लागली की दर मे महिन्यात कराडला जाणं व्हायचं. एकदा गेलो की ३०-३५ दिवस मुक्काम.
घराच्या बाहेर अंगणात असलेल्या विस्तीर्ण मोरीवर एका दगडावर बसून मस्त अंघोळ करायची. जोरजोरात गाणी म्हणायची. दुपारी टायर फिरवत सगळ्या गल्ल्यांमधून बोंबलत हिंडायचं. पोरं गोळा करून रस्त्यावर क्रिकेट खेळायचं. संध्याकाळ झाली की कृष्णामाईच्या घाटावर जायचं. तिथल्या निसर्गाचा अपार आस्वाद घ्यायचा. रात्री मिलिंद मामाकडे पत्त्यांचा डाव रंगायचा. vcr वरती भाड्यानं कॅसेट आणून पिक्चर बघायचा. झोप आली की परत आजीच्या घरी यायचं आणि शेणानं सारवलेल्या जमिनीवर ताणून द्यायची. दिवस कसा संपायचा कळायचं नाही. समोर राहणारी सोनू, अतुल, शक्या, ओमकार, प्रवीण सगळेच आठवतात..
आजीकडे गेलो की खायचे-प्यायचे भरपूर लाड. मी आणि ताई येणार म्हटल्यावर ती आधीच डबे भरून खायला करून ठेवायची. जेवणात भाकरीच्या ऐवजी मग पोळ्या करायची. काय अप्रतिम चव असायची त्या सगळ्यालाच. आजोबा कुठूनतरी गुळाची काकवी घेऊन यायचे.

एका ट्रेकच्या निमित्तानं जवळपास आठ वर्षांनी कराडला जायची वेळ आली. कराड इतकं बादलेलं होतं की आठ नव्हे तर खूप वर्षांनी इकडे आलोय असं वाटत होतं.
अनेक बदल अपेक्षितच होते. रस्त्यांमध्ये, घरांच्या रचनेमध्ये, आणि लोकांच्या स्वभावातसुद्धा !
वेळ काढून कृष्णामाईच्या घाटावर गेलो. तिथलं प्रसन्न वातावरण अनुभवलं. ज्या गल्लीबोळातून टायर फिरवायचो तिथून एक पायी रपेट मारली. काही नातेवाइकांच्या घरी जाऊन भेटून आलो. बऱ्याच जणांनी ओळखलंच नाही.
शक्या इंजिनियर झाला आणि सांगलीत चांगल्या कंपनीत कामाला लागलाय.. दर विकेंडला कराडला येतो. ओमकार सुद्धा बाहेरगावी असतो. प्रवीणचे लग्न झाले आणि त्याला एक मुलगा पण झालाय.

ट्रेकच्या निमित्तानं सगळे परत एकदा भेटलो. खूप बरं वाटलं.

"सोनू काय करते रे शक्या ?" मी सहजच विचारलं.
"काय ल्येका, इथं मी बसलोय माझं काहीतरी विचार की.. सोनू बद्दल बरं विचार्तुयीस" शक्यानं माझ्यावर पडी टाकली.
"गप्प रे .. सांगतो का ती काय करते ते.."
"ल्येका, लग्न झालं तिचं. तुमच्या पुण्यालाच असते. मुलगी पण झाली तिला परवा.. आत्ता आलीये बघ माहेरी आत्ता. जायचं का भेटायला ?" शक्यानं विचारलं.
"अरे नको नको..आत्ता नको, उद्या निघताना धावती भेट घेईन" मी विषय पुढे ढकलला.

जेवता जेवता खिडकीतून समोरच्या उंच इमारतीकडे नजर गेली. आजीच्या वाड्याचं एका पाच मजली इमारतीमध्ये रूपांतर झालेलं. चालायचचं ! सृष्टीच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीत बदल हा होतंच असतो.
कराडच्या आठवणींना उजाळा देऊन घरी निघायची वेळ आली. निघताना सोनुला भेटायचं ठरवलं होतं. पण हिंमत केलीच नाही. भेटू नंतर पुण्यात निवांत असं मनालाच खोटं समजावलं.

तर सांगायचा मुद्दा असा, की काही दिवसांपूर्वी आयुष्यातील अनेक गोष्टींना मी मुकलो असं मला वाटायचं. पण कराडला दिलेल्या एका भेटीनंतर आठवणींचा प्रचंड मोठा खजिना माझ्याबरोबर आहे ह्याची मला जाणीव झाली.
आई जशी तिच्या लहानपणीच्या आठवणी आज मला सांगते, तश्याच काहीश्या आठवणी आज माझ्याकडेही आहेत.
फक्त कराडच्या आणि लहानपणीच्या नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट हि एक आठवणच होणार आहे. मग ते पोरं गोळा करून गेम खेळणं असेल, किंवा चौकात कॉफी पीत गप्पा ठोकणं असेल.
आयटी मधली धावती गाडी असेल, किंवा विकेंडला अनुभवलेला किल्ल्यावरचा निवांतपणा असेल.
आईच्या वाट्याला ज्या आठवणी आल्या आहेत, कदाचित तितक्या समृद्ध नसतील माझ्या आठवणी. पण एक नक्की, माझ्या पुढच्या पिढीला आठवणी सांगताना मी मोकळ्या हाताचा नक्कीच नाही. अजूनही त्यात भर पडणार ह्यात काही शंका नाही.

- भूषण करमरकर
मनोगत वर पूर्वप्रकाशित (सोम., ०१/१०/२०१२ - २३:०६)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults