श्री नृसिंह स्तोत्र

Submitted by पुरंदरे शशांक on 25 May, 2021 - 00:10

श्री नृसिंह स्तोत्र

कडकडकड स्तंभी स्फोट विस्फोट मोठा
गुरगुरगुर व्यापी व्योम पाठी धपाटा

दणदणदण नादे भूमी ती कापताहे
धगधगधग ज्वाळे नेत्र विस्फारताहे

सळसळसळ स्कंधी कुंतले रुळताहे
अकटविकट मुखे सिंह तो गर्जताहे

लखलखलख नेत्री तेज ते फाकताहे
लळलळलळ जिव्हा भक्ष्य ते शोधताहे

झडकरि उचलोनी दैत्य तो घेतलासे
धड न घर न मार्गे उंबर्‍यामाजी बैसे

करकरकर दाती काळ सन्निध भासे
खरखर नख तीक्ष्णे दैत्य तो फाडिलासे

रुधिर गळत देही भीषणे दृष्य सारे
थरथरथर कापे लोकसृष्टी थरारे

फडफडफड प्राणे सोडिले दैत्यराजे
रिपुदमन करोनी सज्जना सोडविजे

शिर नमवुनी पायी भक्त प्रल्हाद भावे
अतिशरणत होता उग्रही शांतवावे
............................................

सदयह्रदय स्वामी रौद्र हे आवरावे
नमवित शिर पायी विनवितो भक्तीप्रेमे

खडतर रिपु साही अंतरी मातलेले
वधुनि सकळ त्याते शुद्ध चित्ता करावे

भजन सहजभावे अंतरी होत जावे
सकल मति स्वभावे त्वत्स्वरुपी भरावे

सदगुण तरी काही अंतरी ते स्थिरावे
ह्रदयी पद प्रभूचे सार्थ ते होत जावे

..........................................

व्योम.... नभ, अंतरिक्ष
स्कंध....खांदा
कुंतले...केस, इथे आयाळ अर्थाने घेणे
काळ....मृत्यू
रुधिर.....रक्त
रिपु दमन....शत्रूंचा (इथे दुष्टांचा) विनाश
रिपु साही .... काम, क्रोधादी सहा रिपु/ शत्रू

श्री लक्ष्मी नृसिंह चरणार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज श्री नृसिंह जयंती
आमचे कुलदैवत व त्या मुळे व्रत
या शुभ मुहूर्तावर हे स्तवन पाठवल्याबद्ल आभारी आहे
श्री लक्ष्मी नृसिंहार्पण मस्तु

Kaay apratim lihilay!! __/\__
Kadhi bhetalat tar mazyakadun chaha due!
(Chaha fakt token mhanun. Kavita faar sundar ahe!)

सुंदर

_/\_

रामदासी शब्दकळा! - अगदी योग्य कौतुक! उभा राहतो प्रसंग डोळ्यासमोर!
पाणी आलं हो डोळ्यात प्रह्लादाचे प्रार्थना शब्द वाचून
अनेक धन्यवाद !
त्रिवार _/\__/\__/\_