"शासकीय तंत्रनिकेतनातलं काॅपी प्रकरण आणि अजून बरेच काही...."पर्व ३रे (सांगता)

Submitted by चंद्रमा on 24 May, 2021 - 06:59

(वाचकांना हा प्रश्न पडला असेल. कथेचं शीर्षक "शासकीय तंत्रनिकेतनातलं कॉपी प्रकरण" आहे पण कॉपी प्रकरण अजून कुठे आढळलेलं नाही तर या कथेची सांगता कॉपी प्रकरणानेच होणार आहे)

...... आता फायनल सेमिस्टर संपत आले होते आणि अंतिम परीक्षेचे वेळापत्रक पण निश्चित झाले. अंतिम सेमिस्टर असल्यामुळे 'एसी' होणे भाग होते.किमान 'अविनाश' आणि 'मनोहरला' तरी, बाकी पांडवांचे विषय बॅक होते. पांडेने तर परीक्षेचा धसकाच घेतला. फायनल चे विषय निघावे म्हणून देवाला साकडे घालू लागला आणि मंगळवारचे व्रत सुद्धा नित्यनियमाने! राजारामने एक्झाम संपेपर्यंत मदिरेला हात न लावण्याची शपथच घेतली आणि मनोहरने कॉलेजच्या प्रत्येक मुलीकडे बहिणीच्या नजरेने बघण्याचा निर्धार केला. अविनाश ला जाम टेन्शन आले होते कारण अंतिम वर्षाचा इन्स्ट्रुमेंटेशन हा विषय खूप अवघड होता आणि तो त्याच्या डोक्यावरून जायचा.
आणि शेवटी शंखनाद झाला. कॉलेजच्या क्लास रुपी रणांगणात 'परीक्षा' नावाचे युद्ध सुरू झाले सर्व सैनिक रुपी परीक्षार्थींनी आपली समशेर घासून धारदार केली.

शासकीय तंत्रनिकेतनात "कॉपी" हा प्रकार होताच! तो बहुतांश कॉलेजमध्ये असतोच! काही सैनिक आमने-सामने शत्रूशी दोन हात करतात तर काही सैनिक गनिमी काव्याने लढण्याचे पसंत करतात. तर हे छुपे सैनिक होते 'कॉपी बहाद्दर' 'मनोहर' ने तर कमालच केली आपल्या हाताला पुन्हा प्लास्टर चढवले आणि त्यावर काही फार्मुली तो लिहायचा आणि त्यावर पुन्हा बँडेज बांधायचा परीक्षेच्या वेळी अलगद ते बँडेज काढायचा आणि प्लास्टर वर लिहिलेले चोरून बघायचा.'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये एक 'मधुमती' नावाची मुलगी होती. तिने तर चक्क पांढऱ्या प्लेन ड्रेसवर समीकरणांची आणि प्रमेयांची नक्षीच काढली पण ती मल्याळम भाषेत आता मल्याळम भाषेत सर्व "ळ" च असतात त्यामुळे ते डिझाईन असल्यासारखेच भासे आणि कम्प्युटर सायन्सच्या अमृताने तर हद्दच पार केली चक्क गुलाबाच्या पाकळी वर कॉपी केली होती. गुलाबाचं फुल घेऊन यायची आणि पाकळ्या उलगडून बघायची तर अशी कॉपी करणाऱ्यांची सैनिक तुकडीच होती नंदनवनात!

सर्व पेपर सुरळीत चालू होते आणि तो दिवस आला अविनाश च्या आयुष्यात 'इन्स्ट्रुमेंटेशन'या विषयाचा पेपर होता. आदल्या रात्री अविनाशने रात्रभर जागून अभ्यास केला तरी पण त्याला खात्री वाटत नव्हती हा पेपर आपण पास करणार म्हणून! मग त्याने डाव्या हातावर काही समीकरणे कॉपी केली आणि लिहलेले झाकण्यासाठी फुल स्लिव्ह शर्ट घातले.अविनाशच्या क्लास रूम मध्ये पर्यवेक्षक म्हणून 'डिटेक्टीव' ची ड्युटी लागली डिटेक्टीव्ह म्हणजे जाॅन मॅथ्यू सर काॅपी पकडण्यात पटाईत! अविनाशने तीन- चार प्रश्न सोडवले पण नंतर त्याला काही जमेना आणि डिटेक्टिव्हच्या भीतीने त्याने हातावरचे काही बघितलेही नव्हते. आता शेवटची पंधरा मिनिटे शिल्लक होती आणि त्याला या समीकरणांची गरज होती पास होण्याकरिता! त्याने हळूच शर्टाचे स्लिव्ह वर केले आणि घाबरत घाबरत बघून लिहू लागला.डिटेक्टीव ला त्याच्या हालचालींवरुन संशय आला. त्याचे एक स्लिव्ह बंद होते आणि एक स्लिव्ह खुले! सर लगेच त्याच्या जवळ आले आणि त्याचा डावा हात बघितला तर त्यावर लिहिलेले आढळले. डिटेक्टिव्हनी सरळ त्याच्या पेपर वर कॉपी चा शेरा मारला.अविनाश ला दरदरून घाम फुटला. त्याचे अवसानच गळाले. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि चक्कर येऊन तिथेच कोलमडला. 'मनोहर' त्याच्या क्लास मध्येच होता त्याने अविनाश ला आधार दिला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते घळाघळा! "यार काय केले मी! आता माझे 'कॅम्पस सिलेक्शन' जाणार! मी नापास होणार!" बाकी पांडवांना पण हे कळाले. ते सर्व त्याचे सांत्वन करु लागले.काही घाबरू नको आपण काहीतरी करू. मग सर्व पांडवाज मिळून प्राचार्यांच्या केबिन मध्ये गेले आणि प्राचार्यांना सांगितले की त्याने रात्री पाठ करण्यासाठी हातावर लिहिले होते आणि सकाळी आंघोळ न केल्यामुळे ते पुसायचे राहून गेले. प्राचार्यांनी 'जॉन मॅथ्यू' सरांना बोलावून घेतले पण डिटेक्टिव्ह ने सांगितले, "नाही हे खोटे बोलताय चक्क! मी कॉपी करताना म्हात्रेला बघितले." ते काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते मग सर्व पांडव निराश होऊन माघारी परतले.

'गोट्या' आपल्या गावी परतला. दुसऱ्या दिवशी एक्झाम नव्हती. अविनाशचा विचार सारखा त्याच्या डोक्यात घोळत होता. 'गोट्या' टॉयलेट कडे गेला आणि विचार करू लागला की या कॉपी प्रकरणातून अविनाश ला बाहेर कसे काढता येईल कारण सर्व युक्त्या त्याला टॉयलेटला गेल्यावर सुचत असतं कारण तिथे एकांतवास असायचा. आणि त्याला युक्ती मिळाली. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली बस पकडून तो होस्टेलला आला आणि अविनाश ला भेटला."अव्या जर तुला संधी मिळाली या कॉपी प्रकरणातून बाहेर पडण्याची तर तू काही पण करायला तयार होशील." अविनाश म्हणाला, "हो मी काही पण करायला तयार आहे. पण कसे?" आता मनोहर पण आला होता मग त्याने तो गोपनीय प्लान सांगितला. "तुला सुसाईड अटेम्प्ट करावा लागेल." "सुसाईड" असे म्हणत अविनाश ओरडला. "अरे यार ऐकून तर घे""जर तू असा प्रयत्न केला आणि कॉलेज प्रशासनाला माहित झाले तर कॉलेज हे प्रकरण बाहेर जाऊ देणार नाही कारण कॉलेजची बदनामी होईल. आणि तुला कॉपी केस मधून बाहेर काढतील जेणेकरून तू असे काही पुन्हा करू नये म्हणून! प्लान साधा सरळ आहे." मनोहर आश्चर्याने म्हणाला "साधा! अरे यार गोट्या काही काय बोलतोय! बिंग फुटले तर आपण सर्व रस्टीकेट होऊ‌" कोण सांगणार आहे हे सर्व आपल्या ग्रुप लाच माहीत असणार फक्त! गोट्या बोलला!
पांडेला आणि राजारामला पण बोलावून घेतले. त्यांना सर्व रितसर माहिती दिली. सर्वानुमते प्लानला संमती मिळाली. मग ठरलं तर 'मिशन टॅंगो'.
आता सर्व सामानाची जमवाजमव करायची होती. दिवस आजचाच शिल्लक होता आणि दुसऱ्या दिवशी शेवटचा पेपर! मग सर्व 'पांडवाज' मार्केटमध्ये आले हार्डवेअरच्या दुकानात! गोट्या म्हणाला," भाऊ आठ ते दहा फुटांच्या दोरखंड पाहिजे आहे." दुकानदाराने त्याच्याकडे संशयाने बघितले आणि म्हणाला, "कशासाठी? काय फासाबिसावर लटकायचे आहे का?" तो मिश्किलपणे हसला. "कुठल्या कॉलेज चे तुम्ही आधी कागदावर लिहून आणा आणि त्याखाली प्राचार्यांची सही पाहिजे तेव्हाच दोरखंड मिळेल." सर्व डोळे विस्फारून दुकानदाराकडे बघू लागले.कारण कोणालाही माहिती नव्हतं की दोरखंड घेण्यासाठी परवानगी लागते म्हणून! मग ते दुसऱ्या दुकानाकडे वळले त्याने पण परमिशन लागेल म्हणून सांगितलं. आता काय करायचं मग गोट्याने शक्कल लढविली. आपण गर्दी असलेल्या दुकानात जाऊ. मग सर्व तिसऱ्या दुकानात आले दुकानदाराकडे न जाता ते कामगाराकडे गेले.गोट्या बोलला, "काका आम्ही कॉलेजमध्ये शिकतो आहो. आम्हाला प्रोजेक्टसाठी आठ ते दहा फुटांचा दोरखंड हवा आहे." "आठ ते दहा फूट फक्त." कामगार उद्गारला. पांडे लगेच म्हणाला "काका इलेक्ट्रीक पोलवर चढण्यासाठी उपयोगात येणारा पाळणा तयार करायचा आहे." आम्हाला त्याकरीता हवा आहे." पांडेच्या युक्तीवादाचे आंम्हा सर्वांना आश्चर्य वाटले आणि अभिमानही! दुकानात गर्दी होती. त्याने जास्त विचार न करता दहा फुटाचा दोरखंड कापून आम्हास देऊन टाकला. सर्वांनी हुश्श केलं!
मग गोट्याच्या मनात विचार आला जर फाशीचा प्लॅन यशस्वी नाही झाला तर बॅकअप प्लान साठी आपल्याकडे पॉइजन जवळ असायला हवे मग त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन उंदीर मारण्याचे औषध घेतले.आता सर्वजण होस्टेलच्या टेरेसवर एकत्र आले. सर्वप्रथम फाशीचा फास तयार करायचा होता पण तो काही पांडवांना जमेना कारण ते हे सर्व प्रथमत: करीत होते. मग शेवटी राजाराम त्यात यशस्वी झाला. उद्या योजनेला सुरुवात कशी करायची सर्वप्रथम सुसाईड लेटर लिहायचे होते. मग गोट्याने मजकूर बनविला.
मी 'अविनाश म्हात्रे' अंतिम वर्ष इलेक्ट्रिकल्सचा विद्यार्थी 'शासकीय तंत्रनिकेतन नंदनवन' येथे शिकतो. कॉलेजमध्ये माझे कॅम्पस सिलेक्शन झालेले आहे पण फायनल एक्झाम मध्ये माझा काहीही दोष नसताना मला कॉपी प्रकरणात अडकवण्यात आले. यास सर्वस्वी कॉलेज प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे माझे करियर सुरु होण्या आधीच संपले. मी माझ्या आई-वडिलांना नापास विद्यार्थी म्हणून तोंड नाही दाखवू शकणार. त्यांच्या सर्व इच्छा- आकांक्षा ची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे मी माझे जीवन संपविण्याचा निर्णय घेत आहे.
आपला आज्ञाधारक विद्यार्थी
अविनाश म्हात्रे.
नंतर गोट्याने विचार केला कॉलेज प्रशासनाचे नाव टाकले म्हणजे प्रकरण आपल्याच अंगलट येईल मग त्याने मजकूर बदलला आणि कॉलेज प्रशासना ऐवजी मीच म्हणजे अविनाश म्हात्रे सर्वस्वी जबाबदार आहे. असा बदल केला आणि हे सर्व अविनाश च्या हस्ताक्षरा मध्येच लिहून घेतले इन केस पोलीस केस झाली तर संशय यायला नको.
आता उद्या दहाला पेपर आहे तो पेपर संपण्याच्या अर्ध्या तास आधी तू म्हणजे अविनाशने उठायचे आणि बाहेर यायचे मी आणि राजाराम तुला बाहेरच भेटणार आणि तुला म्हणणार "काय अव्या आज काही कॉपी नाही केली का!"तू जाम भडकणार आणि माझ्या कानशिलात मारणार आणि हॉस्टेल कडे पळत सुटणार.
मी आणि राजाराम दहा मिनिटानंतर तुझ्या रूम कडे येणार आणि दार ठोठावणार तू आधीच दाराच्या टीचकणीचे स्क्रू काढून ठेवायचे म्हणजे जोरात धक्का मारल्यानंतर दार आपोआप घडणार आणि विशेष म्हणजे टेबलावर उंदराचे औषध आणि सुसाईड लेटर काढून ठेवायचे. तू फक्त फास गळ्यात टाकून ठेवायचा.नंतर पांडे कालवा करणार, "अविनाश फाशी घेत आहे. अविनाश फाशी घेत आहे" आणि दोन्ही विंगच्या विद्यार्थ्यांना एकत्र करणार. होस्टेलच्या ऑफिसला मी जाणार आणि वार्डन ला बोलावून आणणार आणि अव्या तू राजाराम च्या कुशीत काहीही न बोलता फक्त रडत बसायचं.
मग ठरलं तर उद्या प्लान फत्ते करायचा सर्वांनी! एकमेकांच्या हातावर हात ठेवून हळूच आवाजात ओरडले 'मिशन टँगो'!
परीक्षेचा शेवटचा दिवस होता. धाकधूक तर होतीच मनामध्ये प्लॅन फिस्कटणार तर नाही ना गोट्याचे काही मन लागत नव्हते पेपर मध्ये कारण त्याला कसेतरी अविनाशला कॉपी प्रकरणातून बाहेर काढायचे होते कारण त्याचे कॅम्पस सिलेक्शन झाले होते. अविनाश गरीब घरातला शेतकऱ्यांचा मुलगा होता आणि या सिलेक्शन मुळे त्याची परिस्थिती पालटणार होती.एका तासातच पेपर लिहून 'गोट्या' उठला आणि 'राजाराम' व 'पांडे' ची वाट बघू लागला. 'अविनाश' अर्ध्या तासानी येणार होता पण त्याची काही येण्याची चिन्हे दिसेना आता पेपर सुटायला दहा मिनिटे शिल्लक होती मग अव्या येताना दिसला तो 'गोट्या' जवळ न येताच पुढे निघून गेला गोट्याला वाटले 'अविनाश' घाबरला. मग गोट्या,'राजाराम' आणि 'पांडे' त्याच्या रूम कडे निघाले. 'मनोहर' होस्टेललाच होता. राजारामने दार ठोठावले आणि खिडकीच्या फटीतून बघितले अविनाश लगबगीने दोरखंड फॅनला लटकवण्याचा प्रयत्न करीत होता. गोट्याने जोरजोरात दार वाजवायला सुरू केले पण दाराची टीचकनी काही केल्या निघेना! मग अविनाशनेच खाली येऊन ती टिचकणी पटकन काढली. आम्ही दार जोरात उघडल्याचा आव केला तर अविनाश बरोबर पोझिशन मध्ये होता गळ्यात फास लटकवून! टेबल वरून जस्ट स्वत:ला ढकलणार तोच राजाराम आणि मनोहर ने त्याचे पाय पकडले. ठरल्याप्रमाणे पांडेनी कालवाकालव सुरु केली. "अविनाश फासावर लटकला, अविनाश फासावर लटकला" सर्व मुले गोळा झाली. गोट्याने तडक ऑफिस गाठले आणि वार्डन ला घेऊन आला. प्लॅनप्रमाणे अविनाश राजाराम च्या कुशीत मुसमुसून रडत होता आणि पांडवाज मनातल्या मनात हसत होते.
हे सुसाईड प्रकरण प्राचार्यां पर्यंत गेले. दुसऱ्या दिवशी प्राचार्यांनी अविनाश ला घरी बोलावून घेतले. प्राचार्यांचा बंगला कॉलेजमध्येच होता. त्यांनी त्याची काळजीने विचारपूस केली आणि सहृदय सांत्वन केले. त्याला जेवण खाऊ घातले. आपल्या घरी बोलण्यासाठी त्याला स्वतःचा फोन पण दिला.अविनाशची मज्जा होती.
आणि अखेर अविनाश चे नाव कॉपी प्रकरणातून बाहेर निघाले आणि त्याचे कॅम्पस सिलेक्शन पक्के झाले.गोट्याने ही गोष्ट तर आपल्या घरी पण सांगितली आई-बाबांना म्हणजे खरी नाही हो खोटी! अविनाशने सुसाईड अटेम्प्ट केले म्हणून! वातावरणनिर्मिती असावी तर ती चहुबाजूंनी याबाबतीत गोट्याला मानलं पाहिजे हं! या 'टॅंगो' प्रकरणाचा तपास झाला असता तर संपूर्ण पांडवाज कॉलेजमधून रस्टीकेट झाले असते पण सुदैवाने तसे काही घडले नाही कारण तो प्रयत्न एखाद्याचे करिअर घडविण्यासाठी केला होता.आता कॉलेज संपले होते सर्वजण आपापल्या घरी होते.
खरच जीवास जीव देणारे मित्र फार दुर्मिळ असतात बरे‌.खरे मित्र नशिबानेच मिळतात. ते सागरात मिळणाऱ्या दुर्मिळ मोत्यासारखे असतात तर कधी अरण्यातल्या मृगाच्या कस्तुरी सारखे! "चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच आपला खरा मित्र असतो" 'मैत्री' ही सहवासातून निर्माण होत नाही तर ती विचारांच्या जुळणीतून निर्माण होते. वीणेच्या तारा वरून कधीही बोट फिरवले तर त्यातून आल्हाद देणारा स्वरच निघतो पण खऱ्या मित्राच्या तारा अशा नसतात. तो मित्राला जागृत ठेवण्याच्या वेळी वज्रासारखा कठोर तर सुखावणाच्या वेळी फुलासारखा कोमल असतो. "समुद्रातील शिंपल्यांनी नेहमी आशेने उन्मिलीत असावे बरे कारण स्वातीच्या जलधारा केव्हा पडतील आणि त्याचे जलबिंदू शिंपल्यामध्ये शिरून 'मोती' केव्हा होतील याचा काय नियम!"

.........रीझल्टचा दिवस आला. सर्व पांडवाज आज पुन्हा बाबाच्या मठाखाली एकत्र आले. आज 'थोडी खुशी थोडा गम' था कारण 'अविनाश' आणि 'मनोहर' ऑल क्लिअर झाले होते तर 'गोट्या', 'राजाराम' आणि 'पांडे' तिघेही फेल झाले होते. पण आनंद होता तो अविनाश च्या कॅम्पस सिलेक्शन चा! त्याला छान एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी लागली होती. सर्वजण त्या आंब्याच्या झाडाखाली बसले आणि या तीन वर्षात आपण कुठे कुठे दंगा केला या सर्व घटनांची उजळणी करू लागले. सर्वांचे मन भरून आले होते. डोळे पाणावले होते कारण पांडवाज आता विभक्त होणार होते. 'अविनाश' तर गोट्याला मिठी मारून खूप रडत होता. गोट्याने त्याचे सांत्वन केले आणि आपल्या भात्यातून अखेरचे ब्रह्मास्त्र काढले.

"राह ऐसी हो जो चलने पे मजबूर करें,
उम्मीद ऐसी हो जो जीने को मजबूर करें!
महक कभी कम ना हो दोस्ती की;
दोस्ती ऐसी हो जो मिलने को मजबूर करें!!"
आज हृदय खूप जड झाले होते सर्वांचे! हे दिवस आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही, फक्त आठवणी राहतील त्या, या काळजामध्ये! आठवणी मिठाई प्रमाणे असतात एक तुकडा खाल्ला तरी दुसरा पुन्हा खावासा वाटतो. सर्वांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि एक ग्रुप फोटो घेतला बाबाच्या मठामध्ये! पुन्हा भेटण्याचा इरादा करून सर्व आपापल्या वाटेने निघून गेले.....................................

तर असे हे ,"शासकीय तंत्रनिकेतनातलं कॉपी प्रकरण" खरतर ही कथेमधली पात्र माझी एक कल्पना होती पण खरच असे 'पांडवाज' असते तर मला त्यांना कडकडून मिठी मारावीशी वाटली असती. 'शायर गोट्या', 'स्कॉलर अविनाश', 'मद्यप्रेमी राजाराम', 'डिलिव्हरी बॉय पांडे' आणि 'प्रेमवीर मनोहर' खरच खूप मज्जा आली असती! तर मायबोलीकर आपल्याला आपल्या महाविद्यालयात असे पांडवास मिळाले. मिळाले असतील तर कृपया आपण आपला अनुभव व्यक्त करावा ही नम्र विनंती!!!!!!

"साहिल पर सागर के खजाने नहीं आते
जीवन में फिर दोस्त पुराने नहीं आते,
उड़ने दो शोक परिंदों को लाख हवाओं में;
फिर लौटकर कॉलेज के जमाने नहीं आते!!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली तुमची कथा...!
पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला...
छान लिहितायं...लिहित रहा...!